झपाट्याने बदलणार्या या माहिती-तंत्रज्ञानाच्या नवयुगात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाद्वारे आत्मसात करण्याच्या महत्वाच्या क्षमता कोणत्या? हा खरंतर सर्वांनाच पडला पहिला असा प्रश्न आहे. इंटरनेटवर वाटेल ती माहिती उपलब्ध आहे, आणि ती चटकन मिळवताही येते. त्यामुळे घोकंपट्टी करून पुस्तकातील झपाट्याने बदलणार्या या जगात यशस्वी व्हायचं असेल तर शिक्षणातून आपल्याला काय मिळालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं?

इंटरनेटवरून वाटेल ती माहिती उपलब्ध आहे आणि ती चटकन मिळवताही येते, त्यामुळे घोकंमपट्टी करून पुस्तकातील उत्तरे लक्षात ठेवण्याची क्षमता तर नक्कीच फारशी महत्वाची नाही. नुसतेच वस्तुस्थितीचे ज्ञान करून घेणे महत्वाचे आहे असे म्हटले तर वस्तुस्थितीचं ज्ञान प्रचंड वेगाने बदलत आहे. अशा परिस्थितीमध्ये आत्मसात करण्याची सर्वात महत्वाची क्षमता म्हणजे स्वतंत्रपणे विचार करता येण्यासाठी आवश्यक असलेली चौकसबुद्धी.
चौकसबुद्धी म्हणजे आपल्याभोवती घडणार्या घटनांचे, वस्तुस्थितीचे आपल्याला उपलब्ध असलेल्या माहितीचे प्रश्न विचारून आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधून सखोल आकलन करून घेण्याची क्षमता. आकल होण्याबरोबरच स्वतःच्या दृष्टीने नवीन असलेल्या ज्ञानाची निर्मितीदेखील या प्रक्रियेत घडते. हे ज्ञान जगात इतरांसाठी नवीन नसते. जेव्हा आपण विचार करून हे ज्ञान शोधून काढतो, तपासून बघतो तेंव्हा आपली चौकसबुद्धी अधिक धारदार होते.
लहान मुलांना खूप प्रश्न पडतात. जसे जसे आपण मोठे होऊ लागतो तशी प्रश्न विचारण्याची ही चौकसवृत्ती कमी व्हायला लागते. चौकसबुद्धी म्हणजे असे प्रश्न विचारण्याची चौकसवृत्ती आणि त्या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठीची बुद्धी. म्हणजे प्रश्नही पडले पाहिजेत आणि त्या प्रश्नांची ‘योग्य मार्गाने’ उत्तरेही मिळवता आली पाहिजेत. हा चौकसबुद्धीचा ‘योग्य मार्ग’ कोणता हे समजून घेणे गरजेचे आहे. हा ‘योग्य मार्ग’ वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आहे. काळजीपूर्वक केलेल्या अचूक निरीक्षणांमधून आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत, हे प्रश्न सार्वत्रिक आहेत का याचा विचार आपण केला पाहिजे, त्या प्रश्नांचे स्पष्टीकरण काय असू शकेल याचा अंदाज करता आला पाहिजे, मग ते स्पष्टीकरण बरोबर आहे की नाही याची कोणत्या पुराव्याने प्रचिती येऊ शकेल ते ठरवता आले पाहिजे, गरज पडली तर प्रत्यक्ष प्रयोग करून ते तपासून पहाता आले पाहिजे आणि त्या पुराव्याच्या किंवा प्रयोगाच्या निष्कर्षाच्या आधारे योग्य अनुमान मांडता आले पाहिजे हे अनुमान म्हणजेच त्या प्रश्नाचे उत्तर.
