Categories
अभिवादन

साथी गिरीशभाई शाह : मूर्तिमंत प्रेरणा आणि बांधिलकी!

ऑक्टोबर - २०१९

अंनिसचे काम तळमळीने करणारे, निर्गवी, सहृदय, दानशूर, कार्यतत्पर, विनम्र, इतर समविचारीनाही मदत करणारे, प्रसिद्धीपासून दूर रहाणारे, पर्यावरणवादी अशी स्वभाव वैशिष्ट्ये असणारे मुंबई जिल्हा अंनिसचे अध्यक्ष आदरणीय गिरीशभाई शहा यांचे दि. 25 सप्टेंबर 2019 रोजी मुंबई येथे निधन झाले.

गिरीशभाई ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असतानाही ते सांगलीकोल्हापूर येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत पाठवायचे नियोजन करत होते. तिथे डॉक्टर व स्टाफला अंनिसचे विचार समजून सांगत अंनिसची पुस्तकेही त्यांनी दिली होती.

त्यांच्या निधनाने मुंबई जिल्ह्याने व अंनिसने एक खंबीर आधार गमावला आहे. महाराष्ट्र अंनिसचे सर्व कार्यकर्ते गिरीशभाईंच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहेत.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

महाराष्ट्र अंनिसचे मुंबई जिल्हाध्यक्ष असलेले गिरीशभाई शाह यांच्या निधनाचे वृत्त खूपच दु:खद आहे. चळवळीप्रती अत्यंतिक तळमळ आणि बांधिलकी असलेला असा एकही शिलेदार निघून जाणे, ही संघटनेची खूप मोठी हानी असते.

माझी आणि गिरीशभाईंची पहिली भेट वाई येथील राज्यकार्यकारिणीत पहिल्यांदा झाली. माझे आडनाव शाह आहे आणि मी गुजराती भाषिक आहे, याचे त्यांना जास्त अप्रूप होते. तेथील निर्धार फेरी दरम्यान ते माझ्या सोबतच चालले आणि माझ्याशी गुजरातीतूनच संवाद करीत संघटना, रचना, कार्यपद्धती, दृष्टिकोन याबाबत माझ्याशी खूप मनमोकळ्या गप्पा केल्या. त्या दोन दिवसांत विविध विषयांवर त्यांना जे काही प्रश्न होते, ते माझ्याकडून समजून घेत होते आणि त्यांना जे काही अपेक्षित होते, ते माझ्याशी शेअर करीत होते. त्यांच्या या दोन दिवसांच्या सहवासात मला त्यांची तळमळ आणि संघटनेप्रतीची बांधिलकी ओतप्रोत ओसंडून वाहताना दिसली. त्यानंतर अधूनमधून फोनवर बोलणे होत राहिले. संघटनेतील काही घडामोडी-ताणतणाव याबाबत त्यांच्या कानावर काही आले, तर माझ्याशी फोनवर बोलून त्यांचे समाधान व्हायचे आणि ते आश्वस्त होत, असा माझा अनुभव होता. त्याचा मला एक आनंद आहे.

गिरीशभाई कर्करोगाने आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांची मोठी शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यानंतर केमोथेरपीचे उपचार सुरू होते; पण अंनिसच्या सक्रिय कामाच्या आनंदातून ते त्यांचे दु:ख विसरत होते.

त्रिदशकपूर्तीसाठी आवश्यक आयोजन, संयोजनासाठी संघटनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडली आणि महाराष्ट्र अंनिसचा त्रिदशकपूर्ती महोत्सव कार्यक्रम दिमाखदार व्हायला मोलाची मदत उभी राहिली. त्यानंतर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्त परिस्थितीमुळे बाधीत कुटुंबीयांच्या मदतीसाठी शैक्षणिक साहित्य पुरविण्याची जबाबदारी आपण संघटना म्हणून ठरविली त्यावेळी मी गिरीशभाईंना विनंतीचा फोन केला आणि त्यांनी आजारपणात देखील अतिशय उत्साहाने पुढाकार घेऊन त्यांच्या काही समविचारी व्यापारी मित्रांना आवाहन केले. त्यातून मोठी रक्कम मिळवून त्यांनी जवळपास दोन हजार संच शैक्षणिक साहित्य पुरविलेले आपण कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत वितरीत केले आहेत.

सामाजिक संवेदनशीलता, वैचारिक भूमिकांविषयी स्पष्ट राहून जगण्याचा प्रयत्न आणि सहृदयतेने कार्यकर्ते व संघटित प्रयत्नांती पाठराखण करण्याची त्यांची भूमिका आपल्याला मोठा आशावाद देणारी राहिली आहे. त्यांच्यासारख्या निरलसपणे शेवटपर्यंत कार्यरत असणार्‍या सहकार्‍यांना गमावल्याचे दु:ख आणि आंतरिक वेदना आयुष्यभरासाठी राहणार आहे. त्यांचे कुटुंबीय पत्नी जयश्रीबेन, कन्या नीरा व पुत्र पार्थ यांच्यासह सर्व नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या शोकात आम्ही विनम्रपूर्वक सहभागी आहोत. गिरीशभाईंसारखा सहकारी होणे नाही, त्यांची स्मृती आपल्यामध्ये कायम ठेवूया आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेत राहू या! विवेकाचा आवाज बुलंद करू या!