Categories
प्रतिसाद

प्रतिसाद

सप्टेंबर - २०११

मुलाच्या सत्यशोधकी विवाहाचा अभिमान वाटला

            ऑगस्टचा अंकातील ‘आदर्श विवाह समारंभ कसे होतील?’ हा लेख वाचला, खूप आवडला. कारण नाळ जुळली. समाधान वाटले आणि माझ्या मुलाच्या लग्नाच्या समारंभाचे स्मरण झाले. माझ्या मुलाचा विवाह 27 वर्षांपूर्वी सत्यशोधक पद्धतीने मी घडवून आणला. त्यावेळच्या विविध वृत्तपत्रात या विवाहाचे कौतुकही झाले होते. केवळ नावाला अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता भासवून व सत्यशोधकी विवाहाचा गाजावाजा करून प्रचंड खर्च करणार्‍या ढोंगी लोकांपेक्षा मी प्रामाणिकपणे अंनिसच्या विचाराशी ठाम राहिलो. याबद्दल समाधान वाटले.

नारायण अतिवाडकर, बेळगाव


            ऑगस्ट 2011 चा अंक मिळाला. संपादकांनी कायद्याच्या विरोधकांना चांगले समर्पक उत्तर दिले आहे. आम्ही मिटींगमध्ये सामुहिक वाचन केले व विरोधकांची मानसिकता समजण्यास मदत झाली. कव्हरस्टोरीमुळेही काय चालले आहे ते समजले. ‘नागमणीचा डंख’ या लेखात समाजमन समजले. समाज समितीचा कसा वापर करून घेते याचा प्रत्यय आला. प्रभाकर नानावटी यांचाही लेख माहितीत भर घालणारा आहे. आदर्श विवाहाबद्दल चांगली माहिती आहे. विशेष म्हणजे मराठा परिवाराचे अभिनंदन! आपण फार मोलाचे काम व काळाप्रमाणे प्रचार प्रसार करीत आहात. मी वाचकांना विनंती करीन की, आपण प्रत्येक ठिकाणी यासाठी जरूर प्रयत्न करावेत. तसेच फाय फौंडेशनचे विशेष आभार. मी त्यांच्याच ग्रुपमध्ये काम करतो. त्यामुळे मला फार अभिमान वाटतो की, एस.व्ही.कुलकर्णी सरांनी अंनिसला मदत केली. एकंदरीत प्रत्येक अंकाप्रमाणे हा अंकही संग्रही व आकर्षक आहे. आपणा सर्वांचे आभार!

संजय बारी, चिंचवड, पुणे


            मी एक शेतकरी असून आपले अंधश्रद्धा निर्मूलन या उपयुक्त मासिकाचा पूर्वीपासून नियमित वाचक आहे. ह्या मासिकाद्वारे अंधश्रद्धेबाबत जनजागृती होत आहे. भारतात सध्या ज्या प्रमाणे सर्वदूर भ्रष्टाचार घोटाळे माजले आहेत. त्याप्रमाणे अंधश्रद्धेचे जाळे सर्व दूर पसरले आहे. ते देशास, समाजास फार घातक आहे. पोथी पुराणात वरिष्ठ वर्गाने आपले वर्चस्व टिकवणेसाठी अंधश्रद्धांचे जाळे सर्व दूर घुसवले असून कर्मकांड, ग्रह तारे याकडे जास्त घुसवले आहे ते हजारो वर्षांपासून जनमानसावर पगडा बसला आहे. व त्यामुळे देशाचा, समाजाचा घात होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन होणे गरजेचे आहे हे कार्य हे मासिक करत आहे. हे मासिक फार वाचनीय असून त्यात उत्तम दर्जेदार माहिती मिळत असते.

माधवराव पाटील, पिंपळगाव हरेश्वर, जि.जळगाव


            अंकाची वर्गणी वाढवू नये असे माझे मत आहे. त्याऐवजी सभासद संख्या वाढवावी. अंकाची किंमत कमी ठेवल्यास सामान्य माणूसही वर्गणीदार होऊ शकतो. अंकाची संख्या वाढेल. त्यामुळे अंनिसची चळवळीची माहिती जास्तीत जास्त लोकांना कळेल.

अशोक खानापुरे, शेळगी, जि.सोलापूर


अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याने प्रश्न सुटतील का?

            केवळ अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करून समाजातील अंधश्रद्धाविषयक प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी कायद्याच्या जोडीला अतिशय गंभीरपणे लोकप्रबोधन होणे गरजेचे आहे. लोकांमध्ये अंधश्रद्धेविषयी असलेली भीती दूर होणे आवश्यक आहे. मुलांचा प्राथमिक शाळेपासून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे महत्वाचे आहे. काही लोक अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध दर्शवून त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण सर्वांना जगाच्या सोबत चालायचे असेल, इतर देशांसारखे सक्षम व्हायचे असेल तर आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. राजकारण्यांनादेखील स्वार्थी राजकारण सोडून हे विश्वची माझे घर या भूमिकेतून काम करून अंधश्रद्धेचा त्याग करणे गरजेचे आहे.

निवृत्ती पाटील, केकत निंभोरा, जि.जळगाव