Categories
संपादकीय

संत कोणाला म्हणावे?

जून – २०११

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ- महाराष्ट्रातील ही संत परंपरा सर्वमान्य आहे. या संता पाठोपाठ अलिकडच्या काळात, संत विनोबा, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज ह्यांचे संतपदाबाबतही कुणाचेही दुमत नाही. बाबा आमटे यांना संत पदवी नाही; पण हे खरे संतच होत हेही सर्वांना मान्य आहे.

अलीकडच्या काळात संतांचा दुसरा प्रकार उदयास आला आहे. जसे संत सत्यसाईबाबा, संत ..बापू, संत ..दीदी, संत.. महाराज, संत मुक्तानंद, संत प्रणावानंद इत्यादी इ. संताचा हा दुसरा प्रकार सर्वमान्य नाही. या तथाकथित काही लोकांना (म्हणजे त्यांना भक्तांना) ते संत वाटतात पण जे त्यांचे भक्त नाहीत त्यांना  महाराज, बापू, दीदी यांच्या संतत्वाबाद्दल शंका येते.

खरे संत कोण? त्यांची लक्षणे कोणती? कोण संत व कोण बुवा? संत कोणाला म्हणावे? या प्रश्नाच्या अंगाने अलीकडेच प्रसारमाध्यमात मोठी वैचारिक घुसळण झाली. लोकसत्ता या दैनिकात सलग महिनाभर या विषयावर तीन विचारवंताचे लेख प्रसिद्ध झाले. डॉ. दाभोलकर यांचा सत्यसाईबाबावरचा लेख, विद्या बाळ यांचा लेख व ऐसे गुरु अडक्याचे तीन हे संपादकीय यांचा खास उल्लेख करावा लागेल. वरील तीनही लेख काळजीपूर्वक अभ्यासले तर खर्‍या संतत्वाची लक्षणे आपणास स्पष्ट होतील. साररुपाने ही लक्षणे आपण तपासून स्विकारणे उचित ठरेल.

गाडगेबाबा किंवा विनोबाजी यांची राहणी कशी होती? गाडगेबाबा गावाच्या बाहेर उघड्यावर झोपत, खापरात पाणी पीत ते कुणालाही पाया पडू देत नसत, ते पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिरात न जाता वाळवंट स्वच्छ करीत. विनोबा उघड्या अंगाने केवळ पंचा नेसून भारतभर भूदान मागत हिंडले. पण अलीकडचे संत पहा. त्याना मुक्कामाला फाईव्ह स्टार हॉटेल लागते. त्यांचे आश्रम म्हणजे राजवाडे असतात. त्यांचे  महाल पूर्ण बंदिस्त असतात. बसायला सिंहासनासारखी खुर्ची लागते, त्यांना झेड सुरक्षाही लागते. यांची मालमत्ता कोटींच्या घरात असते.

ज्ञानेश्वर, तुकारामांचे अनुयायी पंढरपूरचे वारकरी, बहुजन गरीब असतात. ते विठ्ठलाला किंवा संताना काहीही मागत नाहीत. पण अलीकडच्या तथाकथीत संताचे अनुयायी लखपती, करोडपती, उद्योगपती, राजकारणी, परदेशी श्रीमंत नटनट्या व खेळाडू अशी धेंडे असतात. ह्यातील बहुतेकजण मनाने  अस्थिर व यशासाठी  हपापलेली आणि अपयशाला भिणारी अशी मंडळी असतात. त्याना मी तुमच्या पाठीशी आहे असे अभय देण्याचे काम हे महाराज करत असतील तर त्यांना संत म्हणावे का? तिरुपती बालाजीच्या पेटीत कोणत्याही मार्गाने मिळालेले धन गुपचूप टाकले की, मंडळींना बरे वाटते. तसाच हा साधनसूचितेचा विचार बाजूला ठेवून शरण आलेल्यांना अभय देण्याचा प्रकार होय. खरे संत निती-धर्माच्या बाजूने उभे असतात. महाराज, बुवा, बापू हे अपराधी भावना कॅश करण्याची चलाखी करतात. मग चलाखीतून मिळालेली दक्षिणा जी कोट्यावधी रुपयांची असते, त्यातील काही हिस्सा दान धर्मासाठी वापरला जातो. हे संतत्वाचे लक्षण नव्हे.

मी तुम्हाला अभय देतो, कारण मी देवाचा माणूस आहे. हे सिद्ध करण्यासाठी मग चमत्कार सादर केले जातात. हे चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान तथाकथित संताकडून स्विकारले जात नाही याचा अर्थ काय? चमत्कारातून देवत्वाकडे व देवत्वाकडून व्यवहाराकडे असा हा सरळ सरळ चलाखीचा मामला आहे. बाबा आमटे यांनी कृष्ठरोग्यांना नवजीवन दिले, वारकरी संताच्या भागवत धर्माने अस्पृश्यतेविरोधात जनजागरण केले. साने गुरुजींनी विठ्ठल मंदिर अस्पृश्यासाठी खुले करण्यासाठी उपोषण केले. दया हाच धर्म, सत्य व अहिंसा हाच देव, रंजल्या गांजल्यामध्ये देव आहे असा नितीधर्माचा पुकारा केला. उलट आजचे संत काय करीत आहेत? ते धर्म बुडाला म्हणून परधर्मियांची निंदा व हिंसेला उत्तेजन देत आहेत. मध्यंतरी आज तक या वृत्तवाहिनीने एका बापूने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे नाटक केलेल्या एका पत्रकार बाईला अभय देण्याचे मान्य केले. चंबळचे दरोडेखोर मला शरण येऊन आश्रमात वावरतात असे त्याने सांगितले. आता तर काही स्वयंघोषित संत रक्तमय क्रांतीचीही भाषा बोलू लागलेत.

एकनाथांनी काशीची गंगा तहानलेल्या गाढवाला पाजली. उलट आजचे संत गंगाकाठी मंदिर, मस्जिद वादात भर टाकण्याचे आवाहन करीत आहेत. संतत्वाच्या नावाखाली समाजाला हिंसेकडे व अनितीकडे नेणारी ही मंडळी ‘ऐसे गुरु अडक्याचे तीन’ या लायकीचीच आहेत. दै.लोकसत्ताच्या संपादकीयामधील निष्कर्ष अगदी बरोबर आहे. तुकाराम अशा संताबद्दल म्हणतात, ‘ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुनी म्हणती साधू’

मोठी माणसे खरी कमजोर असतात. मोठ्या पराक्रमासाठी, लालसेसाठी ती हपापलेली असतात. पराभव खुल्या दिलाने स्विकारण्याची त्यांची हिम्मत नसते.  अशांना अभय देऊन खर्‍या नितीधर्माला अव्हेरणारे बुवा, बापू, महाराज हे खरे संत नव्हेत. ‘जे का रंजले गांजले, त्याशी म्हणजे जो आपुले। तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा॥’ अशा संतांना आमचा प्रणाम; भोंदूंना आमचा नकार!