बुलढाणा जिल्ह्याच्या बापूजी हरी शिंदे यांची ताराबाई एकुलती एक मुलगी. बापूजी शिंदे हे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. मराठी, इंग्रजी, संस्कृत या तिन्ही भाषांचे त्यांना चांगले ज्ञान मिळाले होते. बापूजी तेव्हा डेप्युटी कमिशनरच्या कार्यालयात हेडक्लार्कच्या पदावर नोकरीला होते. ताराबाई शिंदे यांच्यावर लहानपणापासून सत्यशोधक विचारांचे संस्कार झाले असणार. सत्यशोधकी ग्रंथ, पुस्तके त्यांना वाचायला मिळाला असणार. त्यांच्या घरी सत्यशोधक कार्यकर्त्यांची ये-जा असणार त्यांच्या चर्चा ताराबाईंनी ऐकल्या असणार. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बंडखोरी आणि विद्रोह होता. त्यांनी शिक्षण घेतले, गोषापद्धती नाकारली. ताराबाई घोड्यावर बसून कोर्ट कचेरीच्या कामास आणि शेतात जात असत. त्यांचा स्वभाव धाडसी आणि करारी होता. त्यांच्या काळात त्यांच्या गावात आणि परिसरात दबदबा होता.
‘तरी मी निरंतर मर्हाटमोळ्याचे अटकेतील गृहबंदीशाळेतील मतिहीन अबला असून माझा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे या निबंधात अतिशय कडक भाषा आहे. पण रोज पुरूषांचे साहस, धाडस व दगलबाजीची नित्य नवी भयंकर उदाहरणे दिसून येत असतानाही तिकडे कोणीच लक्ष न देता स्त्रियांवरच सर्व दोषांच्या गोणी लादतात हे पाहून स्त्री जात्याभिमानाने माझे मन अगदी खळबळून तळतळून गेले.’ अशा शब्दांत ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्री – पुरूष’ तुलना या पुस्तकाची सुरूवात केली.
ताराबाईंच्या मनात पुरूषांच्या वर्चस्वाविषयी, त्यांनी स्त्रियांवर सातत्याने आणलेल्या दबावाविषयी जी चीड साचली होती, अन्यायाविषयी जो अंगार खदखदत होता त्याचा उल्लेख व्हायला एक तात्कालिक निमित्त मिळाले. सुरतच्या एका गुजराती ब्राह्मण कुटुंबातील विजयालक्ष्मी नावाच्या विधवा स्त्रीने केलेली भ्रूणहत्या उघडकीस येऊन तिच्यावर खटला होऊन तिला प्रथम फाशीची सजा ठोठावण्यात आली. त्यामुळे मुंबई प्रांतात एकच खळबळ माजली. तिची शिक्षा कमी करावी आणि फाशी रद्द करावी यासाठी पुणे, मुंबई, सोलापूर अशा अनेक ठिकाणाहून अर्ज आले ही घटना 30 मार्च 1881 ची. हायकोर्टाने 25 मे 1881 रोजी तिची फाशीची शिक्षा रद्द करुन जन्मठेप दिली त्यावरही विजयालक्ष्मीने व अन्य लोकांनी माफीसाठी अपिल केले आणि जन्मठेप रद्द होऊन पाच वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा देण्यात आली. हा निकाल सुद्धा ताराबाईंच्या वाचनात आला होता. त्या काळातही ताराबाईंचे वाचन किती सजग होते हे लक्षात घ्या. ही बातमी 26 मे 1881 च्या टाईम्स ऑफ इंडिया मध्ये प्रसिद्ध झाली. या घटनेने पेटून उठून ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्री – पुरूष तुलना’ हा सविस्तर निबंध लिहिला. 1881 मध्ये वरील खटला चालला आणि ताराबाईंचा निबंध 1882 मध्ये प्रकाशित झाला .
निबंधाच्या पहिल्या भागात त्या विधवा तसेच विवाहित स्त्रियांच्या प्रचलित परिस्थितीचे वर्णन करतात. लेखाच्या उत्तरार्धात त्या विस्तृतपणे पुरूषांच्या वेगवेगळ्या दुर्गुणांची दखल घेतात. विधवांना पुनर्विवाहाची परवानगी नाकारल्यामुळे होणारे सारे दुुष्परिणाम त्या तपशिलाने देतात – विधवांवर बसणारा अशुभाचा शिक्का, त्यांना करावा लागणारा विद्रूपतेचा मूक स्वीकार, त्यांच्या तारूण्यसुलभ भावनांची सक्तीने केलेली गोठवणूक, त्यांना भोगावे लागणारे कष्टप्रद, अवमानयुक्त आयुष्य आणि पुरूषांच्या वासनेला बळी पडावे लागण्याचे भय हे सारे त्या स्पष्ट करतात. 1881 च्या जनगणनेच्या अहवालावरून ब्राह्मण विधवांच्या हातून पंधरा वर्षांत 12,542 बालहत्या झाल्या, अशी आकडेवारी मिळते. परिस्थितीचे गांभीर्य यावरून स्पष्ट होते. ताराबाईंना या प्रश्नाची चांगली जाण होती. तसेच विधवांच्या पुनर्विवाहावरील बंदीची प्रथा ब्राह्मणांकडून समाजातील इतर वर्गांनाही स्वीकारल्याचे त्यांना दिसत होते. ‘पुनर्विवाहाच्या बंदीची चाल महा रोगांप्रमाणे अनेक ठिकाणी व जातीत पसरली’ हे ताराबाईंचे उद्गार अर्थपूर्ण आहेत.
‘जोतीबा फुले आणि स्त्री – मुक्तीचा विचार’ या पुस्तकांत डॉ. गेल ऑम्व्हेट म्हणतात, ‘स्त्री जाती विषय अभिमान’ आणि ‘स्त्री धर्म’ किंवा ‘पातिव्रत्य’ या मुळात अन्याय करणार्या सामाजिक रचना आहेत ही समज या ताराबाईच्या विचाराच्या मुख्य दिशा होत्या. भारताच्या प्राचीन काळाची स्तुती करण्यापेक्षा, वैदिक काळ हा आदर्श म्हणून स्त्रियांना समोर ठेवण्यापेक्षा, ताराबाईंनी अत्यंत धारधार शब्दांत पुराणकथांच्या स्त्री विरोधी भूमिकांचा समाचार घेतला. “आता द्रौपदी पाच नवर्यांची बायको असून ही कर्ण महाराजांचे अंतर्यामी चिंतन करत होती का नाही? अहिल्या सुरेंद्रच्या आंकारूढ होऊन शिळा होऊन पडली. सत्यवती, कुंती असे दोन पुत्री प्रसवल्या तरी पटातच नाव! एकीने पराशर ऋषीपासून अंगाची दुर्गंधी घालवण्याकरीता ऋषी वचन मान्य केले, दुसरीने मंत्र प्रचिती पाहिली वारे देव! वारे ऋषी!”
अशा पध्दतीने ताराबाई शिंदे यांनी टीका केली. पारंपारिक पुरूषांच्या धर्मामध्ये व स्त्रियांनी पाळावयाच्या धर्मामध्ये असलेली विसंगती त्यांनी विदारकपणे पुढे आणली.
केवळ आर्थिक परिस्थितीचा विचार करून वयस्क पुरूषांना मुलगी देणारे बाप, पत्नीच्या मनाचा काही विचार न करता तिला सवत आणणारे पती, पातिव्रत्यधर्माच्या नावाखाली स्त्रीला आपल्या वर्चस्वाखाली दबवून ठेवणारे पुरूष या सार्यांचा परामर्श त्या परखडपणे घेतात. मुलीच्या प्रेमापोटी लहानपणीच तिचे लग्न करून घरजावई आणणार्या वडिलांवर त्या टीका करतात तेव्हा त्यात त्यांचा स्वानुभव प्रतिबिंबित झाला आहे, असेच वाटते. सार्वजनिक जीवनात इंग्रजांचे नोकर म्हणून, नागरिक म्हणून, पुरूषांनी उधळलेले गुण त्या धारदारपणे मांडतात. शास्त्रवेत्ते पुरूष, बुवाबाजी करणारे, भटजी, कीर्तनकार, सुधारक, या सार्यांच्या स्त्रीविरोधी मनोवृत्तीचा पाणउतारा त्या नि:संदिग्ध शब्दांत करतात.
माझे मन अगदी खळबळून, तळमळून गेले, त्यामुळे मला निर्भीड होऊन असेच खडखडीत लिहिल्यावाचून राहवेना, असे म्हणणार्या ताराबाईंचे लिखाण खरेच आक्रमक, आव्हानात्मक आहे. दुर्गुणी पुरूषांविषयी त्या अत्यंत चिडीने, उपहासाने लिहितात – “तुम्ही असे अट्टल, हुशार कोल्हे, ‘वैभव’राव, देव पक्षपाताचा बाप, सकल दोषांचे निधान प्रथम तुम्ही, तुम्ही काय महाठक, प्रतिष्ठित भिकारी”- त्यांच्या उदंड वाचनाचे प्रतिबिंब जसे त्यांच्या लिखाणात जागोजागी विखुरले आहे तसेच बायकी बोली, म्हणी, वाक्प्रचार यांचे सहजोद्गारही तिथे येतात. संस्कृत आणि इंग्रजीचे त्यांचे ज्ञान चांगलेच जाणवते. त्यांची टीकात्मक भाषा महात्मा फुल्यांच्या भाषेशी मिळती – जुळती आहे. पूर्वी तर स्त्री-पुरुष तुलना हा निबंध महात्मा फुले यांनीच लिहिला असे बिनदिक्कतपणे म्हटले जात होते. इतकी परखड, सडेतोड कानउघाडणी करणारी भाषा जोतीराव फुले यांच्याशिवाय कोणीही लिहिणार नाही असे वाटत होते. ताराबाई महात्मा फुल्यांना कन्यावत होत्या. ताराबाईंच्या या निबंधावर नंतर झालेल्या टीकेचा खरपूस समाचार महात्मा फुले यांनीच घेतला.
ताराबाईंनी, एकवाक्यता नसलेली हिंदूंची अनेक शास्त्रे, केवळ स्त्रीच्याच वाट्याला येणारे रूढींचे अनिष्टकारक परिणाम यांविरूध्द आवाज उठवला. पौराणिक कथांची छाननी करून, स्त्रियांना लावले जाणारे नियम पुरूषांनाही का लावायचे नाहीत, असे ठामपणे विचारले. स्त्रियांनी काही लिहिणे जेव्हा अपवादात्मक होते तेव्हा विजेच्या कडकडाटासारखा ताराबाईंचा हा निबंध आला.
इंग्रज सरकारने कायदे करून स्त्रियांच्या परिस्थितीत बदल केल्याबद्दल या सरकारचे ऋण त्यांनी मान्य केले तरी आपले धर्म, चाली, देशरिवाज न सोडता स्वदेशाभिमानी व्हावे असेही उद्गार ताराबाई काढतात. इंग्रजी राजवटीच्या आगमनामुळे घडलेल्या सुधारणांबरोबरच दुष्परिणामांची नोंदही त्यांनी केली आहे.
ब्रिटीश राज्यात स्त्रियांविषयी सुधारणेचे बारीक जरी पाऊल पडले तरी ब्राह्मण पुरूष पुढार्यांचा आराडाओरडा सुरू होई. विवाहाचे वय सती या सारख्या प्रश्नांबाबत असा आरडाओरडा लो. टिळक यांनी केला होता ताराबाई शिंदे यांनी प्रश्न विचारले की, “तुम्ही ब्रिटीशांची भाषा पोशाख इत्यादी सगळे वापरतात घर वगैरे ब्रिटिशांसारखे ठेवतात मग तुम्ही कोणत्या संस्कृतीचे रक्षण करता?” त्यांनी ‘स्त्री धर्म, पातिव्रत्य’ या शब्दांपाठी याची मानभावी प्रवृत्ती उघडी पाडली. एवढेच नव्हे तर धर्म कथांमध्ये मांडलेले आदर्श कसे स्त्री – विरोधी आहेत हे सुध्दा दाखवून दिले. स्त्री जातीतील सावित्री तरी आपल्या पतीचा प्राण परत आणण्याकरीता यम दरबारात जाऊन आली पण पुरूषांमध्ये कोणीतरी आपले बायकोचे प्राणाकरीता यमराजाचे दरबारात तर नाहीच उगीच त्या दरबाराचे वाटेवर तरी गेलेला कोठे ऐकण्यात आला आहे काय? तर जसे एकदा सौभाग्य गेले म्हणजे स्त्रियांनी आपले तोंड अगदी एखाद्या अपराध्याप्रमाणे काळे करून सर्व आयुष्यभर अंधार कोठडीत रहावे त्याप्रमाणे तुमच्या बायका मेल्या म्हणजे तुम्हीही आपली तोंडे काळी करून, दाढ्यामिशा भादरून यावत जन्मपर्यंत कोठेही अरण्यवासात का राहू नये बरे? एक बायको मेली की तिचे दहावे दिवशीच तुम्ही दुसरी करून आणावी असा तुम्हाला कोणत्या शहाण्या देवाने दाखला दिला आहे, तो दाखवा बरे. ‘जशी स्त्री तसेच पुरूष.’
