प्रिय साथी,
ही कार्याध्यक्षांची डायरी लिहिताना वेदना आणि आनंद अशी संमिश्र भावना मनात आहे. आपल्या समितीचे अध्वर्यु शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला सहा वर्षे पूर्ण होत आहेत. आजपर्यंत मागील सहा वर्षांच्या कालावधीत डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पुण्यातील निर्घृण खुनानंतरच्या परिस्थितीचा मागोवा घेतला तर लक्षात येते की, समाजसुधारणेसाठी, शोषणमुक्त, समताधिष्ठित, धर्मनिरपेक्ष समाजनिर्मितीसाठी आपल्या आयुष्यात आपल्या परिने कार्यरत असणार्या दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी-लंकेश यांच्या खुनांची मालिका ही ‘विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता येत नाही, म्हणून त्या व्यक्तीला संपविणे या भूमिकेच्या कार्यपद्धतीचा अवलंब आहे’, हे आता निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर त्या विरोधी; पण मूलतत्त्ववादी, कर्मठ, हिंसेचा पुरस्कार करणार्या आणि छुपेपणाने, आपल्या सभोवतालला (उदा. कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार, समविचारी, समाज, माध्यमे, शासन, राज्यकर्ते आदी) अनभिज्ञ ठेवून कारवाया करणार्या संस्था-संघटना-व्यक्तींना सर्वच राज्यकर्त्यांकडून मतांच्या राजकारणासाठी पाठीशी घालण्याचे धोरण राबविले जात असल्याचे आम्ही अनुभवतो आहोत. कर्नाटकातील पोलिसांच्या योगदानामुळे व तेथील राज्यकर्त्यांनी थोड्याफार प्रमाणात दाखविलेल्या राजकीय इच्छाशक्तीमुळे आजपर्यंतचा तपास होऊ शकलेला आहे. चारही खुनांमध्ये प्रत्यक्ष सहभागी, षड्यंत्र रचणारे, मदत करणारे आणि त्यांची विचारसरणी ठरविणार्या विचारधारेची माहिती आता जगासमोर आली आहे. अर्थात, यामागे महा. अंनिस संघटनेच्या पुढाकाराने आणि योगदानाने वेळोवेळी व्यक्त केलेला असंतोष, संताप, त्यासाठीची आंदोलने-सत्याग्रह आणि जनतेच्या सहभागाची निवेदने यांचा सातत्याचा दबाव जसा कारणीभूत आहे, तसेच खुनाच्या तपासासाठी संबंधित राष्ट्रीय व राज्यस्तरावरील यंत्रणांकडील पाठपुरावा, महत्त्वाचे म्हणजे न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू असलेला तपास हे देखील उपयोगाचे ठरलेले आहे. या सर्व प्रयत्नांना राज्य, देश व आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेले प्रसंगोचित प्रसिद्धीचे सातत्य देखील कारणीभूत ठरले आहे, याची नम्र नोंद आम्ही करू इच्छितो.
आतापर्यंत झालेल्या तपासात प्रत्यक्ष खुनात सहभागी असलेले तपास यंत्रणेच्या ताब्यात आले आहेत. त्यातील काहींचे कबुली जवाब देखील झाले आहेत. मात्र त्यामागील सूत्रधार कोण, हे जरी जनतेला, समाजाला माध्यमातून माहीत झाले असले तरी त्या सुत्रधारांपर्यंत आणि ती विचारांची विषवल्ली संपवण्यापर्यंत तपासयंत्रणांचे हात पोचू दिले गेलेले नाहीत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने ते हात कोठेतरी थांबविलेले दिसतात. त्यामुळे तपास यंत्रणांच्या कामकाजावर लक्ष ठेवून सतत पाठपुरावा करत राहावा लागेलच. म्हणूनच यावेळेची आपली 20 ऑगस्टची घोषणा ‘जवाब दो- सूत्रधार कौन ?’ अशी करू या.
