‘निर्भय’ हे उमेश मुरलीधर सूर्यवंशी यांनी लिहिलेले पुस्तक; नुकतेच ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध झाले. सूर्यवंशी हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृतिशील कार्यकर्ते. ‘अंनिवा’चे सहसंपादक म्हणून त्यांनी तीन वर्षेजबाबदारी पेलली. लाख मराठा मोर्चाचाही त्यांना अनुभव आहे. गेल्या वर्षी राजर्षी शाहूंचा परिचय करून देणारे ‘राजर्षी’ पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले. त्याच्या दहा हजार प्रती संपल्या आहेत.
आपल्या लेखणीला इतिहासकार किंवा संशोधकाची शास्त्रीय बैठक नाही. हा डोलारा इतरांच्या लिखाणावर उभारला आहे, असे सांगत त्यांनी सुमारे सत्तरभर संदर्भ ग्रंथांची यादी दिली आहे.
पुस्तक तीन भागात विभागले असून त्यातही पोटविभाग करून त्यांना मथळे दिले आहेत. त्यामुळे ठराविक उपविषयाची माहिती एकत्र मिळते.
पहिल्या भागात त्यांनी महात्मा गांधींच्या चरित्राचा धावता आढावा घेतला आहे. या भागात शब्दांचा फुलोरा टाळून सोप्या भाषेत निवेदन केले आहे.
दुसर्या भागात एकेक उपविषय घेऊन सखोल चर्चा केली आहे, तर तिसर्या भागात ‘निर्भयता’ वर्णिली आहे.
याविषयी भूमिका मांडताना लेखक म्हणतो, एका प्रश्नातूनच दुसर्या अनेक प्रश्नांची मालिका इथे तयार झालीय. कधीतरी मूळ प्रश्नाला गांधी विचारकेंद्रित करून सोडवायचा प्रयत्न झाल्यास निश्चितपणे काही विधायक व सुवर्णमध्याचा मार्ग हाती सापडू शकतो. गांधी विचार समजून घेऊन प्रश्नांना भिडलो, तर बरेचसे प्रश्न मिटण्याची शक्यता अधिक आहे.
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा विकास अहिंसा व सत्याग्रहाच्या दिशेने कसा झाला, हे सांगताना लेखकाने 1921 ची असहकार चळवळ आणि दांडी यात्रेच्या मिठाचा सत्याग्रह यांची तुलना केली आहे. 1921 साली चौरीचौर्याला 22 पोलिसांना आंदोलनकर्त्यांनी जिवंत जाळले, तेव्हा महात्मा गांधींनी आंदोलन मागे घेतले. या असहकार आंदोलनाची कबुली देताना त्यांनी म्हटले – ‘सत्याग्रहाला हिंसाचारापासून दूर ठेवणार्या कार्यकर्त्यांची प्रशिक्षित फौज तयार करण्याआधीच सत्याग्रहाचे प्रयोग करणे ही हिमालयाएवढी चूक होती.’
दहा वर्षांनी झालेल्या मीठाच्या सत्याग्रहात देशभरात कुठेही हिंसा झाल्याची वार्ता नाही. 78 अनुयायांसहित गांधींनी आश्रम सोडून दांडीयात्रा आरंभली. दोनशे मैलांचा प्रवास त्यांनी पंचवीस दिवसांत केला. रस्त्यात हजारो सत्याग्रही सामील झाले. मुंबईतील 6500 कामगारांनी काम बंद करून सहभाग नोंदवला. मिरवणुका अडवल्या, तर लोकांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. रात्र-रात्र बसून पोलिसांना आव्हान दिले. जवळजवळ 75 हजार सत्याग्रहींना अटक झाली. सत्याग्रहींचे आत्मबल एवढे वाढले होते की, त्यांनी पोलिसी हल्ल्यात डोकी फुटली, तरी हात उचलला नाही.
