Categories
व्यक्तिविशेष

सत्यशोधकांचा पाठीराखा!

ऑगस्ट २०१९

नवनवे उपक्रम आणि प्रयोग परिवर्तनाच्या लढ्यासाठी ऊर्जा देतात, याची खात्री पटल्यामुळे तसे प्रयोग डॉक्टरांनी नेहमी केले. धार्मिक सण हे अधिक समाजाभिमुख व्हावेत, ते मानवतावादी व्हावेत, पर्यावरणपूक व्हावेत, यासाठी केलेले प्रयत्न आजही दिशादर्शक आहेत. गणेशोत्सव, होळी आणि दीपावली अशा सणांच्या काळात डॉक्टरांनी पर्याय दिले. हे पर्याय नवा दृष्टिकोन देणारे होते, उत्साह आणि ऊर्जा वाढवणारे होते. मला बकरी ईदच्या दिवशी प्राण्यांची आहुती (कुर्बानी) देण्याची प्रथा फार अस्वस्थ करीत होती. मला असे वाटले की, आपण या सणाच्या निमित्ताने काही पर्याय द्यावा. मी डॉक्टरांना भेटलो आणि बकरी ईदच्या दिवशी रक्तदान शिबीर घेणार असल्याचे सांगितले. डॉक्टरांना ही कल्पना फार आवडली.

शमसुद्दिन तांबोळी

महाराष्ट्रातील समाजपरिवर्तनाच्या लढ्यातील सैनिकांची सर्वाधिक महत्त्वाची उपलब्धी म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ओळख आणि या ना त्या कारणाने मिळालेला त्यांचा सहवास! मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातून शिक्षणाच्या निमित्ताने चार दशकांपूर्वी मी पुण्यात आलो. तेव्हा मी संत ज्ञानेश्वर या शासकीय मुलांच्या वसतिगृहात राहत होतो. महाविद्यालयात शिकत असताना पुण्यातील विविध सामाजिक संघटनांच्या बैठकीला मी उपस्थित असे. राष्ट्र सेवा दल, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर सामाजिक संघटनांबरोबर माझा संपर्क वाढला. या काळात हमीद दलवाई यांचे विचार व कार्याकडे मी आकर्षित झालो, याचे मुख्य कारण आणि निमित्त ठरले ते डॉ. नरेंद्र दाभोलकर. “आपल्या घरातील घाण काढल्याशिवाय इतरांच्या घरातील अस्वच्छतेबद्दल बोलण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नसतो. आपल्या घराला लागलेली आग विझवणे हे आपले कर्तव्य आहे.” या आणि अशा विधानांमुळे मुस्लिम समाजातील अनिष्ट, जाचक आणि कालबाह्य परंपरा यांची चिरफाड करणार्‍या हमीद दलवाई यांचे कार्य किती मोठे आहे, याची जाणीव डॉ. दाभोलकरांनी करून दिली. मानवी समाजाच्या कल्याणासाठी विज्ञान, विवेक आणि आधुनिक मूल्ये महत्त्वाची आहेत. आपण आपल्या मर्यादित वर्तुळात यासाठी कार्य करणे हे एकूणच मानवतेसाठी वरदान ठरणारे आहे. त्यामुळे विविध संघटनांनी आपले कार्यक्षेत्र निवडून ते कार्य करावे; पण या संघटनांमध्ये समन्वय असल्यास त्याचा एकंदरीत अधिक परिणाम साधता येईल, ही विचारदृष्टी ठेवून दाभोलकरांनी सामाजिक संघटनांमध्ये निर्माण केलेला समन्वय, महाराष्ट्रातील परिवर्तनवादी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना एकत्रित आणण्याचा डॉक्टरांनी केलेला प्रयत्न फारच महत्त्वपूर्ण होता.

