Categories
बालविभाग

प्राणीजगतातील आश्चर्ये

वार्षिकांक – २०१४

उडणारा साप व पेग्विंन

आपणास आश्चर्य वाटेल पण मेलेला साप आपणास डसू शकतो. अशीच अनेक आश्चर्ये विविध प्राण्यांबाबत आपणास पहावयास मिळतात.

रॅटल स्नेक नावाचा एक विषारी साप आहे. तो अमेरिकेत सापडतो. याचे विष माणसाला प्राणघातक असते. असा साप दिसला की, आपण त्याला बहुधा मारतो. तथापी रॅटल स्नेक मेला तरी काही काळपर्यंत तो आपणाला दंश करू शकतो. हे कसे काय? मेलेल्या रॅटलस्नेकला हाताने उचलून टाकून देताना तो हाताला डसल्याची उदाहरणे आहेत. असा साप हाताने उचलण्याची चूक करता कामा नये. साप मेला त्या वेळेपासून कमीत कमी अर्धा तास अशा सापाला हाताने उचलू नये.

रॅटलस्नेकच्या दोन्ही डोळ्यामध्ये असलेला भाग व नाकाचा भाग हे उष्णतेच्या लहरीसाठी सेन्सर्स किंवा संवेदक म्हणून काम करतात. एखादा उंदीर रॅटलस्नेकच्या डोक्याजवळून जात असेल तर उंदराच्या शरीरापासून निघणार्‍या उष्णतेच्या लहरी हे सेन्सर्स स्वीकारतात. परिणामी सापाला उंदीर जवळ आल्याची जाणीव होते व तो उंदराला डंख मारतो. ही क्रिया अंधारात देखील घडते. सापाच्या दृष्टीचा याच्याशी संबंध नाही.

माणसाचा हात रॅटलस्नेकच्या डोक्याजवळ आला तर हीच क्रिया घडते. कारण हातापासून उष्णता लहरी निघत असतात. साप मेला तरी डंख कसा मारला जातो? मेल्यानंतर काही काळ या सापाची मज्जासंस्था कार्यरत असते. त्यामुळे मेलेल्या सापाला ही चेतासंस्था जिवंत असेपर्यंत संवेदना रहातात व तो डसू शकतो. म्हणून सर्पतज्ञांचा सल्ला आहे की, साप शक्यतो मारू नका; कारण तो आपला मित्र आहे. पण त्याला मारणे अटळ झाले तर मेल्यानंतर त्याला अर्धा तासपर्यंत हाताने उचलू नका.

पॅरॅडाईज ट्री स्नेक नावाचा साप, भित्र्या मंडळींनी पाहिला तर आयुष्यभर त्यांना भीतीदायक भास होत राहतील. हा साप झाडावर चढतो व त्याच्या शेंड्यावरून उडी घेऊन जमिनीवर किंवा दुसर्‍या छोट्या झाडावर पोचतो. हे कसे घडते? हा साप आपल्या शरीराचा खालचा भाग उडण्यापूर्वी फुगवितो. त्याची आडवी रूंदी मध्यभागी दुप्पट होते. परिणामी त्याच्या शरीराला कागदाच्या विमानासारखा आकार येतो. सुरवातीला वेग घेतल्यावर हा साप इंग्रजी एस आकार धारण करून क्षितीज समांतर आंदोलने घेत रहातो. या आंदोलनामुळे साप हवेत तरंगू शकतो.

पेंग्विन पक्षी हजारोच्या संख्येने हिवाळ्यात एकमेकांना चिकटून बसून रहातात. जर ते स्वतंत्रपणे बसून राहिले तर त्यांच्या अंगातील उष्णता जमिनीकडे वाहून, हवेत अभिसरण होऊन आणि उत्सर्जनामुळे निघून जाईल. वजा चाळीस अंश सेंटीग्रेड या तापमानाला मग हे पक्षी बळी पडतील. हिवाळ्यातच पेंग्विन अंडी उबवितात. हजारोच्या संख्येने एकमेकास चिकटून राहिल्याने हवेतील अभिसरणाद्वारे व उत्सर्जनाद्वारे निघून जाणारी उष्णता वाचते. त्यामुळे बराच काळपर्यंत अन्नाची गरज टाळून हे पक्षी अंडी उबवतात व पिल्लांना जन्म देतात.

अशा विस्मयकारी घटना विविध प्राण्याच्या वर्तनात आढळतात. याचे कारण उत्क्रांतीने त्यांना दिलेली तगून रहाण्याची, संरक्षणाची आणि प्रतिकाराची देणगी.

