मी अविवेकाचि काजळी । फेडोनि विवेक दीप उजळी ।
ते योगिया पाहे दिवाळी । निरंतर ॥
देशात मंदीच्या झळा सामान्य नागरिकांना जाणावू लागल्या आहेत. राज्यात काही भागात या वर्षी आलेल्या महापुराने ही दाहकता अधिकच अधोरेखित होत आहे. अर्थात महापुराचे संकटही नैसर्गिक होते की अविवेकी वागण्याचा तो परिणाम होता, यावरही आता चर्चा सुरू आहे आणि त्यात तथ्यही दिसून येत आहे. जी नदीपात्रं मोकळी होती, ती बुजवून अनेक ठिकाणी इमारती उभ्या राहिल्या. आपण आपली मर्यादा सोडून नदीच्या क्षेत्रात गेलो, म्हणून ती आपल्या क्षेत्रात आली. तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी ज्या तर्हेने विवेकी निर्णय घेण्याची गरज होती ते घेतले गेले नाहीत. या सर्व अविवेकीपणाचा परिणाम निसर्गाने पुराच्या रूपाने आम्हाला दाखविला.
महापूर हा निसर्गाशी अविवेकी वागण्यामुळे आला, तर मंदी ही आर्थिक अविवेकी निर्णयामुळे आली आहे. अशाही परिस्थितीत आपण या महिन्यात दसरा-दिवाळी सण साजरे करणार आहोत. मागच्या महिन्यात एक मोठा सण आणि एक पंधरा दिवसांची परंपरा पार पडली. त्या सणाला आलेले अविवेकी रूप हेही पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर र्हास करताना दिसत आहे. तो सण म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सवात बसविल्या जाणार्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अवाढव्य गणेशमूर्ती आणि त्यांचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याचा अविवेकी आग्रह यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा र्हास होत आहे. पाण्याचे प्रदूषण वाढत आहे. अर्थात अशा अविवेकी परंपरांना विसर्जित मूर्ती दान करण्याचा विवेकी पर्याय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिला आणि त्याचे परिणाम आता चांगले दिसू लागले आहेत. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी आता कृत्रिम तलाव करून द्यायला सुरुवात केली आहे, तर सरकारनेही आता कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन करायला सुरुवात केली आहे. हा विवेकी विचारांचा विजय म्हणावे लागेल.
पितृपक्षाची पंधरा दिवसांची परंपराही पार पडली. आपल्या पूर्वजांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कदाचित पूर्वी ही प्रथा सुरू केलेली असू शकते. आता मात्र तो एक उपचार ठरत आहे. जिवंतपणी ज्या लोकांनी आपल्या आई-वडिलांची उतारवयात योग्य काळजी घेतली नाही, तेच उत्तरकार्य, वर्षश्राद्ध आणि पित्र थाटात घालताना दिसतात. त्यांचा या ढोंगीपणावर संतांनी अत्यंत कणखर शब्दांत कोरडे ओढले आहेत.
अशा लोकांचे ढोंग उघडे पाडताना संत तुकाराम महाराज म्हणतात-
भुकेल्या नाही अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥
हे तो चाळवाचाळवी! केले आपणचि जेवी ॥
नैवेद्याचा आल । वेंचे ढाकणीं सकल ॥
तुका म्हणे जड । मज राखावे दगड ॥
जिवंतपणी भुकेल्या आई-वडिलांना ज्यांनी अन्न दिले नाही त्यांनी केलेले पिंडदान हे केवळ चाळवाचाळवी आहे. यावेळी नैवेद्य म्हणून जे पदार्थ करतो तो आपण स्वतःच खातो, असा टोला लावायलाही तुकाराम महाराज मागे-पुढे पाहत नाहीत.
संत कबीर यांनीही अशा ढोंगावर आसूड ओढले आहेत.
जिंदा बाप को रोटी न खिलावे । मरे बाद पछताये ।
मूठभर चावल धरके । कौवा बाप बुलाये ॥
तसेच महाराष्ट्रातील संत एकनाथ महाराज यांनीही या श्रध्दांवर कोरडे ओढले आहेत. संत एकनाथ महाराज यांनी तर थेट आपल्या काळात श्राद्धाच्या वेळेला त्यावेळी अस्पृश्य समजल्या जाणार्या समाजघटकातील लोकांना बोलावून जेऊ घातल्याचा उल्लेख आढळतो. खरे श्राद्धामध्ये उच्चवर्णीयांना दान देण्याची परंपरा आहे. त्यामुळे त्यावेळचे उच्चवर्णीय संतापले; पण एकनाथ महाराज यांनी त्यांची फिकीर केली नाही. ते एकनाथ महाराज श्राद्धाबद्दल अत्यंत कणखर शब्दांत लिहितात-
जिता मायबापा न घालिती अन्न।मेल्या प्रेतावरी करिती पिंडदान ॥
पहा पहा संसारीचा कैसा आचारु। जिता अबोला मा मेल्या उच्चारू ॥
जित्या मायबापा न करिती नमन । मेल्यामागे करिती मस्तक वपन ॥
जित्या मायबापा धड्गोड नाही । श्राद्धी तळण मळणपरवडी पाही ॥
जित्या मायबापा गाली प्रदान । मेल्या त्याचेनी नावे देती गोदान ॥
जित्या मायबापा नेती प्यायला पाणी। मेल्या पितरालागी बैसती तर्पणी ॥
एका जनार्दनी कृपेचे तान्हे । विधी निषेध दोन्ही आतळो नेती माने ॥
सर्वच संतांनी अशा कालबाह्य प्रथांवर कोरडे ओढलेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण संत विवेकी विचारांचा दीप पेटविणारे होते. संतविचार जिथे येतो, तिथे विवेकाचा उजेड आपोआप येतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात-
साधू संत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ॥ किंवा
दिवाळी दसरा तोचि आम्हा सण । सखे संतजन भेटतील ॥
म्हणून एकदम कालबाह्य पंरपरा झुगारून देता नाही आली तरी त्याला कालसुसंगत पर्याय दिले पाहिजेत. या परंपरांच्या आडून केला जाणारा सणा-उत्सवांचा बाजार मांडणार्यांच्या विरोधात जागर केला पाहिजे. गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्र उत्सवाचाही गरबा नृत्याच्या नावाने बाजार मांडला जात आहे. त्यात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. हा बाजार सुरू झाला तेव्हा तर तो गोंगाट रात्रभर सुरू होता. त्याला न्यायालयाने दहा वाजेपर्यंतची मर्यादा घालून दिल्याने काही प्रमाणात आळा बसला आहे, हे बरे झाले.
दसर्यानंतर येणार्या दिवाळीत वाजविले जाणारे फटाके ही अविवेकीच बाब आहे. त्याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या विवेकी जनजागृतीचे परिणाम आता दिसू लागले आहेत. हाच खरा संतविचार आहे; किंबहुना अविवेकाची काजळी फेडून विवेकाचा दीप लावणे हेच आपले कार्य आहे. हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-
मी अविवेकाची काजळी । फेडोनि विवेक दीप उजळी ।
ते योगिया पाहे दिवाळी । निरंतर ॥