Categories
व्यक्तिविशेष

मुस्लिम सत्यशोधक मंडळ

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

नाशिक येथे ज्येष्ठ समाजवादी नेते माधवराव लिमये यांनी राष्ट्रीय एकात्मता या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. 1981 साली विश्वहिंदू परिषदेने जनजागरण यात्रा आयोजित केली होती. निमीत्त होते मीनाक्षी पुरम येथे काही दलितांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. हिंदुधर्म खत-यात असल्याची घोषणा करून ही जनजागरण यात्रा काढण्यात आली. या यात्रेच्या मार्गावर पुणे सहित अनेक ठिकाणी हिंसाचार झाला होता. पुण्यातील लकी व सनराइज या दोन इराणी हॉटेलना आगी लावण्यात आल्या. या सर्व पार्श्वभूमिवर नाशिकमध्ये राष्ट्रीय एकात्मता या विषयावर परिसंवाद होता. वक्ते होते डॉ. अरूण लिमये व डॉ. नरेंद्र दाभोलकर, अरूण लिमयेच्या विनंती वरून मी ही नाशिकला गेलो त्यावेळी प्रथमच डॉ. नरेंद्र दाभोलकरांची ओळख झाली व त्याचे रूपांतर मैत्रीत झाले. नाशिकमधील डॉ. दाभोळकरांचे भाषण मला खुपच आवडले. अतिशय मुद्देसुद, प्रभावी व सोप्या भाषेतले, विषयाला धरून ते भाषण होते. पुढे चळवळीमध्ये काम करताना डॉ. दाभोळकरांशी वारंवार संबंध येत गेला. साप्ताहिक साधनाचे संपादकत्व त्यांनी स्वीकारल्यावर आम्हाला चळवळीच्या दृष्टीने हक्काचे स्थान प्राप्त झाल्यासारखे झाले. मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेपासून साधना मंडळाचा संबंध घनिष्ट होता. साधना म्हणजे मु.स.मंडळाचे जणु मुखपत्रच होते. नंतरच्या ही काळात साधनेची ही भुमिका कायम राहिली. हमीद दलवाई यांच्या भाषणेचे वृत्तांत साधनेत येत असत. नंतर यातील काही महत्त्वाच्या लेखाची पुस्तिकापण साधनेने प्रकाशित केली. डॉ. दाभोळकर यांनी साधनाचे संपादक म्हणून काम करताना मुस्लीम समाजातील परिवर्तनवादी चळवळीतली कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. फक्त सत्यशोधकच नव्हे तर रजिया पटेल, शब्बीर भाई शेख

(अ.नि.स.करमाळा), असगरअली इंजीनीयर या सह अनेकांना साधनेत यथा योग्य स्थान मिळाले. काही महत्वाच्या अंकाच्या संपादनामध्ये रजिया पटेल हिचा सहभाग घेतला गेला.

मेहरून्निसा दलवाई या हमीद दलवाईच्या पत्नी. हमीद दलवाईंचा संसार नोकरी करून चालवला. 1966 साली हमीद दलवाईने समान नागरी कायदयाच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्च्यात मेहरून्निसा होत्या. हमीद दलवाईनंतर त्यांनी चळवळीमध्ये सक्रिय होण्याचा प्रयत्न केला. त्यांना हमीद भाईंच्या आठवणी व नंतरची वाटचाल यावर पुस्तक लिहिले. मेहरून्निसा या ऊर्दू भाषेत शिकलेल्या मराठी भाषेशी फारसा संबंध आला नाही पण काम चलाऊ मराठी बोलतात. पुस्तकाच्या लिखाणात सरिता पत्की या ज्येष्ठ लेखिका व कवियत्री यांचा सिंहाचा वाटा आहे. सदर पुस्तक साधनेने प्रकाशित केले. “मी भरून पावले आहे” हे साधनेचे प्रकाशित पुस्तक मेहरून्निसाबाईंची ओळख समाजाला करून देण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरले.

हमीद दलवाई यांनी मृत्युपूर्वी एक पुस्तक लिहून ठेवले होते या पुस्तकाचे हस्त लिखीत मौज प्रकाशनाचे श्री. पु.भागवत यांच्याकडे होते. ते प्रकाशित करण्यापूर्वी काही संदर्भाबदल त्यांना शंका होती. संदर्भ गोळा करण्याचे काम मे.पु.रेगे व त्यांचे सहकारी करत आहेत ते झाले की पुस्तक प्रकाशित होईल अशी भुमिका श्री. पु.नीं घेतली होती. 1977 साली हमीद भाईंचे निधन झाले त्यानंतर 20 वर्षांनी देखील हे पुस्तक प्रकाशित होऊनये ही चिंतेची बाब होती. हमीद भाईंच्या लिखाणाला लोकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी चळवळीची होती. त्यांच्या लिखणावर एखाद्या व्यक्तिचा अधिकार पोहचू शकत नव्हता. थोडीशी कटूता आलीतरी चालेल पण पुस्तक तर प्रकाशित व्हायलाच हवे. अशी मी भुमिका घेतली. मेहरून्निसा भाभींनीही त्याला संमती दिली. दाभोळकरांशी चर्चा केली. त्यांनी पुस्तक प्रकाशित करण्याचे आश्वासन दिले. आम्ही ते हस्तलिखीत भागवंताच्या कडून घेऊन आलो. हमीदभाईच्या निधनानंतर जवळपास 25 वर्षांनी ते पुस्तक लोकापर्यंत पोहचले. डॉ. दाभोळकरांनी साधना प्रकाशनामार्फत ते पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकात हमीद दलवाई यांनी सावरकर, गोळवलकर इ. संघ व हिंदुत्वादी नेत्यांच्या भुमिकांवर टीका केली आहे. हमीद दलवाईची सेक्युलराझिमची परिपूर्ण भुमिका समजुन घ्यायला हे पुस्तक महत्वाचे आहे. डॉ. दाभोळकर नसते तर हे पुस्तक प्रकाशित होऊ शकले असते का? या बदल शंका आहे.