माझ्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात डॉक्टरांचे मोठे योगदान आहे. डॉक्टरांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘विवेकवाहिनी’ उपक्रम राबविला, ‘एक दिवस उपवासाचा-सामाजिक कृतज्ञतेचा’ हा सुद्धा कार्यक्रम राबविला, तेव्हा माझा डॉक्टरांबरोबर अधिक संपर्क आला आणि सहवास लाभला, विचार कसा करावा? निरीक्षण कसे करावे? निष्कर्ष कसे काढावेत? आणि आपल्याला पटलेला विचार स्वत: अंगीकारत तो समाजात कसा रुजवावा, याचा वस्तुपाठ डॉक्टरांनी दिला.

मी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा कार्यकर्ता आहे, दलवाई विचारांचा वाहक आहे, हे जेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आले, तेव्हा आमच्यातील अंतर नाहीसे झाले. कोणत्याही निमित्ताने डॉक्टरांना भेटणे, चर्चा करणे, समस्या मांडणे हे काम फार सोपे झाले आणि डॉक्टरांचे उत्तुंग असे व्यक्तिमत्त्व मला प्रभावित करीत राहिले. दलवाई, कुरुंदकर विचार समजून घेण्याची पात्रता माझ्या अंगी निर्माण झाली, याचे बरेचसे श्रेय मी डॉ. दाभोलकरांनाच देतो.

हमीद दलवाई यांनी लिहिलेली पुस्तके, दलवाईंवर इतरांनी लिहिलेली पुस्तके आणि लेख वाचल्यानंतर मी डॉक्टरांना भेटून त्या संदर्भात चर्चा करून दलवाई विचार अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करीत असे. काही वेळा डॉक्टर मला असे काही प्रश्न विचारीत की, ज्याचे उत्तर माझ्याकडे नसे; मग डॉक्टर म्हणत, “मला नेमकेपणाने सांगता येणार नाही; पण मला असं वाटतं.” म्हणून त्यांच्याच प्रश्नाचं उत्तर अधिक स्पष्टपणे लक्षात आणून देत. मग मी त्यावर वाचन आणि विचार करीत असे. एकदा डॉक्टर म्हणाले, युवकांना हमीद दलवाई माहीत नाहीत… दलवाई मुस्लिम तरुणांपर्यंत कसे पोचवता येईल, याचा विचार केला पाहिजे. हमीद दलवाई यांच्याविषयी अनेक मान्यवरांनी लिहिलेले लेख, दलवाई यांचे अप्रकाशित लेख आणि समीक्षा, मुलाखती एकत्र करून मी ‘हमीद दलवाई : क्रांतिकारी विचारवंत’ हे पुस्तक संपादित केले आणि हमीद दलवाई यांच्या स्मृतिदिनी म्हणजे 3 मे 2008 मध्ये डॉ. दाभोलकरांच्या हस्ते ते प्रकाशित केले. यावेळी दाभोलकरांनी हमीद दलवाई यांची सार्वजनिक स्वरुपात घेतलेली निरीश्वरवादी विचारांची भूमिका सामाजिक चळवळीच्या स्वरुपात काय परिणाम करते, यासंदर्भात विचार मांडले. प्राचार्य नरहर कुरुंदकरांचा संदर्भ देत व्यक्तिगत भूमिका आणि समाजपरिवर्तनाचा लढा यात ताळमेळ कसा साधला पाहिजे, या संदर्भात केलेले विवेचन मंडळासाठी महत्त्वपूर्ण होते. धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन परिवर्तनवादी चळवळीने सकारात्मक घेतला, त्यातील विसंगती, शोषण, कालबाह्यता, विषमता लक्षात आणून द्याव्यात; पण सरसकट धार्मिकतेला टार्गेट केल्यास संघटना समाजात विचार पोचवू शकणार नाहीत,” हा डॉक्टरांचा निष्कर्ष विचारांच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर फार महत्त्वाचा आहे. याचा अवलंब केल्यास समाजसुधारणेसाठी पोेषक ठरेल; अन्यथा समाज आणि संघटना यांच्यात दुरावा होऊन आपले उद्दिष्ट साध्य करता येणार नाही.