त्यापुढे दहा वर्षांनी आली ‘चले जाव’ चळवळ. 1942 साली ‘चले जाव’ची घोषणा करताच महात्मा गांधी आणि प्रमुख काँग्रेस नेत्यांना अटक झाली. नेत्यांचे मार्गदर्शन नसतानाही लोक रस्त्यावर उतरले. हिंसक पद्धतीने भौतिक वस्तू जाळल्या; पण एकही इंग्रज मारला गेला नाही. ही अहिंसाच आहे.
गांधीजींनी हिंसा म्हणजे काय हे स्पष्ट सांगितले आहे- प्रत्येक कुविचार म्हणजे हिंसा होय. द्वेष म्हणजे हिंसा, मिथ्या भाषण म्हणजे हिंसा, ज्याची लोकांना जरुरी आहे ते आपल्या ताब्यात ठेवणे म्हणजे हिंसा; त्याच्या उलट – सुविचार म्हणजे अहिंसा. कुणाचाही द्वेष न करणे म्हणजे अहिंसा, तर्कशुद्ध भाषा म्हणजे अहिंसा, सर्वांचे हित चिंतणे म्हणजे अहिंसा, लोकांना ज्याची जरुरी आहे, ते न्याय्य मार्गाने पुरविणे म्हणजे अहिंसा.
महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य हत्यार ठरवले ते सत्याग्रह. सत्याग्रहातच अहिंसा ओतप्रोत भरली होती. सत्याग्रही होणे म्हणजे निर्भय होणे, अन्यायाविरोधात संघर्ष करणे. या मार्गाने भारतीयांचे आत्मबळ वाढले.
महात्मा गांधींनी ब्रह्मचर्यासंबंधी केलेल्या प्रयोगाचीही नोंद लेखकाने केली आहे. अहिंसेची परमावधी गाठण्यासाठी आधी ब्रह्मचर्याची परमावधी गाठली पाहिजे, असे गांधींचे म्हणणे होते. भारतीय परंपरेने ब्रह्मचर्यात स्त्रीस्पर्श वर्ज मानला; पण मनाला बांध घालण्यासाठी उभारलेला तो कृत्रिम अडथळा आहे. मानसिकदृष्ट्या ब्रह्मचारी झालेल्या माणसाचे मन स्त्रीस्पर्शानेही अविचल राहिले पाहिजे. त्याने निष्पाप स्त्रीस्पर्श वर्ज्य मानू नये, असे गांधीजी म्हणत.
वैषयिक आकर्षणाशिवाय स्त्री-पुरुष एकत्र राहू शकत नसतील, तर ते ब्रह्मचर्य नव्हेच.
ब्रह्मचर्याच्या प्रयोगातून गांधींनी समाजाला अधिकाधिक नैतिक बनण्याची शिकवण घालून देण्याचा प्रयत्न केला. हे सांगताना लेखक म्हणतात – त्यांची मते अशास्त्रीय आहेत; पण प्रामाणिकपणे आणि स्वत:च्या सदसद्विवेकबुद्धीला जोखून ठरविली आहेत.
ब्रह्मचर्याच्या अशास्त्रीय व्रताचे आचरण करणार्या अनेक बुवा-बाबांना त्यांच्या मठात शेवटी अनैतिक कृत्यांना जागा द्यावी लागते, याची उदाहरणे देशात आजही पाहायला मिळतात.
महात्मा गांधींची भडक वकिली करताना असे अशास्त्रीय प्रयोग करण्याची गरज महात्मा गांधींना का पडली? असा प्रश्न लेखकाने उपस्थित करणे आवश्यक आहे.
महात्मा गांधींचे निरपराधित्व प्रभावीपणे लेखकाने रेखाटले आहे.
महात्मा गांधींच्यावर एकाच वेळी दोन आरोप होतात – गांधी हे सनातनी हिंदू होते आणि ते मुस्लिमधार्जिणे होते. या दोन्ही आरोपांची सखोल चर्चा करून लेखक म्हणतो- ते हिंदू धर्माचा अभिमान बाळगत, त्याचवेळी अस्पृश्यतेसारख्या निंद्य रुढीबद्दल दोषही देत. ते रोज प्रार्थना करत; पण त्यांनी आश्रमात कधी देऊळ बांधले नाही. धर्माचा अभिमान बाळगताना दुसर्या धर्माचा द्वेष करत नव्हते. ते रामाबरोबर रहीम जोडत.
