–उमेश सूर्यवंशी
“इतिहास हा माणसाला शहाणपण प्राप्त करून देणारा विषय आहे.” असे विचारवंत ‘फ्रान्सिस बेकिन’ म्हणाला होता. याचे प्रत्यंतर नुकतेच ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे दोन अंकी नाटक पाहताना आला. जालन्यातील शेतकर्यांच्या पोरांनी लिहिलेले व नाट्याभिनय केलेले हे नाटक आहे, ना आकर्षक, ना भव्यदिव्य रंगमंच, ना प्रथितयश ‘नावाजलेले’ कलाकार. असे असूनसुद्धा दोन तासांचे हे नाटक आत्मभान देणारे, पुरोगामी व सम्यक दृष्टी बाळगणारे, संतुलित विचारांचे आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगताना केवळ अफझलखान वध, आग्र्याची कैद व सुटका, शाहिस्तेखानावर हल्ला अशा वीरवृत्तीचाच परिचय करून देण्यात आला. तथापि केवळ लढाया करण्यातच शिवाजीराजांचा पराक्रम मर्यादित नव्हता तर त्यांनी शेतकर्यांसाठी राबवलेले जमीन मोजणीचे धोरण, स्त्रिया व गुलामांच्या विक्रीला केलेला प्रतिबंध, झाडांचे महत्व ओळखून पर्यावरणाची घेतलेली काळजी, सर्व धर्मियांना समानतेने वागवणारा परधर्मसहिष्णु राजा, शुद्राला ‘वीर’ बनवणारा राजा, अंधश्रद्धांचे निर्मूलन करणारा राजा अशी विविध रूपातून शिवाजीराजांच्या नीतीमूल्यांचा व परोपकारी व दूरदृष्टी धोरणांचा परिचय हे नाटक करून देते.
देवाधिदेव इंद्र मृत्यूदेव यमाला पृथ्वीवरून शिवाजीमहाराजांना त्यांच्या विचारांसकट स्वर्गात घेऊन येण्याचा आदेश देतो. ‘यम’ पृथ्वीवर येऊन शिवरायांना घेऊन स्वर्गाकडे चालला असताना वाटेत भोजनासाठी थांबतो. तेव्हा त्याच्या लक्षात येते की, शिवराय आपले ‘विचार’ पृथ्वीवर ठेवून आले आहेत. तेव्हा शिवराय यमाकडे आपला ‘जिरेटोप’ जामीन ठेवून आपले विचार पृथ्वीवरून घेऊन येतो असं सांगून यमाच्या हातावर ‘तुरी’ देऊन निसटतात. इंद्र संतप्त होऊन यमाला सस्पेंड करतो आणि पृथ्वीवरून शिवाजीराजाला त्यांच्या विचारासकट घेऊन येण्यास बजावतो. ‘यम’ पुन्हा ‘शिवाजी’ शोधायला पृथ्वीवर येतो. 350 वर्षांहून अधिक काळ तो शोध घेतच राहतो. दरम्यानच्या काळातील अनेक घटनांचा साक्षीदार बनतो. यातूनच शिवजयंतीच्या निमित्ताने केवळ ‘जय शिवाजी, जय भवानी’ अशा घोषणा देऊन शिवरायांचा विचार दाबून आपले हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी खपणार्या अक्का, दादा, युवा नेता अशा माध्यमातून प्रतिगामी शक्ती कार्यरत होत असतात. ऐन टाईमाला लावणीचा कार्यक्रम रद्द होतो व त्या ठिकाणी शाहीरी पोवाड्याचा कार्यक्रम निश्चित होतो. यातूनच दलित समाजातील ‘सोंगाड्या’ व शिवशाहीरांची शिवरायांच्या जीवनावरील ‘जुगलबंदीचा’ कार्यक्रम होऊन त्यात प्रतिगाम्यांचा पराभव होतो. शिवरायांच्या विचारांचा अंगिकार केल्यास प्रतिगाम्यांच्या हितसंबंधी क्लृपत्यांना ‘बळी’ न पडता आपण हे जीवन एकमेकांच्या सहकार्याने, प्रेमाने सजवू शकतो असा या नाटकाचा थोडक्यात आशय व संदेश.
राजकुमार तांगडे या सर्वसामान्य तरूणाने लिहिलेल्या या नाटकातील संवाद अत्यंत विचारप्रवण व प्रबोधनपर आहेत. “शिवाजीला धर्माची नसून धर्माला मोठं होण्यासाठी शिवाजीचा आधार घ्यावा लागतो.” “जे पुस्तक माणसाला माणसापासून तोडतं ते खोटं पुस्तक व जे पुस्तक माणसाला माणसाशी जोडतं ते खरं पुस्तक”, “जे सांगायचं ते सांगून झालं आता न सांगितलेलं सांगण्याची वेळ आली आहे”, “खोट्या इतिहासाचा वापर करून दंगे पेटवतात”, “शिवाजीला डोक्याच्या कवटीत न ठेवता कवटीतील मेंदूत जपावा लागेल” असे एकापेक्षा एक सरस संवाद या नाटकाचे ‘विचारमूल्य’ एका उंचीवर नेऊन ठेवतात. शाहिरीच्या माध्यमातून अत्यंत वजनदार पद्धतीने समकालिन व्यवस्थेचा ‘उपरोध’ व्यक्त झाला आहे. आजच्या व्यवस्थेवर अत्यंत कठोरपणे केलेले ‘भाष्य’ अत्यंत ज्वालाग्राही आहे.