सत्तांतरानंतर परिवर्तनवादी संघटना अस्वस्थ झाल्या आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजप आणि संघपरिवार अधिक प्रबळ झाल्याने दबक्या आवाजातील आक्रमक हिंदुत्ववादाचा आवाज वाढला आहे. आमदार, खासदार, मंत्रिमहोदय जी विखारी आणि अविवेकी वक्तव्य करतात, त्यामुळे एक संकट मोठ्या वेगाने समोर येत असल्याची भावना निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील संत आणि सुधारकांनी आपल्या कार्यातून समाजप्रबोधनाची परंपरा उभी केली. त्या विचारधारेला एका अर्थाने बाजूला करण्याचा नियोजनबद्धपणे प्रयत्न होत आहे. या प्रबोधनकारांनी समाजाला एका टप्प्यावर आणण्याचा प्रयत्न केला, याची सदोदित जाणीव डॉ. दाभोलकर करून देत असत. सुधारकांच्या कार्याची आठवण, उजळणी होऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉक्टरांनी महाराष्ट्राच्या सुवर्णजयंती वर्षानिमित्त एक अभिनव प्रयोग केला होता. महाराष्ट्रातील समाज प्रबोधकांचे फोटो असलेले वाहन तयार करून ‘वारसा प्रबोधनाचा-समाजसुधारकांचा’ संदेश देणारा उपक्रम फार महत्त्वाचा होता. महात्मा फुले, आगरकर, प्रबोधनकार ठाकरे ते हमीद दलवाई यांचे फोटो आणि विचार घेऊन डॉ. दाभोलकर 50 दिवस जमेल तेथे गेले व हा वारसा गळी उतरवण्याचा प्रयत्न केला. या प्रबोधनामध्ये दलवाई यांचा समावेश केल्यामुळे मला विशेष आनंद झाला होता. मी फोन करून तो आनंद व्यक्त केला, तेव्हा डॉक्टर म्हणाले, ‘हो, त्यांच्याशिवाय ही यादी करताच येणार नाही. हमीद दलवाई यांचे योगदान समाजासमोर यायलाच पाहिजे.’ हमीदभाईंच्या कार्याचा उचित असा सन्मान व्हावा, यासाठी डॉक्टरांनी नेहमीच दखल घेतली. ही दखल मुुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारी होती.

नवनवे उपक्रम आणि प्रयोग परिवर्तनाच्या लढ्यासाठी ऊर्जा देतात, याची खात्री पटल्यामुळे तसे प्रयोग डॉक्टरांनी नेहमी केले. धार्मिक सण हे अधिक समाजाभिमुख व्हावेत, ते मानवतावादी व्हावेत, पर्यावरणपूक व्हावेत, यासाठी केलेले प्रयत्न आज दिशादर्शक आहेत. गणेशोत्सव, होळी आणि दीपावली अशा सणांच्या काळात डॉक्टरांनी पर्याय दिले. हे पर्याय नवा दृष्टिकोन देणारे होते, उत्साह आणि ऊर्जा वाढवणारे होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे प्रयोग राबवित असताना, मला बकरी ईदच्या दिवशी प्राण्यांची आहुती (कुर्बानी) देण्याची प्रथा फार अस्वस्थ करीत होती. मला असे वाटले की, आपण या सणाच्या निमित्ताने काही पर्याय द्यावा. मी डॉक्टरांना भेटलो आणि बकरी ईदच्या दिवशी रक्तदान शिबीर घेणार असल्याचे सांगितले. डॉक्टरांना ही कल्पना फार आवडली. प्राण्यांचे रक्त सांडण्यापेक्षा, जात आणि धर्मासाठी जाणारा मानवतावाद वाढवणारा रक्तदान समारंभ घेण्याचा निर्णय झाला. 2012 मध्ये एस. एम. जोशी सोशॅलिस्ट फौंडेशन, पुणे येथे शिबीर आयोजित केले होते. त्या दिवशी डॉक्टर मुद्दाम उपस्थित राहणार होते. मला आठवते, तो बुधवारचा दिवस होता. मंगळवारी रात्री पुण्याहून डॉक्टर सातार्‍याला गेले होते आणि बुधवारी सकाळी सातार्‍याहून पुन्हा पुण्याला या कार्यक्रमासाठी एस.टी.ने डॉक्टर आले. डॉ. बाबा आढावसुद्धा या कार्यक्रमासाठी येणार होते. कितीही गैरसोय झाली तरी पर्वा न करणारे डॉक्टर सामाजिक कार्यकर्त्यांसाठी एक आदर्श डोळ्यापुढे ठेवत. 2013 मध्ये डॉक्टरांची हत्या करण्यात आली. 2013 मध्ये आम्ही रक्तदान कार्यक्रम घेतला. त्यावेळी कार्यव्यस्तता असतानाही हमीद आणि मुक्ताताई या कार्यक्रमासाठी उपस्थित होंत्या.

