Categories
पुस्तक परिचय

शिवकालीन व्यसनमुक्ती व चिंतनाचा मार्ग

फेब्रुवारी – २०१२

            भाऊसाहेब येवले, राहुरी यांची ‘शिवकालीन व्यसनमुक्ती’ व ‘चिंतनाचा मार्ग’ ही पुस्तके परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना बौद्धिक व वैचारिक खाद्य पुरवणारी आहेत. येवले यांनी मधमाशीने कणाकणाने मध गोळा करावा तसे संदर्भ गोळा केेले. युवा पिढी आणि प्रत्येक कुटुंबात असावे असे हे पुस्तक आहे. त्यात शिवशाहीतील व्यसनमुक्तीचा लक्ष्यवेधी आढावा आणि संदर्भांची जोड आहे. ‘शिवकालीन व्यसनमुक्ती’ व ‘चिंतनाचा मार्ग’ या दोन्ही पुस्तकांची मुखपृष्ठे उल्लेखनीय आहेत. नितीन देशमुख यांच्या कल्पनेतून रेखाटलेली ही मुखपृष्ठे पुस्तकांच्या जमेची बाजू होत. ‘चिंतनाचा मार्ग’ या ग्रंथात 30 वैचारिक लेख आहेत. पर्यावरण, अंधश्रद्धा निर्मूलन, वाचन, संभाषण या विषयांवरील लेखनाद्वारे व्यक्तीमत्व विकासाचे प्रभावी चिंतन आहे. वाढदिवस, लग्नसमारंभ या निमित्त मित्र-परिवाराला भेट देण्यासाठी हे दोन्ही ग्रंथ उपयुक्त आहेत. पुस्तकांच्या विक्रीतून मिळालेला नफा व्यसनमुक्तीसाठी वापरला जाणार आहे. जय व्यसनमुक्ती प्रकाशन राहुरीची प्रकाशन व्यवसायातील धडपड व धावपळ साने गुरूजींच्या धडपडणार्‍या मुलांची आठवण करून देते.

            याच प्रकाशनाने प्रा.विनायक बंगाळ यांचे अंनिसचा ‘झुंजार वाघ’ हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. पुस्तकाचे प्रकाशन हक्क वाचकांच्या स्वाधीन आहेत. बंगाळ सरांच्या पश्चात हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. डॉ.मच्छिंद्र गणपत वाघ हे चळवळीत झोकून देऊन काम करणार्‍यांचे प्रतीक होत. वाघांना नीट लिहीता येत नाही, बंगाळ सरांना नीट दिसत नव्हते. तरीही या जोडगोळीने एकत्र परिश्रम करून इतरांकडून हे पुस्तक लिहून घेतले. वाघांचे हे चरित्र कर्तृत्वाचा ठसा उमटवू पाहणार्‍या तरूणाईला प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. डॉ.वाघांचे चरित्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा छोटेखानी इतिहास आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची प्रस्तावना कार्यकर्त्यांची बांधिलकी अधोरेखित करणारी आहे. नेवाश्यासारख्या खेड्यात अनिष्ट प्रथांविरूद्ध रान उठवणारे डॉ.वाघ यांचे आयुष्य विज्ञाननिष्ठ व विवेकी मनांची मशागत करेल.

            ‘न्यायालयाचा परिसर’ हा लेखनासाठी वेगळा विषय निवडून बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड.के.बी.हन्नूरकर यांचा ‘चक्षुर्वैसत्यम’ हा कथासंग्रह आकाराला आला आहे. ज्येष्ठ लेखक द.मा.मिरासदार यांच्या हस्ते या संग्रहाचे प्रकाशन झाले. डोळ्यांनी पाहिले, जाणिवांनी अनुभवलेले सत्य मांडले आहे. पिळवणूक, दांभिकपणा, अनैतिकता यावर प्रहार केले आहेत. राजकीय व भ्रष्ट शक्तींना बळी पडणार्‍या सामान्य माणसाच्या वेदना शब्दबद्ध झाल्या आहेत. ज्येष्ठ समीक्षक प्र.म.द.हातकणंगलेकर यांनी आपल्या प्रस्तावनेत म्हटले आहे की, ‘चक्षुर्वैसत्यम या कथासंग्रहात वाचनीय कोर्ट कथा आहेत. पाहिलेले व वाचलेले अनुभव प्रत्यक्ष वाचणे हा मनोज्ञ अनुभव आहे. हा कथासंग्रह वाचकांना गुंग करून सोडेल.’ मुदत, यशाचे गमक, सहकार महर्षी वकीली कसब आदि 15 कथा आहेत. सार्वजनिक संस्थांचे खटले मोफत चालवणार्‍या अ‍ॅड.के.बी.हन्नूरकर यांचा हा कथासंग्रह वेगळ्या वाटेने जाणारा असल्यामुळे वाचकप्रिय होईल.

            पत्रकार गुरूबाळ माळी यांनी ‘कोल्हापुरी फटका’ हा आपला लेखसंग्रह कुटुंबियांना अर्पण केला आहे. अनिष्ट प्रथांवर प्रहार व विधायक वृत्तींना प्रोत्साहन हे त्यांच्या लेखनाचे सूत्र आहे. माळी यांच्या पंचवीस लेखांत विधायकतेचा उत्साह व तळमळ आहे. सर्व लेखांतून बदलते कोल्हापूर नेमकेपणाने सादर केले आहे. राजकारणी नेते व राजकारणांतील अपप्रवृत्तींवर माळी यांनी जोरदार आक्रमण केले आहे. सामान्य माणसांच्या प्रश्नांबद्दलची संवेदनशीलता लक्षवेधी आहे. राजन गवस यांनी आपल्या प्रस्तावनेत, ‘कोल्हापुरी फटका या ग्रंथात कोल्हापूरचे मानस सशक्तपणे प्रत्ययास येते. हा ग्रंथ कोल्हापुरच्या उद्याच्या संशोधनास मदत करील असे म्हटले आहे.’ ‘ग्राहक राजा’, ‘मत-महोत्सव’, ‘घोडेबाजार’ हे लेख वाचनीय आहेत.

– संजय थोरात