पुरूषांवर कितीही टीका केली तरी ताराबाई पुरूषद्वेष्ट्या नाहीत. स्त्री = पुरूष समान आहेत ही त्यांची भूमिका आहे. स्त्री आणि पुरूष या दोन्ही जातीत एकोपा निर्माण होऊन, दोघांनी एकमेकांना समजून घेऊन, प्रीतीचा वर्षाव एकमेकांवर करावा हे त्यांचे स्वप्न आहे.
पुरूषांचे दोष प्रकर्षाने मांडणे हा मूळ हेतू असला तरी स्त्रियांच्या दोषांविषयी ताराबाई अज्ञानी नाहीत. पण स्त्रियांचे हे दोष, त्यांच्यातील शिक्षणाच्या अभावाने, पुरूषांच्या त्यांना मोहात पाडण्याच्या वृत्तीमुळे अधिकतर येतात असे ताराबाई मांडतात. स्त्रियांचे अज्ञान दूर करण्यासाठी, स्त्री – पुरूषातील असमतोल दूर करण्यासाठी उपाययोजना सांगणे हा या निबंधाचा हेतू नाही. खरे तर ताराबाईंचे पुस्तक म्हणजे युक्तिवादावर आधारित विश्लेषण असण्यापेक्षा संतापातून जन्मलेली गर्जना आहे. पण त्याचवेळी त्यांनी मांडलेले विचार नेमके आणि धारधार आहेत, राष्ट्रवादी, स्वयंघोषित, समाजसुधारक, धर्मग्रंथ, कुटुंबपध्दती या सर्वांमधल्या पुरूष वर्चस्ववादावर त्यांनी समग्र टीका केली आहे. ताराबाईंची पुरूषप्रधान समाजाविषयीची भूमिका त्यांचे भावनापूर्ण लेखन, कठोर शब्द पुढच्या काळात म. जोतीराव फुले यांनी मांडलेल्या विचारातून जिवंत राहिलेले दिसतात. ताराबाईंचा पुढचा इतिहास अजूनही अंधारातच आहे.
शारदा साठे ‘क्षितिजावरील शलाका’ पृ.81 वर लिहितात, ‘स्त्री-पुरुष तुलना’ वाचतांना मला आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. हा निबंध स्त्रियांशी बोली भाषण करण्यासाठी लिहिलेला नाही तर पुरुषांशी बोलीभाषण करण्यासाठी आणि पुरुषांची कानउघाडणी करण्यासाठी लिहिलेला आहे. आधुनिक स्त्रीवादी चळवळीने प्रथम स्त्रियांची पुरुषप्रधान मानसिकता बदलण्याच्या उद्देशाने व्यूहरचना केली, मांडणी केली, संघटन केले. ताराबाईने शरसंधान केले ते थेट पुरुषशाहीवर, त्यांचा युक्तिवाद त्यांच्याच घशात घालून तीच नीतिमूल्ये आणि दाखले देवून हे केवळ प्रखर बुद्धिमत्तेचे लक्षण नाही, रोग मुळापासून नष्ट व्हावा यासाठी केलेला जनमेजयासारखा तो सर्पतज्ञ आहे. पुरुषी मनोवृत्ती ठेचून नवीन मूल्यांचे रोपण करण्याचा हा एकहाती प्रयत्न आहे. ताराबाईने महात्मा फुले यांचे चरित्र लिहिण्याचाही उल्लेख केला आहे मात्र ते पुस्तक उपलब्ध नाही.
‘स्त्री-पुरुष तुलना’हा दस्तऐवज स्त्री मुक्ती चळवळीचे बायबल आहे. अशा क्रांतिकारी ताराबाई शिंदे यांचा मृत्यू सन 1910 मध्ये झाला. ताराबाई शिंदे यांना आमचा सलाम!
– गौतम निकम
संदर्भ :- 1)A comparison between women and men : Tarabai Shinde and the critique & Gendev Relation in Global India - O’ Hanlon, Rosalind Madras : Oxford University Press 1994 2)कै.ताराबाई शिंदे - कृत स्त्री - पुरूष तुलना - स.गं. मालशे मुंबई : मराठी ग्रंथसंग्रहालय, 1990 3)जोतीबा फुले आणि स्त्री मुक्तीचा विचार -डॉ. गेल ऑम्व्हेट, लोकवाङ्मय गृह, मुंबई, तिसरी आवृत्ती-2001 4)ताराबाई शिंदे - लिखित ‘स्त्री - पुरूष तुलना’ विलास खोले पुणे - प्रतिमा प्रकाशन, 1997. 5)सत्यशोधकी साहित्याचा इतिहास - खंड 1, प्रा.डॉ. श्रीराम गुंदेकर. सत्यशोधकी साहित्य प्रकाशन, लातूर, प्र.आ. 2010