अभय जोशी यांनी आपल्या नोकरीच्या काळात काटकसरीने जमवलेला निधी समाजासाठी वापरण्याची कल्पना डॉक्टरांना दिली. ती कल्पना डॉक्टरांनी उचलली. “एस. एम. जोशी शिक्षण व आरोग्य निधी” मार्फत रोजगाराभिमुख शिक्षण घेणार्‍या मुलांना शिष्यवृत्ती देण्याचे ठरले आणि सामाजिक कार्यकर्त्याला आजार-अपघातप्रसंगी मदत करण्याचे ठरले. धनादेश वाटपाच्या पहिल्या कार्यक्रमाचा तपशील डॉक्टरांनीच ठरवला. या कार्यक्रमासाठी त्यांनी अभिनेते सदाशिव अमरापूरकर, डॉ. विवेक सावंत यांनाही बोलावले. डॉक्टर स्वत: उपस्थित होतेच; डॉ. अभिजित वैद्य, सुभाष वारे, रेगे, अभय जोशी आणि मी यांची समिती तयार केली. हा कार्यक्रम फारच नेत्रदीपक झाला. बकरी ईदनिमित्त आयोजित केलेला रक्तदान कार्यक्रम आणि एस. एम. जोशी शिक्षण व आरोग्यनिधी धनादेश वाटप कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टरांच्या हस्ते झाली. आज जेव्हा-जेव्हा हे कार्यक्रम आयोजित केले जातात, तेव्हा डॉक्टर आपल्या सोबत असल्याची भावना निर्माण होते; पण ते शरीराने आपल्यात नसतात, याचे मोठे दु:ख उरात उसळत असते.

