Categories
आवाहन

श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूर – आवाहन

मे - २०१२

कोल्हापूरमधून श्रमिक प्रतिष्ठान या संस्थेमार्फत आम्ही जे अनेक उपक्रम गेली सुमारे 12 ते 15 वर्षे राबवितो त्याची थोडीफार माहिती आपणास असेलच.

            एकाच विषयावर 8 ते 10 व्याख्याने आयोजित करून ती सर्व व्याख्याने लिहून काढून पुस्तक रूपाने प्रकाशित करणे असा एक उपक्रम सुरू आहे. ही व्याख्यानमाला कॉ.अवि पानसरे व्याख्यानमाला या नावाने चालविली जाते. आजवर या व्याख्यानमालेत जागतिकीकरणाचे परिणाम, शिक्षण, शेती, धर्म, जात आणि वर्ग, एन.जी.ओ. संयुक्त महाराष्ट्राची 50 वर्षे इ. विषयावर सलग 8 दिवस व्याख्याने झाली. ही सर्व व्याख्याने लिहून काढून पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली आहेत. यातील काही पुस्तकांच्या दोन-दोन/तीन-तीन आवृत्त्या प्रसिद्ध कराव्या लागल्या आहेत. महाराष्ट्रातून सर्व पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे मन:पूर्वक स्वागत केले आहे.

            काही विषयावर नामवंत लेखकांकडून विषय देऊन लिखाण करवून घेऊन तेही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. श्रमिक प्रतिष्ठानच्या मार्फत मुख्यत: अशा रितीने आणि अन्य मार्गाने प्रबोधनाचे कार्य सुरू असते. आता अलिकडे अजून पूर्णत्वास न गेलेला एक उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. ज्यांनी कोल्हापूरची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक अंगाने जडणघडण केली अशा दिवंगत व्यक्तींची छोटी छोटी चरित्रे लिहून घेऊन ती प्रसिद्ध करीत आहोत. येत्या दोन/तीन महिन्यात या चरित्रमालेच्या पहिल्या 10 ते 12 चरित्रांच्या संग्रहाचे प्रकाशन करू शकू असे वाटते.

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी : पर्यायी दृष्टिकोन

            येथून पुढे दरवर्षी एक मध्यम आकाराचा ग्रंथ प्रकाशित करावा अशी योजना आहे. दिल्लीहून गेली 10-12 वर्षे Alternative Economica Survey या शिर्षकाचा इंग्रजी भाषेतील ग्रंथ प्रकाशित होत आला आहे. तसाच दरवर्षी एक ग्रंथ मराठी भाषेत प्रकाशित करण्याची योजना आहे.

            महाराष्ट्राच्या मुख्यत: आर्थिक जीवनाचे वेगवेगळे भाग कल्पून एका-एका भागासाठी किंवा पोटभागासाठी विषय निश्चित करून लेखक ठरविण्यात आले आहेत आणि त्यांचेकडून लिखाण मागविण्यात येत आहे. बहुसंख्य समाजाच्या हिताची बांधिलकी स्वीकारून अभ्यास करणारे आणि लिखाण करणारे, व्याख्याने देणारे अशा महाराष्ट्रातील सुमारे 40-50 व्यक्तींची नावे निवडण्यात आली आहेत. मुख्यत: पुरोगामी डाव्या विचारांचे आणि श्रमिकांची बाजू लावून धरणारे लेखक व कार्यकर्ते निवडण्यात आले आहेत.

            हा प्रस्तावित ग्रंथ सरकारी पाहणी व दृष्टिकोन याखेरीज एक पर्यायी पाहणी व दृष्टिकोन मांडील अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या समाज जीवनातील विविध भागाची स्थिती सुलभतेने मांडणे, शेतकरी, शेतमजूर, संघटीत व असंघटीत कामगार, महिला, वंचित व उपेक्षित गट या सर्वांबद्दलची वस्तुस्थितीची मांडणी करणे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा बाबतीत वास्तव काय आहे हे मांडणे. सरकारची या संबंधी धोरणे काय आहेत व पर्यायी धोरणे काय असावीत हे मांडणे. आंदोलनाना वैचारिक बळ प्राप्त करून देणे, अभ्यासकांना योग्य दृष्टिकोन स्वीकारण्यात मदत व्हावी. जनतेच्या चळवळी करणारे कार्यकर्ते यांना उपयुक्त माहिती पुरविणे. उपयुक्त तर्क पुरविणे, शासकीय मांडणीमधील चुका साधारणपणे दाखविणे इ.हेतू आहेत. या ग्रंथाची निर्मिती तूर्त खालील व्यक्तींनी स्वीकारली आहे.

संपादक : अ‍ॅड.गोविंदराव पानसरे

कार्यकारी संपादक : प्रा.डॉ.जे.एफ.पाटील

सहाय्यक संपादक : प्रा.सुनिता अमृतसागर

संपादक मंडळ : श्रीनिवास खांदेवाले, गजानन खातू, सुभाष वारे, डॉ.पी.बी.कुलकर्णी, डॉ.बी.एस.म्हस्के, डॉ.राहुल म्होपरे, डॉ.संतोष यादव

सल्लागार मंडळ : डॉ.अशोक चौसाळकर, दत्ता देसाई, अनंत दिक्षीत, उत्तम कांबळे, भारती पाटील, दशरथ पारेकर, उदय नारकर.

प्रकाशक : श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर

            हा व्यावसायिक उपक्रम नसल्याने किमान पक्षी छपाई व इतर खर्च निघावा अशी ग्रंथाची किंमत ठेवण्यात येईल. हे ग्रंथ प्रसिद्धीनंतर आपण आवर्जून संग्रही ठेवावे असे आवाहन.

कॉ.गोविंदराव पानसरे

श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर