5 जानेवारी 2005 रोजी दाभोलकर सरांशी माझी पहिली भेट झाली. एम.बी.बी.एस.उत्तीर्ण होऊन मी इंटर्नशीप करत होते. नास्तिक विचारसरणी आणि पुस्तके वाचण्याची आवड असल्यामुळे दाभोलकर सरांची काही पुस्तके मी वाचली होती. ते धुळ्याला येणार असल्याने त्यांचे व्याख्यान ऐकता येईल आणि त्यांची स्वाक्षरी घेता येईल एवढी माफक अपेक्षा ठेवून मी कार्यक्रमाला गेले. धुळ्यातील एका बगीच्यात तो कार्यक्रम झाला. कार्यक्रमाअगोदर मी त्यांच्या ‘लढे अंधश्रद्धेचे’ या पुस्तकावर त्यांची स्वाक्षरी घेतली. त्यानंतर मी त्यांना विचारले, “सर, मला हमीद दलवाईची पुस्तके वाचायची आहेत. आपण त्याबद्दल काही मार्गदर्शन करणार का?” क्षणभर विचार करून ते म्हणाले, “हमीद दलवाईच का?” मी त्यांना उत्तर दिले, “सर, मुस्लिम सत्यशोधक ही कल्पनाच खूप क्रांतीकारक वाटते.” दाभोलकर सरांना माझे उत्तर आवडले. ते म्हणाले, “आज खूप वर्षांनंतर कुणीतरी मला हमीद दलवाईविषयी विचारले याचा आनंद होतोय.” माझ्यामुळे सरांना आनंद झाला हे कळल्यावर माझा आनंद गगनात मावेनासा झाला! फक्त स्वाक्षरी घेण्यासाठी आलेली मी त्या दिवसांपासून ‘अंनिस’ची कार्यकर्ती बनले.
‘अंनिस’ची क्रियाशील कार्यकर्ती असतांना दाभोलकर सरांच्या विविधांगी व्यक्तिमत्वाचे जे दर्शन मला घडले त्याचा प्रभाव माझ्या मन: पटलावरून कधीही नष्ट होणार नाही. 21 व 22 मे 2005 रोजी नंदूरबार जिल्ह्यातील समशेरपूर या लहानशा खेडेगावात संभू सदाशिव पाटील यांच्या शेतावर ‘अंनिस’चे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर झाले होते. मे महिन्याच्या खानदेशाच्या रणरणत्या उन्हात गर्दीने खच्चून भरलेल्या बसमध्ये दाभोलकर सर आमच्यासोबत धुळ्याहून समशेरपूरला आले. समशेरपूरला बाहेर सूर्य आग ओकत असताना आत एका पत्र्याचे छप्पर असलेल्या, पंखा नसलेल्या हॉलमध्ये दाभोलकर सरांनी दिवसभर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दोन व्याख्यानांच्या मध्ये ते फक्त काही क्षण पाणी पिण्यासाठी ‘ब्रेक’ घेत होते. तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये ‘अंनिस’ रूजविण्यासाठी सर जी मेहनत घेत होते ते बघून मी थक्क झाले. जेवतांना ग्रामीण भागातील साधी खिचडी जणू पंचपक्वान्न खात असल्याच्या उत्साहात ते खायचे. तेथे एकच प्रसाधनगृह होते. साहजिकच सर्व महिला कार्यकर्त्यांनी तेथे आंघोळी केल्या. दाभोलकर सर आणि सर्व पुरूष कार्यकर्त्यांना शेतातच आंघोळीपांघोळी आटपाव्या लागल्या. आणि सरांनी त्याबाबत कुठलीही तक्रार केली नाही. ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’चे हे मूर्तीमंत उदाहरण सरांच्या रूपाने मी बघत होते. त्या शिबिरात पुन:पुन्हा माझे डोळे का पाणावत होते याचे कारण फक्त माझे मलाच ठाऊक होते….
त्यानंतर 26 ते 29 मे 2005 दरम्यान ‘अंनिस’च्या राज्य कार्यकारिणीसाठी मी धुळ्याहून अविनाश पाटील सर, विनायक सावळे सर यांच्यासोबत वाघोली येथे गेले होते. तेथे गेल्यावर मला जाणवली ती सरांची तरूणांना प्रोत्साहित करण्याची वृत्ती. या देशातील किती संघटना नवीन, अननुभवी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याची, तेही संघटनेच्या सर्वाधिक ज्येष्ठ कार्याध्यक्षास प्रश्न विचारण्याची संधी देतात? पण दाभोलकर सरांनी आम्हा तरूणांनी प्रश्न विचारण्यास केवळ परवानगी दिली नाही, तर ‘उत्तेजन’ दिले. आणि हेच त्यांचे वेगळेपण होते. तरूणाईच्या दुर्दम्य इच्छाशक्तीवर त्यांचा अतुट विश्वास होता.
