रयत शिक्षण संस्थेची महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारांची एक दीर्घ अशी परंपरा आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात सातार्यातून महाराष्ट्राच्या नव्या जडणघडणीत एक अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावलेली होती. समाजातल्या अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा यांच्या विरोधात ज्याला ‘क्रुसेड’ म्हणता येईल अशा प्रकारचे धर्मयुद्ध कर्मवीरांनी त्यावेळच्या पुरोहितशाहीच्या विरोधात अतिशय कणखर अशा पद्धतीने पुकारले होते. याच कामाचे त्यांचे सहप्रवासी म्हणून प्रबोधनकार ठाकरे त्या काळात सातारा रोडला आपलं ‘प्रबोधन’ चालवित होते. असा हा मोठा वारसा घेतलेल्या रयत शिक्षण संस्थेचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी कामाला सुरवात केली, त्या काळात पुढे डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामावर आपलं सर्वस्वी असं कॉन्सनट्रेशन केलं होतं आणि ‘अंधश्रद्धा’ हा आपल्या चळवळीचा ‘फोकस पॉइंट’ केला होता. आपली सारी शक्ती, प्रतिष्ठा, अनुभव आणि अफाट वाचन हे सारंच या कामासाठी ते पणाला लावीत होते. एक फार मोठी जोखमीची, दीर्घ पल्ल्याची समाजहिताची लढाई ते लढत होते. त्या काळात एक दिवस ते माझ्याकडे आले आणि ‘रयत’ च्या माध्यमातून ही लढाई आपण पुढे चालू ठेवूया अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांची अपेक्षा रास्त होती. कर्तव्य भावनेनं आम्ही त्यांच्या कल्पनेला सहजस्फूर्त असा पाठींबा दिला आणि मग महाराष्ट्राच्या विविध भागात कार्य करीत असलेल्या रयत शाखांमधून, त्यांचेे कार्यकर्ते‘अंनिस’चे कार्यक्रम करू लागले. पुढे लगेचच ‘अंनिस’चं महाराष्ट्राचं अध्यक्षपद स्वीकारण्याची त्यांनी मला सूचना केली. त्यांची तळमळ, कामाचा अफाट पसारा, ध्येयासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी या सार्याचा माझ्यावर एक वेगळाच परिणाम होता. मला नाही म्हणायची हिम्मत झाली नाही आणि मी त्यांचा एक सहकारी म्हणून त्यांच्याबरोबर काम करू लागलो. वेगवेगळ्या आंदोलनांच्या निमित्ताने संपर्क वाढत गेला आणि आम्ही दोघं एकमेकांच्या अधिकाधिक जवळ येत गेलो.
मला भावलेले दाभोलकर हे एक संपूर्ण व्यक्तिमत्व होतं. अगदी त्यांच्या अभ्यासाबाबतीत बोलायचं म्हटलं तर अभ्यासातला कोण भला मोठा दिग्गज असेल तर त्याच्या बरोबर वाद घालण्याची त्यांची तयारी असे. चळवळ यशस्वी करण्यासाठी कांही डावपेच आखण्याची वेळ आली तर अत्यंत संयमीपणानं भल्याभल्यांना जमणार नाहीत असे विधायक डावपेचही ते आखत. त्यांची चळवळ ही मर्यादित जाणिवेची चळवळ नाही. सामाजिक न्यायाच्या प्रतिष्ठापनेची चळवळ ते करीत होते. म्हणून त्यांच्या चळवळीच स्वरूप केवळ काय तरी जादूटोणा बंद करणं इतकं मर्यादित होतं असं मी तरी मानायला तयार नाही. त्यांच्या चळवळीच उद्दिष्ट खूप विशाल होतं. व्यापक परिवर्तनाची लढाई ते लढत होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाला साधा माणूस कृतिशील कार्यकर्ता, कुशल संघटक, साक्षेपी संपादक, विवेकी लेखक, द्रष्टा विचारवंत, कार्यकर्ते घडविणारा नेता असे एक ना अनेक कितीतरी पैलू होते. या सार्याच पैलूंचा ते चळवळीसाठी मोठ्या खुबीने वापर करीत असत.
आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मौलिक सूत्रं म्हणून जी ग्रंथित केलेली आहेत त्या सार्या सूत्रांचा उगम- ‘ख्रिस्त, महंमद, मांग ब्राह्मणाशी । धरावे पोटाशी । बंधुपरी’ असं म्हणणार्या म. फुलेंच्या विचारसरणीमध्ये आहे. तेच म. फुले-
‘जगाचा निर्मिक आहे देव एक
धर्म का अनेक जोती म्हणे’
असा परखड सवाल व्यवस्थेला विचारीत होते. देवा-धर्माच्या कोंडाळ्यात अडकलेल्या बहुजन समाजाला मुक्त करणं हा त्यामागचा उद्देश होता. तर पुढच्या काळात आमचे संत गाडगेबाबा किर्तनातून ‘तुमच्या गावात देव किती आहेत?’ असा रोखठोक प्रश्न विचारून समाजाला शिक्षित करण्याचा प्रयत्न करीत होते. याच तोडीचं काम आजच्या काळात डॉ. दाभोलकर करीत होते, म. फुल्यांची सुद्धा त्या काळात महाराष्ट्रानं उपेक्षाच केली. फुल्यांचीच काय, शाहू आणि आंबेडकरांना – महर्षि शिंद्यांना तरी या लोकांनी डोक्यावर घेतलं काय? नाही. तीच उपेक्षा आज डॉ. दाभोलकरांच्या वाट्याला आली. फुले-शाहू-आंबेडकर हे शब्द आज नुस्ते परवलीचे शब्द झाले आहेत. आमचे राज्यकर्ते आपल्या खुर्च्या सांभाळण्यासाठी या शब्दांचा वापर करतात. प्रत्यक्ष त्यांच्या तत्वज्ञानातलं ते किती आणि काय आचरणात आणतात? याचा विचार महाराष्ट्रातल्या शहाण्या लोकांनी केलाय असं मला अजिबात दिसत नाही.
समाजातल्या ज्या अघोरी अंधश्रद्धा आहेत. त्या अंधश्रद्धा नष्ट झाल्या पाहिजेत. म्हणून डॉ. दाभोलकर धडपडत होते. या सार्या अंधश्रद्धा तळागाळातल्या गोरगरीब लोकांच्या जीवावर उठणार्या होत्या. आणि म्हणून खूप व्यापक विचार करून त्यांनी आपला कार्यक्रम आखला होता. विज्ञाननिष्ठा हीच समाजाची जीवननिष्ठा बनावी यासाठी त्यांचा जीव तीळ तीळ तुटत होता. एवढ्यासाठीच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या या कायद्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट होता. या कायद्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात न सामावणारी एक विशाल लढाई ते लढत होते. या सबंध समाजाची समतेच्या माणुसकीच्या एका नव्या पायावर उभारणी व्हावी असं व्यापक स्वप्न ते पहात होते.
‘कायद्याने समाजसुधारणा करता येतात’, हे दाभोलकरांनी कधीही मानलं नाही तरीही हा कायदा त्यांना कशासाठी हवा होता? तर समाजात एखादा विचार मांडला, की तो रुजण्यासाठी त्याला सँक्शन म्हणून सरकारच्या अधिकृत पाठींब्याची गरज असते. कायदा नसेल तर समानतेला विरोध करणार्या प्रतिगामी शक्ती सतत जागृत राहतील आणि प्रयत्नपूर्वक सर्वसामान्यांचं शोषण करतील. कायदा असला की, अशा प्रथांचं उदात्तीकरण करणं त्यांना जमत नाही. एवढ्यासाठीच त्यांना कायदा हवा होता. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला म्हणजे सारं संपलं अशी त्यांची भूमिका नव्हती.
