Categories
पर्दाफाश

राजज्योतिषी अशोक स्वामींचे पलायन

फेब्रुवारी – २०१२

            बुधवार दिनांक 11 जानेवारी 2012. सकाळी-सकाळीच कळलं की, काळ्या चौकटींसाठी प्रसिद्ध असणार्‍या एका स्थानिक दैनिकात मुखपृष्ठावरच एका ‘बाबा’ची जाहिरात आहे. (इथं भोंदू असं मुद्दाम विशेषत्वानं लिहिलं नाही कारण स्वत:च स्वत:ला बुवा, बाबा, महाराज, स्वामी अशी नामाभिधानं लावणारे सगळेच भोंदू असतात. विषय, वित्त आणि लौकिक यांची अभिलाषा नसते तेच खरे सत्पुरूष!) लगेचच पेपर मिळवला. शहराच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या एका चांगल्या हॉटेलमध्ये ‘चेहरा, हस्तरेषा पाहून भविष्य सांगणारे ‘राजज्योतिषी स्वामीजी’ अशोकजी महाराज यांची तीन कॉलम पाच सेंमीची रंगीत जाहिरात होती. त्यात समस्यांची यादी होती, ‘पहिल्या भेटीतच समाधान’ करणार असल्याची गॅरंटी होती, फोनवरून भेटण्याची वेळ ठरवावी या सूचनेपुढे दोन मोबाईल नंबर होते. हॉटेलचं नाव आणि जाहिरातीचा बाज यावरूनच ‘इन्स्वेस्टमेंट’चा अंदाज आला. आजच्या ‘मार्केटिंग’च्या युगात धंद्याची जागा आणि जाहिरातबाजी या दोन अत्यावश्यक गोष्टी आहेत. त्यांची जे लोक पुरेपूर काळजी घेतात ते ‘धंदेवाईक’च असणार(जनकल्याणाची चिंता वहाणारे सत्पुरूष नव्हेत) हा साधा तर्क निघणं हे क्रमप्राप्त होतं.

            झालं. फोनाफोनी झाली. कोण-कोण येऊ शकेल, किती वाजता जायचं, डमी गिर्‍हाईक की पोलीस तक्रार यावर साधक-बाधक चर्चा झाली. ज्योतिषी-मांत्रिकांपासून हैद्राबादी मछलीवाल्या वैदूंपर्यंत अनेक प्रकरणांचा भांडाफोड करण्याचा अनुभव गाठीशी होता. या कामात ‘औषधे आणि जादुई उपचार-आक्षेपार्ह जाहिरात प्रतिबंधक कायदा(1954)’ कसा आणि किती अपुरा आहे हे कळलं होतं. पोलिसी मदतीच्या बाबतीत अतिशय तात्काळ आणि आक्रमक प्रतिसादाचा चांगला अनुभव होता, तसाच गुन्हा दाखल झाल्यानंतर केस उभी राहेपर्यंत पुरावे गहाळ झाल्याचा निराशाजनक अनुभवही होता. तेव्हा एकंदर रागरंग बघून काय करायचं ते बघू असं ठरवलं.

            विनोद वायंगणकर, आतीश कीर, अतुल तांबट, सत्यवान सागवेकर आणि मी स्वत: असे चार वाजता हॉटेलजवळ जमलो. आत जाऊन चौकशी करायच्या आधीच एक सात्विकतेचा लवलेशही नसलेला, पारोसा दिसणारा माणूस हॉटेमलधून बाहेर पडला. तो बाबाचा ‘असिस्टंट’ असल्याचं कळलं. त्याचा एकंदर रागरंग पाहून पोलिसांची मदत घ्यावी लागेल की काय असा वाटून गेलं. सगळे मिळून हॉटेलमध्ये शिरलो, तर रिसेप्शनिस्टनं हटकलं, ‘इतके सगळे लोक एकदम वर जाऊ नका, ज्यांचां काम आहे तेवढेच जा. ‘तेव्हा आम्ही पुढे जातो, तुम्ही एक-एक करून या’ असं सांगून वायंगणकर आणि मी वरच्या मजल्यावर गेलो. बाबाची खोली शोधू लागलो तोच मगाचचा ‘असिस्टंट’ परत आला आणि त्यानं आम्हाला खोली दाखवली.(खोली नंबर 108! काय चालू लोक असतात पहा, लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेण्यासाठी किती प्लॅनिंग!) दरवाजा वाजवला, तसा पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, थोडीशी दाढी, कपाळाला शेंदूर चेहर्‍यावर काहीशी मगु्ररी असा ‘मॅनेंजर’ डोकावला. आत वळला, वेगळ्या भाषेत आपल्या माणसाशी बोलला आणि आम्हाला आतलं काही दिसणार नाही याची काळजी घेत तशाच अर्धवट दरवाज्यातून बाहेर आला. “अपॉईन्टमेंट लिया है?”-तसंच दडपून दिलं, “हां”- “महाराजने कितने बजे बोला था?”- “चार बजे” तो परत आत डोकावला., तेवढ्यात आम्ही काहीतरी बोललो. आम्ही मराठीत बोललो हे ऐकून “हां, महाराज भेटतील आता तुम्हाला. काम कुणाचं आहे?” वायंगणकरनी डमी गिर्‍हाईक म्हणून पुढे व्हायचं असं ठरलेलं होतं. ते पुढे झाले. “नाव काय?” एक खोट नाव. “तुमचं नाव काय?” हे मला उद्देशून. मी गप्प. “ठिकाय्, आधी चप्पल-बूट बाहेर काढून ठेवा” तसं केलं. खोलीचा दरवाजा उघडला.