कासव, घुबड आणि मांडुळ

माणसाच्या अविचाराचे बळी ठरत आहेत कासव, घुबड व मांडुळ साप. अधून मधून या प्राण्याबद्दलच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचायला मिळतात. अमुक नख्यांचे कासव घरात सुबत्ता आणते, तर मांडुळसाप गुप्तधन दाखवितो. घुबडाचा बळी देऊन अमाप धन मिळविता येते अशा अंधविश्वासापायी या प्राण्यांना प्राणीतस्कर पकडतात व एक-दोन लाख रूपयांपासून ते पाच लाख रूपयांपर्यंत त्यांची चोरून विक्री करतात. शॉर्ट कट मार्गाने श्रीमंत होण्याची स्वप्ने बघणारे लोक मात्र गंडवले जातात व नंतर हात चोळत बसतात.

उत्क्रांतीतून पृथ्वीवर ज्या विविध प्राणी व वनस्पतीचा विकास झाला त्यांचे जीवन परस्परावलंबी झाले आहे. घुबड शेतातील उंदरांना पकडून त्यांचे नियंत्रण करतात तर कासव पाण्यातील तरंगणारी घाण खाऊन पर्यावरण स्वच्छ ठेवतात. मांडुळ साप जमीन उकरून भुसभुशीत करतो. मांडुळाला दोन तोंडे असतात हे अज्ञान आहे. इतर सापांचे शेपूट बारीक होत जाते पण मांडुळाचे शेपूट शरीराचा मधला भाग व तोंडाकडचा भाग याची जाडी सारखीच असते. त्यामुळे त्याला दोन तोंडे असल्याचा समज होतो. काही वेगळे आढळले तर त्याला चमत्कार जोडण्याची खुळी समजूत मांडुळाबाबतही लागू पडते. कासवाला प्राणीजगतात फारसे शत्रू नाहीत पण माणूस मात्र त्याच्या मागे लागतो. पुराणात जलप्रलयातून कासवानेच मार्ग काढला अशी कथा आहे. हिंदुच्या दहा देव अवतारातील कूर्म हा अवतार म्हणजे कासव होय. देवाच्या दारात कोरलेल्या या कासवाला आपला प्रथम नमस्कार घडतो. मग माणूस त्याची हत्या का करतो? तर विशिष्ट नखांचे कासव घरात ठेवले तर घरात सुबत्ता येते या वेडगळ कल्पनेतून. आणि त्यासाठी कासवे पकडून मोठ्या रकमेला त्याची विक्री केली जाते.

काही कासवे जमिनीवर वाढतात. ती गवत व वेळप्रसंगी छोटे-मोठे कीटकही खातात. समुद्रातील कासव छोटे-मोठे मासे व इतर जलचर प्राणी खाऊन वाढतात. कासवांना दात नसतात पण जबड्याचे हाडच करवतीप्रमाणे काम करते. कासवाच्या जाती शंभरच्या आसपास आहेत. त्यातील बहुसंख्य जमिनीवरच्या आहेत. कित्येक मैलाचा प्रवास करून कासवे अंडी घालण्यासाठी समुद्रकिनार्‍यावरील विशिष्ट जागी येतात. अंडी घालण्यासाठी जमिनीवर येणार्‍या व परत पाण्यात उतरणार्‍या कासवांची रीघ हा शास्त्रज्ञांच्या कुतुहलाचा विषय आहे.

घुबडाला अपशकुनी समजणारी मंडळी त्याला पकडून गुप्तधन शोधण्याचा मुर्खपणा का करतात? खरं तर घुबड हे उंदीर व तत्सम प्राणी यांना आटोक्यात ठेवतं. तो शेतकर्‍यांचा मित्र आहे. घुबडाला फक्त रात्रीच दिसतं हा गैरसमज आहे. त्याला दिवसाही दिसतं. पण ते दिवसा ढोलीत वा निर्जन ठिकाणी लपून राहतं व शिकारीसाठी रात्री बाहेर पडते. तीक्ष्ण डोळे व तीक्ष्ण नखे ही त्याची शिकारीची आयुधे आहेत.

शेतकर्‍यांचा मित्र असलेले घुबड अशुभ कसे? चुकून ते रात्रीच्या वेळी एखाद्या घराच्या छपरावर उतरले व ओरडायला लागले तर काय तरी अशुभ घडणार हा अंधविश्वास आहे. घुबडाला अशी दिव्य दृष्टी असती तर भारतातल्या ज्योतिषांनी घुबडे पाळली नसती का?