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रश्नावरची डॉ. दाभोलकरांची धडपड आणि तडफडही मी सुरवातीपासून पहात आलोय. त्यांच्या या लढ्यांमधला मी सुरवातीपासूनचा सहप्रवासी आहे. या प्रश्नावर ते खूपच आग्रही होते. अधिवेशन आलं रे आलं की, त्यांची धडपड सुरु व्हायची. मी एकदा त्यांना म्हणालो, ‘दाभोलकर, हे राज्यकर्ते तुमच्या मागण्यांचा साकल्याने विचार करण्याच्या पात्रतेचे तरी आहेत काय?’ डॉ. दाभोलकर या राज्यकर्त्यांकडे काय मागत होते? त्यांची मागणी व्यक्तिगत होती काय? हा कायदा पास झाल्यानंतर दाभोलकरांना व्यक्तिगत लाभ होणार होता काय? ते एका नव्या समाजव्यवस्थेची आग्रही मागणी करीत होते. पण आमच्या सत्तापिपासू, नाकर्त्या राज्यकर्त्यांना त्यांच्या मागणीचे मूळ सूत्र सुद्धा आकलन करून घेता आलं नाही ही आमच्या राज्यकर्त्यांची शोकांतिका आहे. आणि म्हणून परवा बोलताना संतापानं मी म्हणालो, “थू तुमच्या जीनगानीवर आणि तुमच्या खुर्च्यांवर.”
मी तुम्हाला सांगतो, सातासमुद्रापलिकडून आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीचे ब्रिटीश राज्यकर्ते इथं राज्य करीत होते. त्यांनाही आपली सत्ता सांभाळायचीच होती. मात्र सामाजिक सुधारणेच्या बाबतीत आमच्या राज्यकर्त्यांपेक्षा ते कितीतरी उच्चतम पातळीवर होते. आपली सत्ता टिकविण्यासाठी इथल्या जनतेवर त्यांनी अन्याय, अत्याचार केले. मात्र सामाजिक न्यायाची बूज राखण्याबाबतीत आमच्या आजच्या राज्यकर्त्यापेक्षा ते त्या काळातही कितीतरी पावलं पुढं होते. राजाराम मोहन रॉय यांनी सतीच्या प्रथेविरुद्ध त्या काळात जो टाहो फोडला तेंव्हा त्या प्रश्नावर ब्रिटीश राज्यकर्ते अधिक संवेदनक्षम होते असं दिसतं. सतीची चाल हा हिंदू धर्मातला फार मोठा प्रश्न होता तरीही 1829 साली म्हणजे 185 वर्षापूर्वी सामाजिक न्यायाचा हा प्रश्न ऐरणीवर आला तेव्हा व्यक्ती हे मूल्य मानून सतीच्या चाली विरुद्ध कठोर कायदा करण्याचं धाडस परक्या सरकारनं दाखवलं. मात्र आज डॉ. दाभोलकरांच्या बलिदानानंतरही एकमताने ‘जादूटोणा विरोधी बील’ पास करायची आमच्या राज्यकर्त्यांची हिम्मत होत नाही. हे कशाचं लक्षण आहे? आमच्या राज्यकर्त्यांनी आपल्या खुर्चीचा मोह बाजूला ठेवून निर्विकारपणानं विचार केला असता तर दाभोलकरांची हत्या आपण टाळू शकलो असतो. पण आमच्या राज्यकर्त्यांची कद्रू, संकुचित मनोवृत्तीच सामाजिक सुधारणेच्या आड आली आणि त्यामुळेच डॉ. दाभोलकरांची हत्या करणार्या शक्ती चेकाळल्या. त्या धीट बनल्या. अधिकाधिक आक्रमक बनल्या आणि त्यांनी दाभोलकरांच्या जीवावर घाला घातला.
डॉ. दाभोलकरांची निर्घृण हत्या करणार्या प्रवृत्तींना तरी खरंच त्यांच्या देवाचा किंवा धर्माचा अभिमान आहे; असं मी अजिबात मानत नाही. देवाचं किंवा धर्माचं नाव पुढं करून अन्यायी पद्धतीने ज्यांना आपले जन्मजात हितसंबंध साधता येतात; अशा बांडगुळांनीच आपल्या प्रतिष्ठेच्या हितसंबंधाआड येणार्या चळवळींच्या नेत्यांना आजवर टार्गेट केलं आहे. डॉ. दाभोलकरांची हत्या हा अशाच एका विकृत षडयंत्राचाच भाग आहे. ज्याच्यापुढे आपली काहीच मात्रा चालत नाही असा एक प्रबळ शत्रू त्यांना दाभोलकरांच्या रूपात दिसत होता. त्यामुळे या शक्ती त्यांचा दुस्वास करीत होत्या. खरं म्हणजे ‘मृत्यूनंतर वैर संपत’ असा एक आपल्याकडचा रिवाज आहे. परंतु दाभोलकरांच्या निधनानंतरही ‘सनातन प्रभात’चा जो दृष्टिकोन आहे तो अत्यंत घृणास्पद आहे. कोणीही अशा माणसांना आपल्या जवळसुद्धा उभा करून घेणार नाही.
