Categories
वाचक प्रतिसाद

प्रतिसाद…

मार्च - २०११

भारतातील वैज्ञानिक पतनाला शंकराचार्य जबाबादार कसे?

आदरणीय संपादक, अंनिवा,

            ‘प्राचीन भारतात विज्ञानाचा र्‍हास का झाला?’ या लेखाच्या लेखकाशी बोलणे झाले. माझी शंका व त्यावरील त्यांचे उत्तर सर्वांना कळावे यासाठी त्यांनी मला आपल्याला पत्र लिहिण्याची सूचना केली.

            माझा साधा प्रश्न असा आहे – शंकराचार्य हे महाबुद्धीमान होते आणि त्यांच्या अद्वैतवादाच्या तत्वज्ञानाबद्दल विद्वानांना आदर वाटतो आणि ते त्याचा अभ्यास करतात. असं असताना शंकराचार्य हे भारतातील सामाजिक आणि वैज्ञानिक पतनाला जबाबदार होते असा शेरा आपण कसा मारू शकता? यावर मला सविस्तर मत हवं आहे.

            मी आपल्या चळवळीच्या विरूद्ध नाही. पण आपल्या देशातील बहुसंख्य लोकांना ज्याबद्दल आदर वाटतो अशा सर्व गोष्टींबद्दल आपली चळवळ पूर्वग्रहदूषित आहे की काय या शंकेनं मी काहीवेळा संभ्रमित होतो.

आपला नम्र,

प्रसाद जोशी

शंकराचार्यामुळे वैज्ञानिक पतन झालं हे स्विकारण्यावाचून गत्यंतर नाही…

        अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही बहुजनवादी आणि शोषणविरोधी चळवळ आहे. ज्या धर्मव्यवस्थेमुळे समाजाच्या मोठ्या भागाचं शोषण झालेलं उघडपणे दिसतं, अशा व्यवस्थेच्या कडव्या पुरस्कर्त्याला समाजाच्या पतनाबद्दल जबाबदार धरणं यात मला तरी काही गैर वाटत नाही. अशा व्यवस्थेच्या समर्थकांना ज्या गोष्टी आदरणीय वाटतात त्या बहुसंख्य लोकांनाही वाटतात, असा त्यांचा समज असेल तर तो पूर्णतः चुकीचा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीबद्दल म्हणाल तर, कोणतेही पूर्वग्रह न बाळगता वास्तवाकडे स्वच्छ दृष्टीनं बघणं आणि सत्याचा उलगडा होण्यासाठी सतत प्रयत्न करणं हा चळवळीचा प्राण आहे. संभ्रमांचा निरास करणं हा चळवळीचा मूळ उद्देश आहे. ज्यासंदर्भात शंका व्यक्त झाली आहे, त्या मूळ लेखाचा उद्देशही तोच होता.

            आता करून घेऊ या आकलन आद्य शंकराचार्यांचं!

            आद्य शंकराचार्य हे अफाट आणि कुशाग्र बुद्धीमत्ता असलेलं व्यक्तिमत्व होतं हे कुणालाच नाकारता येणार नाही. विरोधकांच्या भूमिकेतील विसंगती हेरून त्यावर विदारक प्रकाश टाकण्याचं त्यांचं कौशल्य वाखाणण्यासारखं होतं. गहन तत्वज्ञानाचा सोप्या भाषेत प्रसार करण्याचं कसब, संघटनाचातुर्य, अविश्रांत भ्रमंतीची क्षमता याद्वारे अवघ्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जे काम केलं ते अजूनही पूर्णपणे पुसता आलेलं नाही हे खरंच आहे.

