Categories
संपादकीय

समाजपरिवर्तनासाठी संघर्ष अटळ…

ऑगस्ट २०१९

महाराष्ट्राला धर्मचिकित्सेची संतपरंपरेपासून थेट फुले-शाहू-आंबेडकर-आगरकर अशी मोठी परंपरा आहे. त्याच परंपरेच्या मूल्यांशी धागा जोडत, डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. 9 ऑगस्टला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला 30 वर्षे पूर्ण होत आहेत. तीस वर्षांचा काळ म्हणजे एखाद्या संघटनेसाठी काही फार मोठा काळ नाही; अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीसाठी तर नाहीच नाही. कारण चार्वाक, महावीर, बुद्ध, तुकाराम आणि सारी संतपरंपरा यासारख्या महामानवांनी करूनही उरलेले अंधश्रद्धा निर्मूलनाचे हे काम दशकांचे नव्हे, तर शतकांचे आहे, तरीही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉ. दाभोलकरांसारखा संघटक, मार्गदर्शक, नेता सनातन्यांच्या गोळ्यांमुळे सहा वर्षांपूर्वी गमावूनही या तीस वर्षांत महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात आपल्या कामाच्या बळावर आपले एक स्थान निर्माण केले. गेल्या तीस वर्षांत सातत्याने राबविलेले प्रबोधनाचे उपक्रम, आखलेल्या मोहिमा, केलेले संघर्ष, आंदोलने यातून संघटनेने उभारलेल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला व्यापक समाजपरिवर्तनाच्या चळवळीस जोडून घेतले; केवळ जोडूनच घेतले असे नाही, तर समाजपरिवर्तनाच्या संघर्षातील एक आघाडीचा शिलेदार म्हणून संघटनेकडे देशभरातून आज पाहिले जाऊ लागले आहे. बुवा-बाबा, मांत्रिक यांच्या अघोरी कृत्यांना आणि विज्ञानविरोधी चमत्कारांच्या दाव्यांना चाप लावणारा जादूटोणाविरोधी कायदा आणि जातपंचायतीच्या मनमानी अन्यायाला चाप लावणारा सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा केवळ महाराष्ट्र अंनिसच्या अथक प्रयत्नामुळेच होऊ शकला. या दोन महत्त्वाच्या उपलब्धींचाच येथे आम्ही उल्लेख करीत आहोत. कारण गेल्या तीस वर्षांतील महाराष्ट्र अंनिसच्या कामगिरीचा तपशीलवार आढावा 9 ऑगस्टच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रसिद्ध होणार्‍या ‘विवेकजागर’ या स्मरणिकेत घेतलेला आहे. ‘अंनिवा’च्या वाचकांनी तो अवश्य वाचावा.

महाराष्ट्र अंनिसला या उंचीवर पोचवण्याचे, तिची जडणघडण करण्याचे, संघटित करण्याचे काम डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अतिशय कुशलतेने केले. अज्ञानाने, दारिद्य्राने, जातीयता, रुढी, धार्मिक कर्मकांडे यांनी ग्रासलेला, प्रचंड गुंतागुंत असलेला असा हा समाज आहे. अशा या समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन जागवत निव्वळ प्रबोधनावर आधारलेली चळवळ उभारण्याचे व त्या चळवळीची तात्त्विक मांडणी करण्याचे महाकठीण काम डॉ. दाभोलकरांनी केले. संघटना उभारणी आणि चळवळीची तात्त्विक मांडणी एकाच व्यक्तीकडून होतेच असे नाही; परंतु डॉ. दाभोलकरांनी ते केले. व्यक्ती चळवळीपेक्षा कधीच मोठ्या नसल्या, तरी व्यक्तीशिवाय चळवळ कधीच आकार घेत नाही. त्यामुळेच त्या व्यक्तीच्या कार्यपध्दतीचा, मांडणीचा, नैतिकतेचा, प्रभाव चळवळीवर पडतो, व्यक्ती ही चळवळीची ओळख बनते. डॉ. दाभोलकरांच्या बाबतीत असे घडणे साहजिकच होते. विचारांचा मूळ गाभा कायम ठेवत डॉ. दाभोलकरांनी वेगवेगळे कार्यक्रम संघटनेला देत विविध उपक्रमांची अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीशी सांगड घालत संघटना सतत वाहती आणि विकसित ठेवली. हेच सनातन्यांना आव्हान ठरले आणि त्यांनी 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. दाभोलकरांचा खून केला; पण डॉ. दाभोलकरांची कुशल संघटनात्मक उभारणी, साधे, नैतिक आचरण यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांच्या जाग्या केलेल्या जाणिवांमुळे त्यांच्या खुनानंतरही संघटना कुंठित झाली नाही; उलट डॉ. दाभोलकरांच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखालील विविध कार्यक्रम, उपक्रम, आंदोलने, मोहिमांमुळे विस्तारत राहिली; अगदी राज्याच्या, देशाच्या सीमा ओलांडत.