वैज्ञानिक दृष्टिकोन खर्या अर्थाने अंगीकारण्यासाठी चौकसबुद्धीचा विकास करणे गरजेचे आहे, शिक्षणाद्वारे योग्य वयात चौकसबुद्धी विकसित होणे महत्वाचे आहे. चौकसबुद्धीवर आधारीत शिक्षण(inquiry based education) हा आधुनिक शिक्षणपद्धतीचा प्रमुख भाग आहे. माहिती असलेली वस्तुस्थिती समजावून सांगणे, सर्वमान्य ज्ञानाचे विद्यार्थ्यांना आकलन होण्यास मदत करणे हे शिक्षणाचे भाग आहेतच परंतु चौकसबुद्धीवर आधारित शिक्षण हे त्यापुढे जाऊन या ज्ञानाची रचना करण्याची मुलांना सहभागी करून घेते. अशा शिक्षणाची सुरवात एखादा प्रश्न, समस्या किंवा विशिष्ट परिस्थिती पुढे मांडून होते. मग त्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्याच्या प्रक्रियेमध्ये मुलांना सहभागी करून घेतले जाते. या प्रक्रियेतून वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित नवीन ज्ञानाची निर्मिती कशी केली जाते ते मुलांना उमगते. याचे सखोल आकलन मुलांना होऊ शकते. आधुनिक संशोधनानुसार अशा प्रकारच्या शिक्षणातून सर्जनशीलता, स्वतंत्रपणे विचार करण्याची, समस्यांची उकल करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित होते. या सर्वांची केवळ शैक्षणिक जीवनातच नव्हे तर व्यावसायिक जीवनातही यशस्वी होण्यात मदत होते.
चौकसबुद्धी केवळ शालेय जीवनातच नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनातही जोपासता येऊ शकते. एका अर्थाने चौकसबुद्धी हा जीवन दृष्टिकोन आहे. प्रश्न विचारण्याचा आणि विवेकी विचाराच्या, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे त्यांची उत्तरे मिळवण्याचा जीवनदृष्टिकोन. चौकसबुद्धीच्या विविध अंगांचा विकास करण्यासाठी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हे करता येऊ शकते; परंतु प्रामुख्याने बाल आणि युवा पिढीला यासाठी प्रोत्साहित करणे फार महत्वाचे आहे. आपल्याला पडलेला प्रश्न-मग तो कोणताही असो अशा प्रकारे विचार करून सोडवणे हा चौकसबुद्धी बळकट करण्याचा व्यायामच आहे. चौकसबुद्धीला चालना देण्याची आणि ती विकसित करण्याची प्रक्रिया कशी घडू शकते ते मितवा आणि तिच्या दादाच्या संवादातून समजून घेवू यात.
आठवीतल्या मितवाने तिच्या दादाला विचारले, “दादा, आकाशाचा रंग निळा का असतो?” हा खरंच खूप सुंदर प्रश्न आहे. अशाच एका प्रश्नाचा खोलवर अभ्यास करून सर सी.व्ही.रमन यांनी प्रकाशाच्या विकिरणाविषयी संशोधन केले आणि त्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिकही मिळाले. हे सर्व मितवाच्या दादाला माहित होते. तो तिला चटकन उत्तर देऊन मोकळा होऊ शकला असता की, ‘आकाशात निळ्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण सर्वात जास्त होते म्हणून आकाश निळे दिसते’ किंवा तो मितवाला म्हणू शकला असता की, ‘काही वर्षांनी तुला भौतिकशास्त्रातील ‘प्रकाश’ या धड्यामध्ये हेच शिकायचे आहे. आणि ‘आकाशात निळ्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण होते म्हणून आकाश निळे दिसते.’ हे काही या प्रश्नाचे संपूर्ण उत्तर नव्हे कारण मग प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय? किंवा निळ्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण जास्त का होते? हे प्रश्न उभे राहतात आणि या प्रश्नांची खोलवर जाऊन दिलेली उत्तरे ही अणूरेणूंच्या संरचनेशी, त्यांच्या पुंजस्थितीशी संबंधित आहेत.
पण त्याची काळजी न करता या प्रश्नांच्या जगात आपल्या चौकसबुद्धीची भ्रमंती ही विविध टप्प्यांवर करता येऊ शकते. म्हणूनच दादाने हा संवादाचा धागा पकडला आणि मितवाच्या चौकसबुद्धीला चालना देण्याचा प्रयत्न सुरू केला.
दादा – काय गं? तुला काय वाटतं की आकाश निळं का बरं दिसत असेल? बघुया बरं आपल्याला शोधून काढता येतं का याचं कारण.
(म्हणजे या प्रक्रियेत दादा तिचा सहाध्यायी झाला. तिच्या विचारांना योग्य दिशा देण्याचे काम तिला प्रश्न विचारून, तिच्या विचारांना दिशा देऊन दादाने कसे केले ते पाहू या.)
