बुधवार दि.1 एप्रिल 2015 रोजी पहाटे 3.30 वाजा सा.रे.पाटील यांचे दु:खद निधन झाले. दुपारी 3 वाजता मी व राहुल थोरात शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्यातील प्रशासकीय इमारतीत पोचलो आणि अंनिसचे आधारवड असलेल्या पाटील साहेबांचे अंत्यदर्शन घेतले. थोड्याच वेळात बरोबर साडे तीन वाजता राष्ट्र सेवा दलाच्या युवकांनी ‘सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे’ हे गीत गाऊन सा.रे.पाटील सरांना अखरेचा निरोप दिला. त्यांनी देहदानाची इच्छ व्यक्त केली होती. त्याप्रमाणे कोणतेच धार्मिक संस्कार न करता त्यांचा देह मिरज मेडिकल कॉलेजला सुपूर्द करण्यात आला. राजकारण, सहकार, शेती आणि समाजकारण अशा अनेकविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने उज्वल यश मिळवणारे पाटीलसाहेब एकमेवाद्वितीय व्यक्तीमत्व होते. गेली 70 वर्षेते विविध क्षेत्रात कार्यरत होते. नव्वदी ओलांडली तरी त्यांचा उत्साह कायम होता.
इचलकरंजीच्या नगरपालिकेत नाका कारकून म्हणून त्यांनी नोकरीला सुरवात केली. याच काळात त्यांचा ध्येयवाद पक्का झाला. अच्युतराव पटवर्धन, आप्पासाहेब पटवर्धन आणि साथी एस.एम.जोशी यांच्या संपर्कातून त्यांची वैचारिक जडणघडण झाली. शेतकर्यांचे आणि कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकार चळवळ हा योग्य मार्ग आहे हे लक्षात घेऊन त्यांनी आपली वाटचाल सुरू केली. त्यांच्या कार्याचा परिपाक म्हणजे दत्त सहकारी साखर कारखान्याचं सुंदर लेणं. कारखान्याच्या माध्यमातून शिरोळ परिसरात दत्त उद्योग समूहाचे नाव देशपातळीवर कोरले गेले. जांभळी या गावात विविध सहकारी संस्था स्थापन करून पुढे खरेदी विक्री संघ व अखेरीस साखर उद्योग असा त्यांचा उत्क्रांत होत गेलेला प्रवास थक्क करून सोडणारा आहे. शिरोळ तालुक्यात 20 सहकारी पाणी पुरवठा संस्थांच्या माध्यमातून 40 हजार एकर जमीन ओलिताखाली आणली गेली. त्यामुळे शेतकरी नगदी पिके घेऊ लागले आणि शिरोळ तालुक्यातील शेतकरी आर्थिक सबल झाला. सा.रे.पाटील यांनी विविध देशाचे दौरे करून प्रगत शेतीचा अभ्यास केला व नवे तंत्रज्ञान इथल्या शेतकर्यांना माहीत करून दिले. आज येथील फुलांची निर्यात जगाच्या बाजारपेठेत होत आहे. याचे श्रेय पाटील सरांनाच जाते.
सा.रे.पाटील राजकारणात श्रेष्ठत्व मिळविण्यासाठी राजकारण करणार्या वृत्तीचे नव्हते. राजकारण हे साधन आहे. त्याचा उपयोग कष्टकर्यांना उन्नत करण्यासाठी व्हावा हा सच्चा समाजवाद त्यांनी प्रत्यक्षात आचरला. कामगारांना नियमाप्रमाणे वेतन देणारा दत्त कारखाना हा पहिला कारखाना असावा. कामगारांच्या कल्याण्याच्या विविध योजनाही त्यांनी राबविल्या. डोनेशन न घेता सभासदाच्या मुलांना तांत्रिक शिक्षण संस्थेत प्रवेश देणारे त्यांचे तंत्रनिकेतन हे एकमेव असावे. सा.रे.पाटील हे शिक्षण सम्राट नव्हते तर ते शिक्षण सर्वांपर्यंत पोचविणारे सर्वोदय विचारवंत होते.
1952, 1999 आणि 2004 या काळात एकूण तीन वेळा सा.रे.पाटील आमदार झाले. राजकीय सत्तेतून त्यांनी आपल्या मतदार संघाचा आर्थिक विकास केलाच पण तो केवळ धनदांडग्याचा नव्हे तर सर्वांचा. मतदार संघाच्या बाहेरही सा.रे.पाटील यांचे कार्य विस्तारले होते. पुरोगामी विचाराच्या संस्थांना त्यांचा मोठा आधार होता. साधना साप्ताहिक व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ आणि या चळवळीचे मासिक यांना ते भरीव आर्थिक मदत करीत. ‘साधना’च्या विपन्न काळात त्यांनी या मासिकाला मोठा आधार दिला. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना प्रबोधनासाठी महाराष्ट्रभर फिरावे लागे. यासाठी सा.रे.पाटील यांनी त्यांना चारचाकी गाडी भेट दिली होती. दाभोलकर अनेकदा त्यांना कारखान्यावर भेटत असत आणि त्यांचे मार्गदर्शन घेत असत.
सा.रे.पाटील यांच्या निधनाने शिरोळ परिसरातील शेतकर्यांचा व कामगारांचा आधारवड हरपला. तसेच समाजवादी विचाराचे छत्र हरपले. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र अंनिसची भावपूर्ण आदरांजली!