माणसाची खरी जडणघडण त्याच्या कौटुंबिक वातावरणात लहानपणापासून संस्कार रूपाने होत असते.म्हणूनच वैयक्तिक गुणवत्ता व कुटुंबस्वास्थ्य साधण्यासाठी विवाह आणि कुटुंब संस्थेचा नव्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे. त्यासाठी आजच्या युवा वर्गाला बदलत्या परिस्थितीला सामारे जायला वैवाहिक जबाबदारीची ओळख वेळीच करुन देण्याची नितांत गरज आहे. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने युवा पिढीशी विवेकपूर्ण सहजीवनाचा सुसंवाद करण्याचा कार्यक्रम म्हणून ‘निवड जोडीदाराची-युवा संकल्प मोहीम’ पुढील काळात महाराष्ट्रात चालवायचे ठरविले आहे.
प्रत्येक पिढीत नव्या जाणिवा निर्माण होत असतात व त्यामुळे नवीन समस्यांना तोंड द्यावे लागते. विशेषत: गेल्या तीन दशकात कुटुंब जीवनपद्धती झपाट्याने बदलत चालली आहे. नवीन जीवनमूल्ये मूळ धरु पाहात आहेत. पती-पत्नीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा, जीवनविषयक दृष्टिकोन व कौटुंबिक भूमिका बदलत चालल्या आहेत. त्यामध्ये मैत्री, जोडीदाराची निवड, विवाहातील रुढी-परंपरा, विवाहानंतर बदलणारी नाती, लैंगिकता, पालकत्व इत्यादी अनेक विषयांवर आपली काही मते असतात. ती नेहमीच इतरांना पटतात असे नाही. हे सर्व लक्षात घेता पूर्वीच्या व हल्लीच्या जीवन पद्धतीचा अभ्यास आजच्या युवक-युवतींनी डोळसपणे करुन त्याची जाणीवपूर्वक नोंद केली पाहिजे. ही सर्व तयारी विवाहपूर्व काळात म्हणजेच युवावस्थेपासूनच व्हावयास हवी. बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि स्वत:च्या अपेक्षापूर्तीसाठी स्वत:च आता नव्या वाटा शोधायला हव्यात. अर्थात ही गरज फक्त शहरापूरतीच मर्यादित राहिलेली नाही. कारण जागतिकीकरणाच्या धोरणामुळे झपाट्याने होणारे औद्योगिकीकरण व शहरीकरण, दळणवळणाची वेगवान साधने, वाढता शिक्षण प्रसार व आधुनिक जीवनपद्धतीची ओळख करुन देणारी नवनवीन साधने ह्या सर्वांमुळे नवे विचार-आचार आता खेडोपाडी पोचले आहे. खेड्यातील जीवन पद्धतीतही बदल होऊ घातले आहेत.
अशा पार्श्वभूमीवर विवाह का आणि कशासाठी करायचा? इथपासून त्याची नकारात्मक व सकारात्मक कारणांचा विचार, विवाह यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणार्या बाबींची समज, वैवाहिक जोडीदाराच्या निवड प्रक्रियेतील पारंपरिकतेतील दिशाभूल, शोषण, फसवणूक आणि त्यातून भोगावा लागणारा मन:स्ताप व अत्याचार याचा युवक-युवतींनी गांभीर्यपूर्वक जाणिव करुन घेणे आवश्यक आहे. त्या हेतूनेच आम्ही महाराष्ट्रातील युवा पिढीशी प्रबोधनाचा सुसंवाद घडवून आणण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. त्यामधून सहभागी होऊन प्रबोधित होणार्या युवांना त्यांच्या यशस्वी वैवाहिक जीवनासाठी संकल्पीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे जोडीदाराची निवड करण्याविषयीची समज विकसित करणारे युवा संकल्प मेळावे पुढील काळात मोठ्या प्रमाणात घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील/मोहीमेची सुरुवात दि. 12 ऑगस्ट 2012 रोजी क्रांती स्मारक, दोंडाईचे, धुळे रस्ता येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्तपणे आयोजित दिवसभराच्या युवा संकल्प मेळाव्याने होणार आहे. त्याला महाराष्ट्र राज्याचे युवा-क्रिडा मंत्री ना. अॅड. पद्माकर वळवी उद्घाटक म्हणून तर कुलगुरु प्रा. डॉ. सुधीर मेश्राम अध्यक्ष म्हणून निमंत्रित आहेत. त्यानंतर मोहीमेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्व विद्यापीठांच्या शहरांमधून एक दिवसीय मेळावे चालू शैक्षणिक वर्षात आयोजित करण्याचा आपला प्रयत्न आहे. दुसर्या टप्प्यात सर्व जिल्हानिहाय मेळावे आणि मागणीनुसार कार्यशाळा पुढील शैक्षणिक वर्षात आयोजित केल्या जातील. जसे निरामय मानसिक आरोग्यासाठी ‘मानस मित्र’ बनविण्याच्या कार्यक्रम आपण राबविणार आहेत. त्याचप्रमाणे विवेकी सहजीवनाचा सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करणारी मोहीम भविष्यात चालविता येऊ शकेल.
विवाहाच्या उंबरठ्यावर उभ्या असणार्या युवक-युवतींनो आपल्या जोडीदाराच्या निवडीबद्दल आपल्या मनात असलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न करु या!
‘निवड जोडीदाराची-युवा संकल्प मोहीमेत सहभागी होऊ या!’
– अविनाश पाटील