साथींनो, डॉक्टरांच्या खुनानंतर आपण ‘माणूस मारता येतो; विचार मरत नाहीत’ अशी घोषणा घेऊन उभे राहिलो. नेमका हा विचार म्हणजेच जो ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ समाजामध्ये, शिक्षणामध्ये रुजवण्यासाठी आपल्या दिवंगत नेत्याने आयुष्याची चार दशके अविरत कार्य केले आणि त्याच कामासाठी बलिदान दिले, तो विचार कधीही मरणार नाही, असा विश्वास त्यात अभिप्रेत आहे.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतिदिन 20 ऑगस्ट हा 2018 पासून आपण ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. ऑल इंडिया सायन्स पीपल्स नेटवर्क (AIPSN) व महाराष्ट्र अंनिस यांच्यासह देशातील विविध विज्ञानवादी संस्था-संघटनांच्या सहभागाने ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ मागीलवर्षी आयोजित करण्यास सुरुवात केली होती. आता हा विचार जिवंत ठेवायचा असेल आणि त्यातून आपल्या नेत्याचे कार्य आणि स्मृती चिरंतन ठेवायच्या असतील तर 20 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून पाळण्यासाठी आणि वेगवेगळ्या माध्यमांनी आणि उपक्रमांनी समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी कटिबद्ध होण्यासाठी आपण आवाहन करीत आहोत.
अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारून तो समाजात रूढ करण्यासाठी आपल्या आयुष्यातील जवळपास चार दशके कृतिशील योगदान देणार्या आणि त्याच कारणामुळे शहीद झालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या प्रेरणादायी स्मृतीला अभिवादन करण्याचा विधायक प्रयत्न यानिमित्ताने आपण सुरू केला आहे, तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवू या !
साथींनो, दुसरे महत्त्वाचे म्हणजे महा. अंनिसच्या त्रिदशकपूर्ती निमित्ताने मुंबई येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषद आणि राज्य अधिवेशन दि. 9, 10 व 11 ऑगस्टची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. त्याची स्थानिक तयारी खूपच मोठी आणि दमछाक करणारी असली तरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगड या नजीकच्या जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी वेळ आणि श्रमाची प्रचंड गुंतवणूक करून तयारी पूर्णत्वाकडे नेली आहे. मागील वर्षभरापासून अनेक बैठका होऊन कामांची, जबाबदारीची वाटणी करत वेगवेगळ्या अंगाने ही तयारी सुरू होती, तरी खर्या अर्थाने त्याला मागील तीन महिन्यांत गती मिळाली.
सहभागी प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी महाराष्ट्राबाहेरील जवळपास वीसपेक्षा जास्त राज्यातून आणि पाच पेक्षा अधिक देशांतून मान्यवर पाहुणे येण्याचे निश्चित झाले आहे. या निमित्त आपण ‘मानवतेच्या विकासासाठी विवेकवाद’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद घेत आहोत. त्यामागील आपली वैचारिक भूमिका देखील महत्त्वपूर्ण आहे. कारण जगातील सर्व विवेकवादी हे नास्तिकतावादाचा पुरस्कार करतात आणि देव-धर्म नाकारताना दिसतात. पण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य असे आहे की, आपली त्याबाबतची भूमिका अज्ञेयवादाची आहे, जी संविधानाशी आणि संत-समाजसुधारकांच्या विचारांशी सुसंगत आहे. म्हणजे आपण असे म्हणतो की, संतांनी ईश्वरसन्मुख धर्म हा मानव सन्मुख केला. हा मानवतावादाचा विवेकाशी असलेला संबंध, ज्याला ‘भारतीय कसावर आधारित विवेकवाद’ असे आम्ही म्हणतो, तो जगापुढे नेणे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचे विचार आणि कृतीतील व्यापकत्व जगभरातील लोकांपर्यंत पोचविणे हा आपल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा उद्देश आहे.
दोन प्रमुख व्यक्तींनी आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहावे यासाठी आपण प्रयत्नशील होतो. एक म्हणजे मलाला युसूफजाई आणि दुसरे डॉ. अमर्त्य सेन. दोन्ही मान्यवर हे ‘नोबेल’ पुरस्कृत आहेत. जेव्हा तुम्ही मानवतावाद स्वीकारता, तेव्हा त्यात हिंसेला स्थान नसते. मलाला ही अशा सर्वच हिंसेच्या विरोधात उभी राहिलेली जगभरातील सर्वोच्च प्रतीक आहे आणि तरुणांची ‘आयकॉन’ आहे. तेव्हा आपल्या दिवंगत नेत्याच्या शहिदत्वानिमित्त आपण मागील काही वर्षे ‘हिंसा के खिलाफ – मानवताकी ओर’ असे अभियान चालवतो त्यातील मानवतावादाचा आणि हिंसेला विरोध करण्याचा जागतिक सहसंबंध अधोरेखित करण्यासाठी मलालाची उपस्थिती आवश्यक होती.
