Categories
कायदा

खा. सुप्रियाताई सुळे यांच्या सहीने जादूटोणा विरोधी कायद्यासाठी सह्यांचे अभियान

मार्च - २०१३

दि. 19 फेब्रुवारी रोजी जादूटोणा विरोधी कायद्याची  14 वर्षे चाललेली फरपट थांबावी व कायदा पारित व्हावा यासाठी 14 हजार सह्यांचे व्यक्तिगत निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्याच्या अभियानाची सुरुवात पुण्यातील महात्मा फुले यांच्या वाड्यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी निवेदनावर सही करून झाली. जेष्ठ विवेकवादी विचारवंत आणि अभिनेते श्रीराम लागू, माजी पोलिस महानिरीक्षक अशोक धिवरे,राष्ट्रवादीचे आमदार अड. जयदेव गायकवाड, प्रसिद्ध समीक्षक आणि माजी मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष रा.ग.जाधव व संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अभय टिळक, स्त्रीवादी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई बाळ यांनीही याप्रसंगी उपस्थित राहून निवेदनावर सही करून सरकारकडे जादूटोणा विरोधी कायद्याची फरपट थांबावी यासाठी आग्रह धरला.

सुप्रियाताई सुळे याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की,   “सरकारसह सर्वांचा या कायद्याला पाठींबा आहे, समाज परिवर्तनासाठी हा कायदा महत्वाचा असून आजही अनेक ठिकाणी जी अमानुष कृत्यें धर्माच्या नावाखाली चालली आहेत त्याला या कायद्याने प्रतिबंध बसेल असा विश्वास वाटतो.  21 व्या शतकात जगताना आजही अनेक अंधश्रद्धा आपण प्राणपणाने पाळतो हे खेदजनक असून यातून केवळ समाज मागे जाणार आहे. त्यामुळे हा कायदा महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित करेल म्हणून मी स्वतः केवळ खासदार म्हणून नाही तर एक गृहिणी म्हणूनही मुख्यमंत्री यांची भेट घेऊन जादूटोणा विरोधी कायद्यासाठी आग्रह धरेन” सुप्रियाताई सुळे यांनी जादूटोणा विरोधी कायदा व्हावा अशी भूमिका घेतली. याच प्रसंगी आमदार जयदेव गायकवाड यांनी देखील आम्ही हा कायदा विधानभवनात एकमताने करण्यासाठी आग्रही राहू असे सांगितले वारकर्‍यांनी देखील या कायद्याला पाठींबा दिला आहे असेही ते म्हणाले.

समाज परिवर्तनासाठी कायदे करीत असताना हितसंबंधी गट कायम विरोधासाठी विरोधाची भूमिका घेत असतो आणि केवळ चर्चा करा असे सांगत वेळ मारून नेतो. त्यांच्या विरोध करण्याच्या भूमिकेत काही तथ्य नसते,उलट समाज परिवर्तन होऊ नये अशी त्यांची भूमिका असते व ती आत्मघातकी असते. अशा राजकीय भूमिका मोडूनच सरकारला समाज परिवर्तनाचे कायदे करावे लागतात, म्हणून जर या कायद्याला कुणी विरोध करीत असेल तर समाजहीत लक्षात घेता सरकारने हा कायदा येत्या अधिवेशनातच पारित करायला हवा, असे माजी पोलिस महानिरीक्षक अशोक धिवरे यांनी मत व्यक्त केले. जेष्ट समीक्षक रा.ग.जाधव म्हणाले की, साहित्यिकांनी या कायद्याला कायम पाठींबा दिला आहे संत-कवी तुकारामाचा वारसा आम्ही चालवतो त्यामुळे साहित्यिकांनी देखील सरकारकडे या कायद्यासाठी आता सक्रिय आग्रह धरायला हवा, या कायद्यामुळे समाज परिवर्तनाची शक्यता निर्माण होईल असे ही ते म्हणाले.