आपल्या व्यवसायाचा एक भाग म्हणून प्रत्येक व्यापारी दुकानातील माल ग्राहकाला पुरवतो. त्या मालाची रास्त किंमत मोजून ग्राहक तो माल खरेदी करतो. नेकीने व्यवहार करणार्या दुकानदाराकडून ग्राहकाची फसवणूक होत नाही; परंतु सर्वच दुकानदार किंवा व्यापारी प्रामाणिकपणे हा व्यवसाय करतात असे नाही. अनेक व्यापार्यांकडून मालाची अवाजवी किंमत आकारली जाते. तर कित्येक दुकानदारांकडून भेसळयुक्त मालाची विक्री केली जाते. यातून फसला जातो तो साधाभोळा ग्राहक. अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसावा, या उद्देशाने ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आले आहेत. या कायद्याची व्याप्ती व्यापारी किंवा दुकानदार यांच्यापुरतीच मर्यादित नसून धोबी, केशकर्तनकार, डॉक्टर वकील इत्यादी व्यावसायिकांनाही हा कायदा लागू आहे. व्यापार्यांनी दिलेला माल खराब निघाला किंवा वकील महाशयांनी चुकीचा सल्ला दिला तर, प्रस्तुत कायद्यातील तरतुदीनुसार त्यांच्यावर केस दाखल करून नुकसान भरपाई मागता येते. पैसे आकारून देण्यात आलेला सल्ला ही सेवा समजली जाते आणि सेवा पुरविणार्यांनी सदोष सेवा पुरविल्यास न्यायालयाकडून तो गुन्हा ठरविला जातो.
आजकाल अनेक ज्योतिषाचार्य ग्राहकांना(जातकांना) ज्योतिषविषयक सल्ला देण्याची गावोगावी दुकाने थाटून असतात. त्यांच्यापैकी कित्येक जणांचा ऐषआरामी हॉटेलमधून मुक्काम असतो. तिथूनच ग्राहकांना सल्ला दिला जातो. ग्राहकांच्या समस्या विविध प्रकारच्या असतात. संतती अथवा पुत्रप्राप्ती न होणे, अनारोग्य, कोर्टकचेर्यांत अपयश, नोकरीमध्ये पदोन्नतीत अडचणी इत्यादी. सहजासहजी न सुटणार्या या समस्या असतात; परंतु दुकाने थाटून असलेल्या भाकितकारांचे फलज्योतिषीय ज्ञान एवढे अगाध असते की, कोणत्याही प्रकारच्या समस्येबाबत ते मार्गदर्शन करू शकतात! अर्थात समस्या जेवढी बिकट तेवढीच ज्योतिषविषयक सल्ल्यांची फी अधिक. त्यानुसार ग्राहक ज्योतिषीबुवांना दोनशे रूपयांपासून पाच ते दहा हजार रूपयापर्यंतची रक्कम निमूटपणे मोजतो. या एकूण व्यवहारामध्ये दुर्दैवाचा भाग असा की, ज्योतिषीबुवांकडून सल्ला म्हणून जे काही ज्योतिष विषयक मार्गदर्शन करण्यात येते, त्यामध्ये सत्याचा लवलेशही नसतो! यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. प्रमाणभूत समजण्यात येणार्या फलज्योतिषीय ग्रंथांतील गृहितकेच चुकीची असल्याने त्यांच्या अनुषंगाने वर्तविली जाणारी भाकिते चुकीची असणे स्वाभाविक आहे. कारण मोजमाप करून केलेले अवलोकन तर्कशुद्ध रितीने तपासून फलज्योतिष निर्माण झालेले नाही. त्यामुळे ते शास्त्रपदाला पोहोचलेले नाही. कोणत्याही विषयाचा अभ्यास विज्ञान किंवा शास्त्र म्हणून गणला जाण्यासाठी निरीक्षण, संरचना, प्रश्न संयोजन, सामान्यीकरण, गृहीत प्रमेय, पुनर्मुल्यांकन आणि निष्कर्ष ही पद्धत अवलंबावी लागते. या पद्धतीचे ढोबळमानाने निरीक्षण, अनुमान, प्रयोग आणि निष्कर्ष असे चार भाग केल्यास फलज्योतिष हे केवळ पहिल्या दोन टप्प्यांपुरतेच मर्यादित राहिलेले आहे. वेळोवेळची ग्रहस्थिती आणि पृथ्वीवरील घटनांचे निरीक्षण करून, त्यावरून अनुमान काढल्यावर ते पुन:पुन्हा सिद्ध होण्यासाठी कोणत्याही चाचण्या किंवा प्रयोग करण्यात आलेले नाहीत. एकूण विश्वातील आकाशगंगांची संख्या अफाट आहे. आपल्याच आकाशगंगेपुरता विचार करावयाचा झाल्यास सूर्याहून अधिक प्रभावी, असे दोनशे अब्जांच्या आसपास तारे आहेत. त्यांच्या ग्रहांची संख्या प्रचंड आहे. हे सर्व ग्रहगोल आपापल्या विशिष्ट गतीनुसार अंतराळमध्ये भ्रमणावस्थेत आहेत. या ग्रहगोलांची अतिमहाप्रचंड अशी संख्या लक्षात घेता, एखाद्या विशिष्ट ग्रहस्थितीची अंतराळात पुनरावृत्ती होणे केवळ दुरापास्तच होय. यामुळे अंतराळातील ग्रहांच्या पृथ्वीवरील मानावावर होणार्या तथाकथित परिणामाच्या चाचण्या घेणे आणि अनुमान व निष्कर्ष काढणे अशक्य होय. दुसरी गोष्ट अशी की, पृथ्वीपासून प्रचंड अंतरावरून परिभ्रमण करीत असलेल्या ग्रहांचा मानवावरील परिणाम हा गुरूत्वाकर्षणीय सूत्रानुसार शून्याच्या आसपास आहे. मानसिक प्रभावाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास ग्रहगोल हे प्रचंड आकाराचे चैतन्यहीन, असे खडक असल्याने आणि कोणत्याही अचेतन वस्तूचा मानवावर कोणत्याही प्रकारचा मानसिक प्रभाव पडत नसल्याने ग्रहांचा(आणि तार्यांचा) मानवावरील मानसिक प्रभाव केवळ शून्य होय. मात्र, हे वैज्ञानिक सत्य फलज्योतिषीय ग्रंथांना मान्य नसल्याने, त्यांनी मानवाला ग्रहनक्षत्रांच्या प्रभावाखाली जखडून ठेवले आहे. म्हणूनच फलज्योतिष हे विज्ञानाशी फारकत घेतलेले अशास्त्रीय थोतांड असल्याचा निर्देश जागतिकी किर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांनी केला आहे.
