Categories
संपादकीय

नकाशाचे फडफडणे आणि धरणीकंप

मे - २०१९

प्रख्यात नाटककार राम गणेश गडकरी यांच्या एका नाटकातील एक सुभाषित सद्याच्या राजकीय रणधुमाळीत संबंधितांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरेल. भिंतीवर नकाशा फडफडला म्हणून देशात धरणीकंप होत नाही, हेच ते सुभाषित. राजकारण हा काही अंनिसचा विषय नाही; पण क्षेत्र कोणतेही असो, त्यामध्ये अंधविश्वास आणि अविवेकाचा घोष केला जात असेल, तर त्याचा समाचार घेणे हे आमचे कर्तव्य ठरते.

प्रज्ञासिंग ठाकूर या स्वत:ला साध्वी समजणार्‍या एका पक्षाच्या समर्थक बाईंनी हुतात्मा करकरे यांच्याबद्दल जे अनुदार भाष्य केले ते विवेकाला धरून नाही. त्या म्हणाल्या की, “हेमंत करकरे यांनी माझा तुरुंगात जो छळ केला त्याच्या शापामुळेच करकरे अतिरेक्यांकडून मारले गेले.” हेमंत करकरे हे एक वस्तुनिष्ठ तपास करणार आणि कर्तव्यकठोर असे अधिकारी होते. अतिरेकी मग ते कोणत्याही धर्मातील असोत, त्यांच्याविरोधात पुरावा मिळाला, तर ते आपले कर्तव्य बजावण्यात कसूर करत नसत. साध्वी प्रज्ञासिंग यांच्या प्रकरणात मालेगाव येथील बाँबस्फोटात प्रथमदर्शनी पुरावे मिळाले म्हणूनच त्यांना अटक करण्यात आली. त्या सध्या जामिनावर सुटल्या आहेत. त्यांच्यावरील खटल्यांचा निकाल अजून लागायचा आहे. तरीही त्या स्वत:ला निर्दोष समजून एका कर्तव्यकठोर अधिकार्‍याला शिव्याशाप देतात, याचे आश्चर्य वाटते आणि दु:खही होते. हेमंत करकरे मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले, ते त्यांच्या देशाप्रती असलेल्या निष्ठेमधून कर्तव्य बजावीत असताना; साध्वीच्या शापामुळे नव्हे. म्हणूनच भिंतीवर नकाशा फडफडला म्हणून देशात धरणीकंप होत नाही हेच खरे. क्षमाशीलता हा खर्‍या साधूचा किंवा साध्वीचा धर्म असतो; पण साध्वी प्रज्ञासिंग शापवाणी उच्चारतात याचा अर्थ त्यांचे साध्वीपण हे खरे नाही.

धर्माचा विपर्यास करणार्‍या मंडळींचा भारतात तोटा नाही. धर्माच्या नावाखाली ही मंडळी अधर्माचे आचरण करतात. लोकांना भिती घालणे हा धर्म नाही. साक्षी महाराज नावाच्या एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराने त्यांच्या मतदारांना तंबी दिली आहे. तुम्ही मला मत दिले नाही, तर मी तुम्हाला शाप देईल. कावळ्याच्या शापाने गायी मरत नाहीत या म्हणीप्रमाणे खरं तर लोकांनी या साधूच्या शापाकडे दुर्लक्षच करायला हवे आणि निर्भयपणे मतदान करून आपला विवेक ढळू देता कामा नये. अंधश्रद्धेचा असा दुरूपयोग करणारी मंडळी सत्तेवर आली, तर भारतीय राज्यघटनेशी ती प्रतारणा ठरेल. साधुत्वाच्या नावाखाली चालणारी अशा प्रकारची भोंदूगिरी ही भारतीय समाजावरील आपत्तीच आहे. त्याचा निषेध व्हायला हवा.

राजकीय प्रचाराच्या धामधुमीत घडलेली आणखी एक घटना विवेकी माणसांना चिंतीत करणारी आहे. खासदारपदाच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या एका उमेदवाराने त्यांच्या मतदार संघातील मुस्लिम मतदाराला गर्भीत इशारा दिला आहे. तुम्ही जर मला मते दिली नाहीत, तर जेव्हा तुमच्या कामासाठी तुम्ही माझ्याकडे याल, त्यावेळी मी तुम्हाला चांगलंच लक्षात ठेवीन. या इशार्‍याचा अर्थ असा की, निवडून आल्यावर हे खासदार त्यांच्या सत्तेचा दुरुपयोग करून मुस्लिमांना त्यांच्या राजकीय लाभापासून वंचित ठेवतील. याचा अर्थ ते उघडपणे भारतीय राज्यघटनेतील सर्वधर्मसमभावाचे तत्त्व पायदळी तुडवतील.

राजकीय क्षेत्रात असा अविवेकाचा आणि अंधश्रद्धेचा प्रभाव वाढताना दिसत आहे. राज्यकर्त्यांनी विज्ञाननिष्ठा पायदळी तुडवली, तर अवघा समाजही त्यांच्या वाटेवरून चालू लागल्यास नवल नाही. असं झालं तर भारतीय लोकशाहीचे भवितव्य अंधारमय होणार याबद्दल शंका नाही. जात, धर्म आणि अंध:विश्वास यांच्या वर्चस्वातून निर्माण होणारे अराजक हे आपल्यापुढचं आव्हान आहे. त्याला कसं सामोरं जायचं याचा सुबुद्ध नागरिकांनी गंभीरपणे विचार करावा.