Categories
बुवाबाजी

पंजाब-हरियाणातील डेरावाद – गुरुमित सिंह

जानेवारी - २०१५

बाबा रामपालच्या प्रकरणावर तर्कशील सोसायटी पंजाबचे कार्यकर्ते गुरुमित सिंह आणि सुमित सिंह यांनी पाठविलेल्या हिंदी लेखांचे अनुवाद वाचकांसाठी देत आहोत.

हरियाणा आणि पंजाब ही दोन्ही राज्ये समान सांस्कृतिक धाग्यात विणली गेलेली राज्ये आहेत. त्यामुळे त्या राज्यात घडणाऱ्या घटनांचा परिणाम या दोन्ही राज्यांवर होतो. आज ही दोन्ही राज्ये डेरावादाच्या, बुवाबाजीच्या विळख्यात वेगाने फसत आहेत. अर्थात संपूर्ण देशातच आज धर्मगुरु राजकीय पक्षांबरोबर मतांच्या राजकारणात एकरूप होत आहेत पण हरियाणा – पंजाबमधील जनतेच्या मानसिकतेवर ह्या बुवा-बाबांचे वर्चस्व फार वेगाने वाढू लागले आहे. तेथील जनतेतील एक मोठा वर्ग या बाबा लोकांच्या चरणी लीन होण्यातच धन्यता मानू लागल्याचे दिसत आहे. जनतेच्या या मानसिकतेमुळे भ्रामक सुखी जीवनाच्या शोधातील हे भरकटणे त्यांच्या शोषणाचे एक साधन बनून गेले आहे आणि हे बाबा काहीही न देता दानशूर बनून गेले आहेत तर जनता मात्र याचक !
रामपाल प्रकरणानंतर राजकीय सत्तेची खूपच भंबेरी उडाली. हरियाणा-पंजाबमधील उच्च न्यायालयाने आदेश दिला कि या राज्यातील सरकारांनी आपआपल्या क्षेत्रात जे डेरे आहेत त्यांची तपासणी करून त्याचा अहवाल ध्यावा. हे बाबा लोक राजकीय व्यवस्थेलाही कशा प्रकारे आव्हान देत आहेत याचीही माहिती उच्च न्यायालय घेत आहे.
या पंजाब-हरियाणाला हे डेरे ही काही नवीन गोष्ट नाही. यांचा इतिहास पाचशे वर्षे जुना आहे. डे याचा अर्थ ‘थांबा’ किंवा ‘शिबीर’ असाही आहे. जेव्हा एखाद्या आध्यात्मिक शिबिराला ‘गुरु’ प्राप्त होतो तेव्हा त्याचे रुपांतर डेऱ्यात होते. इतर भागात यांना आश्रम असेही म्हटले जाते. उत्पादन साधनांत बदल झाल्याने सामाजिक बदल घडून येत असतात, पण लोक अनेक सामाजिक, सांस्कृतिक परंपराना पारंपारिक धर्माच्या बंधनामुळे सोडू शकत नाहीत, हे बदल स्वीकारू शकत नाही. त्यामुळे हे बदल स्वीकारण्यात अडथळे ठरणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक परंपरातून बाहेर पडण्याच्या प्रक्रीयेत या डेरावादाचा उदय झाला आहे. सर्वच डेरे रूढीवादी परंपरा मोडण्याचे आवाहन करतात पण स्वताचाच एक रूढीवाद निर्माण करतात. दलित, मागासवर्गीय हे सन्मानाच्या आशेने या डेऱ्याना शरण जातात कारण या डेर्यात जातीभेद नष्ट करण्याची भाषा केली जाते.
