Categories
उपक्रम शाखा वार्ता

पालघर अंनिसतर्फे सर्पविषयक जनजागृती सप्ताह

सप्टेंबर - २०१२

            दि.19 जुलै 2012 ते 24 जुलै 2012 दरम्यान पालघर तालुक्यातील शाळा, महाविद्यालयातून रंगीत पोस्टरच्या माध्यमातून विषारी व बिनविषारी साप कोणते, त्यांचा वावर, सापाचे पर्यावरणातील स्थान, सर्पदशानंतर सापाच्या विषामुळे दिसणारी लक्षणे, साप अन्नधान्याची नासाडी करणार्‍या उंदरांचे भक्षण करून मानवी अन्नाचे रक्षण कसे करतो. साप चावला असता काय करावे तसेच सापाविषयी असलेल्या अंधश्रद्धेपोटी अनेकजण त्याला दूध पाजून आजारी पाडतात वा साप दिसताच घाबरून त्याची हत्या केली जाते इ. माहिती विद्यार्थ्यांना रांगेत उभे करून दिली. चार बाय दोनच्या आकारातील सापांची माहिती असलेली रंगीत पोस्टर्स पहायला सर्वजण उत्सुक असतात. या पोस्टर प्रदर्शनानंतर प्रत्येक शाळांकडून चमत्कार व व्याख्यानासाठी आमंत्रण मिळतेच.

            दि.18 व 19 जुलै 2012 नूतन विद्यामंदिर, उमरोळी, ता.पालघर येथील 130 विद्यार्थी, दि.20 जुलै रोजी सेवाश्रम विद्यालय, मुरबे येथील 750 विद्यार्थी तसेच दि.23, 24 आणि 25 रोजी दांडेकर महाविद्यालय, पालघर येथील 6000 विद्यार्थी असे एकूण 7380 विद्यार्थ्यांपर्यंत या वर्षी आम्ही हा पर्यावरण जागृतीचा संदेश पोहोचविला.

लैंगिक विषयांतर्गत शोचे आयोजन

            तसेच पालघर अंनिसतर्फे लैंगिकता शिक्षण या विषयांतर्ग 17 शोचे आयोजन करण्यात आले. दि.3, 4 व 5 जुलै 2012 रोजी सेवाश्रम विद्यालय व ज्युनि.कॉलेज मध्ये 13 तर पं.राजगुरू विद्यालय या ठिकाणी दि.8 जुलै रोजी 4 शो असे एकूण 17 शो वयात येताना या मुला मुलींसाठीच्या फिल्मचे आयोजन करून 1045 मुलांमध्ये या विषयाची ओळख करून दिली. या उपक्रमासाठी मा.रंगराव गढरी सर, अ‍ॅड.दीपक भाते, सूर्यभान पवार, रत्नदीप कांबळे, अनिल करवीर, श्रीकांत पवार, अण्णा कडलास्कर यांनी विशेष परिश्रम घेतले.

-अण्णा कडलास्कर, पालघर