Categories
आठवणीतले दाभोलकर

सर! आम्ही चालवू हा पुढे वारसा!

वार्षिकांक – २०१३

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना बहुतांश कार्यकर्ते डॉक्टर म्हणून संबोधतात. मी त्यांना सर म्हणते. अत्यंत आदर्श, प्रेरणादायी, व्यापक भान असलेले मार्गदर्शक होते ते. साधे कसे रहावे. सांगत पण अत्यंत ठाम मत असे मांडावे. स्वत:चे जगणे सभोवतालच्या न्याय्य विषयांशी कसे जोडावे, शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त कसे राहावे ज्ञान आणि मनोबल कसे वाढवावे, दृष्टिकोन कसा विकसित करावा. आपल्या ध्येयासाठी समर्पित जीवन कसे जगावे अशा अनेकविध बाबींपासून ते वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवाद, मानवतावाद स्वत:च्या कृतीतून, शब्दांतून, विचारांतून सतत शिकविणारे ते एक समाजशिक्षक होते. खूप काही अफाट, अलौकिक असे देण्याची त्यांची क्षमता होती. त्यांच्याकडून सतत नवीन गोष्ट, दृष्टिकोन शिकायला मिळे. त्यांच्यासोबत काम करताना खूप आनंद वाटे व शिकायलाही मिळे. अजून खूप काही त्यांच्याकडून शिकायचे होते. पण तशी संधी आता राहिली नाही. कोणा अत्यंत क्रूर व हीन प्रवृत्तीने कायमची ही संधी नाहिशी केली. मला नेहमीच सर कार्यकर्त्याला मानसिक बळ देणारे, आश्वस्त करणारे, धडपडायला लावणारे, स्वत:मधील विश्वास वाढविणारे, कार्यकर्त्याला पुढे नेणारे व त्यांच्याबरोबर राहणारे दिसले. सरांसोबत काम करीत असतानाच्या अनेक आठवणी आहेत. पुढील काळात त्यांच्या आठवणींसह, त्यांचे विचार व कार्य प्रेरक राहणार आहेत.

सरांना मी पहिल्यांदा 1994 मध्ये प्रत्यक्ष पाहिले ते लातूरला एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमांना आवर्जून हजर राहिले. त्यांच्या व्याख्यानांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. त्यांची व्याख्यान देण्याची कला, शब्दांचा योग्य व चपखल वापर, दृष्टिकोन देण्याची पद्धत, मुद्देसूद मांडणी, विषयाचे आकलन व ज्ञान आणि दिलेल्या वेळेत करावयाची प्रभावी मांडणी याची मी अक्षरश: फॅनच झाले. सरांची व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची अजून जवळून ओळख मला माधव बावगे यांच्याकडून झाली. पुढे मी रीतसर मअंनिसची अधिकृत क्रियाशील सदस्य झाले. आणि प्रत्यक्ष काम करावयास सुरूवात केली. त्यानंतर सरांचा अनेकवेळा सहवास मिळाला आणि प्रत्येक वेळी नवीन ऐकायला व शिकायला मिळाले.

वसंतराव नाईक महाविद्यालयात लहूजी साळवे विचारमंचाच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलनावर कार्यक्रम होता. मातंग समाजामध्ये पाठीत गळ घालण्याची अंधश्रद्धा आहे ती कमी/नाहीशी करण्यासाठी हा प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला होता. यासाठी सरांसोबत मीही होते या कार्यक्रमात महिला आणि अंधश्रद्धा या विषयावर माझे व्याख्यान झाले. सरांचे अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर व्याख्यान झाले. इतर मान्यवरांच्या व्याख्यानानंतर कार्यक्रम संपला. कार्यालयात बसल्यावर सर मला म्हणाले, “तुझे भाषण चांगले झाले, तुझी सादरीकरणाची पद्धत चांगली आहे, तुझ्याकडे विचारांची पकडही आहे. पण एक गोष्ट दुरूस्त केली पाहिजे ती म्हणजे बोलण्याची गती, तू खूप गतीने बोलतेस. मीही सुरवातीला असेच बोलत होतो. यात आपले भाषण खूप छान झाले असे वाटते पण पुढच्याला पहिले वाक्य समजायच्या आत त्याच्या कानावर दुसरे वाक्य आदळते व यामुळे योग्य व आवश्यक परिणाम साधला जात नाही. त्यामुळे मी जाणीवपूर्वक माझी व्याख्यानाची पद्धत विकसित केली, तुही हे लक्षात ठेव आणि गतीबाबत तेवढा बदल कर, थोडीशी सावकाश बोल. सरांनी कौतुक केल्याचा मला आनंद तर झालाच पण त्यांच्या सूचनेकडे मी गांभीर्याने लक्ष दिले, प्रयत्न केला. पुढे सोलापूरला पुन्हा आम्ही एका कार्यक्रमाला एकत्र होतो. माझ्या भाषणानंतर सर म्हणाले, “सविता सूचनेची अंमलबजावणी दिसली. चांगली प्रगती आहे.” तशी अजून खूप प्रयत्न आणि सरावाची आवश्यकता आहे. मात्र या प्रसंगातून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आपल्या सहकार्‍याचा उत्साह वाढविणे, कमतरता ही कमतरता वाटणार नाही. अशा पद्धतीने सांगणे, मनोबल वाढविणे, आणि मी तुमच्यासारखाच व तुमच्या बरोबरच आहे. कुणी वेगळा वा विशेष नाही, असा कार्यकर्त्यामध्ये विश्वास निर्माण करण्याची त्यांची कला खूप भावली.

