- भारतातील प्रत्येक 4 था मनुष्य उपाशी आहे.
- कुपोषणाने दर 7 मिनिटाला एक बालक मृत्यू पावते.
- जगातील प्रमुख देशांत अन्नधान्यापायी दंगली.
ही सारी वाक्ये खोटी वाटावीत असा आज समाजातील काही घटकांचा व्यवहार आहे. धार्मिकतेच्या नावाखाली अत्यंत अव्यवहार्य प्रकार सर्रास चालू आहे. देवाची/देवीची जयंती, सत्पुरूषांचे प्रगटदिन, ग्रामदेवतेची यात्रा व तत्सम काहीही कारणांमुळे गावजेवण अर्थात महाप्रसादाचे आयोजन करणे ही आजकाल ‘फॅशन’ झाली आहे. गावातील/शहरातील एखादे मंडळ, संस्था-संघटना त्याचबरोबर काही ‘धनवान’ वैयक्तिक खर्च करून महाप्रसाद आयोजित करतात. हे आयोजन सामाजिक व धार्मिक कार्य म्हणून, संस्था संघटना प्रसिद्धीसाठी म्हणून तर ‘धनवान’ उदारतेचा आव आणून पार पाडतात. कधी कधी तिन्ही कारणांचा समुच्यय महाप्रसादाच्या आयोजनामागचे कारण असते.
मंदिर छोटे असो वा मोठे, देवाची मूर्ती झाडात कोरून ठेवलेली असो अथवा छप्परवजा रस्त्याकडेला असो महाप्रसादाच्या आयोजनासाठी फारसा फरक पडत नाही. राबणारे तरूण कार्यकर्ते, सेवानिवृत्तांचा ‘धार्मिक’ आधार, प्रतिष्ठितांचा ‘आर्थिक’ आशिर्वाद व पोटभरू धार्मिक अनुयायांची रांग एवढ्या गोष्टी जमून आल्या की, ‘महाप्रसाद’ सफल झालाच म्हणून समजा. रस्त्याच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आकर्षक सजावटींचा शामियाना अथवा मांडव उभारायचा. ओळीने टेबल-खुर्च्या मांडायला, जेवणासाठी मोठ मोठी पातेली गॅस शेगडीवर ठेवायची. देवाच्या मुर्तीला अथवा फोटोला भरगच्च फुलांचा हार, मोठ्या समई लावायच्या, स्टिरिओ बॉक्सवर धार्मिक गाणी लावायची, पाण्यासाठी महापालिकेचा टँकर मागवायचा, तत्पूर्वी एक दिवस अगोदर स्थानिक नगरसेवकांना सांगून संबंधित परिसराची साफसफाई करून घ्यायची. ‘पावडर’ मारून घ्यायची एवढी सारी तयारी करायची आणि प्रतिष्ठित राजकीय नेत्याच्या शुभहस्ते(?) पंगत सुरू करायची. त्यावेळी पेपरमध्ये उठून दिसेल असे ‘दानशूर’ व्यक्तींबरोबर फोटोसेशन करायचे. पंगतीमागून पंगती उठू लागतात आणि सायंकाळच्या वेळेस आवराआवर सुरू करायची असा हा दिनक्रम असतो.
या महाप्रसादादरम्यान काही गोष्टी ‘विशेष उठून’ दिसतात. एरवी स्वत:च्या घरामध्ये पाण्याची बादलीही न उचलणारा ‘स्वाभिमानी’ युवक जेवणाची मोठमोठी भांडी लिलया उचलून आपले ‘कर्तव्यं’ पार पाडत असतो. देवाची आरती सुरू व्हायच्या अगोदर अथवा संपल्या संपल्या ‘सन्माननीय ज्येष्ठ व्यक्ती’ लगेच पंगतीमध्ये हजेरी लावून पुन्हा आपली ‘धार्मिकता’ दाखवायला मोकळे होतात. ज्या ‘प्रतिष्ठित’ व्यक्तींनी महाप्रसादाला आर्थिक मदत दिलेली असते ते अथवा त्यांचे कुटुंबिय महाप्रसादाठिकाणी आले की, त्यांना देवदर्शनाचा “तखझ पास” देऊन त्यांचेसाठी एखादे टेबल मांडले जाते. काही कारणाने येणार नसतील तर प्रसाद भरून स्टेनलेस स्टीलचे डबे घरपोच केले जातात. स्त्रिया ह्या धार्मिकतेच्या प्रमुख वाहक. घरी जेवण तयार करायचा ‘त्रास’ वाचला या आनंदात ‘चूलबंद’ कार्यक्रम करून महाप्रसादाला हजेरी लावतात. शक्य झाल्यास लहान डबा अथवा रूमालातून ‘स्वीट डिश’ घरी आणतात. महाप्रसादाच्या आयोजनात पहिल्यापासून खपणारे ‘निष्ठावंत कार्यकर्ते’ सर्वात शेवटी जेवतात आणि पुन्हा आवराआवरीच्या कार्याला जुंपून घेतात.
असा हा महाप्रसादाचा एकूण ‘माहोल’ असतो. थोडा विचार केला तर अनेक प्रश्न उभे राहतात. उद्या देशाची धुरा ज्या युवकांच्या समर्थ खांद्यावर येणार आहे त्या युवकांसमोर सामाजिक/धार्मिक कार्याचा हाच ‘आदर्श’ उभा राहणार का? धार्मिकतेमध्ये नैतिकता महत्वाची असेल तर केवळ पैशासाठी दोन नंबरचे धंदे करणार्या समाज कंटकांना महाप्रसादाद्वारे ‘प्रतिष्ठा’ प्राप्त करून देणे योग्य आहे का? धार्मिकतेमध्ये ‘साधनशुचितेचा’ आग्रह धरायला हवा तर गॅस सिलिंडरची सर्वत्र टंचाई असतानाही कोणत्या मार्गाने त्यांचा पुरवठा यथासांग केला जातो? महाप्रसादासाठी लोकांनी दिलेले धान्य, तेल डबे व इतर साहित्य शिल्लक राहिले तर ते परत न करता कार्यकर्ते आपापसांत वाटून घेतात हे कोणत्या धार्मिक नैतिकतेत बसते? प्रसादाच्या नावाखाली महागड्या पदार्थांची रेलचेल कोणत्या धार्मिक पोटपुजेत बसते? एकाच देवाच्या अथवा सत्पुरूषाच्या नावे जवळच्याच 2-3 गल्लीमध्ये महाप्रसाद करतात. यातून कोणती धार्मिक एकजूट होते? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न असा की, महाप्रसादाच्या जेवणावर खरा हक्क कोणाचा? पोटभरू लोकांचा की, गरीब लोकांचा? ज्यांच्या एक वेळच्या जेवणाचीही खात्री नाही त्या लोकांसाठी महाप्रसाद असावा पण ‘व्यवहार’ उलटाच आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते “पुरोगामी महाराष्ट्रात पडताहेत, महाप्रसादाच्या विशाल राशी, पोटभरूंची झाली चंगळ, खरा गरजू उपाशी.”
– उमेश सूर्यवंशी