‘खरे तर जे वैचारिक मतभेद असतात ते तुम्हाला वैचारिक पद्धतीने वाद-प्रतिवाद करून मिटवता येतात.’ अशी डॉ. दाभोलकरांची श्रद्धा होती. त्यामुळे त्यांनी भल्या भल्यांची आव्हानं स्वीकारली. अगदी शंकराचार्याला सुद्धा आव्हान दिलं. ते कमालीचे संवादी होते. ते कांही लुंग्यासुंग्याची लढाई लढत नव्हते. दाभोलकर एक कळीची लढाई लढत होते आणि हे ज्यांना मान्य नव्हतं त्यांनी दाभोलकरांचा बळी घेतला. या शक्ती कोणा एका व्यक्तीच्या शत्रू नाहीत तर अफाट मानवजातीच्या त्या शत्रू आहेत.
डॉ. दाभोलकरांच्या हत्येने कल्पनाही करता येणार नाही अशी कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. कार्लाईल सारखा तत्वज्ञ एका ठिकाणी असं म्हणतो, ‘जेव्हा निसर्ग एका महान व्यक्तीला जन्म देतो. तेव्हा त्यांच्यासाठी तो एक ढाचा तयार करतो, तो ढाचा तसाच ठेवत नाही. तो ढाचा तो मोडून टाकतो.’ कारण ही माणसं पेणच्या छापाच्या गणपतीसारखी नसतात. डॉ. दाभोलकरांसारखा अचाट कर्तृत्व असणारा माणूस पुढील शंभर वर्षात जन्माला येईल काय? नाही. पुण्यात म. गांधीजींची 1948 साली हत्या झाली. त्याला आता 65 वर्षे पूर्ण झाली. त्यानंतर पुन्हा गांधी जन्माला आले काय? नाही. जसं गांधी पुन्हा जन्माला येणं शक्य नाही, तसं आता डॉ. दाभोलकरही पुन्हा जन्माला येणं कदापि शक्य नाही. आता आमची तरूण मंडळी भावनेच्या भरात ‘आम्ही सारे दाभोलकर’ असं म्हणताहेत. एका अर्थाने ते त्यांचं बरोबर असेलही. पण आपणा सार्यांना दाभोलकर होता येणं शक्य आहे काय? डॉ. दाभोलकरांनी आयुष्यभर जी साधना, तपश्चर्या केली. ती तपश्चर्या करण्याची आणि विशेषत: आपल्या अंगिकृत कार्यासाठी प्राणाचे मोल देण्याची जी तयारी दर्शविली ती अद्वितीय आहे.
माझी अशी खात्री आहे की, डॉ. दाभोलकरांना हे माहीत होतं की, या लढाईमध्ये आपण कोणा कोणाशी संघर्ष करीत आहोत. आपलं हे काम कोणा कोणाला आवडत नाही. अशा लोकांशी लोकशाही मार्गाने दोन हात करायला ते समर्थही होते. माणसाने कशासाठी आपले प्राण वेचावेत याचं सम्यक आकलन या माणसाला होतं. कृष्णवर्णीयांच्या माणुसकीच्या हक्कांसाठी मार्टिन ल्यूथर किंग लढले. ते तरी कोणाचे शत्रू होते? त्यांनी तरी कोणाचे काय वाकडे केले होते? डॉ. दाभोलकर देखील त्यांच्यासारखीच व्यापक लढाई लढत होते. हे दोघेही कोणाच्या व्यक्तिगत आणि मानवी हिताच्या आड आले होते काय? नाही. कृष्णवर्णीयांच्या हक्कांची लढाई ज्या शक्तींच्या स्वार्थी हितसंबंधावर होत होती, अशा शक्तींनी मार्टिन ल्यूथर किंग यांची हत्या केली. या सनातनी शक्ती मार्टिन यांच्या हत्येवेळी जशा एकवटल्या तशाच त्या दाभोलकरांच्या हत्येवेळी सुद्धा एकवटल्या आहेत. भगतसिंग जसे अन्यायी अशा राजवटीच्या विरोधात लढताना शहीद झाले तसे डॉ. दाभोलकरही एका महान तत्वासाठी अन्यायी शक्तीच्या विरोधात लढताना शहीदच झाले. एका विलक्षण आणि वेगळ्या माणसाने केलेली ही लढाई आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनाच्या इतिहासात तिला तोड नाही.