            उजव्या हाताच्या भिंतीला(पलिकडे टॉयलेट) छतापासून खालच्या बेडपर्यंत दोन रांगात देवतांची आठ पोस्टर्स. त्याखाली एक मोठा फोटो, त्यापुढे ताम्हण, त्यात गडू, त्यावर नारळ, संपूर्ण बेडभर झेंडूची फुलं पसरलेली. चार ठिकाणी केळ्यांचे घड ठेवलेले. आमच्या समोर खाली जमिनीवर एक पांढर्‍या बेडशीटात लपेटलेली आडवी गादी. समोर आडवं लावलेलं दुसरं बेड आणि त्यावर बसलेले महाराज. तांबडी लुंगी, भगवा शर्ट, गळ्यात रूद्राक्षांच्या माळा, कपाळाला तांबडा मळवट, दाढी, हातात कसलं तरी पुस्तक, त्यात मग्न झालेला गंभीर चेहरा. बेडवर आजूबाजूला पंचांग, पुस्तकं, चोपड्या असं सगळं ठेवलेलं. वातावरण निर्मिती जबरदस्त होती. (फोटो मिळाला असता तर फार बरं झालं असतं!) महाराजांनी वर पाहिलं आणि मॅनेजर म्हणाला, “पुढे या, देवाला नमस्कार करा आणि सांगितलेली फी समोर ठेवा” आता मुळात फोनच केला नव्हता तर फी कुठून माहीत असणार?” पैसे खाली राहिलेत ते घेऊन येतो” असं सांगून वायंगणकर निघाले तेव्हा सगळ्यांना लगेच वर यायला सांगायचं असं आम्ही ठरवलं. मी खोलीतच थांबलो. महाराज आणि मॅनेजर थोडे बिचकल्यासारखे वाटले. काही मिनिटांतच आमची सगळी टीम आत आली तेव्हाही चलबिचल दिसली. एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही पटकन निर्णय घेतला आणि डमी गिर्‍हाईक अजीजीच्या ऐवजी गरजलं, “हे जे काही तुम्ही चालवलंय तो भंपकपणा आहे. हे सगळं ताबडतोब बंद व्हायला हवं.”

            मग सुरू झाला प्रश्नांचा भडीमार. ‘गुड कॉप-बॅड कॉप’ स्टाईलनं दमबाजी. शब्दश: संवाद सांगायची आवश्यकता नाही, पण दोन-तीन मिनिटांतच “आम्ही निघून जातो” असं महाराज म्हणू लागला आणि मॅनेजरनं तर चक्क पाय धरले. एवढ्यावर खूष होऊन आम्ही लगेच निघून गेलो असतो तर त्यांनी धंदा पूर्ववत चालू केला असता. म्हणून “ताबडतोब सगळा पसारा गुंडाळा, नाहीतर पोलीस स्टेशनवरून गाडी मागवतो” अशी भूमिका आम्ही घेतली. आम्ही हलायला तयार नाही हे लक्षात आलयावर त्यांनी सगळं आवरायला सुरवात केली. महाराजाकडच्या एका मोठ्या वहीत पैशांच्या नोंदी होत्या. त्यानुसार उपाय-तोडग्यांच्या किंवा उपासनेच्या नावाखाली त्यांनी या आधी एकेका गिर्‍हाईकाकडून तेरा-चौदा हजारापर्यंत पैसे काढले असल्याचं लक्षात आलं. सकाळपासून एकच गिर्‍हाईक येऊन गेलं असल्याचं कळलं, पण याचा थांगपत्ता त्यांनी शेवटपर्यंत लागू दिला नाही. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यामधल्या वाकड या गावचे हे तिघे रहिवाशी. मॅनेजर आणि असिस्टंट हे सख्खे भाऊ तर महाराज या दोघांचा मेहुणा. सगळ्यांची आडनावं जोशी.