साधनेला 50 वर्ष पूर्ण झाली त्या निमीत्ताने साधनेत महत्वाचे लेख संकलित करून त्याचे विविध विषयात वर्गीकरण करून प्रकाशित करण्याची महत्वकांक्षी योजना डॉ. दाभोळकर व मा. रा.ग.जाधव यांनी आखली. या खंडात काही विषयावरच्या आलेल्या लेखाचा धावता आढावा घेण्याचे ठरले होते. त्या प्रमाणे मुस्लीम प्रश्नावरच्या लेखांवर आधारित आढावा घेण्यात लेख लिहिण्याची संधी मला दाभोळकरांनी दिली. हा लेख लिहण्यासाठी अगदी 50 वर्षापूर्वीच्या (अगदी पहिल्या अंकापासून) अंकातील लेख पाहण्याची मला संधी मिळाली. हे जुने अंक चालताना माहिती नसलेल्या अनेक गोष्टी मला माहित झाल्या. एका अर्थाने मुस्लीम सत्यशोधक चळवळीचा इतिहासाच वाचायची संधी मिळाली. साधनेतला हा लेख ज्या वेळी मी लिहिला त्या वेळी मी मुस्लीम सत्यशोधक मंडळात वा त्या चळवळीत नव्हतो. या चळवळीच्या लोकांपासून मी दूर गेलो होतो, व आजही मी मुस्लीम सत्यशोधक चळवळीत नाही. गुजरातच्या दंगलीच्या वेळी मंडळाच्या नेत्यांनी चुकीची भुमिका घेतली होती. त्या आधी पण अनेक मुद्यावरून माझे मु.स.मंडळाच्या नेत्यांबरोबर वैचारिक मतभेद झाले होते. म्हणून मी चळवळीपासून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. माझी ही भुमिका डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना ती पटली होती की नाही ते काही सांगता येत नाही. पण त्यांनी ती भुमिका तपशीलासह ऐकून व समजुन घेतली होती व त्या नंतर मला साधनेच्या या इतिहास संकलित करणार्‍या ग्रंथासाठी लेख लिहण्यास सांगितले होते. माझ्यावर त्यांनी दाखवलेला विश्वास आश्वसक होता.

मुंबईतील हाजीअली दर्ग्यात स्त्रियांनी प्रवेश करू नये असा फतवा निघाला यावर एका वाहिनीवर चर्चा आयोजित केली होती त्यात डॉ. दाभोळकर सहभागी झाले होते. यात त्यांनी धर्माचा आदेश महत्वाचा की संविधानातील अधिकार असा प्रश्न उपस्थित केला होता. एका अर्थाने मुस्लीम परिवर्तनवादी चळवळीचीच भुमिका त्यांनी मांडली.

गुजरातच्या डांग जिल्हामध्ये ख्रिश्चनाच्यावर हिंदुत्वाद्यांनी हल्ले केले होते. त्या घटनेची पाहणी करून अहवाल तयार करण्यासाठी एक सत्यशोधक तुकडी डांग येथे गेली होती. गोव्यातील जे.पी चळवळीतील गांधीवादी कार्यकर्तेश्री कलानंद मणीयांच्या पीसफुल सोयायटीतर्फे ही टीम गेली होती. त्यांच्या पाहणीवर आधारित एक दीर्घ लेख मी लिहिला. डॉ. दाभोळकरांना तो खुपच आवडला. त्यांनी तो अंकात घेतला व त्या अंकाची कव्हर स्टोरी त्या लेखावर आधारित केली. अंक प्रकाशित झाल्यानंतर स्नेहसदनचे फादर बर्टी यांनी साधनेतून काही अंक विकत घेऊन स्वखर्चाने काही मित्रांना पाठवले. चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे, लिहिते करणे हे संपादन म्हणून त्यांनी उत्तम रीत्या केले.

अंधश्रद्धा निमूर्लन समितीतर्फे डॉ. दाभोळकरांनी पुण्यात इस्लाम व अंधश्रद्धा या विषयावर डॉ. असगरअली इंजीनीयर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानात डॉ. इंजिनियरांनी इस्लाममध्ये कुराणात कशी अंधश्रद्धा नाही हे विस्ताराने मांडले. नंतर आमची भेट झाल्यावर मी त्यांना सांगितले की मुसलमानातील अंधश्रद्धा हा विषय व्याख्यानासाठी निवडायला हवा होता. त्यांनी ते हसत हसत स्वीकारले. अंतिमच्या चळवळीत अनेक मुस्लीम कार्यकर्ते सहभागी झाले. जे व्यापक चळवळीचा विचार स्वीकारण्याची प्राथमिक भुमिका येथे तयार होते.

अन्वर राजन