Categories
बुवाबाजी

नांदेड जिल्ह्यात अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार – मुलांचे हात घातले उकळत्या तेलात

ऑक्टोबर - २०१९

महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात येऊन सहा वर्षेपूर्ण झाली, तरीही या कायद्याबाबत प्रशासनातील बरेच पोलीस व न्यायपालिकेतील वकील अनभिज्ञ असल्याचे नांदेड येथील एका घटनेतून अनुभवास आले. विशेष म्हणजे या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत नांदेड चर्चेत होते. कारण या कायद्यांतर्गत पहिला गुन्हा; तोही मुस्लिम बाबाचा नांदेड येथे नोंदविण्यात आला आहे. या कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याच्या संदर्भात नांदेड पोलिसांचे मार्गदर्शन इतर जिल्ह्यांतील पोलीस घेत असत.

या कायद्यासाठी अंनिसने स्वत:च्या थोबाडीत मारून घेणे, स्वत:च्या रक्ताने पत्रे लिहिणे अशा विविध मार्गांनी 18 वर्षेलढा दिला. शेवटी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर हा कायदा पारित झाला. या कायद्याचे महत्त्व जाणून अंनिसने 29 जिल्ह्यांतून 85 दिवस व्याख्याने, चमत्कार सादरीकरण, पोस्टर प्रदर्शन इत्यादींच्या माध्यमातून या कायद्याचा प्रचार-प्रसार, जनजागृतीसोबतच पोलीस व वकील यांच्यासाठी सुद्धा कार्यक्रम/प्रशिक्षण आयोजित केले. ज्या बिलोली तालुक्यात आणि नांदेड जिल्ह्यात ही घटना घडली, त्या बिलोली तालुक्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये व नांदेडच्या पोलीस मुख्यालयात पोलिसांसाठी हा कार्यक्रम/प्रशिक्षण घेण्यात आले, तरीही असा अनुभव येतो म्हणजे या कायद्याबाबत आणखी जागृतीची आवश्यकता भासते आहे. या घटनेबाबतची पीडित व इतरांकडून कळलेली माहिती व पार्श्वभूमी अशी की, पिंपळगाव (कु.) येथील संजू राम जाधव हा किशोरवयीन मुलगा शेळ्या-मेंढ्या राखण्याचे काम करत असे. एके दिवशी घरी न आल्यामुळे त्याचा शोध घेतला असता, रानामध्ये एका खड्ड्यातील पाण्यात त्याचा मृतदेह आढळला.

31 ऑगस्ट 2019 रोजी संजूचे वडील राम फकिरा जाधव यांनी बिरू भुमा शिरगिरे व संतोष बाबू हरणमारे या किशोरवयीन मुलांना व गंगाधर मालोजी कुरेकर या गृहस्थाला आपल्या घरी बोलावले, हे तिघेही शेळ्या-मेंढ्या राखण्याचे काम करतात. या तिघांसोबत त्यांचे नातेवाईक उत्सुकतेपोटी राम जाधव यांच्या घरी गेले. तिथे रामची पत्नी कांताबाई, मांत्रिक असलेला रामचा भाऊ लक्ष्मण फकिरा जाधव व त्यांचे इतर नातेवाईक होते.

मांत्रिक लक्ष्मण याने संजूच्या मृत्यूबाबत माहिती द्या, असे म्हणत या तिघांना अनेक प्रश्न विचारले. याबाबत काहीच माहिती नाही, असं उत्तर मिळालं, तेव्हा तुम्हाला सत्त्वपरीक्षा द्यावी लागेल, असं म्हणत त्याने उकळत्या तेलाची कढई मागवली. जर तुम्हाला काहीच माहिती नसेल, तर या उकळत्या तेलात तुमचा हात घातला तरी, काहीही होणार नाही, असं म्हणत त्या दोन मुलांना आपल्या आजूबाजूला घेतलं. आपल्या डाव्या व उजव्या हातात त्या मुलांचा एक-एक हात धरला आणि उकळत्या तेलात बुडविला व काही क्षण तसाच ठेवला. त्या दोघांपैकी संतोष नावाच्या मुलाने पँटमध्ये लघवी केली आणि जागीच कोसळला. हे सर्व बघून पळ काढण्याच्या प्रयत्नात असणार्‍या गंगाधर या गृहस्थाला राम फकिरा व मांत्रिक लक्ष्मण यांनी पकडलं व जबरदस्तीने त्याचाही हात त्या उकळत्या तेलात बुडविला. हा सर्व प्रकार पीडिताचे नातेवाईक पाहत होते; पण मांत्रिकाची दहशत असल्यामुळे कोणीही विरोध केला नाही. तेथून बाहेर पडल्यानंतर पीडितांनी रिक्षा केली व तेथून 10 किलोमीटर दूरवरच्या कुंडलवाडी येथे दवाखान्यात गेले. डॉक्टरांनी प्रथमोपचार करून नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात पाठविले. तिथे कळले की डीप बर्निंग आहे.

दरम्यान या प्रकरणी 328, 508, 406 व 34 भादंवि अन्वये कुंडलवाडी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला.

या घटनेची माहिती कळताच अंनिसचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष सम्राट हाटकर यांनी पीडितांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. कुंडलवाडी येथे जमलेले पत्रकार पीडितांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत होते. त्यातील पत्रकार कल्याण गायकवाड यांनी अंनिसच्या भूमिकेविषयी विचारणा केली. ही घटना अंधश्रद्धेतून घडली असून यामध्ये जादूटोणाविरोधी कायद्यान्वये कारवाई व्हावी. यासाठी पुरवणी जबाब घ्यावेत, इत्यादी बाबींचा पाठपुरावा करणार, याचबरोबर जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार-प्रसार व कडक अंमलबजावणी व्हावी, अशी अंनिसची भूमिका असून त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कळविले.

अखेर अंनिसच्या पाठपुराव्याने पोलिसांनी पुरवणी जबाब घेऊन जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम 3(2),3 लावले. घटनेसंदर्भात सम्राट हाटकर, अ‍ॅड. धोंडिबा पवार, कमलाकर जमदाडे व चित्ततोष करेवार यांनी कुंडलवाडी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एम. कांबळे याची भेट घेतली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून निदर्शनास आले की, या कायद्याविषयी माहिती नसल्याने सरकारी वकिलाशी चर्चा करून पुढची कार्यवाही केली. कोर्टात फी भरून एम.सी.आर.ची प्रत घेतेवेळी तेथील वकिलांशी झालेल्या चर्चेतून कळले की, या कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यामुळे आरोपीला वकील मिळत नव्हता. कारण या कायद्याविषयी पूर्ण माहिती नव्हती. अंनिसकडून या कायद्याची प्रत त्यांना देण्यात आली.

अधिक तपास करून पुरावा हस्तगत करण्याकरिता 14 दिवसांच्या एम.सी.आर.ला मंजुरी मिळाली. घटनेच्या 20 दिवसांनंतर कळले की, पीडित बिरू भुमा या मुलाच्या हाताची पाचही बोटे कापावी लागली आणि तो एका खासगी दवाखान्यात अ‍ॅडमिट आहे. या घटनेचा पाठपुरावा करण्यात कुंडलवाडीचे स्थानिक व ज्येष्ठ कार्यकर्ते एन. जी. वाघमोडे यांची मदत व बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य कार्यवाह अ‍ॅड. रंजना गवांदे यांचे मार्गदर्शन लाभले.