दि. 22 जुलै 2019 रोजी दु. 2.43 मिनिटांनी ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या प्रक्षेपकाद्वारे तब्बल 9 अब्ज 80 कोटी खर्चाच्या ‘चांद्रयान-2’ चे प्रक्षेपण आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून यशस्वीपणे झाले आणि तमाम भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून गेलेला होता. चंद्रावर बग्गी उतरवणारा अमेरिका, रशिया आणि चीन नंतरचा ‘चौथा देश’ अशी बिरूदावली लावून घेण्याच्या अनुषंगाने भारताने टाकलेले ते पहिले यशस्वी पाऊल होते. हे विशेषण लावून घेण्यासाठी मात्र दि. 7 सप्टेंबर 2019 पर्यंत वाट पाहावी लागणार होती. कारण या यानात असणारे ‘ऑर्बिटर’ चंद्राभोवती फिरत राहणारे होते. तर ‘ऑर्बिटर’ मध्ये असणारे ‘विक्रम लँडर’ चंद्रावर उतरण्यासाठीची तारीख 7 सप्टेंबर 2019 होती. विक्रम यशस्वीपणे जर चंद्रावर उतरले, तर त्या ‘विक्रम’मध्ये असलेली ‘प्रज्ञान’ नावाची बग्गी अर्थात चार चाकी गाडी चंद्रावर उतरून चंद्राचे निरीक्षण करणार होती. लगेचच काहीतरी विलक्षण घडावं असं वाटणार्यांना काही कालावधीसाठी वाट पाहावी लागणार होती. तो दिवस; किंबहुना मध्यरात्र उजाडली; पण काळजाचा ठोका चुकवणारी दि. 7 सप्टेंबरच्या मध्यरात्री 1.30 ते 2.30 च्या सुमारास चंद्रावर ‘विक्रम’ लँड होणार, असं इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी जाहीर केलं; परंतु चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना ‘विक्रम लँडर’शी असलेला इस्रोचा संपर्क तुटला आणि भारताची चांद्रमोहीम 2 अयशस्वी झाली. ‘चांद्रयाना’चे लँडिंग पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोच्या केंद्रात के. सिवन यांच्या बरोबर उपस्थित होते. पंतप्रधान वैज्ञानिक कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे उल्लेखनीय आणि अभिनंदनीय आहेच; परंतु आर्थिक मंदी, बेरोजगारी, नोटाबंदीचा फज्जा, विकासदराचा घटता आलेख यापासून लक्ष विचलित करण्यासाठीचा एकमेव आशेचा किरण म्हणून या अंतराळ मोहिमेकडे पाहण्यात आलेलं होतं की काय, याची शंका आल्याशिवाय राहात नाही.
अंतराळ मोहिमा या खूपच खर्चिक आणि यशस्वी होण्याची शक्यता कमी असणार्या असतात. पृथ्वीपासून जवळपास तीन लाख चौर्याऐंशी हजार किलोमीटर अंतरावर असणार्या चंद्रावर यान पाठवणे, त्या यानाशी संपर्क करणे या खरं तर कल्पने पलिकडच्या बाबी आहेत. त्यामुळे सदरची मोहीम अयशस्वी झाली, तर फार मोठं आभाळ कोसळलं असंही होत नाही. मोहीम यशस्वी झाली असती, तर फार हुरळून जाण्याची सुध्दा गरज नव्हती. परंतु प्रसारमाध्यमांनी या मोहिमेचा असा काही प्रचार आणि प्रसार केला की, चंद्रावर आता केवळ आपणच आणि आपलं नेतृत्व. ‘चाँद अपने मुठ्ठीमें’ अशा प्रकारच्या हेडलाईन्सखाली चर्चासत्र राबवण्यात अनेक टीव्ही चॅनेल्स कार्यरत होते. विज्ञानप्रसार करण्यापेक्षा या मोहिमेकडे राजकीय लाभाच्या अनुषंगानेच पाहिलं गेलं. विज्ञान जगताच्या द़ृष्टीने प्रचाराचा असला प्रकार किळसवाणाच होता. या काळामध्ये प्रसारमाध्यमांमध्ये येणार्या बातम्या किंवा ‘व्हॉट्सअॅप’द्वारे फिरणारे मेसेजेस पाहिल्यांनतर माझ्यासारख्या सर्वसामान्य खगोल अभ्यासकाला आश्चर्यच वाटायचं. क्षणभर असं वाटायचं की, मी अंतराळाच्या माहिती संदर्भात फारच मागासलेला आहे की काय? खगोल अभ्यासकांना जे माहीत नाही, ते प्रसारमाध्यमांना कसं काय समजतं? अर्थात, चुकीचं आणि मीठ मसाला लावलेलं. थोडा आढावा घेतल्यानंतर समजलं की, ‘व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी’चे आणि आय. टी. सेलचे तथाकथित तज्ज्ञ हे या माहितीचे पुरवठादार आहेत.
