पुसद(जि.यवतमाळ) येथे अल्पवयीन मुलीस पळवून नेणार्या महादेव संपत लोखंडे(वय 65 रा.टिटवन) या कथित साधूला जलदगती न्यायालयाचे न्यायाधीश ए.एम.वैद्य यांनी दोन वर्षे सश्रम कारावास व दोनशे रूपयांची दंडाची शिक्षा ठोठावली.
आरोपी महादेव संपत लोखंडे याची मागील दहा वर्षांपासून फिर्यादीच्या चिखली कॅम्प येथील घरी ये-जा होती. काही दिवस तो मुक्कामी राहत असे. 24 जानेवारी 2010 रोजी फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस यात्रेचे निमित्त करून टिटवन(बार्शी टाकळी) येथे नेले. येथून नवेगाव काळमाथा येथे पळविले. घटनेच्या दिवशी मुलगी परत न आल्याने शोधाशोध केल्यानंतर 28 जानेवारी रोजी पुसद ग्रामीण पोलिसात तक्रार करण्यात आली.
शोध घेतला असता ती आरोपीसोबत नवेगाव येथे असल्याचे आढळून आले. मुलीच्या जीवास धोका असल्याचा फिर्यादीने 15 फेबु्रवारी रोजी तक्रार नोंदविली त्यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली व मुलीला वडिलांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी आरोपीविरूद्ध ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सुनावणी होऊन 12 साक्षी तपासण्यात आल्या. याप्रकरणी कथित साधूवर गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीला कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारच्यावतीने अॅड.सुधाकर राठोड यांनी बाजू मांडली.