            पण शंकराचार्यांचं स्वतःचं जीवन अंतर्विरोधानं भरलेलं होतं हेही विसरून चालणार नाही. जग हा आभास आहे, ते संपूर्णपणे मिथ्या आहे असे अतर्क्य तत्वज्ञान (अजातवाद) मांडणारा हा माणूस जगाचं खोटेपण त्याच जगाला पटवण्यासाठी आयुष्यभर धडपडत राहिला. निवृत्तीचा (संन्यास) पुरस्कार करणारा हा माणूस स्वतः मात्र नेहमीच्या सामाजिक जीवनातून कधीच निवृत्त झाला नाही. ईश्वराची पूजा आणि आराधना यांच्या ग्राम्य विधींना त्यांनी विरोध केला, त्यांच्या ‘ब्रम्हवादी’ दर्शनात विश्व मिथ्या मानल्यामुळे (ब्रम्हसत्यम् जगत् मिथ्या, जीवो ब्रम्हैव नापरः। – विवेकचूडामणी) त्याची निर्मिती करणारा ईश्वरच नाही आणि तरीही त्यांनी ‘भज गोविंदम् भज गोविंदम्’ अशी चर्पटपंजरिका म्हणत जनमानसात रूजवली ती मूर्तीपूजा!

            दर्शनाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष जीवनाला इतकं मिथ्या मानणारे शंकराचार्य समाजधारणेच्या क्षेत्रात नव्या हिंदू धर्मव्यवस्थेचे निर्माते ठरले. त्यांच्या काळातला हिंदुधर्म आजच्या अर्थानं एक धर्म नव्हता तर अनेक पंथांची भेसळ होता. त्यात मीमांसा आणि सांख्य तत्वज्ञानाचा पुरस्कार करणारे नास्तिक होते, वेद नाकारणारे चार्वाक होते आणि इतर कितीतरी आस्तिक पंथ-उपपंथ होते. यापैकी आस्तिक पंथांचं एकीकरण आणि नास्तिक परंपरेचं मनुस्मृतीच्या आधारे खच्चीकरण करण्याचं काम शंकराचार्यांनी केलं. ‘प्राचीन भारतात विज्ञानाचा र्‍हास का झाला?’ या लेखात ‘कलीवर्ज्य’ म्हणून सांगितलेली वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी , स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी आणि बेटीबंदी अशी सात बंधनांची संकल्पना त्यांनी आग्रहानं मांडली आणि अत्यंत कडवेपणानं त्यांनी या व्यवस्थेचा प्रचार केला. त्यांचं हे कार्य पुढे चालू रहावं यासाठी त्यांनी देशाच्या चार टोकांना चार पीठं स्थापन केली. (उत्तरेकडे काश्मीरमध्ये ज्योतिर्मठपीठ, पूर्वेकडे पुरी इथं गोवर्धन पीठ, श्रृंगेरी इथं शारदा पीठ आणि द्वारका इथं द्वारका पीठ) ती आजही आहेत आणि या पीठाधिपतींना आजही शंकराचार्य हीच पदवी आहे.

            चातुर्वर्ण्याच्या प्रश्नावर त्यांना मनुस्मृती शिरोधार्य होती. वेदान्त भाष्यात आणि बृहदारण्यक उपनिषदावरील भाष्यात मनुस्मृतीचा अनेक वेळा उल्लेख येतो. ‘मनूची वचनं म्हणजे औषध आहे’ असं तैत्तिरिय संहितेसारखंच (2.2.10.2) त्यांचंही (ब्रम्हसूत्र: 2.1.2) मत आहे. मनुस्मृती ही वेदवाक्यांवर आधारलेली असल्यामुळे तिला किंचितही विरोध करणं हा साक्षात् वेदांचा विरोध आहे असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं आहे. विश्व मिथ्या मानणार्‍या कोणाही व्यक्तीला विज्ञानाबद्दल किंचितही आस्था असण्याचं कारण नसतं, कारण विज्ञान हे पूर्णपणे इहवादी असतं. शंकराचार्यांनी ‘विज्ञानाला विरोध करू या’ या पद्धतीनं विरोध केला नसला, तरी त्यांच्या विचारांच्या क्षेत्रात विज्ञानाला स्थानच नव्हतं. त्यामुळे विज्ञानाचा विशेषत्वानं वेगळा उल्लेख करण्याची त्यांना गरजच वाटली नाही.

