रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणपासून सुमारे 10 कि.मी. अंतरावरचं अलोरे गाव.
गावच्या वस्तीपासून लांब अंतरावर ‘शहानूरबाबा सेवाधाम’ या गोंडस नावाखाली असलेला शहानूर बाबाचा दर्गा. (हा शहानूर बाबा मुळचा औरंगाबाद जिल्ह्यातल्या चिकोडीच्या जवळचा. तिथली समाधी दरवर्षी आकारानं थोडी-थोडी वाढते अशी वदंता.) दर्ग्याच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या कमानीतून ठळक अक्षरात दिसणारी पाटी : “येणार्या भाविकांनी आपल्या घरी अडचणीचे दिवस असताना 7 दिवस येऊ नये. तसेच मयत, बाळंतपण या कालावधीमध्ये 41 दिवस येऊ नये.” मुख्य दरवाजातून आत गेल्यावर चादर घातलेली कबर. त्याभोवती लाकडी मंडप. मंडपाच्या चौकटीला मनोकामना पुर्या व्हाव्यात म्हणून गाठी मारून ठेवलेली ‘बंधनं’ आणि ज्यांना मूल होत नाही अशा जोडप्यांनी बांधलेले छोटे पाळणे. दर्ग्याच्या डाव्या बाजूला दर गुरूवारी दरबार भरतो तिथं मोठं सिंहासन. त्यामागच्या भिंतीवर उजवीकडे हसन आणि हुसेन यांना मांडीवर घेतलेल्या पैगंबरांचा फोटो. मध्यभागी शहानूर बाबाचा फोटो. डावीकडे सध्या दर्ग्याचा सर्वेसर्वा असणारे अशोकभाई यांचा तरूणपणीचा फोटो.
दरबाराच्या दिवशी अशोकभाई सर्व भाविकांच्या शंकाचं निरसन करतात. ‘न्यायनिवाडा’ करतात. झपाटलेल्यांना बरं करतात. मूल नसणार्यांना आशिर्वाद देतात. “गुरूवारी आला असता तर तुम्हाला लोकांनीच अनुभव सांगितले असते.” अशोकभाई सांगू लागतात, “दरवर्षी गुढीपाडव्याच्या दुसर्या दिवशी उरूस असतो. त्याला जालना, अमरावती, नागपूर, हैद्राबाद, बेळगाव, हुबळी इथून लोक येतात. त्यात घरगुती अडचणी, ‘बाहेरचं लागीर’, व्यसन, झपाटणं यासाठी उपचार घेणारे ‘पेशंट’ असतात. कोंबडी-बकरा मारणं असे प्रकार इथं चालत नाहीत. फक्त देणगी स्वीकारतो. रजिस्ट्रेशन आहे! भविष्यात वृद्धाश्रम काढण्याची इच्छा आहे. आम्ही इथं आरोग्य शिबीरं घेतो. कान, नाक, घसा तपासण्याची शिबिरं घेतो. चष्मे मोफत देतो. यावर्षी 160 चष्मे दिले. दर महिन्याला इथं डॉ.बाबूभाई अहीर हे नाडीतज्ञ येतात. ते आयुर्वेदिक पूड, तेल यासारखे उपचार करून ‘पॅरालिसिस’ बरा करतात. इतर डॉक्टरना ‘न झेपणार्या केसेस’, कोमात गेलेलं पेशंट बरे करतात. ते फी घेत नाहीत, फक्त औषधाचे पैसे घेतात. समस्या निवारण करताना मी खरं काय ते शोधतो, घरातील वाद आणि मनाचे विकार लक्षात घेऊन प्रत्येकाचे संसार टिकावेत यासाठी मार्ग काढतो. उपाय म्हणून शपथ घ्यायला लावतो. जर शपथ पाळली नाही तर ती व्यक्ती अलोरे स्टँडपासून लोळत दर्ग्यात येते. व्यसनमुक्तीसाठी अर्जून सालाची पूड देतो. त्यामुळे उलटी होते, घाण वास येतो. मग दारू पिण्याची इच्छा होत नाही. रक्त ओकणारा रूग्ण बरा करतो. उचकी लागली तर मंतरलेला गूळ पाण्याबरोबर घ्यायला देतो.
दुनियेत अनेक ठिकाणी धक्का खाल्लेले लोक येतात. पण आम्ही फी घेत नाही. श्रमदानातून कामं करून घेतो, स्वत: झाडू मारून स्वच्छता करतो, स्वत: निर्व्यसनी आहे. त्यामुळे खर्च भागतो. मी चप्पलही घालत नाही. माझ्या अंगात देव येतो. मला अडतीस सिद्धी प्राप्त आहेत. मी जर दर्ग्यात उपासना करत असताना कुणी पाहिलं आणि ती व्यक्ती नंतर दर्ग्याबाहेर पडली तर बाहेरसुद्धा त्याला मी दिसतो.”