फलज्योतिषाने ग्रहांना विविध गुणधर्मांसमवेत वर्णदेखील बहाल करून टाकले. संबंधित ग्रंथांनुसार गुरू व शुक्र ब्राह्मण, रवी व मंगळ क्षत्रिय, चंद्र वैश्य, बुध शुद्र, शनी अंत्यज आणि राहू-केतू मातंग आहेत.(चातुर्वर्ण्याचा भूतलावरील प्रभाव एवढा जबरदस्त आहे की, अंतराळातील लाखो किलोमीटर दूरवरच्या चैतन्यहीन ग्रहगोलांना देखील त्याच्या पकडीतून निसटता आलेले नाही!) एकूण ग्रहांपैकी मंगळ आणि शनी हे अत्यंत खतरनाक ग्रह असून, त्यांच्या युतीने हाहा:कार माजेल, असे चित्र रंगविले जाते. उदा.तमोगुणी विषय लंपट, क्रूर वृत्ती आणि पित्त प्रकृतीच्या मंगळ या ग्रहामुळे अंडवृद्धी, कफरोग, गळवे आणि व्रण या व्याधींपासून पीडा होते आणि दारिद्य्र वाट्याला येते. शनी या ग्रहामुळे दारिद्य्र, दीर्घ आजार(कदाचित मृत्यू) आणि संधीवातादि कष्टदायी विकार भोगावे लागतात. जेव्हा मंगळ आणि शनी या दोन्ही ग्रहांची युती घडून येते, तेव्हा या दोन्ही ग्रहांचे दुष्परिणाम संयुक्तपणे भोगणे क्रमप्राप्त होते. अर्थात हे सगळे फलज्योतिषीय निष्कर्ष थोतांडी स्वरूपाचे असल्याने प्रत्यक्षात माणसाच्या केसालाही धक्का पोहोचत नाही; परंतु फलज्योतिषाला धार्मिक वलय प्राप्त झाल्यामुळे बहुसंख्य साध्याभोळ्या लोकांची त्यावर श्रद्धा असते. शनी-मंगळ या ‘धोकादायक’ ग्रहांच्या युतीतून घडून येणार्या महाभयंकर अशा तथाकथित दुष्परिणामांमुळे त्यांच्या मनाचा थरकाप उडाला नाही तर नवल! अनिष्ट ग्रहांबाबत जनसामान्यांना वाटणारी दहशत एवढी जबरदस्त असते की, ते अक्षरश: वेडेपिसे होऊन जातात. गेल्या 21 जानेवारी रोजी पुणे शहरामध्ये अरूण पालकर या एका मध्यमवर्गीय गृहस्थाने आपल्या दोन्ही मुलांसह पत्नीची हत्या करून स्वत: आत्महत्या केली. शनी-मंगळाच्या युतीमुळे जे अनर्थ घडतात, त्यांच्याशी मुकाबला करण्यास असमर्थ असल्याने, आपल्याला कुटुंबाचा नाश करून घेण्याचा मार्ग पत्करावा लागला, असे पालकर यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये नमूद करून ठेवले होते. थोतांडी फलज्योतिषाने निर्माण केलेल्या दहशतवादातून पालकर कुटुंबाचा सर्वनाश झाला. एवढी दु:खद घटना दुसरी नसावी. वस्तुस्थिती ही आहे की, केवळ मंगळ-शनीच नव्हे, सर्व ग्रहांची युती झाली तरी, तिचा पृथ्वीवर तिळमात्रही परिणाम होऊ शकत नाही; कारण एकूण सर्व ग्रहांचा गुरूत्वाकर्षणीय परिणामाच्या दोन शतांशहूनही कमीच आहे. हे खगोल विज्ञानाने सिद्ध करून दाखविले आहे. मात्र, प्रत्येक युतीच्या वेळी फलज्योतिषाने ‘जलप्रलय होणार’, ‘भूकंप हेऊन शेकडो माणसे गाडली जाणार’ अशा प्रकारची भीतीदायक भाकिते वर्तविली, ती अर्थातच खोटी ठरली. शास्त्रपदाला न पोहोचलेले फलज्योतिष सत्य ठरतील अशी भाकिते वर्तवू शकत नाही. ज्योतिषाचा धंदा करणारे तथाकथित शास्त्रे भाकिते वर्तविण्यासाठी भ्रामक भाषाजालाचा हमखास वापर करतात. त्यात ‘जर-तर’ची शब्द योजना असते. भोळी माणसे त्यात गुरफटून स्वत:ची फसवणूक करून घेतात. आज सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांचा वापर करून भोंदू-ज्योतिषी भोळ्या लोकांना मोठ्या प्रमाणात गंडा घालत आहेत. हा निश्चितपणे फसवणुकीचा धंदा आहे. प्रस्तुत विषय ग्राहक संरक्षण कायद्याच्या कार्यकक्षेत आणल्यास ही फसवणूक नक्कीच थांबू शकेल.
– यज्ञेश्वर निगळे