इस्रोचे प्रमुख के. सिवन यांचा हवाला देऊन दि. 8 सप्टेंबर 2019 पासून प्रसारमाध्यमांतून ‘चांद्रयाना’संबधी जाणीवपूर्वक बातम्यांची रेलचेल होती. बातम्यांचे आशय भारतीयांचा ऊर भरून यावा असेच होते; पण त्या बातम्यांची सत्यता तपासली तर आपल्या भ्रमाचा भोपळा फुटल्याशिवाय राहत नाही. वानगीदाखल काही बातम्यांचा आढावा घेऊया.
1. हिंमत हारू नका : चीनमध्येही भारताच्या ‘चांद्रयान 2 मोहिमेचे भरभरून कौतुक’ या बातमीखाली चीनच्या सोशल मीडियावर भारताच्या ‘चांद्रयान 2’ मोहिमेचं भरभरून कौतुक होत आहे. चीनची सरकारी मीडिया ‘ग्लोबल टाईम्स’ने एका यूजरला ‘कोट’ करत भारतीय शास्त्रज्ञांनी उत्तम प्रयत्न केल्याचे म्हटलं आहे. तसेच कोणताही देश जर अंतराळातील संशोधनात प्रगती करत असेल, तर त्याचा आम्ही सन्मान करतो. ‘चांद्रयाना’च्या अॅटिट्यूड कंट्रोल थ्रस्टरवरील (अउढ) नियंत्रण न झाल्यानेच संपर्क तुटला असावा, अशी शक्यता चीनमधील एका शास्त्रज्ञाने व्यक्त केल्याचं देखील ‘ग्लोबल टाईम्स’ने म्हटलं आहे. ही बातमी अनेक प्रश्नचिन्हं निर्माण करते. चीनच्या मोहिमांचं आपण किती कौतुक केलेलं आहे? यूजरचे नाव काय? शास्त्रज्ञ कोण? याचं उत्तर येतच नाही. कोणाच्याही नावे काहीही खपवणे हा एकमेव उद्योग असंच याचं स्वरूप होतं.
2. इस्रोचे नासाकडूनही कौतुक झालं आहे. ‘नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने कौतुक करताना म्हटले की, अवकाशातील कामगिरी कठीणच असते. ‘चांद्रयान 2’ मोहिमेत इस्रोने केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत व त्याने आम्हालाही स्फूर्ती मिळाली आहे. ‘नासा’ने म्हटले की, आपण देाघे मिळून सौरमंडळाचा आणखी शोध घेण्याची संधी मिळेल. याची आम्हाला आतुरतेने प्रतीक्षा आहे. ‘नासा’ला आपल्याकडून स्फूर्ती मिळणे म्हणजे जरा अतिच म्हणावं लागेल.
