समाजसुधारकांच्या महाराष्ट्रात अजूनही काही अनिष्ट प्रथा चालू आहेत. स्त्रियांचे केशवपन त्यापैकी एक. महाराष्ट्र अंनिसच्या जळगाव शाखेने याबाबत प्रबोधन मोहीम राबविले. त्याचा हा वृत्तांत.
लोण ग्रामस्थांना महाराष्ट्र अंनिसचे आवाहन.
अंमळनेर तालुक्यातील लोण(दर्ग्याचे) या गावात दरवर्षी राम नवमीच्या दिवशी मुली व तरूणींचे मुंडन करण्याची प्रथा सुरू आहे. या प्रथेमुळे काही मुलींचे सक्तीने मुंडन(केशवपन) केले जाते. ही कालबाह्य, अमानुष व महिलांवर अत्याचार करणारी प्रथा असल्यामुळे ती तत्काळ बंद करावी, ‘मुलींच्या मुंडन प्रथेला एप्रिल फूल करावे’, असे विनम्र आवाहन लोण ग्रामस्थांना महाराष्ट्र अंनिसच्या वतीने कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.
दि. 1 एप्रिल रोजी रामनवमी असल्याने सालाबादप्रमाणे लोण गावातील ग्रामस्थ आपल्या गावातील मुलांचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी अंधश्रद्ध मानसिकतेतून आपल्याच काही मुलींचे, तरूणींचे जाहीर मुंडन(केशवपन) करतात, अशी तक्रार एरंडोलस्थित ‘परत मातृभूमीकडे’ पुस्तकाचे लेखक डॉ.संग्राम पाटील यांनी समितीकडे केली होती. त्यानुसार सदर प्रकाराबाबत अंमळनेरचे तहसीलदार प्रमोद हाके यांना जळगाव जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र अंनिसतर्फे मागणी करण्यात आली की, लोण ग्रामस्थांशी संवाद करून त्यांना मुलींच्या केशवपनाची प्रथा बंद करण्याचे आवाहन करावे, त्यासाठी समितीचे कार्यकर्ते गावकर्यांशी जाऊन बोलायला तयार आहेत. अन्यथा तालुका दंडाधिकारी म्हणून योग्य कायदेशीर कारवाई करावी.
आपल्याच मुलीचे मुंडन केल्यामुळे गावातील मुलांचे आरोग्य कसे काय सुरक्षित होऊ शकेल? हा प्रश्न उपस्थित करून आरोग्य संवर्धनाची स्थिती, आवश्यकता व उपलब्ध उपायांची चर्चा लोण गावकर्यांशी करण्याची गरज महाराष्ट्र अंनिसला जाणवते आहे. त्यांच्याशी होणार्या संवादातूनच व प्रबोधनातून जाणवते आहे. त्यांच्यामध्ये कालसुसंगत होण्याचे आणि कालबाह्य, निरर्थक, दिशाभूल करणार्या रूढी-प्रथा-परंपरा टाकून देण्याचे आवश्यक परिवर्तन निर्माण होऊ शकेल असे वाटते. त्यादृष्टीने समिती तालुका व जिल्हा प्रशासनाला संपूर्ण तज्ञ सहकार्य द्यायला तयार आहे.
पुरोगामीत्वाचा संत-समाज सुधारकांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात सती प्रथा, बाल विवाह, स्त्री शिक्षणावर बंदी, विधवा केशवपन आदी महिलांवरील अन्यायकारक प्रथांचे निर्मूलन केले गेलेले आहे. केशवपन बंद करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी नाभिक समाज बांधवांचा संप 150 वर्षांपूर्वी घडवून आणला होता. सती व देवदासी प्रथा विरोधी कायदे आज अस्तित्वात आहेत. अशा पार्श्वभूमीवर जर जळगाव जिल्ह्यात लोण ग्रामस्थ मुलींचे केशवपन अंधश्रद्ध मानसिकतेतून करीत असतील तर त्यांना प्रथमत: प्रबोधनाने व न ऐकल्यास प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाईने परावृत्त करण्याची गरज आहे असे समितीला वाटते.
