Categories
आठवणीतले दाभोलकर

पूर्णवेळ कार्यकर्त्यांचे पाठीराखे डॉक्टर

वार्षिकांक – २०१३

आठवणीतील डॉक्टर दाभोलकर लिहिणे म्हणजे माझ्यासाठी तर अत्यंत जड जात आहे. मन सुन्न आणि हात दगड झालाय. पण काय करणार? सत्य हे स्वीकारावेच लागते. आणि ते पचवून दिनक्रमही चालू ठेवावा लागतो हीच शिकवण डॉक्टरांच्या प्रत्येक कृतीतून आणि सहवासातून मी शिकलो. डॉक्टर, तुम्ही दौर्‍यावर आहात आणि तुम्ही परत येऊन सातारला मला भेटून अंनिसच्या कामाची चर्चा करणार याच प्रतिक्षेत मी आजही आहे.

1991 पासून माझा आणि डॉक्टरांचा परिचय झाला. तो दिवस मला आजही आठवतो. घरची अत्यंत गरीबी, माझे वडील मला सांभाळत नव्हते. आई व मी सातार्‍यात मावशीकडे रहायला आलेलो. मी नुकतीच 10 वी ची परिक्षा दिलेली. स्वत:च्या पायावर उभे राहून आईला सांभाळणे व उदरनिर्वाह करणे हेच पक्के डोक्यात. सातार्‍यातील एका हार्डवेअरच्या दुकानात सेल्समनची नोकरी करताना एका गिर्‍हाईकाला खिळे पुडीत बांधून देताना पेपर हातात आला आणि त्यातील एक पान बाजूला ठेवून नंतर वाचत बसलो. त्यात होती सुंदर हस्ताक्षर असणारा मुलगा पाहिजे अशी जाहिरात. कामाची वेळ 1 ते 5. मी मागचा पुढचा विचार कोणताही विचार न करता अर्ज तयार केला आणि पाठवला. 15 दिवसांनी निरोप आला 19, गुरूकृपा हौ.सोसा., शाहूनगर, गोडोली, सातारा येथे भेटायला या. मी भेटायला गेलो आणि काय एक चष्मा घातलेला आणि थोडे टक्कल असलेला असा पण प्रसन्न मुद्रेचा चेहरा माझ्यापुढे होता. पत्र लिहिणे, लेख लिहिणे, फायलिंग करणे एवढे काम मला सांगून थोडी पत्रं लिहायला लावली आणि उद्यापासून तू कामावर ये असे सांगितले. आनंद याचा होता की, पार्टटाईम काम मिळाले. आता पुढे कॉलेजचे शिक्षण पूर्ण करता येईल. त्या दिवसापासून मी काम आणि कॉलेज यामध्ये गुंग झालो. एफ.वाय.बी.कॉम.ला ज्या कॉलेजात शिकत होतो तेथेच भाषण देण्यासाठी डॉक्टर दाभोलकर प्रमुख वक्ते म्हणून आले. मी अवाक् झालो. रोज पत्रं लिहून, लेख लिहून त्यातून थोडेफार अंनिसचे काम समजले. पण डॉक्टरांचे ते व्याख्यान(वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावरील) ऐकून मी भारावून गेलो. आपण एवढ्या मोठ्या माणसाबरोबर काम करत आहोत याची जाणीव झाली व मनस्वी अभिमान वाटला. मग काय कॉलेज शिकत शिकत मी डॉक्टरांसोबत काम करत असतानाच सातारा अंनिसच्या कार्यकर्त्यांशी माझी ओळख झाली. मी हळूहळू अंनिसमय झालो आणि अंनिसचं काम माझा नित्यक्रम झाला. डॉक्टरांसोबत राहून मी खर्‍या अर्थाने माणूस म्हणून घडत गेलो. डॉक्टरांच्या प्रत्येक गोष्टींचा प्रभाव माझ्या जीवनावर पडत गेला. कोणत्याही संकटांवर निर्भयपणे व चिकाटीने मात करायला मी शिकलो. माझ्या जीवनात अनेक कौटुंबिक संकटं आली. ती निर्धाराने आणि सामंजस्यपणाने सोडवायचे कौशल्य मी केवळ डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियांमुळेच शिकलो. खालची मान वर न करणारा राजू खर्‍या अर्थाने बोलता, लिहिता आणि कृतिशील संघर्ष करणारा झाला तो केवळ डॉक्टर आणि अंनिस चळवळीमुळेच. स्वत:च्या उपजिविकेचा मार्ग शोधताना मला अनपेक्षितपणे डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियांचा सहवास मिळाला आणि मी बनलो एका वेगळ्या वाटेने जाणारा पूर्णवेळ अंनिसचा कार्यकर्ता.