म.अं.नि.स.ने 2004 मध्ये लातूर येथे राज्यव्यापी अंधश्रद्धा निर्मूलन महिला परिषद जाहीरनामा परिषद घेतली होती. तेव्हा मी महिला सहभाग विभागाची राज्य सहसचिव होते. त्यामुळे पूर्वतयारीच्या कामात सरांसोबत असण्याची संधी मिळाली. त्या परिषदेत येणार्‍या पाहुण्यांचा परिचय स्वत: सरांनी सांगितला व मी लिहिला. त्यानंतर जेव्हा मी दोन दिवस येणार्‍या सर्व पाहुण्यांचे परिचय वाचले, तेव्हा हे लक्षात आले की, सरांनी किती अचूक आणि योग्य शब्द वापरले आहेत. किती समर्पक विशेषणे दिली आहेत. पूर्ण ओळख मात्र मोजक्या शब्दात करण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगेच आहे. स्वत:ची अशी, मात्र वास्तव ओळख ऐकताना त्या पाहुण्यांनाही अभिमान वाटावा, ही सरांची कला. एवढा मोठा कार्यक्रम पण सर्व जबाबदार्‍या कार्यकर्त्यांना दिल्या. प्रास्ताविक करण्याचे काम मला सांगितले. फक्त विचारमंचावर कमीत कमी राहून कार्यकर्त्यांच्या मागे राहून त्यांच्याकडून काम करून घेतले आणि अत्यंत यशस्वी पद्धतीने ही परिषद घेतली. कार्यकर्त्यांना नेतृत्व दिले. पुढाकार घेण्याची संधी दिली. कार्यकर्त्यांमध्ये परिषदेनंतर ही चर्चा पण झाली की, सर विचारमंचावर जास्त दिसलेच नाहीत. अशा रितीने सरांनी कार्यकर्त्यांमधील गुण-कौशल्य ओळखून त्यांना घडविले.

सरांची शेवटची भेट झाली ती 8 ऑगस्ट 2013 रोजी नाशिकला, जातपंचायतीला मूठमाती अभियानाच्या कार्यक्रम प्रसंगी. तेव्हा मी पाहिले तिथे जमलेल्या विविध कार्यकर्त्यांशी सर या विषयावर अत्यंत तळमळीने बोलत होते. जोशी समाजातील आंतरजातीय विवाह केलेल्या प्रमिला एकनाथ कुंभारकर या 23 वर्षांच्या गरोदर तरूणीचा बापाने गळा दाबून जीव घेतला. त्या पार्श्वभूमीवर ही जातपंचायत मूठमाती परिषद होती. जेव्हा प्रमिलाची आई व आजी तिथे सरांना भेटल्या तेव्हा उत्तम कांबळेसह सर त्यांना पुढील कृतीबाबत अत्यंत पोटतिडकीने सूचना देत होते. मुलाला वसतिगृहात ठेऊन शिक्षणाची व्यवस्था कशी करता येईल. आईची जगण्याची व्यवस्था कशी करता येईल. या सूचना देत होते.

सरांच्या अत्यंदर्शनाला येण्यासाठी सातार्‍याला रात्री 12 वाजता पोचले. सरांना ज्या स्थितीत बघण्याची वेळ आली ते रूप मान्यच नाही. जिवंत, सौम्य पण ठाम, निगर्वी, निर्भीड, सामान्याप्रती, शोषितांप्रती अत्यंत कणव, अलौकिक प्रतिभेचा, अचाट उपक्रमशीलतेचा खळखळता झरा मरूच शकत नाही. पण हा झरा शरीर रूपाने आटला हे वास्तव आहे. या झर्‍यातील चैतन्यरूपी विचारांचे काय? ते विचार खळाळतच राहतील. आम्ही हा विचारांचा झरा आटू देणार नाही.

प्राचार्या सविता शेटे