भारतीय राज्य घटनेच्या 51 व्या कलमात नागरिकांची कर्तव्ये दिलेली आहेत. त्यामधील एक कर्तव्य हे वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्याचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हे विज्ञानाबरोबरच निर्भयता व नीती रूजविण्याचे कार्य आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी केले.
सोनद सेवा प्रबोधिनी या पारिवारिक सामाजिक संस्थेतर्फे दिल्या जाणार्या अंधश्रद्धा निर्मूलन उत्कृष्ट कार्यकर्ता गौरव पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वर्षीचा हा पुरस्कार गेली 12 वर्षे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणारे निगडी प्राधिकरणातील दुग्ध व्यावसायिक रवींद्र बोर्लीकर आणि आकुर्डीतील एस.पी.व्यवस्थापन संस्थेतील कार्यालय अधिक्षक क्रांती पोतदार-दांडेकर यांना देण्यात आला. गेल्या तीन वर्षांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणार्या कृतीशील महिला व पुरूष कार्यकर्त्यास हा पुरस्कार दिला जातो. स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पूर्वी हा पुरस्कार नामदेव टोमके व दिलीप कामत यांना देण्यात आलेला आहे.
समारंभाचे अध्यक्षस्थान म.अं.नि.स.चे अविनाश पाटील यांनी भूषविले होते. समारंभाचे प्रास्ताविक सोनद सेवा प्रबोधिनीचे कार्यवाह डॉ.राजेंद्र कांकरिया यांनी केले. संस्थेच्या कार्याध्यक्ष सौ.छाया कांकरिया यांनी आभार मानले. डॉ.प्रतिजा कांकरिया यांनी सूत्र संचालन केले. या प्रसंगी म.अं.नि.स.चे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, पिंपरी चिंचवड म.अं.नि.स.चे अध्यक्ष दिनकर साळुंखे, कार्याध्यक्षा अॅड.मनिषा महाजन, अरविंद पाखले, श्रीराम नलावडे, संजय बनसोडे, क्षितीजा कांकरिया, सौ.बोर्लीकर, रमेश पोतदार, सुमनताई ओक इ. मान्यवर उपस्थित होते.
-अॅड. बी. ए. मचे, चिंचवडगाव, पुणे