Categories
ज्योतिष संतविचार

संत म्हणतात, भविष्य एक थोतांड

मे - २०१९

विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. आकाशातील ग्रह आणि तारे ही ग्रहमाला आहे. त्याचा भविष्याशी काहीही संबंध नसल्याचे विज्ञानाने स्पष्ट केले आहे, तरीही आजही त्याच ग्रहांच्या आधारांवर भविष्यं सांगितली जात आहेत. रवी, अर्थात सूर्य नावाचा ग्रह असल्याचे सांगून त्याच्या आधारे भविष्य सांगितले जाते. मात्र सूर्य हा ग्रह नसून तो तारा हा आहे, हे आता स्पष्ट झालेले आहे. तरीही लोक या भविष्यांच्या थोतांडाच्या आहारी मोठ्या प्रमाणात जाताना दिसत आहेत. विज्ञानाने मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान आपल्याला हातात दिले आहे. त्यामुळे संपूर्ण जग आपल्या हातात आलेले आहे. याच तंत्रज्ञानाचा आधार घेऊन भविष्य सांगण्याच्या जाहिराती केल्या जात आहेत. संगणकाच्या आधारावर जन्मपत्रिका बनविल्या जात आहेत, हा आणखी मोठा विनोद आहे. लोकांच्या सुशिक्षित होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र त्यांचे शहाणे होण्याचे, ज्ञानी होण्याचे, विवेकी होण्याचे प्रमाण वाढण्याची गरज आहे; मात्र आज विज्ञानाने दिलेल्या आधुनिक साधनांच्या माध्यमातूनच भोंदूगिरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. दूरचित्रवाहिन्यांवर बिनदिक्कतपणे भविष्याच्या जाहिराती केल्या जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी या जाहिरातींचा सुळसुळाट आहे. त्याला भुलून केवळ अडाणीच नव्हे, तर स्वत:ला सुशिक्षित म्हणवून घेणारे ‘अडाणी’ही मोठ्या प्रमाणात बळी पडताना दिसतात.

खोट्या गोष्टी सांगून समाजाचे शोषण करणार्‍या काही प्रवृत्ती या बिनदिक्कतपणे भविष्य एक शास्त्र असल्याचे सांगतात. ज्या शास्त्राचा आधार ग्रह आहेत आणि ज्याचा उल्लेख ग्रह म्हणून केला जातो तो सूर्य तारा आहे, हे माहीत असूनही ते समाजाची दिशाभूल करतात. कदाचित त्यांनाही हे थोतांड आहे, हे माहीत असावे; परंतु समाजाचे शोषण करण्यासाठी ते जाणीवपूर्वक तसा प्रचार करत असावेत. विज्ञानाच्या प्रगतीनंतर खरे तर याबाबत लोकजागृती होऊन अशा भोंदू लोकांचा पर्दाफाश होण्याची गरज आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यासाठी मोठ्या प्रमाणात जागृतीचे काम हाती घेतले आहे. त्याला व्यापक स्वरूप येण्याची गरज आहे. संतवचनांच्या आधारे याबाबत लोकजागृती केली, तर त्याचे परिणाम अधिक चांगल्या तर्‍हेने दिसू शकतात. देवा-धर्माच्या आणि तथाकथित शास्त्रांच्या आधारे काही थोतांड मांडले असेल, तर त्याचा प्रतिवाद संतवचनाच्या आधारे करण्याची गरज आहे. वारकरी संतांनी याबाबत अत्यंत स्पष्ट शब्दांमध्ये त्यातील बोगसपणा उघडा पाडला आहे. तुकाराम महाराज तर स्पष्ट शब्दांत सांगतात…

सांगो जाणती शकून । भूत भविष्य वर्तमान॥

त्यांचा आम्हासी कंटाळा। पाहो नावडती डोळा॥

आपण भविष्य सांगण्याचे जाणतो असे म्हणणारे जे आहेत, ते केवळ दांभिक आहेत. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळातील सर्व ज्ञान आपल्याला आहे, असे सांगणारे. मंत्रा-तंत्रांच्या आधाराने तुमच्यावर येणारे अरिष्ट दूर करतो, असे सांगणारे ढोंगी आहेत. त्यामुळेच अशा लोकांचा आपल्याला कंटाळा आहे. इतकेच नव्हे, तर असे लोक आपल्याला डोळ्यांनी पाहणेसुद्धा आवडत नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात.

रिद्धिसिद्धींचे साधक । वाचासिद्धी होती एक।

काहीजण आम्हाला रिद्धिसिद्धी नावाची शक्ती प्राप्त आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण अशक्य ते शक्य करतो, असे भासवितात; तर काहीजण आपल्याला वाचासिद्धी प्राप्त असल्याचे सांगतात. वाचासिद्धी म्हणजे जे आपण बोलतो ते खरे होते, असा दावा करतात. मात्र ते सर्व थोतांड आहे. उलट असे सांगून समाजाची फसवणूक करणारे जे लोक आहेत, ते अशा वाईट कर्मामुळे अधोगतीला जातात. त्यांनी अगोदर काही चांगली कामे केली असतील, तर त्यांचाही क्षय होतो, असे तुकाराम महाराज सांगतात. अन्य एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, आपण मात्र असल्या भंपक गोष्टी कधी करीत नाही. आपल्याला कोणती वेताळासारखी शक्ती प्रसन्न झालेली आहे, असे सांगत नाही किंवा मी देवार्चनाचे दुकान मांडलेले नाही, हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात की…

नाही वेताळ प्रसन्न। काही सांगो खाणखूण॥

नाही देवार्चन। असे मांडले दुकान॥

भविष्य, शुभ, अशुभ असल्या कल्पनांतून समाजाचे होणारे शोषण रोखण्यासाठी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होण्याची गरज आहे. संतवचनांचा आधार घेऊन केल्यास त्याचे परिणाम नक्कीच सकारात्मक पाहायला मिळतील.