परामानसशास्त्राबद्दल लोकांमध्ये प्रचंड कुतुहल आहे. टेलिपथी परामानसशास्त्रातील एक प्रकार आहे असे या शास्त्राचे समर्थक म्हणतात.
कोणत्याही बाह्य साधनाशिवाय केवळ मनाद्वारे एका व्यक्तीचे विचार दुसर्या व्यक्तीला कळणे म्हणजे टेलिपथी. टेलिपथी मध्ये कोणत्याही बाह्यतंत्राचा अगर माहितीचा अवलंब केला जात नाही. एका व्यक्तीच्या मेंदूतून निघालेल्या विचारलहरी दुसर्या व्यक्तीचा मेंदू स्वीकारतो व त्या व्यक्तीला पहिल्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय ते कळतं अशी टेलिपथीची कल्पना आहे.
आधुनिक मानसविज्ञानात टेलिपथी व परामानसशास्त्रातील इतर शाखा यांना मान्यता नाही. का ते समजून घेऊ या. मानवी मेंदू क्षीण विद्युत-चुंबकीय लहरी उत्सर्जित करतो. या लहरींची तीव्रता अनियमितपणे कमी जास्त होते. या लहरीची तीव्रता एनसिफिलोग्राफी या तंत्राने मोजता येते.
टेलिपथीच्या समर्थकांना असं वाटतं की, रेडिओच्या कार्याप्रमाणे मेंदूचे कार्य चालत असते. रेडिओ ट्रान्समीटर मधून निघालेल्या लहरी रेडिओ रिसीव्हर पकडतो. त्यासाठी रिसीव्हर ट्यून करावा लागतो. विचाराचे प्रक्षेपण विद्युत चुंबकीय लहरीद्वारे दुसर्या व्यक्तीला अशाच प्रकारे समजत असेल. दोन व्यक्तींचे ट्युनिंग किंवा अनुनाद घडतो असे म्हणा हवे तर. हा युक्तीवाद प्रथमदर्शनी खरा वाटतो पण तो खरा नाही. याचे कारण पाहू या.
मेंदूतील विद्युत चुंबकीय लहरी या शंभर कोटी इतक्या न्यूरॉन्समधून निघालेल्या लहरींचा एकत्रित परिणाम असतो. अशा लहरींतून मेंदूतील विचारांचे ज्ञान होणे म्हणजे जगाच्या पाठीवरील सर्व लोक एकाच वेळी एकत्र येऊन विविध भाषेत बोलू लागले तर त्यांचे बोलणे समजून घेण्यासारखं आहे. दंगलीमध्ये जसा गोंगाट निर्माण होतो व त्यात परस्परांचे बोलणे आपणाला कळू शकत नाही तसाच हा प्रकार आहे. रेडिओमध्ये ध्वनीचे विद्युत सिग्नल हे विशिष्ट रेडिओलहरींत मिसळले असतात. रिसीव्हरमध्ये हे सिग्नल कॅरीयर रेडिओ लहरीपासून वेगळे केले जातात. पण बाजारातील गोंगाट मायक्रोफोनमध्ये पकडला व मॉड्युलेट केला तर रिसीव्हरमध्ये गोंगाटच मिळेल. एका न्यूरॉनपासून मिळालेल्या लहरीं आपण एनसिफिलोग्राफने मोजू शकत नाही. म्हणून टेलिपथीच्या अस्तित्वाचा युक्तीवाद फसवा आहे.
टेलिपथीच्या विरोधात आणखी काही तर्कनिष्ठ युक्तीवाद पाहू या.
एखाद्या व्यक्तीस जन्मत: टेलिपथी अवगत झाली तर ते त्या व्यक्तीला खूपच फायदेशीर ठरेल. इतर कुणाला न कळता, दुसर्याचे हेतू संबंधित व्यक्तीलाच कळतील. याचा उपयोग व्यक्तीला संरक्षणासाठी करता येईल. उत्क्रांती तत्वाप्रमाणे जीवन संघर्षात टेलिपथीचा वापर फायदेशीर ठरल्याने अशा लोकांची संख्या वाढेल आणि त्यांची टेलिपथीची क्षमताही वाढेल. पण असं दिसत नाही. योगायोगाचा अनुभव सांगणारा हजारात एखादा भेटतो. तो टेलिपथीचा पुरावा मानता येणार नाही.
टेलिपथीची दृष्टीशी तुलना करा. प्रकाशाचा उगम व प्रकाश परावर्तीत करणारे पदार्थ आपल्या डोळ्यांना दिसतात. डोळ्यांचा हा उपयोग नैसर्गिक निवडीनुसार प्रत्येक प्राण्याला फायदेशीर ठरतो. म्हणून प्रत्येक प्राण्यात डोळे विकसित झालेत. अशाच प्रमाणे टेलिपथी प्रत्येक प्राण्यांमध्ये विकसित व्हायला हवी. तसे आढळत नाही हा टेलिपथी अस्तित्वात नसण्याचा सर्वात मोठा पुरावा होय.