            तेव्हा शंकराचार्यांच्या एकूण कार्याचं मूल्यमापन करू जाता, त्यांनी हिंदू धर्मव्यवस्था अधिक कडक केली आणि या व्यवस्थेची समाजावरची पकड भक्कम केली असंच म्हणावं लागतं. गुप्त राजवटीत (इ.स.319 ते 415) सरंजामी राज्यपद्धती अस्तित्वात आली. या व्यवस्थेमुळे वाढीला लागलेल्या नव्या शोषणाधारित व्यवस्थेला शंकराचार्यांच्या बुद्धीनं आणि संघटनाकौशल्यानं धर्माचं अधिष्ठान दिलं. त्यांचं बुद्धीचातुर्य आणि कार्यक्षमता यामुळे समाजव्यवस्थेला दगडासारखं काठिण्य आलं ही शोकांतिकाच म्हणायला हवी. मानवतावादी मूल्यांच्या दृष्टीनं तर हा अक्षम्य अपराधच आहे. तेव्हा हिंदू धर्माच्या नवनिर्माणाच्या शंकराचार्यांच्या प्रयत्नात सामाजिक आणि वैज्ञानिक पतन झालं हे स्विकारण्यावाचून गत्यंतर नाही…

                  डॉ. आशुतोष मुळ्ये


डॉ.आशुतोष मुळ्ये यांचा लेख आवडला

            अं.नि.वा.च्या फेबु्रवारी 2011 अंकातील मधील डॉ.आशुतोष मुळ्ये यांचा प्राचीन भारतात विज्ञानाचा र्‍हास का झाला? हा लेख अतिशय अभ्यासपूर्ण व रोचक वाटला. आपल्या देशाची उज्ज्वल परंपरा त्यातील सर्व क्षेत्रातील प्रगती यांची माहिती देणारा हा लेख खूपच महत्वपूर्ण वाटला. त्याचबरोबर भारतीय समाजाच्या पिछेहाटीला आपणच कसे जबाबदार आहोत, त्याला आपली भारतीय समाजरचना कशी कारणीभूत आहे याबद्दलचे विवेचन सुस्पष्ट आहे. प्रस्तुत लेखाबद्दल लेखकांचे मन:पूर्वक अभिनंदन तसेच त्यांनी यापुढेही अशाच महत्वाच्या विषयावर लेख लिहावेत यासाठी हार्दिक सदिच्छा.                 –

डॉ.एन.व्ही.चिमणकर, जळगाव

            अशाच अर्थाचे अनेक फोन लेखक डॉ.आशुतोष मुळ्ये यांना आले आहेत. या लेखाबद्दल लेखकाचे हार्दिक अभिनंदन. –संपादक


अंनिसचे काम ऐतिहासिक

            फेबु्रवारी महिन्याचा अंक मिळाला. एका दमात सर्व अंक वाचला. वाचलेवर तुमच्याशी न बोलणे म्हणजे कृतघ्नपणा ठरेल असे वाटले, म्हणून हे पत्र लिहितोय.

            ‘अंधश्रद्धा’ सारख्या नाजूक, संवेदनशील विषयाशी निगडित सामाजिक लढाई तुम्ही गेली 20 वर्षे लढता आहात. त्याची गोड फळेही दिसताहेत. ही चळवळ कासवाच्या गतीने महाराष्ट्रभर वाढली आहे. खेड्यापाड्यातसुद्धा हा विचार घेऊन तरूणांची फळी तयार होत आहे, हे फार मोठे फलित आहे. अंनिसचे हे काम ऐतिहासिक व आश्वासक आहे. येत्या 50 वर्षांत अंनिसच्या आदर्शांचा, तत्त्वज्ञानाचा वटवृक्ष होणार आहे, भविष्यात तरी राहील. हे मोठे. ऐतिहासिक काम करणेसाठी तुम्ही व तुमच्या सर्व लहानथोर सहकार्यांना आरोग्यसंपन्न, दिर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!

            दोन दशकाच्या प्रवासाचा मागोवा घेत पुण्यात जो अंनिसचा मोठा कार्यक्रम झाला. त्यात मोठ्या विचारवंतांनी भाग घेतला. त्यांची उपस्थितीच या चळवळीच्या यशाचे गमक आहे. आपण उद्धृत केल्याप्रमाणे, “विवेकाचा झेंडा देऊ हाती, हम होंगे कामयाब!” विवेकाचा हा झेंडा घेऊन ही अंनिसची चळवळ वाढेलच व निश्चिंतपणे यशस्वी होईल. याची खात्री वाटते. परत एकदा या ऐतिहासिक कामासाठी तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन! धन्यवाद!    

डॉ.आनंद कोळी, इचलकरंजी