3. युरोपियन स्पेस एजन्सीला जे बारा वर्षांत जमलं नाही, ते इस्त्रोनं अवघ्या पस्तीस तासांत करून दाखवलं. या बातमीच्या अनुषंगाने ‘विक्रम लँडर’शी असलेला संपर्क तुटला आहे. सॉफ्ट लँडिंग करण्यात ‘विक्रम’ला अपयश आल्याने इस्त्रोच्या ‘चांद्रयान 2’ मोहिमेला काहीसा धक्का बसला. मात्र अवघ्या पस्तीस तासांमध्ये इस्रोने ‘विक्रम’चा ठावठिकाणा शोधून काढला. आतापर्यंतच्या अनेक मोहिमांमध्ये लँडरशी संपर्क तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. युरोपियन स्पेस एजन्सीचा यानाशी संपर्क तुटला होता. या यानाची माहिती तब्बल बारा वर्षांनी समोर आली. त्यामुळेच ‘विक्रम लँडर’शी संपर्क साधला जाऊ शकतो, असा विश्वास इस्रोला आहे. आजअखेर ‘विक्रम लँडर’चा ठावठिकाणा समजलेला नाही, हे वास्तव आहे.
4. ‘ऑर्बिटर’ने जो फोटो काढला, त्या आधारावर ‘विक्रम लँडर’चे तुकडे झालेले नसून तो एकसंध आहे. एका बाजूला कललेला आहे, असे वृत्त इस्रोच्या अधिकार्याच्या हवाल्याने प्रसारमाधमांनी दिले होते; पण इस्रोने अजून या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. चंद्रावरचा एक अख्खा दिवस पृथ्वीवरील चौदा दिवसांबरोबर आहे. त्यामुळे ‘लँडर’ आणि ‘रोव्हर’ची डिझाईन 14 दिवस काम करण्याच्या द़ृष्टीनेच करण्यात आली होती. चौदा दिवसांनंतर चंद्रावर रात्र होईल. रात्रीच्या वेळी कडाक्याचा थंडावा असतो, त्यावेळी ‘लँडर’मधील उपकरण काम करण्याची शक्यता कमी आहे. ‘ऑर्बिटर’च्या माध्यमातून ही ‘चांद्रयान 2’ मोहीम चालू राहणार आहे. ‘ऑर्बिटर’चे आयुष्य साडेसात वर्षांचे असेल, असे इस्रोकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यातूनही नवीन माहिती मिळू शकते. चंद्रावर पाणी आणि बर्फाचा शोध लागू शकतो. मोहिमेची 95 टक्के उद्दिष्टे पूर्ण झाल्याचे इस्रोने जाहीर केले आहे. दोन किलोमीटरवरून पडलेल्या वस्तूला काहीही झालेलं नाही, असं सांगणार्या अवलियाचं कौतुकच करावं लागेल. मुख्य म्हणजे ‘आर्बिटर’चं आयुष्य एक वर्षच सांगणारे आता साडेसात वर्षांवर कसे आले?
विशेष म्हणजे वरील सर्व बातम्या के. सिवन यांच्या नावे असलेल्या ट्विटरवरून प्रसारित करण्यात आलेल्या होत्या. परंतु इस्रोने ट्विटर अकाउंटबद्दल दि. 11 सप्टेंबर 2019 रोजी अधिकृतपणे जो खुलासा केला, तो तमाम भारतीयांनी विचारात घेण्याची गरज आहे. ‘इस्रोचे प्रमुख के. सिवन यांच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. इस्रोच्या अधिकृत अकाऊंट खेरीज अन्य कोणत्याही अकाऊंटला ‘फॉलो’ करू नये. के. सिवन यांचे सोशल मीडियावर स्वत:चे कोणतेही व्यक्तिगत अकाऊंट नाही,’ अशा आशयाची बातमी इस्रोला अधिकृतपणे द्यावी लागली. हे निश्चितच वैज्ञानिक जगताला भूषणावह नाही. सोशल मीडियाद्वारे स्वत:च्या गौरवासाठी इतर देशांच्या नावाचा गैरवापर करणे नैतिकतेत बसत नाही. असा गैरवापर करताना इस्रो काय करत होती? हे विचारणारे बाहेरचे देश आणि तेथील वैज्ञानिक संस्था आहेतच ना!
