Categories
बुवाबाजी

धार्मिक डेरे आणि राजकारणाची अभद्र युती – सुमित सिंह

जानेवारी - २०१५

हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील कसबे बरवाला येथील सतलोक आश्रमातील तथाकथित संत रामपाल याला नोव्हेंबर २०१४ मध्ये पंजाब-हरयाणा हायकोर्टाच्या आदेशावरून अटक केली. मात्र त्यासाठी त्यांना फारच मेहनत करावी लागली. त्यासाठी त्यांना पोलीस आणि सुरक्षा दलाच्या ३० कंपन्या व त्याव्यतिरिक्त ४०० पोलीस वाहने, ३०० बसेस आणि ४० बुलेटप्रुफ गाड्या आणि २० पोलीस नियंत्रण कक्षांचा वापर केला गेला. यासाठी सरकारला जवळ जवळ तीस कोटीचा खर्च आला. ज्याचा विनियोग या पेक्षा कितीतरी चांगल्या कामाकरिता करता आला असता.
रामपालने अटकेतून वाचण्यासाठी आजारी असण्याचे नाटक केले आणि हजारो श्रद्धाळू विशेषतः बायका आणि लहान मुलांची ढाल उभी करून पोलिसांची कारवाई रोखून धरली. रामपालच्या कमांडोनी पेट्रोल बॉम्ब आणि दगडांचा पोलिसांवर अक्षरश: मारा केला. डेऱ्याचा पोलिसांनी ताबा घेतल्यावर तेथे त्यांना मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि गोळाबारुद मिळाले त्याचबरोबर शक्तिवर्धक ओषधे, अल्ट्रा साऊंड यंत्रे वगैरे सामान मिळाले. सर्वात मजेची गोष्ट ही कि ज्या दैवीशक्तीचा दावा करीत हा रामपाल हजारो भक्तांना इतकी वर्षे मूर्ख बनवत होता त्या दैवीशक्तीने मात्र त्याला अटक होण्यापासून वाचवले नाही.
गेल्या दशकभरात आपल्या देशात धर्माच्या नावावर हा डेरावाद आणि बुवाबाजी मोठ्या प्रमाणावर वाढलेली तर आहेच पण त्याचबरोबर हे बाबा, स्वामी, ज्योतिषी लोक राजकीय पातळीवरही शक्तिशाली होत आहेत. धर्माच्या नावावर जनतेचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण करणे हेच यांचे उद्दिष्ट आहे. यासाठी त्यांच्या तथाकथित दैवी शक्तीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी येथील प्रसार माध्यमानाच आपले एजंट बनवले आहे. त्यांच्या प्रचारासाठी राजकीय लोक, पोलीस, सरकारी यंत्रणा आणि प्रसारमाध्यमे यांची जणू युतीच झाली आहे.
गेल्या दोन दशकांपासून केंद्र आणि राज्य सरकारांकडून जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाची धोरणे लागू केली जात आहेत, त्यामुळे महागाई, गरिबी, उपासमार, बेरोजगारी, आजारपण, विषमता, भ्रष्टाचार, मानसिक रोग यासारखे गंभीर प्रश्न वेगाने वाढत आहेत आणि त्याखाली फक्त गरीब आणि दलितच भरडला जात आहे.
पण आपल्या या समस्यांची खरी कारणे शोधण्यात आणि त्याला जबाबदार असणाऱ्या भ्रष्ट आणि भांडवलदार, धन दांडग्याच्या धार्जिण्या सरकारच्या विरोधात उभे राहण्यात आपल्या देशातील जनता कमी पडत आहे कारण या शोषण व्यवस्थेचे समर्थक असलेले हे डेरेवाले, बुवा-बाबा, स्वामी, महाराज, भगवान, आध्यात्मिक पंथ आपल्या सत्संगात लोकांच्या या प्रश्नाचे मूळ देवाची कृपा, नशीब, दुर्देव, मागच्या जन्मीचे पाप हे असल्याचे ठसवत आहेत आणि ह्याच्यातून सुटण्यासाठी तुम्हाला संघर्षाची काहीच गरज नाही, कोणताही किंतु-परंतु मनात आणण्याची काही एक गरज नाही. तुम्ही फक्त ‘गुरु’ वर भरोसा टाका अशी शिकवण देत आहेत. तिला या बुवा, बाबा, तथाकथित संत, स्वामी आणि धार्मिक प्रचारातून तिच्या उदात्त भविष्यावीषयी भुलविले जात आहे. राजकीय व्यवस्थेकडूनही त्याला खतपाणी घातले जात आहे. प्रसार माध्यमातून हे साधू संत, स्वामी, ज्योतिषी आणि बाबा सकाळ संध्याकाळ आपला अंधश्रद्धाळू प्रचार करीत आहेत, त्याचबरोबर आपल्या शिक्षण व्यवस्थेतही तेच तेच वसाहती काळातील रूढीवादी, पौराणीक पाठ्यक्रम शिकविले जात आहेत. त्यामुळे सामान्य माणूस वैज्ञानिक दृष्टीकोन, आत्मविश्वास आणि आपल्या अधिकारांसाठी संघर्ष करण्यापासून रोखला जात आहे.