अलोरे गावातील आधी लकवा मारलेले आणि अशोकभाईंच्या उपायानं काही प्रमाणात बरे झालेले राजाराम बाबूराव हवालदार(एजंट?) म्हणाले, “दरबाराच्या वेळी बाहेर सगळे लोक प्रश्न लिहून देतात. बाबाना प्रश्न काय आहे हे माहीत नसते, तरीही बाबा तो ओळखून बरोबर उपाय सांगतात.
उरसाच्या वेळी इतर दर्ग्यातून होतात तसे जरबा टोचणे वगैरे कार्यक्रम होतात.
या दर्ग्यातला विशेष चमत्कार(?) म्हणजे दगडी जात्याचा. हात कोपरापर्यंत आत जाईल अशा दगडी कड्यासमोर बसायचं, हात आत घालायचा, “शहानूर बाबाकी जय” असं दहा वेळा म्हणायचं, घरच्या देवाचं नाव दहा वेळा घ्यायचं आणि आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची. जर इच्छा पूर्ण होणार असेल तर कडं सहज उचललं जातं, नसेल तर जड होतं. पुन्हा याउलट क्रिया करायची. होकारार्थी ‘रिझल्ट’ मिळणार असेल तर कडं जड येतं, नकारार्थी मिळणार असेल तर हलकं होतं. हा प्रयोग दर्ग्याला भेट देणार्या आपल्या कार्यकर्त्यांनी केला तेव्हा अर्थातच जड-हलकं असं काही झालं नाही.
अलोरेच्या पुढे 4 कि.मी.अंतरावरचं पोफळी-शिरगाव. डोंगरांच्या रांगामधला विलोभनीय, निसर्गरम्य परिसर. तिथं हजरतपीर आकुसखांबाबा उर्फ सिकंदर यांचा दर्गा. या दर्ग्यासंबंधी एक मजेशीर आख्यायिका आहे. महाकाली(देवी!) आपल्या सात भावांना घेऊन कोकणात आली. महाकाली शाकाहारी आणि हे सात पीर मांसाहारी. हे सात भाऊ म्हणजे सात पीर. त्यांचे पोफळी, कुरधुंडा, गुहागर वगैरे सात ठिकाणी दर्गे आहेत. त्यातलेच एक आकुखांबाबा. ते पोफळी, कुंभार्ली आणि शिरगाव या तीन गावांचं सांभाळ आणि रक्षण करतात असंही सांगितलं जातं.
दर्ग्याची सगळी ठेवण नेहमी इतरत्र आढळते तशीच. मूल नसलेले, मुलांच्या प्रगतीच्या समस्या असलेले, घरात वाद किंवा अशांती असलेले ‘झपाटलेले’ असे लोक अडचणींच्या निवारणासाठी इथं येतात. त्यावेळी पीरापुढे गार्हाणं घालणारे ‘एजंट’ त्यांची वाट पाहत असतात. गावातील अनेक लोकांनी आपलं नाव, फोन नंबर असलेली व्हिजीटींग कार्डस छापून घेतलेली आहेत. यात काही महावितरणमध्ये काम करणारे विद्युत कर्मचारीसुद्धा आहेत. हे लोक दहा-बारा हजारांचं ‘पॅकेज’च देतात. लोकांनी फक्त आपल्या समस्या सांगायच्या आणि पैसे द्यायचे. इथं बकर्या-कोंबड्यांचे बळी सर्रास चढवले जातात. गावामध्ये आणि येणार्यांमध्ये दर्ग्याबद्दल दहशत पसरवली जाते. रात्री नऊनंतर ‘बाबा’ दर्ग्याच्या परिसरात कोणाला थांबू देत नाहीत. जर कोणी थांबला तर ते ‘दिसतात’ आणि झोपू देत नाहीत.
दरवर्षी फेब्रुवारीतल्या पौर्णिमेला उरूस होतो. हा उरूस जिल्ह्यातला ‘नंबर एक’चा उरूस असं स्थानिकन लोक म्हणतात. त्यावेळी कव्वाली, जरबा टोचणे इत्यादी कार्यक्रम होतात. तीन लाखांची चादर असते. कोंबडी-बकर्याचा नैवेद्य असतो. नाही कापले तर अडचण येते, नवस बोलला असेल आणि तो पुरा केला नाही तर भास होतात, दर्ग्याच्या खालच्या बाजूला एक वहाता झरा आहे, तो फक्त उरसाच्या दिवशीच बंद होतो, अशा वदंता भाविकांमध्ये पसरवल्या जातात. अलोर्याप्रमाणे इथल्या दर्ग्यातही दगडी कड्याचा चमत्कार सांगितला जातो. नकारार्थी उत्तर असेल तर कडं जड येतं की, जेसीबीनंसुद्धा हलत नाही असं सांगितलं जातं. मात्र इथे कार्यकर्त्यांना प्रयोग करू दिला नाही.
या दर्ग्यासंबंधी माहिती मिळविण्यासाठी रत्नागिरी शाखेचे, आतेश कीर, मयूर पवार, मधुसूदन तावडे आणि अशोक भाटकर हे कार्यकर्ते सहभागी झाले.
– विनोद वायंगणकर