आपल्या देशातील कल्याणकारी सरकारचे प्रतिनिधी म्हणून प्रशासनातील अधिकार्यांनी व लोकप्रतिनिधींनी स्वत:हून अशा कालबाह्य, मानसिक गुलामगिरी रूजविणार्या प्रथांच्या विरोधात भूमिका घेऊन कारवाई करण्याची आवश्यकता आहे, किंबहुना, भारतीय नागरिक म्हणून ते आपले कर्तव्यपण आहे. याच भूमिकेतून तहसीलदारांना निवेदन देऊन व लोण ग्रामस्थांना प्रथा बंद करण्याचे आवाहन महाराष्ट्र अंनिसचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत जगदाळे, जिल्हा कार्यवाह डॉ.अय्युब पिंजारी, जिल्हा समन्वयक डी.एस.कट्यारे, भारतीताई गाला, प्रा.शिला पाटील, किशोर पाटील आदींनी केले.
या निवेदनानंतर समितीने अंमळनेरचे तहसीलदार व पोलीस यंत्रणांना केशवपन प्रथेविरोधात कृती करण्याचे आवाहन केले. पण त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. प्रथा चालू राहिली पण आवाज उठला हेही नसे थोडके.
रामनवमीचे औचित्य साधून लोण बुद्रुक(दर्ग्याचे) येथील 15 महिलांचे मुंडण झालेच. अंनिसने या प्रथेविरूद्ध उठवलेला आवाज पोलिस आणि प्रशासनाच्या साक्षीने दडपला गेला. महिलांनी मुंडण केल्याने मुलांची इडा-पिडा टळते, त्यांचे आरोग्य उत्तम राहते, अशी अंधश्रद्धा या गावाच्या मानगुटीवर 50 वर्षांपासून बसलेली आहे. ‘अंनिस’च्या प्रयत्नांनी महिलांचे मुंडण टळलेले नसले तरी अंधश्रद्धेने धरलेल्या लोणकरांच्या मानगुटीची पकड पहिल्यांदाच हलली जरूर आहे.
वानखेडे कुळाचे कुलदैवत असलेल्या इंदासिनीदेवीची यात्रा लोणला भरलेली होती. वानखडे कुळातील कुटुंबांत पहिल्या पुत्रप्राप्तीनंतर जावळ काढून झाले तरी शेंडी ठेवली जाते. नंतर शेंडी उतरवण्याचा कार्यक्रम या इंदासिनीदेवीच्या यात्रेत होतो. बाळाची शेंडी उतरवून झाली, की बाळाच्या आईचे मुंडण केले जाते. पन्नास वर्षांपासून लोण बुद्रुक, लोण चारम, मुडी बोदर्डे व परिसरातील गावांत राहणार्या वानखेडे कुळाच्या कुटुंबातून ही प्रथा सुरू आहे. यात्रेत बोकडबळीचीही प्रथा होती. वानखेडे कुळातील लोण येथीलच रहिवासी गुलाबराव गैंदल पाटील, शिवाजीराव पाटील, संतोष पाटील, यशवंत पाटील, रवींद्र पाटील, दादाभाऊ पाटील, सुदाम भिका पाटील आदींच्या पुढाकाराने ती बंद झाली. आता इंदासिनीदेवीला वरण-भाताचा नैवेद्य दाखविला जातो. गावातील या मान्यवरांसह इतरांशीही बोकडबळीची प्रथा घालवली तशी केशबळीची ही प्रथाही आता घालवा म्हणून अंनिसच्या स्वयंस्फूर्त कार्यकर्त्यांनी सांगून-समजावून पाहिले, काहींनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकलेही, पण परिणाम साधला गेला नाही.
‘प्रशासनाने काहीच केले नाही’
अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले की, अंमळनेरचे तहसीलदार प्रमोद घुले व पोलीस अधिकार्यांशी चर्चा झाली होती. त्यांनी मुली, महिलांचे मुंडण होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले. तसेच लोण येथे स्वत: उपस्थित राहून संबंधितांना रोखू, असे सांगितले होते. तहसीलदार लोणला गेलेच नाहीत. पोलीस अधिकारी गेले; पण एकाच जागी कोपर्यात बसून राहिले. त्यामुळे मुंडणाचा विधी झाला. प्रथेसंबंधी झालेल्या मुंडणचे छायाचित्र मिळवले जात आहे. हा पुरावा हाती मिळाल्यावर प्रशासनालाही जाब विचारू व संघटनेच्या पातळीवर योग्य तो निर्णय घेऊ. मुली, महिलांना सक्तीने मुंडणाची प्रथा रोखण्यासाठी प्रयत्न करू.
– अविनाश पाटील