पर्यावरणाच्या संतुलनासाठी विविध प्राण्यांचे निसर्गाच्या साखळीतील विशिष्ट स्थान आहे. म्हणून प्राण्यांची अकारण वा चुकीच्या कारणासाठी हत्या करणे हा गुन्हा आहे. प्राणी तस्करी रोखण्यासाठीचे कायदे कडक व्हायला हवेत. लोकप्रबोधनाची व्याप्ती पण वाढवायला हवी.

पाल

दुधात पडलेली पाल त्या दुधाचा चहा पिल्यानंतर दिसली तर अनेकांना उलट्या होतात. पालीचे विष आपल्या पोटात गेलंय या भीतीने त्यांची गाळण उडते. पाल विषारी असते? याचे उत्तर ती विषारी नसते हे आहे. पालीविषयीचे समज व गैरसमज दैनंदिन जीवनात अकारण भीती वाढवतात.

पाली जगभर उष्ण प्रदेशात आढळतात. त्यांचे जगभर आढळणारे तीन हजारांच्या आसपास प्रकार आहेत. दोन तीन इंचापासून ते दोन-तीन फुटापर्यंच्या लांबीच्या पाली आढळतात.

पाल पाण्यात पोहू शकते. बिळात शिरून किडे खाऊ शकते. पालीच्या पंजाचे खास वैशिष्ट्य आहे. त्या पंजावर दाब देऊन कुठेही आणि कशाही चिकटून बसतात. थोडासा चिकटपणा म्हणजे ओलसरपणा आणि पंजा पूर्ण हवा बंद करण्याची सोय यामुळे त्या खिडकीतील काचेवर किंवा छतावर चालू शकतात. भिंतीला चिकटलेला पालीचा पंजा रबरासारखा भिंतीच्या पृष्ठभागाला चिकटतो याचे कारण हवेचा पंजावर पडणारा दाब. रबराची छोटी अंतर्गोल चकती कपाळावर दाबा. ती कपाळावर चिकटून बसते. तीच क्रिया पालीच्या पंजाबाबत घडते.

गरजेनुसार पाली झाडावर चढून तेथील किटक खातात. आपल्या घरात पाली आढळतात कारण दिव्याच्या प्रकाशाकडे आकर्षित झालेले किडे त्यांना मटकावयला मिळतात. डोक्यावर डोकावणारे डोळे, पायाद्वारे मिळणारे स्पर्शज्ञान व आवाज यांचा उपयोग पालींना भक्ष्य पकडण्यासाठी किंवा जीव वाचविण्यासाठी होतो. पालीवर आघात झालाच तर तिचे शेपूट तुटून पडेल अशी युक्ती ती करते. वळवळणारे शेपूट आपले लक्ष वेधून घेते तेवढ्यात पाल निसटते व लपण्यात यशस्वी होते. तुटलेले शेपूट पुन्हा वाढू शकते.

पालीबद्दल फार मोठा अंधविश्वास समाजात आढळतो. ती अंगावर पडली तर शुभ वा अशुभ मानले जाते. शरीरावर ती कोठे पडली यावरून हे संकेत ठरविण्याची प्रथा पालीची कारीका म्हणून प्रसिद्ध आहे. पण यात काहीच तथ्य नाही.

पाल विषारी नसते. काही रानटी जमाती पाली खातात. साप व उंदीर पण पालींना खातात. त्यांना काहीही होत नाही. पाल हे मांजराचेही भक्ष्य आहे. मग पाल पडलेले दूध किंवा अन्न पोटात गेले तर काहींना उलट्या का होतात?

याचे एक कारण पालीचे किळसवाणे शरीर. माणसांना पूर्वग्रहामुळे पाल आवडत नाही. दुसरे कारण पाल विषारी असते हा गैरसमज मनात भीती निर्माण करतो आणि या भीतीपोटी उलट्या होतात. जीवन साखळीतील पाल हा एक दुवा असल्याने तिच्याबद्दलचे गैरसमज आपण टाकून द्यायला हवेत.

डास, किडे व माशा यांना मटकावणारी पाल घरात असली तरी चिंता बाळगण्याचे कारण नाही. फक्त अन्न पदार्थ आणि दूध झाकून ठेवण्याची काळजी घ्या.