29 मे रोजी राज्य कार्यकारिणीचा समारोप झाल्यावर अविनाश सर आणि सावळे सरांसोबत मी धुळ्याला परतणार होते. मध्यंतरात वेळ होता म्हणून दाभोलकर सरांसोबत आम्ही सर्वजण ‘साधने’च्या कार्यालयात गेलो. रात्री आम्ही सर्वजण जेवणासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. इडली, डोसा अशी खाण्याची ऑर्डर दिल्यानंतर आम्ही सरांशी संवाद करत होतो. सर आम्हाला संत साहित्यातील विवेकवादी विचारांविषयी सांगत होते. ते ऐकताना मी त्यांना म्हटले, “सर, रवींद्रनाथ टागोरांनीदेखील गीतांजलीत म्हटले आहे- ‘deliverance for me is not in renununciation’ (मुक्ती सर्वसंग परित्याग करून मिळविता येत नाही.)” माझे शब्द ऐकताच सरांनी गीतांजलीमधील दुसरी कविता म्हणायला सुरवात केली- leave this chanting, singing & telling of beads. (तुमचे हे मंत्रोच्चार सोडा, रिकाम्या गाभार्यात देवाचे अस्तित्व नाही. घाम गाळणार्या, कष्ट करणार्या लोकांमध्ये परमेश्वर राहतो. त्या ‘कष्टकर्यांसोबत आणि कष्टकर्यांसाठी’ जगणे हीच परमेश्वराची खरी उपासना आहे या आशयाची ती कविता.) सरांनी ही कविता पूर्ण म्हटली आणि मी आश्चर्यचकीत होऊन त्यांच्याकडे बघत राहिले! मराठी संतसाहित्य असो अथवा इंग्लिश गीतांजली, दाभोलकर सरांच्या असामान्य प्रतिभेचे क्षितीज किती विस्तारलेले आहे याची जाणीव मला यानिमित्ताने झाली. कार्यकर्ता हा केवळ कामसू असून चालत नाही तर त्याने अभ्यासूही असायला हवे हे मला यानिमित्ताने कळले. गीतांजलीमधील त्या कवितेत टागोरांनी म्हटलेय – कष्टकर्यांसोबत, कष्टकर्यांसाठी जगणे ही परमेश्वराची खरी उपासना. त्यादृष्टीने विचार करायचा झाल्यास दाभोलकर सर हे जणू ती कविता स्वत: जगत होते!
कवितेविषयी आम्ही बोलत असतानाच वेटर आमचे खाद्यपदार्थ घेऊन आला. काटेचमचे उचलून आम्ही खायला सुरवात करणार तोच सर आम्हाला म्हणाले, “सगळ्यांच्या प्लेटस् आल्या, पण बिचार्या अविनाशची काही आली नाही. त्यामुळे तो शांतच बसलाय. त्याच्याकडे कुणाचेच लक्ष नाही.” आम्ही सगळ्यांनी अविनाश सरांकडे बघितले आणि आमच्या उतावळेपणाची भयंकर शरम आम्हाला वाटली. क्षणभर कुणीच काही बोलले नाही, पण फक्त क्षणभरच. दुसर्या क्षणी दिलखुलास हास्य करीत सर म्हणाले, “अरे, तुम्ही सगळेजण असे शांत का झालात? बघा अविनाशची प्लेट आली. चला, खायला सुरवात करूया.” असे होते आमचे दाभोलकर सर! इतर कुणालाच जाणवले नाही, पण फक्त त्यांनाच जाणवले की, अविनाश सरांची प्लेट अद्याप आलेली नाही. कार्यकर्त्यांची पित्याप्रमाणे काळजी घेणारे ‘सर’…. सर गेले आणि आम्ही आमचा पिता गमावला….
दाभोलकर सरांमुळे मी ‘साधना’ वाचू लागले. साधनेत एका लेखात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर टीका केली होती आणि स्वातंत्र्यप्राप्तीचे सर्व श्रेय गांधीजींना दिले होते. तो लेख वाचून मी नेताजींचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान स्पष्ट करणारा लेख लिहिला. माझ्या मताशी सर किती सहमत होते ते मला ठाऊक नाही; पण त्यांनी माझा लेख साधनेत छापला आणि स्वत: फोन करून ‘तू लेख चांगला लिहिलास’ असेही मला सांगितले. त्यांचा फोन आल्यावर मी किती खूष झाले होते! आपल्यापेक्षा वेगळे मत मांडणार्या व्यक्तीचे विचार शांत डोक्याने ऐकून घ्यावे, त्यांची कदर करावी, आदर करावा हा गुण मी दाभोलकर सरांकडून शिकले. आज समाजात सर्वत्र असहिष्णू वृत्ती वाढत असताना निकोप समाजजीवनासाठी या सहिष्णूतेची अत्यंत गरज आहे असे मला वाटते.
मी 5 वर्षे लष्करात असताना दाभोलकर सरांशी पत्रांद्वारे माझा संपर्क होता. फोनवर फारशी न बोलणारी मी त्यांच्याविषयीचा माझा आदर पत्राद्वारे व्यक्त करायचे. दाभोलकर सरांनी लिहिलेली 10 पत्रे माझ्या घरी आहेत, त्यातील 4 तर त्यांच्या स्वत:च्या हस्ताक्षरातील आहेत. त्यातील एका पत्रात त्यांनी मला लिहिले होते- “आयुष्यातील किती वर्ष तू लष्करात काढशील हे मला ठाऊक नाही. पण मला असे वाटते की, तुझ्यात एक खूप चांगली, कार्यक्षम कार्यकर्ती आहे. भविष्यात या पैलूलाही न्याय व वेळ देण्याचा विचार कर.” 5 वर्षांनंतर मी पुन्हा नागरी जीवनात परतलेय. राजस्थानी तरूणाशी विवाह केल्याने राजस्थानात स्थायिक होतेय. भविष्यात मी ‘अंनिस’साठी किती काम करू शकेन याविषयी मी आत्ताच काही लिहिणार नाही कारण ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.’ पण ‘तुझ्यात एक खूप चांगली, कार्यक्षम कार्यकर्ती आहे’ हे दाभोलकर सरांचे शब्द माझ्या मन:पटलावर कोरले गेले आहेत. तीच माझी बांधिलकी, तीच माझी प्रेरणा…