मी हमीद दलवाई यांनी केलेल्या समाजप्रबोधनाच्या कार्यावर पीएच. डी. करणार आहे, हे जेव्हा डॉक्टरांना सांगितले, तेव्हा त्यांना फार आनंद झाला. माझ्या अभ्यासात कशाचा समावेश करणार आहे? आराखडा काय आहे? या संदर्भात चौकशी केली. माझ्या दृष्टीने डॉक्टरांनी दलवाई विचारांचे केलेले आकलन महत्त्वाचे होते. मला डॉक्टरांची मुलाखत घ्यायची होती. डॉक्टरांनी तारीख आणि वेळ दिली. मी सदाशिव पेठेतील प्रधान सरांच्या घरी तयार केलेल्या कार्यालयात गेलो. सोबत टेपरेकॉर्डर होते. यानिमित्ताने डॉक्टरांसोबत झालेली चर्चा ध्वनिमुद्रित स्वरुपात माझ्याकडे आहे. हमीद दलवाई आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्याविषयी डॉक्टरांना अभिमान वाटत होता. या मुलाखतीत डॉक्टर काय म्हणाले, हे आमच्या संदर्भातही महत्त्वाचे आहे. डॉक्टर म्हणतात, “हमीदभाईंचं अकाली निधन झालं आणि मला मुलगा झाला, तेव्हा मी माझ्या मुलाचं नाव ‘हमीद’ असं ठेवलं. हे जे असोसिएशन आहे, सत्यशोधक हे नाव घेऊन मुस्लिम समाजात काम करणं, हे अतिशय अवघड आहे. कारण मुस्लिम सत्यशोधकांना सत्यशोधनाचं काम करणं म्हणजे पवित्र इस्लाम आणि अल्लाह यांच्यावर अविश्वास दाखविण्यासारखं आहे. कारण इस्लाममध्ये सत्य शोधण्यासारखं काही नाही. सत्य अस्तित्वात आहे, हे समजून घेणं हेच इस्लामला अपेक्षित आहे. म्हणून मुस्लिम समाजात ‘सत्यशोधक’ या नावाने काम करणं, हेच अशक्य आहे.” मुस्लिम समाजप्रबोधनाचा विषय किती अवघड आहे, याची कल्पना डॉक्टरांना होती. ते पुढे असे म्हणाले होते, ‘आज हिंदू धर्मातही सत्यशोधनाबद्दल बोलले की, आमच्यावर हल्ले होतात; पण ज्या इस्लामची चौदाशे-पंधराशे वर्षांची परंपरा आणि इतिहास आहे, त्यात चिकित्सा करण्याचे धाडस कोणी केले नाही.’ धर्म ही तपासण्यायोग्य बाब आहे, असे सामान्यपणे मानले जात नाही. केवळ तपासण्याची बाब नव्हे, तर त्यातील कालबाह्य, अयोग्य, अन्यायकारक गोष्टी आहेत, त्या नाकारल्या पाहिजेत, हा विचार घेऊन हमीदभाईंनी ही चळवळ उभी केली. धर्मातील न पटणार्‍या गोष्टी बाजूला सारून मानवी जीवन उभारायला हवे, हे सांगण्याची हिम्मत दलवाईंनी दाखवली. उघडच आहे की, समाजानं त्यांना स्वीकारलं नाही. आज आम्ही काही मांडतो ते स्वीकारत नसले, तरी किमान ऐकून घेतात; परंतु हमीदभाई जे मुद्दे मांडत होते, ते स्वीकारण्याचा प्रश्नच नाही, नुसतं ऐकणं म्हणजे सुद्धा एक प्रकारची धर्मनिंदाच आहे, असे मानणार्‍या समाजातील ते काम आहे. मानवतावाद, विवेक, बुद्धिप्रामाण्य, धर्मनिरपेक्षता हे पुढचे शब्द आहेत. धर्म तपासावा, त्यातील नको असलेला, न पटलेला भाग वापरू नये, अशी मांडणी केली असती, तर कदाचित कालसुसंगत झालं असतं. जे नीतीला साह्य करणारं, ते मानावं नसेल, ते नाकारावं या धर्माचा अवमान नाही, तर धर्माला कालसुसंगत करणं आहे; परंतु हे हमीदभाईंनी मांडलं, ते मांडण्यासाठी जो अभ्यास करावा लागतो, तो केला. त्यामुळे प्रचंड निर्भयता, धाडस, वाद घालण्याची रग, खुमखुमी लागते, ती दलवाईंकडे होती. समाजाला धक्का देण्याची ताकद त्यांच्याकडे होती. मुस्लिम महिलांवरील अन्याय दूर झाला पाहिजे; मग त्याबद्दल धर्मात काय आहे-नाही, हे पाहायची गरज नाही. हा एक विचार दलवाईंनी मांडला. मुस्लिम समाजातील दुसरा प्रवाह म्हणतो, ‘कुराणाचा आधार घेऊन मांडले, तर लोकांना ते अधिक पटेल.’ आम्हालाही म्हणतात, ‘अंधश्रद्धा निर्मूलनाच्याऐवजी श्रद्धा उन्नयन समिती का चालवत नाही?’ मी म्हणतो, ‘मग तुम्ही श्रद्धा उन्नयन समिती काढावी, आमचा त्याला विरोध नाही.’

