Categories
अभिवादन

सूर्य पाहिलेला मी!

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रात शोकव्याकुळता आहे, संताप आहे. तुम्ही विचार करायला का घाबरता, असा रोकडा सवाल विचारणार्‍या आगरकरांचाही इथे खून नाही झाला. खून ना फुल्यांचा झाला, ना राजा राममोहन रॉय यांचा. अठराव्या, एकोणीसाव्या, विसाव्या शतकातील प्रतिगामी व्यवस्थेत जे घडले नाही, ते एकविसाव्या शतकात, लोकशाही व्यवस्थेत, ज्ञानाधारित समाजात घडावे! या संदर्भात चिंतन आणि आत्मपरीक्षणाची अपरिहार्यता जाणवत आहे. पुरोगामी शक्तींना नव्या दिशेचा प्रवास खुणावत आहे. डॉ. दाभोलकर हा उत्तुंग उंचीचा अफाट माणूस. माझे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड. या तेजस्वी माणसाच्या व्यक्तिगत संदर्भातील आठवणींची काही पाने उलगडताना एक मुलुखावेगळे पर्व दिसू लागते!

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मी पहिल्यांदा भेटलो ते सातार्‍यात. तिथे एक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर होते. मी तेव्हा कॉलेजात होतो. या शिबिरात दाभोलकर सर्वप्रथम भेटले. ते जे बोलले ते एवढे वेगळे होते आणि तरीही अशा सुरेल, संयत पद्धतीने डॉक्टर ते मांडत होते की मला धक्काच बसला. तेव्हा कॉलेजात असल्याने, विद्रोहाची भलती हौस होती. एखादी गोष्ट मान्य करण्याऐवजी ती नाकारण्यात फुशारकी वाटावी, असे ते दिवस. कॉलेजातील छात्रभारती या विद्यार्र्थी संघटनेचा मी अध्यक्ष. त्यामुळे आज याच्याशी वैचारिक भांडण, उद्या त्याच्या विरोधात मोर्चा असले उद्योग अखंड चाललेले. मतभेद व्यक्त करायचे ते चढ्या आवाजात आणि प्रतिपक्षाला नामोहरम करत, अशी सवयच जडलेली. मग जेत्याच्या आवेशात पराक्रम साजरा करायचा, वगैरे. पण, दाभोलकर हे रसायन अद्भुत होतं.

आम्ही जी चढाई करत असू त्यापेक्षा धारदार मुद्दे मांडत असूनही, त्यांचा तोल ढळत नसे आणि आपल्याला जे नेमके बोलायचे त्याचा विसरही पडत नसे. त्यांचे ते समतोल, संयत रुप पाहून मी थक्कच झालो होतो. आपल्या एकेका शब्दाने धर्मसत्तेला आव्हान देणारा, पारंपरिक धारणांचे राजवाडे उद्ध्वस्त करणारा, अनेकांच्या दुकानांना सुरुंग लावणारा आणि तरीही कोणतेही व्यक्तिगत हितसंबंध नसलेला असा स्थितप्रज्ञ फकीर होता हा!

मग मी या माणसाच्या आकंठ प्रेमात बुडून गेलो. ते वयही तसे होते. एकतर, कोणताही माणूस मूर्ख वाटावा, अशी वयोदत्त मस्ती आणि त्याचवेळी कोणी आवडले तर ते थेट हृदयात विराजमान व्हावे, अशी आसक्ती. प्रेमात पडण्याचेच वय ते. आणि, द्वेष, विखार वाढवणारेही!

त्या अधिष्ठानावर तर मी आज उभा आहे.

दाभोळकरांनी जे पेरले ते किती उगवले माहीत नाही, पण त्यांचे पेरणारे हात मला नेहमीच खुणावत राहिले, हे खरे. पेरणारे कमी असतात, पण तरी अगदी अपवाद नसतात.

अपवाद असतात ते पेरल्यानंतर पिकांची हिशेबी राखण करणारे दाभोलकर या बाबतीत महागुरु. म्हणजे, ते माणूस अर्ध्यात टाकून जात नसत. त्याला घट्ट पकडून ठेवत. त्याला कामाला लावत आणि त्याच्याकडून चळवळीची कामेही करुन घेत. त्या बाबतीत ते पक्के धोरणी आणि हिशेबी.

मी असा भटका-विमुक्त. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबई, पुणे अशा सर्वदूर पथारी टाकणारा. पण, या प्रत्येक ठिकाणी दाभोलकर नवनव्या रुपात भेटत गेले. कमालीचा व्यवस्थापनकुशल, केडर बांधणारा, चळवळीसाठी खुबीने माणसे जोडणारा, मार्केटिंग करणारा, आंदोलनांसाठी पैसे मिळवणारा आणि तरीही वैचारिक भूमिकांवर अविचल असणारा हा अद्भुत माणूस. मी तर सोडाच, कारण मला ही सगळी बाधा केव्हाच झाली होती. पण, काठावर उभ्या असणार्‍या भल्याभल्यांना डॉक्टरांनी आत ओढले आणि त्यांना पैलतीरावर पोहोचवले. ते बाकीचे महाराज परवडले, पण हा असा बाबा होता की त्या संमोहनातून सुटणे अशक्यच होते.