या पंजाब-हरियाणात व्यसनाचा प्रश्न फारच गंभीर बनलेला आहे. नशेच्या अनेक वेगवेगळे प्रकारांनी अनेक कुटुंबे मेटाकुटीला आलेली आहेत. अनेक कुटुंबे यात उद्वस्त झालेली आहेत. मुख्यतः महिलांना या व्यसनाधीनतेचा त्रास फार मोठ्या प्रमाणावर सोसावा लागत आहे. अशा स्थितीत ह्या डेऱ्यातून व्यसनातून मुक्त होण्याचे अनेक भ्रामक, अवैद्यानिक उपाय सांगितले जात आहेत. त्यांना भुलून अनेक महिला आपले कौटुंबिक स्वास्थ्य परत मिळविण्याच्या आशेने या डेऱ्यांना शरण जात आहेत. काही व्यसनाधीन लोकांना जगण्याचे नवीन मार्ग सापडल्याने यातून ते मुक्त होतातही, जे सकाळ संध्याकाळी नशेतच लडबडलेले असत ते आता सत्संग वैगेरेत रमून जातात. हा एक या डेरावादाचा सकारात्मक भाग झाला. पण म्हणून ज्या आर्थिक-मानसिक शोषणाच्या चक्रात हे लोक फसत जातात त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.. जनतेच्या सामाजिक-आर्थिक प्रश्नांबद्दल जी प्रचंड अनास्था शासन व्यवस्थेकडून दाखवली जात आहे त्यामुळेच अशा अनेक अन्यायी, अवैद्यानिक मार्गाकडे वळणे जनतेला भाग पडत आहे.
यात सर्वात मोठा प्रश्न आहे पारंपारिक धर्म आणि या डेऱ्यांच्या विचारधारा यांच्या संघर्षाचा ! हा संघर्ष बहुतेकवेळा हिंसक पातळीवरही पोहोचतो तर कधी कधी आपआपसातील झगडे किंवा गुरुच्या मृत्यूनंतर गुरुपदाच्या वारश्यावरून उफाळून आलेले वाद यातून नवे नवे डेरे निर्माण होत राहतात. मग मतांच्या राजकारणासाठी सोकावलेले सर्वच पक्षांचे नेते या गुरूंची चरणधूळ माथ्याला लावण्यासाठी त्यांच्या डेयात रांगा लावतात. बडे डेरे विविध राजकीय पक्षांच्या पंखाखाली घेतले जातात. त्यामुळे डेऱ्यानाही मस्ती चढते. आपल्याला देशातील कोणतेच कायदे कानून लागू नाहीत ही भावना बळावते व मग हा प्रश्न कायदा आणि सुव्यवस्थेचा बनून जातो.
जर सरकारने आपले सामाजिक कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडले, राजकीय पक्षांनी या डेऱ्याना आपली व्होट बँक म्हणून वापरण्याचे राजकारण करणे बंद केले तर हा संघर्ष टळू शकतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या डेरे, बुवा-बाबा- महाराज-भगवान यांच्या तथाकथित आश्रमांवर पोलिसांच्या गुप्तहेर विभागाने सातत्याने लक्ष ठेवले पाहिजे जसे पोलीस विविध राजकीय पक्ष, युनियन, संस्था यावर लक्ष ठेवत असतात. त्यामुळे यांच्या कारवायांची आगाऊ माहिती पोलिसांना मिळून त्यांच्यावर नियंत्रण राखणे शक्य होईल. आज या डेऱ्यांची ना कोणती नोंदणी होते ना यांच्या डेऱ्यात येणाऱ्या भक्तांवर कोणाचे लक्ष आहे. त्यामुळे यांना अवैध कामे करायला पूर्ण मोकळीक मिळते. म्हणूनच यांच्या डेऱ्यातील तथाकथित आश्रमातील कारवाया लक्षात घेऊन कायदा बनविणे गरजेचे आहे म्हणजे मग यांची अवैध बांधकामे, अवैध सेना, अवैध पैसा यावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल आणि या भागात थोडीफार शांतता निर्माण होईल.

लेखक संपर्क : गुरुमित सिंग, अंबाला मोबा. ०९४१६०३६२०३

मराठी अनुवाद राजीव देशपांडे