एकाच वेळी हिंदू व मुसलमान समुदायाकडून गांधींच्या वाट्याला सुख-दु:खाचे प्रसंग आले. याचे कारण ते दोन्ही तुटलेल्या, भंगलेल्या, कष्टलेल्या समूहाकरिता पंचिंग बॅग होती.
जातीभेदविरोधी कार्याची नोंद घेताना लेखक म्हणतो- जातीभेदविरोधी कृतीत गांधींना प्रिय जनाशीही कठोरपणे वागावे लागले. गांधी-आंबेडकर संघर्षाचे स्वरूप बाह्यरुपावरून ठरवू नये, अंतरूप पाहावे. त्यांचे कार्य एकमेकांना पूरक होते.
गांधींनी दिलेल्या एका इशार्याकडे लेखक लक्ष वेधतो- “राखीव जागा व सवलती यांना अवास्तव महत्त्व देऊन अलगपणा राखण्याच्या प्रवृत्तीमुळे ज्याला-ज्याला आपले हितसंबंध राखण्यासाठी अस्पृश्यता व दलितपण टिकवून धरावेसे वाटेल आणि मग अस्पृश्यता निवारणाचे उद्दिष्ट विफल होईल.”
सशस्त्र क्रांतिकारक आणि गांधींजींचा संबंध शोधताना त्यांनी सशस्त्र क्रांतिकारकांचे तीन गट पाडले आहेत. काँग्रेस अंतर्गत सुभाषबाबू आझाद हिंद सेना यांचा पहिला गट, साम्यवादी विचारांचा भगतसिंगांचा दुसरा गट आणि सावरकर, आरएसएस, हिंदू महासभा यांचा तिसरा गट.
मुळात तिसरा गट स्वातंत्र्य लढ्यात नव्हता. लेखकाने अभ्यासासाठीही त्यांना भगतसिंग आणि सुभाषबाबूंच्या शेजारी उभा करणे चूक आहे. या गटाचे वर्तन ब्रिटीशधार्जिणे होते. त्यांनी ब्रिटिशांबरोबर सशस्त्र लढा केला नाही. अटक करून अंदमानला पाठवेपर्यंत सावरकर सशस्त्र लढ्याशी संबंधात होते; पण त्यावेळी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत होते; भारतात नव्हे.
पहिल्या आणि दुसर्या गटातील म्हणजे शहीद भगतसिंग आणि सुभाषबाबू यांच्याशी महात्मा गांधींचे संबंध जवळिकीचे होते. याचे तपशीलवार पुरावे लेखकाने दिले आहेत.
ब्रिटिशांशी प्रामाणिक असणारा एक गट म्हणजे त्यांचे लष्कर! यातील नव्वद हजार नौसैनिकांनी 22 फेबु्रवारी 1946 रोजी बंडाचे निशाण रोवले. त्यांनी आपल्या बोटीवर काँग्रेसचा तिरंगा, मुस्लिम लीगचा हिरवा आणि कम्युनिस्ट पक्षाचा लालबावटा लावला होता. या नौसैनिकांना काँग्रेसने आणि महात्मा गांधींनी शस्त्रे खाली ठेवायला लावली. त्यांचे पुढे काय झाले, याचा मागोवा लेखकाने घेतलेला नाही, उल्लेखही केलेला नाही. एवढेच नव्हे, तर काँग्रेसने या नौसैनिकांना पाठिंबा दिला असता, तर फाळणीशिवाय स्वातंत्र्य मिळाले असते का? नौसैनिकांनी बंड केले नसते, तर स्वातंत्र्य इतक्या लवकर मिळाले असते काय? अशा प्रश्नांचा मागोवा लेखकाने घेणे आवश्यक होते.
