Categories
संपादकीय

पडलो तरी नाक वर

जून – २०१४

एप्रिल-मे 2014 या काळात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 16 मे रोजी जाहीर झाले. या निवडणुकीचे भविष्य वर्तवणार्‍या ज्योतिष्यांना महाराष्ट्र अंनिसने उघड आव्हान दिले होते. निकाल जाहीर झाल्यावर स्वत:ची पाठ थोपटून घेण्याची ज्योतिष्यांची जुनीच खोड आहे. मी सांगितलेले खरे ठरले अशा बढाया ते मारत असतात. पण अशा बढाया मारणारे व न मारणारे सगळेच ज्योतिषी या निवडणुकीच्या ज्योतिषाच्या निकालाबाबत सपशेल उताणे पडले. पण पडलो तरी नाक वर या आविर्भावाने एक तथाकथित प्रसिद्ध ज्योतिषी ज्योतिष हे शास्त्र नाही हे सिद्ध करा व 31 लाख रूपये जिंका असे आवाहन अंनिसला करीत आहे. जे नाही ते सिद्ध करता येत नाही पण जे आहे त्याचे पुरावे शोधता येतात. मूळ गृहितानुसार तर्काने काढलेली अनुमाने प्रत्यक्षात तपासता येतात हे या शहाण्यांना कधी कळणार?

ज्योतिष्यांना आपली गृहिते तपासण्याची खरं तर लोकसभा निवडणूक ही नामी संधी होती. ही संधी साधण्यासाठी त्यांनी आपले सर्व सामर्थ्य व बुद्धीमत्ता पणाला लावायला हवी होती. ते जर जिंकले असते तर त्यांना महाराष्ट्र अंनिसचे 21 लाख रूपये जिंकण्याची व अंनिसला कफल्लक बनवण्याची नामी संधी होती. शिवाय आव्हान देणारी अंनिस जर हरली असती तर त्यांचा ज्योतिषाविरोधातील प्रचार कायमचा थांबला असता. लोकांनी ज्योतिष्यांना डोक्यावर घेतले असते. आम्ही मग भारतात ज्योतिष विद्यापीठे वाढविण्यासाठी भारत सरकारला गळ घातली असती. काही आयुर्वेद आचार्यांच्या औषधी दुकानाप्रमाणे मग ज्योतिष्यांची दुकाने गावागावात, गल्लीगल्लीत निघाली असती.

पण असं काहीच झालं नाही. 28 फेबु्रवारी 2014 ला महाराष्ट्र अंनिसच्या ज्योतिष चिकित्सक समितीने देशभरातील ज्योतिष्यांनी लोकसभेच्या निवडणुकीचे भविष्य वर्तविण्याचे अंनिसचे आवाहन स्वीकारावे अशी सूचना केली होती. व यासाठी अचूक भविष्य वर्तविणार्‍या ज्योतिष्यांसाठी 31 लाख रूपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी त्यांना दिली होती.

भविष्य सांगण्याच्या आव्हान प्रक्रियेत विविध पक्षांना मिळणार्‍या जागा, निवडून येणार्‍या उमेदवारांच्या मताची टक्केवारी, महत्वाच्या मतदार संघातील विजयी उमेदवार, महाराष्ट्रातील विविध पक्षांना मिळणार्‍या जागांची संख्या, नवीन मंत्रीमंडळातील नावे इत्यादी एकूण 30 प्रश्न उपस्थित केले होते. यापैकी 22 प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्‍यांना बक्षीस मिळणार होते. महाराष्ट्रातील तथाकथीत नामवंत व प्रसिद्ध ज्योतिष्यांना हे आव्हान रजिस्टर पोस्टाने पाठविले होते. पण हे आव्हान स्वीकारण्यास एकही ज्योतिषी वीर मैदानात उतरला नाही.

एका प्रसिद्ध ज्योतिष्याने अंनिसच्या आव्हानाला बाजूला ठेवून पत्रकाद्वारे आपली भाकिते प्रसारमाध्यमांना दिली होती. या 20 भाकितांपैकी केवळ चार भाकिते बरोबर ठरली. म्हणजे मार्कस् 20%. हेच नापास वीर आता नाक वर करून ज्योतिषाची भलावण करत महाराष्ट्रात हिंडत आहेत.

कित्येक कोटी किलोमीटर अंतरावरील ग्रहाचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो हे सांगणार्‍या ज्योतिष्यांना 1000-2000 किलोमीटरवरील प्रदेशात काय घडणार यांचा बिनचूक अंदाज घेता येत नाही यातूनच ज्योतिष्यांची लबाडी सिद्ध होते. महाराष्ट्र अंनिसचा निष्कर्ष समजून घेतला तर ज्योतिष्यांना आता ग्राहक संरक्षण कायद्याचा बडगा दाखवायलाच हवा. त्यासाठी हवे जनजागरण व प्रबोधन.

डॉक्टरांचा उपचार चुकला तर त्यांच्यावर पोलीस कारवाई करतात. भेसळयुक्त खोटा माल व्यापार्‍याने विकला तर त्याच्यावर ग्राहक संरक्षण कायद्याखाली कारवाई होते. माहितीच्या अधिकाराची पायमल्ली केल्यास तो गुन्हा ठरतो. मग ज्योतिषाला त्यातून सूट का? काही ज्योतिषी लोकांचे मृत्यूयोग सांगतात. हा खरं तर गुन्हा आहे. काही जण जमत असलेला विवाह मोडतात. काही वर्षापूर्वी पुण्यात घडलेली घटना आठवा. पत्रिकेतील अशुभ ग्रहाच्या भीतीने एका कुटुंबातील प्रमुखाने स्वत:चे व कुटुंबियांचे जीवन विष पिऊन संपविले. म्हणून ज्योतिष व ज्योतिषी हे दंडनीय अपराधी असू शकतात. अशांना शिक्षा व्हायलाच हवी. ग्राहक संरक्षण कायद्यात ज्योतिष्यांचा समावेश हवाच.