Categories
बुवाबाजी

समज देताच अंगातील सैलानी बाबाने ठोकली धूम..!

जून - २०१९

औरंगाबाद शहरातील फुलेनगर भागात हिवराळे नावाचे 65 वर्षीय इसम गेल्या कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहे. त्यांनी स्वत: तीन लग्नं केली असून ते तिसर्‍या पत्नीसोबत ज्या प्लॉटवर राहतात, तर त्याच प्लॉटच्या उर्वरित जागेवर दोन्ही पत्नी राहतात. विशेष म्हणजे त्यांची दुसरी पत्नी कामधंदा करून मोठ्या सवतीचा सांभाळ करते, हे कौतुकास्पद आहे..!

या दोघींशी आपला काही संबंध नाही व त्यांनी घर सोडून दुसरीकडे निघून जावे, या संपत्तीच्या लालसेपोटी पती-पत्नी या ना त्या कारणाने कुरापत काढून भांडण करत असत; पण त्या डगमगल्या नाहीत. नवरा आपला झाला नाही तरी चालेल; पण बेघर व्हायचे नाही, हा दृढ निश्चय त्यांनी केला होता.

हिवराळे अधून-मधून आजारी पडायचे. दिवसेंदिवस इलाजासाठी पैशांची कमतरता भासू लागली होती. आता त्यांच्या तिसर्‍या पत्नीच्या अंगात सैलानी बाबा येऊ लागले होते आणि अंगातील सैलानी या दोघींनी माझ्या नवर्‍यावर करणी केली! असे ओरडून-ओरडून सांगत असे. ही वार्ता पूर्ण फुलेनगरात पसरली होती. बदनामीपोटी त्या दोघींनी उस्मानपुरा पोलीस ठाणे गाठले. त्यांनी सविस्तर वृत्तांत कथन केला; पण यावर काय मार्ग काढावा, हे पोलिसांनाही सुचेनासे झाले. (कदाचित गुन्हा दाखल करण्याची पोलिसांची मानसिकता नसावी.) अखेर तेथील एका पोलीस कर्मचार्‍याने त्यांना अंनिसचे शहाजी भोसले यांना भेटा, असा सल्ला देऊन माझा संपर्क नंबर त्यांना दिला.

एक दिवस मला त्यांचा फोन आला. भेटीचा दिवस निश्चित करून भेटीअंती सविस्तर चर्चा झाली. मालमत्ताच्या भांडणात महाराष्ट्र अंनिस म्हणून काहीही हस्तक्षेप केला जाणार नाही; मात्र त्या महिलेच्या अंगात सैलानीचा शिरकाव झाल्यावर जे कृत्य करते त्यात सत्यता आढळल्यास काही तरी मार्ग काढू असे त्यांना अश्वासन दिले.

त्या दिवशी रविवार होता. काही कार्यकर्त्यांकडे वेळही होता म्हणून सुनील उबाळे, सुनील चौतमोल, जे. पी. वैद्य व मी असे चार कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ फुलेनगरात हिवराळे यांच्याकडे गेलो. आम्ही कोण आहोत, याबाबतची ओळख करून दिली. तुमच्या मालमत्तेच्या भांडणात हस्तक्षेप करण्याचा आम्हाला काहीही अधिकार नाही. त्याचबरोबर अंगात येणं हा गुन्हा नाही; मात्र अंगात येऊन कोणी भीती दाखवत असेल, दहशत निर्माण करत असेल, तर तो जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत अजामीनपात्र गुन्हा आहे. करणी, कवटाळी, बाहेरची बाधा कोणी जादूटोणा करून करू शकत नाही. असे असताना अंगातला सैलानी जर इतरांचे नाव घेत असेल, तर गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी समज दिली. समजविण्यात तब्बल दीड तास गेला. त्या पती-पत्नीची समजून घेण्याची मानसिकता नव्हती. या दोघीच करणी करतात, अशा मताशी ते ठाम होते व ओरडून-ओरडून सांगत होते. आमच्या कार्यकर्त्यांचे वेगवेगळ्या अँगलने व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचे कामदेखील चालू होते.

केवळ गरीब कुटुंबीय असल्याने गुन्हा दाखल करण्यापेक्षा समज दिल्याने प्रश्न मिटत असेल, तर प्रयत्न करायला काय हरकत आहे. या सामाजिक भावनेतून आम्ही आलो होतो. शेवटी ‘आता सैलानी बाबा अंगात येऊन समाजविघातक कृत्य केल्याचे आम्हाला समजले, तर तुम्ही आता जे-जे कथन केलेत ते सर्व व्हिडीओ आम्ही पुरावा म्हणून पोलिसांना देऊ..!’ अशी तिरकस समज देऊन आम्ही तेथून निघालो.

आज या घटनेला 15 दिवस होत आहते. दर दिवसाआड अंगात येणारा सैलानी बाबा चक्क 4 तारखेच्या अमावस्येला देखील महाराष्ट्र अंनिसला घाबरून पुन्हा फुलेनगरकडे येऊ शकला नाही. हे समाधानकारक असल्याने आम्हा सर्वांना आनंद वाटला. महाराष्ट्र अंनिससोबत काम करताना फक्कड आनंद मिळतो, याचा पुन्हा अनुभव घेतला. सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन..!