लेखकाने मांडलेल्या तथाकथित तिसर्या गटाबद्दल लिहिताना लेखकाने महत्त्वाचे सत्य मांडले आहे – “गांधींचे नेतृत्व मान्य असणारे पंडित नेहरू, सरदार पटेल, सुभाषबाबू, मौलाना आझाद ही दिग्गज मंडळी देशाच्या वर्तुळात अत्यंत लोकप्रिय झाली होती. अर्थात, गांधींनी आपली दुसरी फळी तयार केली. सावरकरांना नेतृत्वच जिथे करणे जमले नाही, तिथे लोकप्रिय अनुयायी निर्माण करण्याची गोष्ट दूरच. गांधी, सावरकर हा लढाच विषम आहे. यामध्ये गांधी उत्तुंग आणि सावरकर खुजे ठरले, ही वस्तुस्थिती आहे. सावरकरभक्तांना हे वास्तव दु:खप्रद असले, तरी पचवणे भाग आहे. मृत्यूनंतर ‘20 व्या शतकातील सर्वश्रेष्ठ मनुष्य’ हा किताब गांधींच्या वाट्याला आला आणि सावरकर अंधारात जात राहिले.”
इंग्रज व गांधी संबंधाबाबत लिहिताना लेखक म्हणतो – “150 वर्षे इंग्रजांनी भारत गुलाम बनवला, साधनसंपत्ती लुटून नेली. भारत कंगाल केला, क्रौर्याची परिसीमा गाठली, तरीही इंग्रज माणसाविषयी कोणत्याही प्रकारची कटुता भारतीय मनात निर्माण झाली नाही. गांधींच्या शिकवणुकीचे हे सार होते.”
गांधींचा खून विपर्यास आणि वास्तव मांडताना लेखकाने फाळणी, 55 कोटी मुस्लिमांचे लांगूल चालन इत्यादी असत्य प्रचारांचा परामर्ष घेतला आहे. खुनामागे वर्णवर्चस्ववादी हिंदू गटाबरोबर जामीनदारांचा मोठा गटही सामील होता – याचा उल्लेख केला आहे. गांधींच्या खुनासाठी वापरलेले पिस्तूल ग्वाल्हेर संस्थानच्या एका व्यक्तीकडून आले होते. गांधी हत्येची चिथावणी देणारी पत्रके व पोस्टर काढण्यात ‘आलदार’सारखी संस्थाने पुढे होती, याचा उल्लेख केला आहे.
गांधींचा खून हा राजकीय खूनच होता आणि त्याला सांस्कृतिक विचारसरणीची जोड होती, असे सांगत त्यांनी खुनामुळे हिंदुत्ववाद्यांचे अपेक्षित मनसुबे पूर्ण झाले नाहीत, असे निरीक्षण नोंदवले होते.
खुनानंतर महाराष्ट्रात उमटलेल्या प्रतिक्रियांचा ऊहापोह लेखकाने केलेला नाही. जनमानस समजून घेण्यासाठी आणि जमीनदारी आणि खून यामधील संबंध स्पष्ट होण्यासाठी प्रतिक्रियांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. खुनामागील मास्टरमाईंड पकडले गेले नाहीत, त्यासाठी कायदे अपुरे आहेत का? याची चर्चा झालेली नाही.
शेवटचा विभाग आहे निर्भयता-तुझे नाव गांधी! गांधींच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग घेऊन लेखकाने निर्भयता स्पष्ट केली आहे.
रामायण-महाभारताप्रमाणे महात्मा गांधीही महाकाव्याचे नायक होऊ शकतात, असा विश्वास शेवटी व्यक्त केला आहे.
एका सच्च्या गांधीभक्ताने लिहिलेले हे पुस्तक अभ्यासू व्यक्तींना संदर्भ ग्रंथ म्हणून, तर सामान्यांना गांधी समजून घेण्यासाठी उपयोगी आहे.
पुस्तकाचे नाव : निर्भय
प्रकाशक : साथी सुषमा उमेश सूर्यवंशी, कोल्हापूर
पृ. सं. 176, मूल्य : 200/-