मांजराची उडी

माणूस जर उंचावरून पडला तर हातपाय तरी मोडून घेतो किंवा डोके तरी फोडून घेतो. खूप उंचावरून माणूस जमिनीवर कोसळला तर त्याची वाचण्याची शक्यता जवळजवळ शून्य असते. पण उंचावरून मांजर हवेत भिरकावले किंवा अंदाज चुकल्याने ते झाडावरून किंवा उंच इमारतीवरून खाली कोसळले तर त्याला सहजा इजा होत नाही. याबाबत 1987 मध्ये केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध झाले आहेत. अपघाताने खाली पडलेली 132 मांजरे 2 ते 32 मजल्यावरून खाली कोसळली होती. त्यातील बहुतेक मांजरे काँक्रीटच्या जमिनीवर उतरली होती. यातील 90 टक्के मांजरे वाचली. 60 टक्के मांजरांना काहीही इजा झाली नाही. गंमत म्हणजे अधिक उंचीवरून म्हणजे सातव्या किंवा आठव्या मजल्यापेक्षा जास्त उंचीवरून जी मांजरे कोसळली त्यांना कमी दुखापत झाली. याचे रहस्य काय?

मांजराला काही विज्ञान कळत नाही पण उपजत कौशल्याचा ते कसा वापर करते त्याचे विज्ञान आपणाला समजले आहे. उंचावरून खिडकीतून खाली पडलेच तर मांजर पहिल्यांदा, उपजत प्रेरणेने आपल्या शरीराला असे वळविते की, त्याचे पाय खाली यावेत. नंतर ते आपल्या पायाच्या लवचिकतेचा उपयेग करून जमिनीवर पडता पडता धक्क्याचा दणका शॉक अ‍ॅबसॉर्बवर प्रमाणे कमी करते. पायाच्या लवचिकतेचा उपयोग त्यास स्प्रिंगप्रमाणे होतो.

लोखंडाचा तुकडा पाण्यात बुडतो पण त्याचेच पसरट घमेले केले तर ते पाण्यावर तरंगते याचे कारण पाण्याची उद्धरण शक्ती. हवेबाबतही हे खरे आहे. मांजर खाली पडत असताना त्याच्यावर खालून वर कार्य करणारी हवेची उद्धरणशक्ती कार्यान्वित होते. ते जर कमी उंचीवरून खाली पडले तर हवेची उद्धरण शक्ती कमी रहाते. त्यामुळे कमी उंचीवरून पडलेल्या मांजराला दुखापत होण्याची शक्यता वाढते. जितकी हवेच्या स्तंभाची खोली जास्त तितकी उद्धरणशक्ती जास्त. म्हणून मांजर बर्‍याच उंचावरून खाली येताना उलट दिशेने असणारा हवेचा दाब मांजराला तरंगत खाली येण्याला उपयोगी पडतो.

ही क्रिया अपघाती विमानातून पॅराशुटद्वारे उडी मारणार्‍या वैमानिकाप्रमाणे आहे. पॅराशुट उघडण्यापूर्वी वैमानिक वेगाने पडत असतो. पण पॅराशुट उघडताच खालून वर असणार्‍या हवेच्या दाबामुळे गुरूत्वाकर्षण बॅलन्स होते व तो हळूहळू एकसमान वेगाने खाली उतरतो.

खिडकीतून अपघाताने खाली पडणारे मांजर आपलं अंग वळवून पाय खाली आणते आणि ते पसरून धरते. त्यामुळे त्याचा वेग नियंत्रित होतो व त्याला पॅराशुटप्रमाणे टर्मिनल गती मिळते.

हवेतून किंवा पाण्यातून खालच्या दिशेने गतीमान असणार्‍या पदार्थाची गती सुरवातीला वाढत असते. पण जसजसा हा पदार्थ खाली जाईल तसतशी गतीतील वाढ कमी होत जाऊन त्या पदार्थाला स्थिर गती प्राप्त होते. या गतीला टर्मिनल गती असे नाव आहे. स्टोक नावाच्या वैज्ञानिकाने यावर संशोधन केलंय. मांजराचे खाली पडणे सहाव्या किंवा त्यापेक्षा जास्त मजल्यावरून असेल तर अखेरीस त्याची गती टर्मीनल गती होते आणि गुरूत्वाकर्षणाचे बल, उद्धरण शक्तीमुळे बॅलन्स होते.

अधिक उंचावरून मांजर पडताना या टर्मिनल गतीमुळे व पायाच्या लवचिकतेमुळे ते पॅराशुटप्रमाणे अलगद जमीनीवर टेकते. त्यामुळे त्यास इजा होत नाही.

निसर्गाने प्राण्यांना संरक्षणासाठी उपजत प्रेरणा दिलेल्या असतात. मांजरही या उपजत प्रेरणेचा उपयोग स्वत:चा जीव वाचविण्यासाठी करतो. मांजराप्रमाणेच विविध प्राण्यांना अशा प्रेरणा मिळालेल्या असतात. व त्या आपणाला आश्चर्यजनक वाटतात.

प्रा. . रा. आर्डे