Categories
भांडाफोड

पाणीवाले भोंदू बाबाला अटक

जानेवारी - २०१५

वाशी-ए.पी.एम.सी मसाला मार्केट येथे राधाकृष्ण महाराज उर्फ पाणीवाले बाबा यांचा
दरबार भरविण्यात आला होता. बाबाने मंतरलेले पाणी पाजल्यानंतर ८८ प्रकारचे आजार बरे होतात, अशी आयोजकांनी जाहिरात केली होती. सदर कार्यक्रमासाठी ए.पी.एम.सी प्रशासन व पोलिस यांनी परवानगी नाकारली होती.
केवळ तीन वेळा पाणी पाजून मधुमेह, पक्षघात, थॉयराइड सारखे आजार बरा करण्याचा दावा केल्यामुळे कार्यक्रम स्थळी हजारो लोकांनी गर्दी केली होती. प्रशासन व पोलिस परवानगी न घेतल्यामुळे ए.पी.एम.सी पोलिसांनी आयोजकांवर कारवाई केली.
बाबाने केलेला दावा हा जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत कारवाईस पात्र असल्यामुळे सदर भोंदु बाबाला अटक करावी म्हणून महाराष्ट्र ‘अंनिस’च्या नवीन पनवेल शाखेच्या वतीने कार्यध्यक्ष जादुगार पी. बी. हांडे व माघाडे यांनी दिनांक १७/१२/२०१४ रोजी ए.पी.एम.सी मार्केट पोलिसांना निवेदन दिल्यानंतर पोलिसांनी सदर भोंदुला अटक केली आहे. सदर बाबाच्या शिबिरात उच्चशिक्षित लोकांचा मोठ्या प्रमाणात भरणा होता. वीज आल्यामुळे अंधार दूर झाला पण २१ व्या शतकात बहुसंख्य लोकांच्या मनातील अज्ञान अंधश्रद्धेचा अंधार दूर झाला नाही. ही मोठी शोकांतीका आहे. देव धर्माच्या नावाखाली आपण किती मानसिक गुलाम बनतो यांचे त्यांना भान नसते. १३ डिसेंबर ते २० डिसेंबर २०१४ हा महाराष्ट्र अंनिस ‘जादूटोणा विरोधी कायदा वर्षपूर्ती’ सप्ताह सादर करत आहे. या कालावधीत १०६ केस महाराष्ट्रात दाखल झाल्या आहेत. ही कायदा झाल्याची मोठी जमेची बाजू आहे. पण लोकांनी वैज्ञानिक दृष्टीकोन स्विकारण्याची गरज असल्याचे जादुगार हांडे यांनी मत व्यक्त केले.

पी. बी. हांडे, पनवेल मोबा: ९८१९४९३३८६