डॉक्टरांना प्रबोधनाचा विचार रुजवायचा होता, त्याचा प्रसार करायचा होता. त्यामुळे धर्माकडे सकारात्मक पद्धतीने पाहून, त्याला कालसापेक्ष वळण देऊनच प्रबोधन होईल, हे त्यांनी सुधारकांच्या जीवनकार्यातून आणि विचारांतून हेरले होते. एक आगरकर सोडले, तर जवळपास सर्व सुधारकांना धर्माची गरज का वाटली? महात्मा फुले, आंबेडकर ते गाडगे महाराजांनाही धर्माला समवेत घेऊन समाज बदलावा, असे वाटत होते. या सुधारकांनी ईश्वरकेंद्रित धर्म मानवकेंद्री केला, समाजविन्मुख धर्म समाजसन्मुख केला, पारलौकिकवादी धर्म इहलौकिकवादी केला. या पार्श्वभूमीवर दलवाई यांची भूमिका काय होती, असा प्रश्न डॉक्टरांनी विचारला, तेव्हा मी म्हणालो की, दलवाईंना भारतीय संविधानावर आधारित नवसमाज निर्माण करणारा प्रवाह अपेक्षित होता. धर्मनिरपेक्षता हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. तेव्हा डॉक्टर म्हणाले, समाज धर्मनिरपेक्ष बनवण्याचा, समाजाशी संवाद साधण्याचा कोणता कृती कार्यक्रम हाती घेतला? मला दलवाईंचा कार्यक्रम माहीत होता; पण कृती कार्यक्रम माहीत नव्हता. मी निरुत्तर झालो, तेव्हा डॉक्टर म्हणाले, “मलाही पुरेशी माहिती नाही; पण माझ्या समजुतीप्रमाणे बुद्धिप्रामाण्याच्या आधारे धर्माला नकार देण्याची ती दलवाईंची भूमिका होती. ही भूमिका निश्चितपणे एक गरज भागवते, तसेच कार्य म्हणून, चळवळ म्हणून काही मर्यादा निर्माण करते.”

डॉ. दाभोलकरांच्या एक तासाच्या मुलाखतीत अनेक तपशील आहेत. या मुलाखतीचा प्राथमिक उद्देश माझ्या शैक्षणिक कार्यासाठी माहिती घेण्याचा होता; पण मी एक कार्यकर्ता असल्यामुळे चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी कोणते मुद्दे घ्यायचे आणि कोणते मुद्दे टाळायचे, याचे भान मुलाखतीतून मिळाले, जे या चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहे.

मुस्लिम सत्यशोधक चळवळीने पन्नाशीत पदार्पण केले आहे. आज आपल्यात डॉक्टर असते, तर समाजपरिवर्तनाचा विचार नव्या प्रयोगाने पुढे नेला असता; परंतु 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉक्टरांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली, तो मानवतेसाठी काळा दिवस ठरला. हत्येनंतरही समाजकंटकांनी जी विखारी वक्तव्यं केली, ती फारच बोचणारी आहेत. आता तर या प्रवृत्तीला सत्ता मिळाल्यामुळे आत्मबल मिळाल्यासारखे वाटतंय. धार्मिक ध्रुवीकरणाच्या निमित्ताने केले जाणारे वक्तव्य तथाकथित गोरक्षक कायदा हातात घेऊन, मॉब लिंचिंग करीत आहेत. राजकीय अभ्यासक लोकनेत्यापेक्षा संत आणि साध्वी म्हणवणारे संसदेत समाजाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या संतांनी-साध्वींनी मानवतावादी भूमिका घेतली असती, तर गोष्ट वेगळी- संतांचा अवमान करणारी, प्रतिमा डागाळणारी भाषा समाजात तेढ निर्माण करीत आहे. विज्ञान-विवेकवाद हा मूलभूत कर्तव्याचा भाग असूनसुद्धा – अवैज्ञानिक व अविवेकी मानसिकता असह्यामुळे त्या प्रकारची अनेक विधाने सर्रास केली जात आहेत. आज डॉक्टर असते, तर त्यांनी या विरोधात भूमिका घेऊन निर्भयपणे रस्त्यावर उतरले असते.