दादा – आकाश आपल्याला निळ्या रंगाचे दिसते हे तुझे निरीक्षण पूर्णपणे बरोबर आहे का? आकाश कायम निळ्या रंगाचे दिसते का? ते कधी कधी निळ्या रंगाचे दिसत नाही ते सांग बरं.
मितवा – बरोबर आहे तुझं. आकाशात ढग असले की आकाश निळ्या रंगाचे दिसत नाही आणि रात्रीदेखील आकाश निळ्या रंगाचे दिसत नाही. आणि हो! सुर्योदयाच्या आणि सुर्यास्ताच्या वेळीही आकाशात कधी कधी वेगळे रंग दिसतात.
दादा- अजून विचार कर बरंं.
मितवा- मी कृत्रिम उपग्रहांचे आणि अवकाशयानांचे फोटो बघितले आहेत. त्यातही आकाश निळ्या रंगाचे दिसत नाही.
दादा – छान निरीक्षणं आहेत तुझी, मितवा. मग आता सांग आकाश म्हणजे काय ते.
मितवा- दादा, हे काय रे! तुला साधं आकाश म्हणजे काय ते माहीत नाही?
दादा- तसं नाही मितवा. आता तूच दिलेल्या उदाहरणाचा विचार कर. उपग्रहाच्या आजूबाजूला दिसतं त्याला आकाश म्हणायचं का?
मितवा – अरे हो की. मला आठवलं, त्याला अवकाश म्हणतात.
दादा – मग आकाश म्हणजे नेमकं काय?
मितवा – जे पृथ्वीवरून मोकळ्या मैदानात किंवा गच्चीवर गेल्यावर आपल्या डोक्यावर दिसतं ते आकाश.
दादा – छान व्याख्या केलीस तू आकाशाची. ती अजूनही काटेकोर बनवता येऊ शकेल. पण आता तुझ्या प्रश्नाकडे जाऊ. तुझ्या व्याख्येतलं आकाश स्वच्छ सूर्यप्रकाशात ढग नसताना निळं का दिसतं, असा तुझा प्रश्न आहे, बरोबर? मग मला सांग हा निळा रंग नेमका कशाचा असतो? काय असतं आकाशात?
मितवा – सोप्पयं. हवा! आकाशात हवा असते.
दादा- मग हवेचा रंग निळा असतो का? आपल्याला या खोलीतली हवा कुठे निळ्या रंगाची दिसते?
मितवा-हे काय रे दादा! तू नुसतेच प्रश्न विचारून मला गोंधळात टाकतोस. माझ्या प्रश्नांचे उत्तर दे ना.
दादा – अगं या गोंधळानंतर तुझ्या डोक्यात जेव्हा लख्ख प्रकाश पडेल ना, तेव्हा तुझी चौकसबुद्धी अधिक धारदार झाली असेल. आपण हवेच्या रंगाबद्दल बोलतोय तर मला सांग आपल्याला विविध गोष्टी वेगवेगळ्या रंगाच्या का दिसतात? सांग बरं, तुझा हा टी-शर्ट हिरव्या रंगाचा का दिसतो?
मितवा-कारण तो शर्ट ज्या कापडापासून बनवलाय त्याला हिरवा रंग दिलाय.
दादा- मग तो हिरवा रंग हिरवा का दिसतो?
मितवा- असे काय प्रश्न विचारतोय रे दादा.
दादा – हिरवा रंग आपल्याला अंधारात हिरवा दिसतो का?
मितवा-नाही. अंधारात तो काळाच दिसेल. तो हिरवा दिसण्यासाठी त्यावर प्रकाश पडला पाहिजे ना!
दादा – मग रात्री आपण आकाशावर टॉर्चचा प्रकाश टाकला तर ते निळं दिसतं का बरं? विचार कर आणि सावकाश उत्तर दे. वाटल्यास आज रात्री प्रयोग करून बघ बरं आणि प्रकाश पडल्यावर तुझा शर्ट हिरव्याच रंगाचा का दिसतो? इतर कोणत्या रंगाचा का बरं दिसत नाही?
मितवा – कारण तो हिरव्या रंगाचा आहे आणि प्रकाश आपल्याला तो रंग दाखवतो.
