अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र आहे. प्रतीवर्षाप्रमाणे वार्तापत्राचा विशेषांक आपण नोव्हेंबर-डिसेंबरचा जोडअंक म्हणून प्रसिद्ध करतो. आमचे वाचक या अंकाची आतुरतेने वाट पहात असतात. विशेषांक 2012 च्या प्रकाशनाला थोडा उशीर झाला याबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच, वाचक, वर्गणीदार, जाहिरातदार व हितचिंतक यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
दिवसेंदिवस अंनिसवरचे लोकांचे प्रेम वृद्धिंगत होत आहे याचा आनंद होतो. विशेषांकाच्या प्रकाशनासाठी मान्यवरांनी लेख पाठवून सहकार्य केले. कार्यकर्त्यांनी जाहिराती मिळविण्यासाठी प्रचंड श्रम घेतले. जाहिरातदारांनी उदंड प्रतिसाद दिला. यामुळेच अंनिवाची मशाल अधिक तेजाने तळपत जाणार आहे.
हा अंक नेहमीप्रमाणे वैचारिक व ललित साहित्याने नटलेला आहे. जॉन नावाचा जर्मन तरूण भारतातील विवेकवादी संघटनावर संशोधन करण्यासाठी भारतात आला. अनेक संघटनांचा परिचय झाल्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याची महती त्याने ओळखली व आपल्या समितीला केंद्रस्थानी मानून तिच्या कार्याद्वारे भारतातील विवेकवादी चळवळीचे मूल्यमापन जॉनने केले व या विषयावर पी.एच.डी. मिळविली. अंनिसचा झेंडा जर्मनीपर्यंत पोचला ही आपणाला अभिमानास्पद बाब आहे. जॉनच्या ग्रंथाचा सुमन ओक यांनी मराठीत अनुवाद केलाय. त्यातील अंनिसशी संबंधित भाग हे या अंकाचे खास वैशिष्ट्य.
‘दैववादी मानसिकता व आजचे समाजवास्तव’ या विषयावरील परिसंवादात विविध मान्यवरांनी आपले परखड विचार मांडलेत. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यशैलीत सुधारणा करण्यासाठी ते उपयोगी ठरतील.
अंनिस ही केवळ प्रबोधन करणारी संघटना नव्हे. कृतीशीलता हे अंनिसचे खास वैशिष्ट्य. जातवास्तव बदलण्यासाठी अंनिसने आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाहांना बळ देण्याचे उपक्रम केले. लातूर व कोल्हापूर अंनिसने याबाबत केलेल्या उपक्रमांचा रिपोर्ट आपणास प्रेरणादायी ठरावा.
याबरोबरच दर्ग्यातील अघोरी उपचार, गर्भसंस्काराचे फसवे विज्ञान आदि विचारप्रवर्तक लेख या अंकात समाविष्ट आहेत. वैचारिकतेबरोबरच, विविध कथा, बालकिशोरांसाठीचे साहित्य, कविता, हास्यचित्रे इत्यादी ललित विभागांनी हा अंक नटलेला आहे.
अंनिसला बळ देणार्या विचारवंतांमध्ये पुष्पाताई भावे नेहमीच अग्रभागी असतात. त्यांची परखड मुलाखत वाचकांना आवडेल. अंनिसला योगदान देणार्या एका कार्यकर्त्याचा परिचय आपल्या विशेषांकात दिला जातो. दोन दशकाहून अधिक काळ अंनिसच्या विविध उपक्रमात योगदान देणारे व वार्तापत्राचे संपादक म्हणून सतत 10 वर्षे कार्यरत असणारे प्रा.आर्डेसर यांचा परिचय सर्वांना प्रेरणादायी ठरेल.
अशा विविध साहित्याने नटलेल्या ह्या विशेषांकाचे वाचक स्वागत करतील अशी आशा बाळगतो.
-संपादक