Categories
प्रतिसाद

रविशंकर व रामदेवबाबा – सत्संग की बुद्धीभेद?

मार्च - २०१२

मी आपल्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा’ वर्गणीदार आहे. आपल्या फेब्रुवारी 2012 च्या अंकातील ‘महासत्संग नव्हे तर बुद्धीभेद करण्याचा कार्यक्रम’ हा अविनाश पाटील व डॉ.रविंद्र टोणगावकर यांच्या लेखातील विसंगती व वस्तुस्थिती दाखविण्यासाठी हा लेखन प्रसंग.

            या लेखात आकडेवारी देऊन म्हटले आहे, ‘अत्यंत हलाखीत आपले जीवन जगणार्‍या कुटुंबाचे दारिद्य्र आपल्या योगशक्तीने दूर करण्याचा उपाय रविशंकरजी सांगणार आहेत का?” आता गौतम बुद्ध, श्रीराम, पैगंबर यांनाही संपूर्ण दारिद्य्र नष्ट करणे जमले नाही ते रविशंकर व रामदेवबाबांना कसे शक्य होईल? वरील धर्मोपदेशकांनी जगात दारिद्य्र व रोग आहेत म्हणून आपला उपदेश थांबवला का? वरील महात्म्यांनी मानवी जीवन आसक्तीरहित व सुखी करण्याचा प्रयत्न केला की नाही?

            आपला दावा आहे की, “मन:शांती व मुक्ती या आभासी कल्पना आहेत, त्यातून परावृत्त झाल्याशिवाय जीवनातले प्रश्न सोडवायला कोणीही प्रवृत्त होऊ शकणार नाही.” आता भरपूर पैसा मिळाला तर सुखी होऊ, मुलगा झाला तर सुखी होऊ, पद मिळाले तर सुखी होऊ याही आभासी कल्पनाच आहेत. तसे नसते तर घोटाळेबाज, लाचखाऊ अत्यंत सुखी झाले असते. पद, प्रतिष्ठा, पैसा यात भल्या-बुर्‍या मार्गाचा उपयोग करून ‘मिळविणे’ हा भाग येतो, याउलट मन:शांती व मुक्तीमध्ये ‘रिकामे होणे’ सोडणे हा भाग येतो. कोणताही संत मग रविशंकर असो रामदेवबाबा असो हेच सांगतो. यामुळे जीवनात समस्या निर्माण न होता सुटल्या जातात.

            त्यांचे आजचे जीवन तपासले तर सर्व सोईंनी युक्त अशी जीवनशैली दिसते का? साधु संन्याशी, योगी यांनी सर्व सोयींनी युक्त जीवन जगू नये का? प्रश्न आहे तो ते किती आसक्तीरहित जीवन जगतात याचा. पं.नेहरू, म.गांधी हे नेते सुटाबुटात वावरत होते. पण स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी फकीरी पत्करली की नाही? सर्वस्वाचा त्याग केला की, नाही? आपण म्हणता “शक्तीप्रदर्शनाचा कार्यक्रम स्थानिक धनवानांच्या सहकार्याने आयोजित केला जातो.” मग यात गैर काय? धनवान लोकांच्या सहाय्याने योग निरोगी जीवन, सुखी जीवन याचा लाभ सर्वसामान्य लोकांना झाला तर काय बिघडले? अंनिससाठी जर एखाद्या धनिकाने देणगी दिली तर स्वीकारता का नाही? शिवाय शक्तीप्रदर्शन निवडणुकीत जिंकण्यासाठी वापरतात. रविशंकर व रामदेवबाबा निवडणुकीला उभे राहिले असते तर हा शब्दप्रयोग योग्य होता.

            डॉ.टोणगावकर म्हणतात, “शिबीर संपल्यानंतर व्यायाम सुदर्शनक्रिया मनोभावे करत होतो. त्याचा आनंद लुटत होतो. म्हणजे टोणगावकरांनी आनंदाचा लाभ घेतला आहे. सुदर्शन क्रिया, प्राणायाम यामुळे कार्बन डायऑक्साईड कमी होतो. एर्न्डाफिन स्त्रावामुळे अफूच्या सारखे व्यसन लागते. तात्पुरते बरे वाटते.” आता कित्येक मानसिक, शारीरिक रोगावर डॉक्टरजी औषधे देतात ती शारीरिक स्त्राव योग्य प्रमाणात व्हावा यासाठीच असतात की नाही? व्यायामाचा उद्देश कार्बन डायऑक्साईड कमी करणे, घामावाटे त्याज्य पदार्थ बाहेर टाकणे हाच असतो या क्रिया सतत कराव्या लागतात असे टोणगावकर म्हणतात. व्यायाम ध्यान धारणा या सतत करण्याच्याच क्रिया आहेत. महिना पंधरा दिवस व्यायाम किंवा ध्यानधारणा करून वर्षभर आरोग्य व शांती मिळेल अशी समजूत टोणगावकर का करतात? रामकृष्ण परमहंस एके ठिकाणी म्हणतात लोटा दररोज घासला नाही तर त्यावर हिरवट गंज चढतो-मळकट होतो. तसेच योगासने, ध्यानधारणा ही नियमित करण्यासाठीच असतात.

            सध्या तालमी ओस पडल्यात, दहा बारा वर्षांच्या मुलांना डायबेटीस, हार्टअ‍ॅटॅक इ.रोग होत आहेत. चंगळवादी संस्कृती, बैठे जीवन यामुळे शारीरिक व मानसिक विकार होत आहेत. रामदेव बाबा व रविशंकर थोड्याफार प्रमाणात का होईना आसन प्राणायाम याचा प्रसार करत आहेत. त्यांना पाठींबा देण्याऐवजी, योग, आसने यातील विज्ञान समजावून न घेता त्याला बुद्धीभेद म्हणणे ही विसंगती नव्हे का?

            स्वा.सावरकर हे विज्ञाननिष्ठ होते. हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरितीवर त्यांनी प्रहार केले पण सावरकर म्हणतात, ‘योगामध्ये मन व शरीर’ याचा अत्यंत सुरेख संगम आहे.

            मी रविशंकर यांचे कुठलेही शिबीर केले नाही. रामदेवबाबांचे शिबीर मात्र केले आहे. आपण माझे पत्र प्रसिद्ध कराल व माझ्या शंकांना उत्तरे द्याल तर सर्वसामान्य लोकांना त्याचा लाभ होईल. आपल्या उत्तराची अपेक्षा.

-जयंत दत्तात्रय देशपांडे, आटपाडी, जि.सांगली.

(वाचकांनी वरील पत्राबाबत आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवाव्यात. निवडक प्रतिक्रियांना पुढील अंकात प्रसिद्धी दिली जाईल.- संपादक)