दादा – असं असेल तर तो कोणत्याही रंगाच्या प्रकाशात आपल्याला हिरवाच दिसला पाहिजे नाही का? निळ्या रंगाच्या प्रकाशात तो हिरवा दिसेल का?
मितवा – हो हिरवाच दिला पाहिजे, नाही का? सांग ना दादा बरोबर आहे ना माझं उत्तर?
दादा – मला नाही माहीत. आपण प्रयोग करून बघूयात ना. तू आकाशकंदिल बनवण्यासाठी आणलेले ते अर्धपारदर्शक रंगीत जिलेटीन पेपर्स आहेत ना, ते आपण या सी.एफ.एल. बल्बला गुंडाळून प्रकाशचा रंग बदलू शकतो. बघूया ना वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाशामध्ये तुझ्या शर्टचा रंग काय दिसतो आणि मग इतर रंगांच्या वस्तूंचे रंगही वेगळे दिसतात का याचं निरीक्षण करूयात. एक निरीक्षण टेबलच बनवले पाहिजे.
प्रकाशाचा रंग
निळा
निळा
निळा
निळा
लाल
लाल
लाल
लाल
वस्तूचा मूळ रंग
हिरवा
पिवळा
पांढरा
जांभळा
हिरवा
पिवळा
पांढरा
जांभळा
वस्तूचा दिसणारा रंग
——
——
——
——
——
——
——
——
आणि मग या निरीक्षणातून बघूयात की, आपल्याला ‘रंगाच्या सिद्धांता’चे काही नियम सापडतात ते.
मितवा आणि तिच्या दादामधील हा संवाद ही मितवाच्या चौकसबुद्धीला चालना देण्याची सुरवात आहे. मूळ प्रश्नाचे उत्तर कुठेतरी दूरच राहिले, परंतु विचार करण्याची ही जी प्रक्रिया सुरू झाली ती महत्वाची आहे. मितवाने असा प्रयोग केला आणि तिचा स्वत:चा ‘रंगांचा सिद्धांत’ मांडण्याचा प्रयत्न केला, आणि त्या सिद्धांताच्या आधारे तपासून पाहता येतील अशी काही भाकिते केली आणि स्वत: प्रयोग करून ती तपासून पाहिली तर तिला ‘प्रकाश’ आणि ‘रंग’ हे भौतिकशास्त्रातील विषय सखोल समजतीलच पण त्याचबरोबर तिची वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता म्हणजेच चौकसबुद्धी जोपासली जाईल.
यावेळी आपण प्रकाश आणि रंग हे उदाहरण घेतले. पण आपल्या आवडीचा कोणताही विषय, प्रश्न घेऊन आपल्या चौकसबुद्धीला चालना देणे शक्य आहे. आपल्याला चित्तवेधक वाटतील अशी सार्वत्रिक निरीक्षणे शोधायची, त्यामागे स्पष्टीकरण काय असू शकेल असा सखोल विचार करून त्याबाबतचा आपला स्वत:चा सिद्धांत मांडायचा, त्या सिद्धांतावर आधारित तपासून पहाता येतील अशी भाकिते मांडायची, त्यांची सत्यासत्यता प्रयोग करून तपासून पहायची. काही भाकिते चुकीची ठरली तर आपल्या सिद्धांतामध्ये योग्य ते बदल करायचे, सुधारणा करायची, परत नवीन भाकिते करायची, नवीन प्रयोग करायचे यातूनच खरी वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारीत चौकसबुद्धी विकसित होऊ शकते.
मूळ प्रश्नाचं उत्तर फारसं महत्वाचं नाही, महत्वाची आहे ती कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया! ही पूर्णपणे अनुभवणे गरजेचे आहे. कदाचित या प्रक्रियेत एका प्रश्नापासून सुरवात होऊन वेगळ्याच प्रश्नांची उत्तरे शोधली जातील. शोधून बघा बरं या प्रश्नाचे उत्तर! बघा बरं मांडून तुमचा ‘रंगांचा सिद्धांत!’ किंवा घ्या कोणतातरी नवीन प्रश्न आणि करा थोडा चौकसबुद्धीचा व्यायाम!
–सुगत दाभोलकर
लेखक संपर्क: मोबा. 09551076659