‘नंदू माधव’ या एकमेव प्रथितयश कलाकाराने या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकाच्या माध्यमातून आपली ऐतिहासिक व सामाजिक जाणीव अत्यंत निरपेक्षपणे व्यक्त केली आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील पोरांना अत्यंत परिणामकारक पद्धतीने रंगमंचावर सादर करण्यात दिग्दर्शकाचे असामान्य कौशल्य आहे. म्हणूनच नाटकातील लहानात लहान ‘व्यक्तीरेखा’सुद्धा लक्षात राहते. लेखकाचा ‘सत्यशोधकी विचार’ अत्यंत परिणामकारक पद्धतीने सादर करून दिग्दर्शकाने लेखकाशी ‘समर्पक न्याय’ केला आहे. या नाटकाच्या निमित्ताने नंदू माधव हे नाव परिवर्तनवादी चळवळीशी ‘नाळ’ जुळण्यात यशस्वी झाले आहे यात शंकाच नाही.
नाटकातील प्रत्येक कलाकाराने अत्यंत समरसून व जबाबदारीने आपली भूमिका पार पाडली आहे. त्यामुळेच अभिनयात ना कुणी ‘डावा’ ठरतो ना कुणी ‘उजवा’. लेखक, दिग्दर्शक व कलाकार यांचे हे ‘टीमवर्क’ अत्यंत संतुलित झाले आहे. या नाटकाची संकल्पना, संगीत शाहीर संभाजी भगत यांची आहे. ‘शाहीर हा काळाचा भाष्यकार असतो’ असं म्हणतात. संभाजी भगतांच्या लेखणीला व वाणीला हे वाक्य चपखल लागू पडते.
एकूणच हे नाटक पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळीत कार्य करणार्या कार्यकर्त्यांची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोचवण्यात व बहुजनांची ‘सांस्कृतिक भूक’ भागवण्यात यशस्वी ठरले आहे. ‘शिवाजी महाराज’ या व्यक्तीरेखेवर आजवर अनेक ग्रंथ, अनेक पुस्तिका, नाटके, चित्रपट निर्माण झालेत. यातील बहुतेक माध्यमे ‘पोपटपंची शिवचरित्र’ सांगण्यात रस मानतात. पण या नाटकाने शिवरायांची एक वेगळी प्रतिमा विवेकपूर्ण रीतीने उभा केली आहे. या नाटकासाठी बर्याच पुरोगामी लेखकांचा संदर्भ वापरला असला तरीही या नाटकाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीने आपल्या चोख जबाबदारीने नाटकात ‘प्राण’ ओतला आहे.
स्वराज्याच्या स्थापनेत 35% मुस्लिम सैन्याचा बहुमोल वाटा असताना केवळ ‘इतिहास’ चुकीच्या पद्धतीने लिहिल्याने शिवाजी विरूद्ध मुसलमान असे अतिरंजीत चित्र आजपर्यंतच्या नाटक चित्रपटातून उभे राहिले होते. यात प्रतिगामी वर्गाचे हितसंबंध होते. तथापि ही कोंडी फोडून ‘खरे शिवचरित्र’ लोकांना समजावे व शिवरायांच्या आदर्श जीवनाचा परिचय होऊन त्या दिशेने समाजव्यवस्था निर्माण होण्यासाठी एक पाऊल पुढे पडावे या दृष्टीने या नाटकाचे ऐतिहासिक महत्व आहे. “माझ्या दहा भाषणांपेक्षा वामनदादांचा एक जलसा भारी आहे.” असे उद्गार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काढले होते. तेच उद्गार या नाटकालाही समर्पकरित्या लागू होतात. ज्या लोकांना वाचण्याचा कंटाळा येतो किंवा जे लोक इतिहास, कादंबरीतून शोधतात त्या सर्वांनी हे ‘नाटक’ जरूर पहावे. यातून त्यांना ‘शहाणपण’ नक्कीच प्राप्त होईल.
ज्या महात्मा फुलेंनी शिवरायांची रायगडावरील समाधी शोधून काढली, सर्वप्रथम शिवजयंती साजरी केली, शिवरायांवर पोवाडा लिहिला त्याच जोतीरावांनी तत्कालिन सनातन्यांना दिलेला ‘इशारा’ आठवतो. फुले म्हणतात, “हे धर्मग्रंथ वेळीच जाळा, अन्यथा बहुजनांची मुले शिकतील आणि धर्मग्रंथ वाचतील तेव्हा यातील लबाड्या पाहून ते नुसते धर्मग्रंथच जाळणार नाहीत, धर्मग्रंथ जवळ बाळगणार्यांनाही जाळतील.” हे नाटक फुलेंच्या इशार्यावर शिक्कामोर्तब करते. हे नाटक खर्या अर्थाने फुले विचारांचा ‘सत्यशोधकी जलसा’ आहे.