इस्रोच्या नावे खपवलेल्या बातम्या कमी होत्या म्हणून की काय, आणखी एक बातमी वृत्तपत्रांमध्ये झळकली ‘अमेरिकेने एकादशीच्या दिवशी ‘चांद्रयान’ सोडल्यानेच त्यांची चांद्रमोहीम यशस्वी झाली,’ असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी सोलापूर येथील गडकोट मोहिमेच्या ब्रँडिंगप्रसंगी केले. भारतीय कालमापन पध्दतीमुळेच हे शक्य झाल्याचा दावा भिडे यांनी केला. ब्रह्मांडातील नक्षत्रांची स्थिती एकादशीलाच अतिशय संतुलित असते. त्यामुळेच अमेरिकेची ‘चांद्रमोहीम’ यशस्वी ठरली. अमेरिकेच्या ‘चांद्रमोहिमा,’ त्यातलं अपयश यावर बोलताना संभाजी भिडेंनी भारतीय कालमापन पध्दतीचं महत्त्व अमेरिकेला पटल्याचं म्हटलं. चंद्रावर उपग्रह सोडण्याचे अमेरिकेचे 38 प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर ‘नासा’च्या एका वैज्ञानिकानं भारतीय कालमापन पध्दतीचा अभ्यास केला. एकादशीला उपग्रह सोडल्यास मोहीम यशस्वी इोईल, असा सल्ला या वैज्ञानिकांना दिला. त्यानंतर नासाची मोहीम फत्ते झाली, असा दावा भिडे यांनी केला’. अशा प्रकारची वक्तव्यं जाणीवपूर्वक आणि हेतुपूर्वक पसरवली जातात, हे सर्वसामान्यांनी समजून घेतले पाहिजे.
पंतप्रधानांच्या नावे आक्षेपार्ह ‘पोस्ट’ टाकणारे सापडत असतील, तर वैज्ञानिक माहितीशी खेळ करणारे असे ‘पोस्ट’कर्तेकसे काय सापडत नाहीत? जाणीवपूर्वक असं घडवून आणलं तर जात नाही ना? आज बहुतांश क्षेत्रामध्ये अपयश पदरी पडत आहे. विकासाच्या वल्गना ज्या तडफेने केल्या आणि काही निर्णय अक्षरश: जनसामान्यांच्यावर लादण्यात आलेले होते, त्याचे दुष्परिणाम आज दिसत आहेत. नोटाबंदी, रोजगार बंदी, आर्थिक मंदी, विकासदर अशा क्षेत्रांवर चर्चा होण्यापेक्षा तीन लाख चौर्याऐंशी हजार किलोमीटर अंतरावर असणार्या चंद्राच्या संशोधनाचं सर्वसामान्यांना का अप्रुप वाटावं, असा मला नेहमी प्रश्न पडतो. अंतराळ किंवा वैज्ञानिक क्षेत्रातील एक यश अथवा अपयश एवढ्यापुरतंच याच महत्त्व राहिलं असतं; पण ‘चांद्रमोहिमे’च्या लँडिंगंच ब्रँडिंग करायला पंतप्रधान गेले ते उगीच नाही.