गेल्या काही वर्षापासून डेरे आणि धार्मिक स्थानात खून, बलात्कार, अपहरण अशासारख्या गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. त्यामुळे जर सर्वच राजकीय पक्ष या डेऱ्याची मदत घेणे बंद करतील तर रामपाल सारख्यांना अपराध करण्यापासून आणि ताकदवान बनण्या पासून रोखता येईल. धर्म आणि जातीच्या नावावर मते मागण्यासाठी भलेही कायदेशीर बंदी आहे पण याची अमलबजावणी होते कुठे? आणि धर्माच्या नावावर चालणाऱ्या या बुवा-बाबा, डेऱ्याकडे एक मोठी व्होट बँक तयार असतेच आणि मग या डेऱ्या समोर निवडणुकीच्या काळात डावे पक्ष सोडले तर इतर सर्व पक्ष आपले माथे टेकवत असतात. यासाठीच त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांकडे डोळेझाक केली जाते, त्यांना मोकाट सोडले जाते. उदाहरणार्थ, सिरसा डेरा निवडणुकीत कधी कॉंग्रेस, कधी अकाली दल आणि आता भाजप यांना निवडणुकीत मदत करत आलेला आहे. त्यामुळेच त्याच्यावर जाणीवपूर्वक कायदेशीर ठोस कारवाई टाळण्यात आलेली आहे.
अशाच प्रकारे देशातील इतर अनेक बुवा – बाबानीं राजकीय वरदहस्त आहे. सत्यसाईबाबा हे त्याचे ठळक उदाहरण. अनेक वेळा त्यांच्या चमत्कारांची भांडाफोड होऊनही अनेक नामवंत, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती त्यांच्या पायावर लोळण घेत त्यांना भगवान मानत होतेच. शेवटच्या काळात त्याच्या कामी त्याची दैवी शक्ती नाहीच आली. त्याला इस्पितळातच उपचारासाठी भरती व्हावे लागले. त्याच्याच भविष्यवाणीनुसार त्याचे आयुष्य ९६ वर्षाचे होते पण त्यांना ८५ व्या वर्षीच चाळीस हजार कोटीची संपत्ती मागे सोडून मृत्यू आला. त्याचप्रमाणे आसाराम बापू, त्याचा मुलगा नारायणभाई खून आणि बलात्कारासारख्या आरोपांखाली एका वर्षापासून तुरुंगात बंद आहेत. बंगलोरच्या नित्यानंदवर असेच खटले चालू आहेत. कुमारस्वामी नावाचा स्वामीही असाच लोकांना मंत्राने आजारातून बरे करण्याच्या नावाखाली देशभरातील लोकांना लुटत सुटला आहे. निर्मल बाबाच्या धंद्याचा पर्दाफाश दोन वर्षापूर्वी झाला. पण देशभरातील इतर हजारो बाबा या राजकीय कृपाछत्रामुळे कायद्याच्या विळख्यात सापडलेले नाहीत.
त्यामुळे आता आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रामपाल, आसाराम, सिरसा डेरावाला राम- रहीम बाबा यांच्यासारख्या बुवा-बाबांकडे महागाई, बेरोजगारी, आजार, असमानता, निरक्षरता, उपासमारी, भ्रष्टाचार या आपल्या कोणत्याही प्रश्नांचे उत्तर नाही. ना त्यांच्याकडे दैवी शक्ती आहे ना त्यांच्याकडे काही ज्ञान आहे, ना त्यांच्याकडे
हे प्रश्न सोडवण्याचे काही धोरण आहे, या सगळ्या प्रश्नांना केवळ ही लुटारु व्यवस्थाच जबाबदार आहे, विश्वात कोणत्याच भगवान, देव, आत्मा, यांचे अस्तित्व नाही किंवा कोणीच दैवी चमत्कार करु शकत नाही. हे सर्व धर्माच्या नावावर लुटणाऱ्या ठेकेदार आणि पुरोहित वर्गाचे कारस्थान आहे.
यासाठीच केंद्र आणि राज्य सरकारांनी आता देशभर या धर्माच्या नावावर अंधश्रद्धा पसरवून लोकांचे शोषण करणाऱ्याच्या विरोधात कायदा बनविला पाहिजे व यांना शिक्षा केली पाहिजे. श्रद्धेचा व्यापार करणाऱ्या हे किल्लेवजा डेरे आणि धर्मिक संघटन यांच्याकडून मते मागणाऱ्या राजकीय पक्षावर आणि त्यांना मदत करणाऱ्याविरोधात ठोस कारवाई केली गेली पाहिजे. देशातील सर्व धार्मिक डेरे आणि आश्रम यांना आयकर कायद्याच्याखाली आणले गेले पाहिजे.
आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आपले प्रश्न अंधश्रद्धेने, आध्यत्मिकवादाने आणि या ढोंगी संत – साधुमुळे सुटणार नसून आपल्या आयुष्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करून आणि भ्रष्ट व्यवस्थेत बदल करूनच सुटू शकतील. यासाठी आपल्याला आपली व लोकांची राजकीय जाणीव जास्तीत जास्त प्रगल्भ केली पाहिजे.

लेखक संपर्क : सुमित सिंह ०९७७९२३०१७३

अनुवाद राजीव देशपांडे