ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी रावसाहेब शिंदे सद्भावनादिनानिमित्त श्रीरामपूर(जि.नगर) येथील तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री जन्माचे स्वागत इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तिन्ही कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
एकलहरे येथील आठवाडी परिसरात व्यसनाधिनतेने ग्रासलेल्या भागात व्यसनमुक्तीचा कार्यक्रम संपन्न झाला. समितीचे राज्य सभासद डॉ.मच्छिंद्र वाघ यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली प्रथम गावातून व्यसनाने सजविलेल्या तिरडीची अंत्ययात्रा काढली. व्यसन सोडण्याची प्रतिज्ञा दिल्यानंतर उपस्थितांपैकी काहींनी व्यसन सोडण्याचा निश्चय केला. त्यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर व्यसनाधिनतेच्या अंत्यायात्रेमध्ये डॉ.मच्छिंद्र वाघ यांनी महिलेच्या भुमिकेत तर दादासाहेब साठे यांनी व्यसनाच्या भुमिकेत प्रभावी नाट्य सादर केले. व्यसनाधीन वस्तूची होळी करण्यात आली. गावातील दुकानांमध्ये व्यसनी वस्तू विक्रीस ठेवू नये असा ठराव आम्ही करू असे सरपंच यांनी अध्यक्ष पदावरून बोलतांना सांगितले.
शिरसगाव येथे “स्त्री जन्माचे स्वागत करा” हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या जिल्हा कार्याध्यक्ष अॅड.रंजना पगार गवांदे व प्रमुख अतिथी म्हणून डॉ.मच्छिंद्र वाघ उपस्थित होते. यावेळी प्रथम मुलींना जन्म देणार्या मातेचा अॅड.रंजना गवांदे यांच्या हस्ते सन्मान करून महाराष्ट्र अंनिसच्या वतीने ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ हे पोस्टर्स ग्रामपंचायत व गावातील विविध संस्थांना मोफत वितरीत करण्यात आले.
– दादासाहेब साठे, श्रीरामपूर, जि. अहमदनगर