महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यभरात अंधश्रद्धा निर्मूलन व विवेकी समाज निर्मितीच्या उद्देशाने नवीन व इच्छुक कार्यकर्त्यांसाठी मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागीय पातळीवर दिनांक 9 व 10 मे 2015 या दोन दिवशीय वैचारिक निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जनशिक्षण संस्था संचलित विजयेंद्र काबरा समाज कार्य महाविद्यालय, बंजारा कॉलनी, खोकडपुरा, औरंगाबाद येथे नुकतेच पार पडले.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी औरंगाबाद शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जनशिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सतीश सुराणा हे होते. आणि अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची उपस्थिती होती.
दोन दिवशीय या शिबिरात पहिल्या दिवशी “अंनिसची व्यापक वैचारिक भूमिका” या विषयावर अविनाश पाटील(धुळे) यांनी समितीच्या काम करण्याच्या पद्धतीची व गेल्या 25 वर्षाचा कामाचा आढावा घेणारी महत्वपूर्ण भूमिका विषद केली. “वैज्ञानिक दृष्टिकोन” या विषयावर समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अजित खोजरे यांनी पॉवर पॉईंट प्रेजेंटेशनद्वारे मानव निर्मितीपासून आजपर्यंतची सखोल माहिती दिली. “मन व मनाचे आजार” या विषयावर अंनिसचे राज्य सरचिटणीस व प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.हमीद दाभोलकर(सातारा) यांनी ‘मनाचा’ उलगडा करून दिला. “फलज्योतिष : समज-गैरसमज” या विषयावर अंनिसचे विविध उपक्रम विभागाचे राज्य सचिव डॉ.नितीन शिंदे(इस्लामपूर) यांनी खगोलशास्त्रीय माहिती देताना ग्रह, तारे, नक्षत्र, रास याबाबत मांडणी करताना कुंडली कशी तयार केली जाते. कडक मंगळ व शनीची साडेसाती कशी असते? त्यामागील सांगितले जाणारे थोतांड व खरी वस्तुस्थिती याबाबत सखोल मार्गदर्शन केले. आणि रात्री अंनिसचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसले यांनी बुवाबाजीचे चमत्कार कसे असतात? बुवा समाजाला कसे लुबाडतात? याबाबत सप्रयोग व्याख्यान दिले व त्यामागील विज्ञान समजावून सांगितले.
दुसर्या दिवशी “बुवाबाजीची व्यापक वैचारिक भूमिका व बदलते स्वरूप” या विषयावर अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे(शहादा) बुवाबाजीची भयानकता सांगताना बुवा, बाबा बुवाबाजी कसे करतात. सुडो सायन्सच्या मदतीने अवैज्ञानिक प्रचार कशाप्रकारे करतात याबाबत विवेचन केले. त्याचबरोबर “संघटना बांधणी आणि कार्यकर्तेपण” या विषयावर कार्यकर्ता कसा असावा, त्याने समाजात कसे वावरावे, सुसंवाद कसा असावा हे व्यक्तिमत्वाचे पैलू विषद केले. “करणी-भानामती” या विषयावर अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी करणी आणि भानामती कशी होते, त्यामागील सत्यता काय असते यावर भानामती सोडवल्याचे दाखले देत सविस्तर माहिती दिली. “स्त्रिया आणि अंधश्रद्धा” या विषयावर अंनिसच्या महिला विभागाच्या राज्य सचिव प्राचार्या सविता शेटे यांनी महिलांना दिले जाणारे दुय्यम स्थान यामुळे बदलती मानसिकता व त्यामुळे अंधश्रद्धेकडे जाणारा कल कसा असतो याबाबत विवेचन केले. “जोडीदाराची विवेकी निवड” या विषयावर गटचर्चा घेण्यात आली. शिबिरार्थींनी यात चांगल्या प्रकारे सहभाग दिला.
शिबिराच्या समारोप प्रसंगी निवृत्त न्यायाधीश मनोहर आगलावे, डॉ.श्याम महाजन, माधव बावगे, शहाजी भोसले यांची उपस्थिती होती. शिबिराचे सूत्रसंचालन अंनिस औरंगाबाद शाखेची कार्याध्यक्ष सोनालिका नागभिडे यांनी केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ.रश्मी बोरीकर, प्रा.डॉ.अजित खोजरे, प्रा.डॉ.क्षमा खोब्रागडे, अभय निकाळजे, सोनालिका नागभिडे, अतुल बडवे, अंजली कापसे, प्रशांत कांबळे, बुद्धप्रिय कबीर, दिलीप शिकरे, प्रवीण भालेराव, मजहर पटेल, रिंकू कडवे आणि जनशिक्षण संस्थेचे पदाधिकारी यांनी योगदान दिले.
–शहाजी भोसले
संपर्क : 9422212557