दुसर्या बाजूला, डॉ. अमर्त्य सेन हे भारतीय वंशाचे असे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ आहेत, ज्यांनी जगातील विकास मोजण्याचा निर्देशांक हा मानवकेंद्री केला आणि जगभर आता राष्ट्राची प्रगती भौतिक साधनांनी नव्हे, तर मानव विकास निर्देशांकात मोजली जाऊ लागली आहे.
हे दोन्ही संदर्भ लक्षात घेऊन आपण या दोघांच्या उपस्थितीसाठी प्रयत्नशील होतो. संपर्क, संवाद साधत होतो. पण सुरक्षेच्या कारणाने मलाला आणि इतर अनेक व्याप व व्यस्ततेमुळे डॉ. अमर्त्य सेन यांचे परिषदेला येणे आता शक्य दिसत नाही. पण त्यांचा काही दृक्श्राव्य संवाद त्यावेळी होऊ शकतो का ? असा प्रयत्न सुरू आहे.
त्रिदशकपूर्तीनिमित्त प्रकाशित करावयाच्या महाराष्ट्र अं.नि.स. त्रिदशकपूर्ती ‘विवेक जागर विशेषांक’ साठीचे लेखनही ठरल्यानुसार उपलब्ध होत आहे. ते काम खूपच जास्त वेळ खाणारे, किचकट आणि चिकाटीचे आहे. अगदी अंतिम टप्प्यातच लेखन आणि जाहिरातींचे मजकूर उपलब्ध होतात, त्यामुळे वेळेत अंक प्रसिद्ध करण्यासाठी प्रचंड तारेवरची कसरत करावी लागते. एका बाजूला अंक दर्जेदार होण्याचा आणि दुसर्या बाजूला कोणा देणगीदार-जाहिरातदारांबद्दलचे काही छापायचे राहून जाऊ नये, याचा दुहेरी दबाव व ताण असतो. पण संपादक मंडळ आणि व्यवस्थापकीय यंत्रणा मर्यादित मनुष्यबळावर देखील ते पूर्ण करीत आहे.
या सर्वांसाठी जो मोठा खर्च आहे, तो उभा करण्यासाठी नेहमीच्या सवयीनुसार कार्यकर्ते ऊशिरा म्हणजे अगदी शेवटच्या टप्प्यात कामाला लागले आहेत. त्यामध्ये देखील फारच मोजके कार्यकर्ते देणग्या व जाहिरातीसाठी प्रयत्न करतांना दिसतात. आपण निधी संकलनाबाबत फारच संकोची आहोत. पण आता जी माहिती मिळत आहे, ती निश्चितच आशादायी आहे.
त्रिदशकपूर्तीसंदर्भात महाराष्ट्र विधिमंडळाच्या मुंबईतील अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री, आमदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना माहिती दिली. त्यांना जाहिराती व देणग्यांबाबत आवाहन केले. तसेच आम्ही प्रत्यक्ष दिल्लीत जाऊन महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरींपासून प्रकाश जावडेकर, रामदास आठवलेंपर्यंत महाराष्ट्रातील मंत्र्यांची भेट घेतली. तसेच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांना भेटलो. मुंबई-दिल्लीतील सर्वांचाच प्रतिसाद अतिशय सकारात्मक व उत्साह देणारा होता. दिल्ली भेटीत इतर अनेक सामाजिक, सांस्कृतिक माध्यमांतील मान्यवरांच्या भेटी झाल्या.
त्रिदशकपूर्तीची ऑनलाईन नोंदणी आपण केली असेलच. आपणही आपल्या कुटुंबासह अधिवेशनाला उपस्थित राहून हा आनंद सोहळा सर्वांच्या सहभागाने, सर्वांच्या साक्षीने देखणा, अविस्मरणीय आणि जागतिक पातळीवर महाराष्ट्र अंनिसचा अमीट ठसा उमटवणारा करावा, ही विनंती. आपण सर्वांचा सहभाग आणि योगदानातून त्रिदशकपूर्ती सोहळा यशस्वी होऊन त्यातून प्रेरणा व ऊर्जा घेत आपण भविष्यवेधी झेप घेणार आहोत, यासाठी सज्ज होऊ या !
फुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर !
आपला स्नेहांकित
अविनाश पाटील