            अशोक हा बोलबच्चन, तर संतोष हा उत्कृष्ट मॅनेजर. बारा गावचं पाणी प्यायल्यामुळे सगळे तरबेज झालेले. साध्या-भोळ्या माणसांना गंडवायचं आणि पैसे उकळायचे. जळगावपासून इतक्या दूर एम.एच.19, क्यू.0032 या मरून रंगाच्या संतोषच्या मामाच्या मारूती 800 मधून फिरत, धंदा करत आलेले. आम्ही त्यांना एकच प्रश्न विचारला, “तुम्ही एवढं लोकांचं भविष्य सांगता, तर मग रत्नागिरीतल्या पहिल्याच दिवशी तुम्हाला चंबूगबाळं आवरायची वेळ येणार आहे, ते कसं नाही कळलं?” यावर ते अर्थातच निरूत्तर झाले. सगळं सामान भरून झाल्यानंतर तिघांना रांगेत उभं करून “आमची चूक झाली, आम्ही लोकांची फसवणूक करतो, यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात पाय टाकणार नाही” असं वदवून घेतलं, त्याची व्हिडीओ क्लिपही घेतली. हॉटेलमधून ‘चेक आऊट’ करून त्यांना मार्गाला लावलं तेव्हा कुठे आम्ही स्वस्थ झालो.

            बुवाबाजीविरूद्ध लढ्याचे दोन मार्ग असतात. प्रबोधन आणि संघर्ष. या भानगडीतून ज्यांचं शोषण होतं त्यांना समजावून शहाणं करण्याचा प्रयत्न करणं हा प्रबोधनाचा मार्ग खूप वेळ काढणारा आहे, पण त्याचे परिणाम चिरकालीन असतील. बुवाबाजीला थेट भिडून भांडाफोड करण्याचा संघर्षाचा मार्ग थरारक आणि परिणामकारक असला तरी तो तात्कालिक असतो. नवे बुवा येतात, नव्या पद्धतीनं मार्केटिंग करतात आणि भले भले त्याला बळी पडतात. आपण हे लक्षात घ्यायला हवं की, या लोकांचं खरं सामर्थ्य तुमच्या आमच्या अगतिकतेत असतं. शिक्षण महागलंय आणि मिळालं तरी तिथे जिवघेण्या स्पर्धेला सामोरं जावं लागतंय. शिक्षण घेतलं तरीही नोकरीची शाश्वती नाही की धंद्याची गॅरंटी नाही. लग्नाच्या बाजारात गुणांची कदर, शिक्षणाचं मोल असेल याची खात्री नाही. दुर्धर रोगापासून बचाव करायला पैसा नाही. जातीय तणाव वाढून दंगली कधी पेटतील याचा नेम नाही. असं कितीतरी! रोजच्या जीवनात ही असुरक्षितता असतेच. त्याच्या जोडीला दैवी उपायांच्या सामर्थ्याची जळमटं मनात असतात. पाडगावकरांच्या भाषेत सांगायचं तर “आपण शोधायचे नाही, आपण लढायचे नाही, आपण भिडायचे नाही आयुष्याला!” अशी आपली प्रवृत्ती असते. त्यामुळे पांगळ्या झालेल्या बुद्धीला प्रतिष्ठाप्राप्त धार्मिक शॉर्टकटची ओढ लागते. पण हा शॉर्टकट अनेकदा कडेलोटाकडे नेणारा असतो. माणसाच्या आयुष्यात संकटं, अडचणी येणारच. त्यांच्याशी झगडत, मनगटातील बळाच्या जोरावर आयुष्याला भिडत पुढे जाणं हाच योग्य मार्ग. लक्षात एवढंच ठेवायचं, “खुदहीको कर बुलंद इतना, की हर तकरीर से पहले खुदा बंदे को खुद पुछे बता तेरी रजा क्या है।”

– डॉ. आशुतोष मुळ्ये, रत्नागिरी