आज मारेकर्यांनी त्यांची हत्या केली म्हणजे त्यांचे विचार संपतात काय? नाही. डॉ. दाभोलकर हे समाजपरिवर्तनाच्या लढाईतले अपराजित योद्धे होते. हल्लेखोरांनी त्यांचा नश्वर देह संपवला. तो केव्हातरी संपणारच होता. पण त्यांनी जो विचार निर्माण केला तो कुणीही नष्ट करू शकत नाही. त्या विचारामागे त्यांनी जी एक नैष्ठिक ताकद उभी केली. ती त्यांचे शत्रू सुद्धा नाकारू शकत नाहीत. त्यामुळे ‘अंनिस‘च्या लहान थोर कार्यकर्त्यांना एक लक्षात ठेवावं लागेल, डॉ. दाभोलकरांच्या तोंडाला काळ फासण्याचा प्रयत्न झाला. त्यांना यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या पण ते यत्किंचितही आपल्या विचारांवरून ढळले नाहीत. बिचकले, डगमगले अथवा दबकलेही नाहीत. त्यांना त्यांच्या आत्मसामर्थ्याची पूर्ण कल्पना होती. बिनतोड युक्तिवाद, सामाजिक प्रश्नासंबंधीची निकड, त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजून समर्पणाची तयारी हे त्यांचं खरं आत्मसामर्थ्य होतं. त्यांची आयुध पक्की होती. ज्या आयुधांसह ते प्राणपणाने लढले ती आयुध आजमितीला कार्यकर्त्यांकडं असतीलच असं नाही. पण डॉक्टरांनी जी आयुध वापरली तिच आयुध कार्यकर्त्यांनी आपापल्या शक्तीप्रमाणे वापरली पाहिजेत. पण दिशा तीच, मार्ग तोच आणि आयुधही तीच हे लक्षात ठेवलं पाहिजे.
ज्या विकृत शक्ती दाभोलकरांना प्राण घ्यायला टपलेल्या होत्या, त्यांच्या विरोधात लढतानाचा त्यांचा बुलंद आवाज कधी क्षीण झालाय असं कधीच वाटलं नाही. त्यांचा हा बुलंद आवाज या शक्तींनी त्यांच्यावर घाले घालण्याआधी जितका तीव्र होता तितकाच किंबहुना त्याही पेक्षा अधिक तो तीव्र बनला. त्यांच्या धमक्यांना ते बधले नाहीत. डॉ.दाभोलकरांच्या संपूर्ण जीवनाचं हे सार आहे. त्यांच्या लढ्याचं ते भक्कम आयुध आहे. दाभोलकरांचं नावं घेऊन ‘अंनिस’चे जे कार्यकर्ते उभे राहतील त्यांनी हे पक्कं लक्षात ठेवलं पाहिजे तरच ते दाभोलकरांचे अनुयायी म्हणवून घ्यायला ते पात्र ठरतील. या प्रश्नावर काम करताना समतोल सांभाळून आणि आपल्या प्राणांची फिकीर न करता त्यांना काम करावं लागेल. दाभोलकरांच्या युक्तिवादापेक्षाही त्यांची समर्पितवृत्ती ही खरी त्यांची एक मोठी शक्ती होती. या शक्तीचा विसर न पडता कार्यकर्त्यांनी अहोरात्र राबलं पाहिजे.
‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांना त्यांच्या या महान नेत्याने फार मोठा वारसा दिलेला आहे. तो वारसा वैचारिक कृतीचा आहे. याच समग्र भान ठेवून त्यांना इथून पुढे ही खडतर वाटचाल करावी लागेल. डॉ. दाभोलकरांच्या हत्येने कार्यकर्त्यांना दिशा धूसर झाल्यासारखं झालं आहे. ते सैरभैर झाले आहेत. अजूनही या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत. येत्या काही दिवसांमध्ये आपणासमोर काय वाढून ठेवलंय? याचा सुद्धा विचार करायला त्यांना वेळ मिळालेला नाही. कारण त्यांची डोकी भ्रमिष्टासारखी झाली आहेत आणि तरी सुद्धा डॉ. दाभोलकरांचा हा भव्य-दिव्य वारसा पुढे नेण्याची फार मोठी जोखीम त्यांना आपल्या अंगावर घ्यावी लागणार आहे. डॉ. दाभोलकर हे देहाच्या स्वरूपात आता आपल्यात कधीच येणार नाहीत. हे वास्तव स्वीकारून कार्यकर्त्यांसमोर जो एक आणि एकच मार्ग शिल्लक राहतो तो म्हणजे त्यांनी घालून दिलेल्या संघर्षाचा. कार्यकर्त्यांना दाभोलकरांच्या आदर्श जीवन शैलीची नव्याने ओळख करून देण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्यांच्या जाण्यानं समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. खरोखरंच जागा भरून निघणं अशक्य आहे. त्यांच्या कार्याची स्मृती जतन करताना त्यांच्या भूमिकेवर ठामपणानं पाय रोवून उभा राहणं हाच त्यावरचा उपाय आहे. ‘कधीतरी – कुणीतरी अवतरेल आणि डॉ. दाभोलकरांची जागा घेईल’ अशा भ्रमात समाजाला राहता येणार नाही. मघाशी म्हणालो त्याप्रमाणे, ‘अशा व्यक्ती पुन्हा पुन्हा जन्माला येत नाहीत आणि म्हणूनच जेव्हा हजारो कार्यकर्ते त्यांची भूमिका घेऊन ठामपणे उभा राहतील तेव्हा दाभोलकरच त्यांच्या रूपात दिसतील.
माझं वय लक्षात घेता आज माझ्या काही मर्यादा आहेत. अलिकडे मला तुमच्या प्रत्येक कार्यक्रमात दाभोलकरांइतकी फिजिकली भागीदारी कदाचित करता येणार नाही. या प्रश्नासंबंधिची दाभोलकरांइतकी शक्ती माझ्याकडे आहे असं मी बिलकूल मानत नाही. पण त्यांनी जो एक सामाजिक संघर्षाचा धडा घालून दिलाय. त्याच मार्गाने चालण्याचा माझा प्रयत्न राहील. माझ्या अंत:करणात, माझ्या जीवात जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत माझ्या शक्तिनिशी मी तुमच्या सोबत आहे. पण सबंध पुढच्या वाटचालीत मार्गदर्शन करण्याइतपत मी माझा अधिकार मानत नाही. ते काम तो अधिकार डॉ. दाभोलकरांचाच आहे असं मी मानतो. ‘धन्याचा हा माल । मी तर हमाल । भारवाही।’ एवढ्या अर्थानं माझ्याकडे जे पद आहे त्या पदाचा मी विचार करतो. मात्र ज्या एका महान प्रश्नासाठी डॉ. दाभोलकरांनी कुर्बानी दिली आहे. त्यांचं जे हौतात्म्य आहे, त्याच्या उजेडात आपण आपली पावलं टाकू. महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांसोबत या लढ्यात त्यांचा मार्गदर्शक म्हणून नव्हे तर त्यांचा एक जोडीदार म्हणून मी सोबत असेन. एवढच सांगतो. ‘अंनिस’च्या सर्व कार्यकर्त्यांनी उमेद न सोडता आणि डॉ. दाभोलकरांनी ज्या एका महान कार्यासाठी आपलं बलिदान दिलं त्याचं सामर्थ्य लक्षात घेऊन आणि येणारी जोखीम लक्षात घेऊन आपली जबाबदारी पेलायला अभिमानानं पुढं आलं पाहिजे. एवढंच माझं त्यांना कळकळीचं आवाहन आहे.
–प्रा. एन. डी. पाटील
शब्दांकन : प्रा. एकनाथ पाटील