या 20 ऑगस्ट 2019 ला डॉक्टरांच्या शहिदत्वाला सहा वर्षे होत आहेत. खुन्यांना अजून शिक्षा झालेली नाही, सूत्रधारापर्यंत अजून तपास यंत्रणा पोचलेल्या नाहीत. न्यायालयीन लढाई चालूच आहे. (त्याचा तपशील याच अंकात इतरत्र दिला आहे.) रस्त्यावरील लढाईचा; पर्यायाने जनतेचा दबाव व्यवस्थेवर राहणे आवश्यकच आहे. हा संघर्ष आपल्याला दीर्घ काळपर्यंत करावा लागणार आहे. एखादा सोम्या-गोम्या बुवा, बाबा खुनी असता, तर आतापर्यंत त्याचा तपास लागून त्याला शिक्षाही झाली असती; पण ही लढाई ज्यांना या देशाचे संविधान मान्य नाही, ज्यांचे सामाजिक न्यायाशी काहीही देणेघेणे नाही, ज्यांना या देशात धर्माधारित उच्च जात-वर्गाची सत्ता प्रस्थापित करायची आहे, अशा सनातन्यांबरोबर आहे आणि ही लढाई सोपी नाही. आज जगभरातच उजव्या शक्तींचा प्रभाव वाढत आहे. भारतात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतील भाजपच्या प्रचंड विजयाने प्रतिगामी शक्तींचे बळ नक्कीच वाढले आहे. त्यानंतर देशातील काही भागात झुंडशाहीने घेतलेले बळी, आंतरजातीय लग्न केल्यामुळे प्रतिष्ठेपायी होत असलेल्या हत्या, जातीय अत्याचार या संदर्भात घडलेल्या घटना हेच दर्शवत आहेत; तसेच समाजाकडूनही याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत नाहीत. ही समाजाची संवेदनाहीनता, धर्माधर्मांत तेढ निर्माण करणारी वक्तव्ये, विज्ञानविरोधी वक्तव्ये, अवैज्ञानिक कर्मकांडे, शिक्षण पध्दतीत तथाकथित प्राचीन ज्ञानाच्या नावाखाली घुसडले जात असलेले भ्रामक विज्ञान, या सगळ्याला सत्ताधार्‍यांचा मिळत असलेला पाठिंबा हे सर्व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीच्या उद्दिष्टांना बाधा आणणारेच आहे. नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा जर तसाच स्वीकारला गेला, तर घटनेने मध्यवर्ती मानलेल्या सामाजिक न्यायाच्या आणि राजकीय, बाजारू हस्तक्षेपापासून आणि सामाजिक-धार्मिक पूर्वग्रहांपासून दूर ठेवणार्‍या शिक्षक-विद्यार्थी यांच्या शैक्षणिक स्वातंत्र्याच्या संकल्पनेलाच तडा जाण्याची शक्यता आहे.

एका बाजूला ही स्थिती आहे, तर दुसर्‍या बाजूला नवउदारवादी आर्थिक धोरणामुळे निर्माण होत असलेली बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, गरिबी, प्रचंड विषमतेची स्थिती आहे, ती सार्‍या जगभरातच वाढत आहे. वरवर जरी ही लढाई धार्मिक, जातीय, वांशिक वाटत असली, तरी तिच्या मुळाशी आहेत, ही प्रचंड विदारक आर्थिक स्थिती निर्माण करणारी आर्थिक धोरणे. या धोरणांमुळे गरिबी, बेरोजगारीने पिचलेला अस्मिताहीन, अप्रतिष्ठित बनलेला माणूस सारा ‘विवेक’ गमावून बसतो. धर्मांध, जात्यंध टोळ्यांचा भक्ष्य बनतो.

या पार्श्वभूमीवर आपण येत्या 9 ऑगस्टला ‘मानवतावादासाठी विवेकवाद’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आणि 10-11 ऑगस्टला संघटनेचे त्रिदशकपूर्ती अधिवेशन मुंबईतील मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात आयोजित करत आहोत. त्याची तयारी हा अंक तुमच्या हाती पडेपर्यंत अंतिम टप्प्यात आली असेल. या परिषद-अधिवेशनाच्या निमित्ताने देश-विदेशातील विवेकवादी संघटनांचे प्रतिनिधी, व्यक्ती यांच्या समोर महाराष्ट्र अंनिसच्या गेल्या तीस वर्षांतील भरीव कामाचा लेखा-जोखा मांडला जाईल. भविष्यातील आव्हानांबद्दल, कार्यक्रमाबद्दल चर्चा केली जाईल, वर्तमानाच्या भीषण वास्तावाची दखल घेतली जाईल. मार्गदर्शन केले जाईल व तेथील विचारमंथनातून कार्यकर्त्यांना आगामी संघर्षासाठी सिद्ध होण्याची प्रेरणा मिळेल, याची खात्री वाटते.