दि. 17 ऑक्टोबर 2019 रोजी चंद्राशी संबंधित एक उत्सव ‘करवा चौथ’ या नावाने साजरा होत आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नीनेे करावयाचा उपवास म्हणून या उत्सवाचा उल्लेख केला जातो. या उपवासाची सुरुवात सूर्योदयाला होते आणि सायंकाळी चंद्र उगवला की उपवास सुटतो. पंजाब, हरियाना, राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये याचे प्रस्थ फार आहे. लग्नानंतर बारा वर्षे किंवा सोळा वर्षे महिला हा उपवास चालू ठेवू शकतात. त्यानंतर सुरू ठेवणे हे महिलांवर अवलंबून आहे. कार्तिक कृष्ण चतुर्थीला हा उत्सव होतो. दि. 17 ऑक्टोबर 2019 रोजी ‘करवा चौथ’ उत्सवाची सुरुवात सायंकाळी 6.48 ला होत आहे, तर समाप्ती सायंकाळी 7.28 ला. वेळ 7.28 सांगणार्याचं घड्याळ तपासण्याची गरज आहे. कोणतीही वैज्ञानिक साधनं न वापरता एवढी तंतोतंत वेळ काढणार्यांच्या बुध्दिमत्तेची कीव करावीशी वाटते आणि मुख्य म्हणजे पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून पत्नीने उपवास करावा; पतीची काहीच जबाबदारी नाही का, असा प्रश्न हा उत्सव साजरा करणार्या महिलांच्या मनात येत नाही का? आणि चाळणीतून चंद्र पाहिला काय किंवा डायरेक्ट पाहिला काय, असं कोणतं अरिष्ट येणार आहे? ज्या चंद्राशी हा उत्सव संबंधित आहे त्याचा जरा आढावा घेतला, तर बरं होईल.
‘चांद्रमोहीम 2’ च्या प्रक्षेपणापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे चेअरमन के. सिवन यांनी चांद्रयानाची प्रतिकृती तिरुपती बालाजीला अर्पण केली होती. हा खरं तर संशोधकांचा अपमानच समजायला पाहिजे. वैज्ञानिक द़ृष्टिकोन नसल्याची ही पावती आहे. महान वैज्ञानिक असणं आणि वैज्ञानिक द़ृष्टिकोन बाळगणं, या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. तिरुपतीला जाऊनसुध्दा 15 जुलै 2019 रोजी होणारे ‘चांद्रयाना’चे उड्डाण शेवटच्या क्षणी इंधनाच्या टाक्यातील दोषांमुळे पुढे ढकलण्यात आले. दि. 22 जुलै 2019 रोजी ते उड्डाण झाले. तिरुपतीला गेल्यामुळे ‘चांद्रयान’ मोहिमेचे काहीही बिघडत नाही; परंतु सर्वसामान्यांचा द़ृढ विश्वास विज्ञानावर बसण्याऐवजी बालाजीवर बसतो. एवढे मोठे वैज्ञानिक चंद्रावर जाण्यासाठीसुध्दा देवाची आराधना करतात तिथं आपलं काय? असं म्हणून समाज तिरुपतीपुढे नतमस्तक व्हायला पैसे देऊन रांगा लावतो. वैज्ञानिकांनी दैववादाची चलती होणारी ठिकाणं वाढवण्यापेक्षा वैज्ञानिक ठिकाणांचं महत्त्व वाढवायला पाहिजे, हे मात्र नक्की.
व्रतवैकल्यांची भारतीय समाजामध्ये तुफान आवक झालेली आहे. चंद्राशी निगडित संकष्टीचं एक फार मोठं फॅड भारतीय समाजामध्ये आलेलं आहे. जागतिकीकरणाने जी एक अनिश्चितता निर्माण केलेली आहे, त्याचं संकष्टी हे एक अपत्य आहे असं म्हटलं, तर वावगं ठरू नये. 1990 पर्यंत या संकष्टीनं समाजाला घेरलेलं नव्हतं. संकष्टीच्या दिवशी तर चंद्राची गरज भासतेच. कारण तो उगवला नाही, तर संकष्टीचा उपवास सोडताच येत नाही. चंद्र उगवण्याची रात्री 9.58 अशी अत्यंत अचूक वेेळ देणारे ‘पंचांग’कार अजबच रसायन म्हणावं लागेल. कारण टेलिस्कोप किंवा कोणतेही वैज्ञानिक उपकरण न वापरता एवढ्या प्रचंड अंतरावरची वस्तू यांना बरोबर उगवताना कशी दिसत असेल, हा मुख्य प्रश्न आहे.