डॉ. श्रीराम लागू आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या वादविवादाचा एक अफलातून कार्यक्रम डॉक्टरांनी तयार केला होता. त्याचे सूत्रसंचालन मीही करत असे.

स्वतः तर वेगळ्या वाटा चोखाळल्याच, पण सगळ्यांना कामाला लावले हो या माणसाने. रीमा लागू असो की नाना पाटेकर, सदाशिव अमरापूरकर असोत की खुद्द श्रीराम लागू अथवा निळू फुले, मृणाल कुलकर्णी असो वा थोरली सोनाली कुलकर्णी, किंवा प्रतीक्षा लोणकर असो अथवा चंद्रकांत कुलकर्णी, डॉक्टर सगळ्यांना कामाला जुंपत आणि विवेकाचा रथ हाकायला भाग पाडत. आपापल्या हस्तिदंती मनोर्‍यात रममाण झालेल्या साहित्यिकांनाही त्यांनी परिवर्तनवादी चळवळीशी जोडून घ्यायला लावले. साधना साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीत असताना तर डॉक्टरांच्या या सर्वंकष विचारधारेची नीट ओळख झाली.

डॉक्टरांची कमाल नेहमी वाटायची ती यासाठी कारण, विचार आणि कृती यात कमालीचे अद्वैत होते, तिथे. अखंड वाचणारे, नियमित लिहिणारे, भाषणे करणारे डॉक्टर आणि त्याचवेळी सदोदित चळवळीची व्यूहरचना आखणारे, रस्त्यावर उतरणारे डॉक्टर ही दोन्ही रुपे विलक्षण होती. आणि, एवढे सारे गंभीरपणे करुन ते कमालीचे हसतमुख, विनोदी आणि हजरजबाबी होते. आयुष्य आनंदात जगणारे होते. एरंडेल पिल्यासारखा चेहरा करुन, सक्तीने लादलेले सेवाव्रत पार पाडणारे कार्यकर्ते नव्हते ते. त्यांनी व्रत घेतले होतेच, पण ते आनंदाने जगण्यासाठी. फरक इतकाच होता की हाच आनंद त्यांना सर्वांना द्यायचा होता. आनंद ही मूठभरांची मक्तेदारी होणार नाही, याविषयी त्यांचा आग्रह होता.

सर्वच संदर्भात त्यांची ठोस अशी भूमिका होती आणि ती अंतिमतः विवेकवादाला जाऊन भिडत असे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाठी ते रस्त्यावर उतरले, तेव्हा म्हणूनच मी म्हटले होतेः डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आजवर एकही निवडणूक लढवलेली नाही. कधी लढवतील अशी शक्यता नाही. पण म्हणून काही ते अराजकीय ठरत नाहीत. उलटपक्षी राजकारणाचा खरा आणि व्यापक अर्थ कदाचित अशा लढाऊ कार्यकर्त्यांनाच उमगलेला असतो. त्यामुळेच तर एका मूलगामी कायद्याच्या निर्धाराने ते बाहेर पडले! असा हा माणूस. तेजस्वी. पायवाटेला प्रकाशवाटा करणारा.

शरीराला निव्वळ सुखोपभोगाचे नाही तर ध्येयाचे साधन मानत रोज मॉर्निंग वॉक, व्यायाम यात सकाळचा काही वेळ व्यतित करणार्‍या या व्रतस्थ माणसावर गोळ्या घातल्या जाव्यात, भर दिवसा, पुण्यात, हे संतापाचा कडेलोट करणारे आहे.

सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता,

या वाटेने जात त्याने कैक ठेकेदारांना आव्हान दिले… अनेकांच्या दुकानांना त्यामुळे कुलुप लागले! म्हणून, त्यांचा खून केला त्यांनी दिवसाढवळ्या.

पण मग आठवला तो पाब्लो नेरुदा. चिलीचा जागतिक कीर्तीचा कवी. त्याचा खून करण्यासाठी मारेकरी आले तेव्हा त्याने त्या मारेकर्‍यांना सांगितले, तुमच्यासाठी सर्वात धोकादायक काय असेल तर ती म्हणजे माझी कविता! मला ठार माराल, मला संपवून टाकाल, पण माझ्या या कवितेचे काय कराल? माझ्या मृत्यूनंतर तर ती तुमच्यासाठीच अधिकच धोकादायक होत जाईल.

मारेकरी शहाणे! त्यांनी त्याच्या खुनाचा बेतच रद्द केला.

पण या मूर्खांना ते समजले नाही.

डॉक्टरांच्या जाण्यामुळे घरोघरी पणत्या तेवणार आहेत. अंधाराच्या विरोधात त्या आता एल्गार पुकारणार आहेत. त्या सर्व पणत्यांचे परस्परांशी एकच नाते आहे, आम्ही सूर्य पाहिला आहेः! या सूर्याचा वारसा सांगत सर्वांनाच प्रकाशाच्या वाटेने जायचे आहे. आज मीही अभिमानाने सांगतोय, होय! मीही सूर्य पाहिलेला माणूस आहे!

संजय आवटे