कार्यकर्ता समाजासाठी पूर्ण वेळ आपले आयुष्य झोकून देतो तेव्हा त्याची एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेणारे जणू माझे वडीलच असलेले डॉक्टर हे राजूच्या स्वत:च्या घरासाठी कृतीशील आर्थिक मदत करतात तेव्हा त्यांच्यातील माणूसपणा हृदयाला भिडणारा असतो. डॉक्टर आणि त्यांचे सर्व कुटुंबीय हे माझ्यासाठी खरे तर आधारवडच. स्वत:च्या नात्यापेक्षाही जवळची अशी माणसं मी अंनिस चळवळीत जोडू शकलो ते केवळ डॉक्टरांच्या सहवासातील कामामुळेच. डॉक्टरांच्या वागण्यातील साधेपणा, वक्तशीरपणा, टापटीपपणा, प्रामाणिकपणा आणि अभ्यासूपणा या गुणांचा सहवास मला पुढेही नेहमी पथदर्शक असाच राहील.

राजू कुठे आहेस? काय करतोस? तुला वेळ आहे का? अत्यंत प्रेमळ आणि आदरयुक्त असा डॉक्टरांचा फोन मला सतत यायचा. पुढील कामाची दिशा, नियोजन याबाबत ते अर्धा अर्धा तास बोलायचे. सातारा हद्दीत प्रवेश करताना त्यांचा फोन आला नाही असा दिवस उजाडला नाही. डॉक्टरांचा फोन आता कधी येणार नाही हे सत्य आहेच. पण तेवढ्याच ताकदीचे सहकारी डॉक्टरांनी अंनिसमध्ये तयार केले आहेत. त्यांचे फोन हे डॉक्टरांचेच फोन असून कामाला बळ आणि धैर्य देतात हेही तितकेच सत्य आहे.

डॉक्टर तुम्हीच आम्हाला शिकवलंत की, संकटांवर विवेकानेच मात करता येते. भावनिक होऊ नका. पण आपलं अस्तित्व आमच्यात नाही हे स्वीकारणं म्हणजे केवळ मोठं संकट असू शकतं हे खर्‍या अर्थानं आम्ही आज अनुभवत आहोत. पण त्यावर विवेकानं उत्तर आम्ही शोधलंय. जेवढ्या निर्भयपणे आणि विवेकाने शैलाताई, मुक्ताताई आणि हमीदने आम्हाला सक्रीय कृतीशील पाठींबा दिलाय त्याला खरंच तोड नाही. अविनाश पाटील यांच्यासारखं संयमी आणि अभ्यासू नेतृत्व आम्हाला मिळालंय. माधव बावगे, विनायक सावळे, सुशीलाताई मुंडे, मिलिंद देशमुख आणि खरे तर सर्वच कार्यकर्ते हे आमचे खंदे सहकारी आहेत. त्यामुळे आम्ही आता मागे पहाणार नाही. डॉक्टर आपलं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आपली चळवळ आणि विवेकाचा विचार कृतिशीलपणे पुढे नेण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा करेन आणि हीच खर्‍या अर्थाने आपल्याला आदरांजली असेल. फक्त गरज आहे माझ्या अंनिस चळवळीतील सर्व साथींची पूर्वीप्रमाणेच सहकार्य करण्याची. ते मिळणारच या विश्वासासह…..

प्रशांत पोतदार