डॉक्टरांच्या निधनाला-हत्येला-सहा वर्षे पूर्ण होत आहेत. कासवाच्या गतीने गुन्हेगारांचा शोध घेतला जातोय. आता कुठे काही धागे-दोरे हाती लागतात; पण एकूणच पुराव्याअभावी या गुन्हेगारांना हवी तशी शिक्षा होणार का, असा प्रश्न आहे. खरं तर शिक्षेचा प्रश्न नाही; ही मानसिकता कशी संपवायची हा प्रश्न आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय संयमाने-विवेकाने संघर्ष करण्याचा निर्धार केला आणि तो चालवला आहे. फुले-शाहू-आंबेडकर-आगरकरांचा सुधारणेचा वसा पुढे घेऊन जाणारी ही चळवळ ग्रामीण भागात आणि राष्ट्रीय पातळीवर गेली आहे. एका अर्थाने या चळवळीची खोली आणि उंची वाढली आहे. डॉक्टरांनी चळवळ विस्तारत असताना दिलेली व्याख्याने, केलेला संवाद, लिहिलेली पुस्तके ही अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीबरोबरच परिवर्तनवादी कार्यकर्त्यांसाठी मोठी भेट आहे. हे अक्षर वरदान अनेक पिढ्यांसाठी उपयोगी पडणारं आहे. डॉ. दाभोलकरांनी वस्तुस्थितीचा स्वीकार करून कामाला सुरुवात केली. त्यांना कल्पना होती की, चळवळीचे ध्येय हे या दशकात साध्य करता येणार नाही, ते शतकाचं काम आहे. शंभर वर्षांनंतर का होईना, आपल्याला मानवतावादी विचार समाजात उगवताना दिसतील. महात्मा फुले, आगरकरांच्या शताब्दीनंतरही त्यांचे द्वेष करणारे समाजात आहेत. डॉक्टरांना त्यांच्या कार्यकाळानंतरचे शतक दिसत होते. त्या आशावादावर त्यांनी चळवळ वाढवली. आज या चळवळीला मागे घेऊन जाणार्‍यांची संख्या वाढताना दिसतेय. त्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या असण्याची गरज अधिक अधोरेखित होत आहे. आज अधिक निराशा पदरी पाडणारे वातावरण निर्माण झाले आहे. असे असले, तरी डॉक्टरांच्या मुशीतून निर्माण झालेले कार्यकर्ते निराश नाहीत, ही फार मोठी जमेची बाजू आहे. ‘आम्ही सारे दाभोलकर’ म्हणणारा कार्यकर्ता जोपर्यंत आहे आणि नंतरही निर्माण होणार आहे. विजय हा शेवटी परिवर्तनवाद्यांचाच होणार आहे, हा

विश्वास देणारे डॉक्टर समाजाचे संचित आहे. माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थान आहे.

एकतर्फी तोंडी तलाकचा प्रश्न वेड्यावाकड्या मार्गाने का होईना सुटण्याच्या मार्गावर आहे. याचा आनंद डॉक्टरांना झाला असता. ‘मुस्लिम सत्यशोधक’सह अनेक परिवर्तनवादी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारे दाभोलकर आपल्या परिघाबाहेरचं पुरोगामित्व पाहणारे, त्यांना बळ देणारे होते. त्यांचा विवेक अन् विज्ञानवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, मानवतावाद, जमातवादी राजकारण्यांनी घेरलेल्या असहाय्यतेच्या काळात डॉक्टरांची पुन्हा-पुन्हा आठवण येते. आपला वेळ, शरीर, लेखणी आणि वाणी ज्या चळवळीसाठी डॉक्टरांनी वापरली, ती चळवळ अधिक व्यापक होताना पदोपदी डॉक्टरांची आठवण येते. डॉक्टरांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!