आज एकविसाव्या शतकामध्ये या रुढीचं प्राबल्य वाढलेलं असेल, तर तो शिक्षण व्यवस्थेचा दोष म्हणावा लागेल. कारण चंद्राच्या उगवण्याचा आणि आपल्या जेवणाचा काय संबंध? इतर वेळी चंद्र उगवत नाही का? चंद्र रात्री बारा वाजता उगवत असता, तर आपण जेवायचं थांबलो असतो का? अहो, आपल्या सूर्यमालेतील सर्वांत मोठ्या गुरू ग्रहाला जवळपास चौसष्ट उपग्रह आहेत. याचा अर्थ गुरूला चौसष्ट चंद्र आहेत. आपल्या पृथ्वीला एकच चंद्र आहे म्हणून संकष्टी महिन्यातून एकदा येते. आपण जर गुरू ग्रहावर असतो, तर संकष्ट्या किती आल्या असत्या विचार करा. चौसष्ट! महिन्यातून चौसष्ट संकष्ट्या कराव्या लागल्या असत्या. याचा अर्थ दिवसाला दोन संकष्ट्या पडल्या असत्या. एक संकष्टी सोडेपर्यंत दुसरी लागली असती. केली असती का? हा मुख्य प्रश्न आहे. आपण काय करत असतो, याचं भानच आपण ठेवत नाही. चंद्रावर जाण्याची स्वप्नं पाहण्यापेक्षा, उपवास सोडण्यासाठी त्याचा वापर करावा यासारखं दुर्दैव नाही. चंद्राला ओवाळत बसण्यापेक्षा चंद्रावर गेलेल्या चांद्रवीरांचा लेखाजोखा पाहूया आणि आपल्या मुलांना अंतराळात झेप घेण्यासाठी प्रवृत्त करूया. ‘गणेश चतुर्थी दिवशी चंद्राकडे पाहू नये. कारण चोरीचा आळ येतो,’ अशी सांस्कृतिक वचनं ज्या समाजामध्ये ठाण मांडून बसलेली आहेत, त्यांना अंधश्रध्देच्या गर्तेतून बाहेर काढण्यात ही मोहीम मदतगार ठरो, हीच अपेक्षा.
‘पीएसएलव्ही सी 11’ या प्रक्षेपक यानाच्या साहाय्याने ऑक्टोबर 2008 मध्ये इस्रोने ‘चांद्रमोहीम-1’ राबवलेली होती. ‘मून इम्पॅक्ट प्रोब’ हा विविध अकरा उपकरणं असलेला बॉक्स दि. 14 नोव्हेंबर 2008 रोजी म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी चंद्रावर यशस्वीपणे उतरवण्यात आला. या बॉक्सच्या चारही बाजूला भारताचा तिरंगा ध्वज रंगवलेला होता. त्यावेळी चंद्रावर यान पाठवणारा जपान, चीननंतरचा भारत तिसरा आशियाई देश ठरलेला होता. या मोहिमेने इस्रोच्या आणि पर्यायाने भारतीयांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा तर रोवलाच; पण भविष्यातील ‘चांद्रयान-2’ मोहिमेचा पाया घातला गेला. तत्कालीन नेतृत्वाने या मोहिमेचा ना गाजावाजा केला, ना मिठी मारली, ना आनंदाश्रू ढाळले, ना मीडियाने प्रचार केला, ना चर्चासत्रं भरवली, ना रात्र जागवली. वैज्ञानिकांना त्यांचं काम करू द्यावं, आपण आपलं काम करावं, यातच व्यापक हित सामावलेलं आहे.