Categories
पुस्तक परिचय

उन्मादी कालखंडातील लढ्याची गोष्ट

मे - २०१९

विवेकाच्या वाटेवर

डॉ. हमीद दाभोलकर यांचं ‘विवेकाच्या वाटेवर’ हे पुस्तक नुकतंच राजहंस प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे. हे त्यांचे दुसरे पुस्तक आहे. त्यांचे वडील डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बरोबर त्यांनी ‘प्रश्न मनाचे’ हे पहिले पुस्तक लिहिले. लेखक म्हणतात की, डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर लगेचच ते काही लिहू शकले नाहीत; पण जादूटोणाविरोधी कायदा झाल्यावर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात ‘कायदा झाला डॉक्टर!’ हा लेख लिहिला आणि त्यानंतर लिहिण्यातून व्यक्त होणं ही त्यांच्या आयुष्यातील भावनिक संतुलन राखण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट बनली.

या पुस्तकाच्या नावातच त्यांनी ‘उन्मादी कालखंडातील लढ्याची गोष्ट’ हे उपनाव नमूद केलेले आहे आणि सुरुवातीला पुढे नमूद केलेला सुविचार उद्धृत केला आहे. “त्यांनी आम्हाला गाडण्याचा प्रयत्न केला. त्यांना हे माहीत नव्हते की, आम्ही बीजे आहोत, विवेकी विचारांची बीजे. आम्हाला जितके खाली गाडाल, तितक्याच जोमाने आम्ही तरारून उगवून येऊ आणि आमच्या सावलीत जे कोणी बसतील त्यांना सावली देऊ. अगदी आम्हाला गाडणार्‍या हातांनादेखील.”

लेखकाचा जन्म 1978 सालचा; त्यांचे नाव ‘हमीद’ असे असल्याने ‘का हो, तुमचं आडनाव दाभोलकर आणि नाव हमीद कसं?’ असा प्रश्न विचारला जाई. त्यावर लेखक असे सांगत असत की, माझे आई-वडील नावावरून धर्म ओळखला जाण्याच्या विरोधात आहेत म्हणून त्यांनी माझं नाव हमीद ठेवलं आहे. या उत्तरात पुढे थोडीशी वाढ झाली; ते म्हणतात हमीद दलवाई हे एक मोठे धर्मचिकित्सक होते, तसेच काम माझे बाबा करू पाहत आहेत म्हणून माझं नाव हमीद आहे. या लेखामध्ये लेखकाने आपल्या नावासंबंधीच्या जाणिवेचा विकास कसा होत गेला याचं खूप छान वर्णन केले आहे. शेवटी ते म्हणतात की, “अंनिसचे तीन हजार कार्यकर्तेआणि या विचारांचे हजारो-लाखो हितचिंतक देखील डॉ. दाभोलकरांना आपले वैचारिक पालकत्व देतात, म्हणजे आपल्या सोबत असंख्य हमीद आहेत.”

हे पुस्तक म्हणजे विविध वर्तमानपत्रांतून, मासिकांतून छापून आलेल्या लेखांचा संग्रह आहे. ‘बाबा आठवताना’ या पहिल्या भागात लेखकाने वडील डॉ. दाभोलकर आणि त्यांची आई यांच्या विषयीचे लेख लिहिले आहेत. ‘हॅट्स ऑफ आई’ या लेखामध्ये त्यांनी त्यांच्या आईची ओळख करून दिली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी लग्न झाल्यापासून घरातील सर्व जबाबदार्‍या स्वीकारणारी आई, ‘आपण लोकांशी इतके चांगले वागून आपल्या वाट्याला हे असे का आले?’ असा प्रश्न तिला कधीही पडलेला नाही. आपण जाणीवपूर्वक निवडलेला हा रस्ता आहे आणि त्यामध्ये हे धोके आहेत याची कुठेतरी खोलवर जाणीव तिला होती; पण आयुष्याच्या या टप्प्यावर थोडा तरी वेळ निवांतपणाने पतीबरोबर घालवता यावा, ही तिची इच्छा आता पूर्ण होणार नाही, याचे शल्य मात्र त्यांना आहे.

दुसरा भाग अंनिसच्या कामासंबंधी आहे. त्या भागाचे नाव आहे, ‘अंनिसच्या आघाडीवर’ तिसरा भाग ‘आरोपींच्या शोधात’ म्हणजे डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या तपासासंबंधी आहे, तर चौथ्या ‘साधना आणि परिवर्तन’ या भागात डॉ. दाभोलकरांच्या अंनिस सोडून इतर कामाविषयीची लेख आहेत. ‘कायदा झाला डॉक्टर!’ हा लेख आणि ‘समाजकेंद्री असणे’ हा दुसरा लेख म्हणजे हयात नसलेल्या डॉक्टरांशी केलेले स्वगत आहे. या लेखामध्ये डॉक्टर आपल्यात नसल्याचे दुःख आणि त्याचबरोबर डॉक्टरांच्या मागं प्रयत्नपूर्वक त्यांचं अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद या दोन्ही गोष्टी दिसून येतात.

‘अंनिसच्या आघाडीवर’ या प्रदीर्घ भागामध्ये जादूटोणाविरोधी कायद्याचा इतिहास याबरोबरच नरबळी, गप्प बसा संस्कृती, आरोग्यव्यवस्था व अंधश्रद्धा, जातपंचायतीला मूठमाती, लोकशाही विवेकाची वारी, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, मदर तेरेसा चमत्कार, बुवाबाजी आणि विवेकाची प्रकाशबीजे असे विविध विषयांवरील लेख आहेत.

नरबळीबद्दल लेखक म्हणतात, संत तुकारामांपासून ते गाडगे महाराजांपर्यंत आणि महात्मा फुलेंपासून ते प्रबोधनकार ठाकरेपर्यंत प्रबोधनाचा आणि धर्मचिकित्सेचा जाज्वल्य वारसा असलेल्या महाराष्ट्रामध्ये असे का घडते आणि ते टाळण्यासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार केला पाहिजे. गप्प बसा संस्कृतीत ‘बुवाबाजीचे पीक’ या लेखामध्ये त्यांनी रामरहीम, आसाराम, रामपाल, राधे माँ अशा बुवांचा आढावा घेतला असून ते म्हणतात, “शोषण करणार्‍या अशा भोंदूबाबांच्या विरोधात अधिक कठोर स्वरुपातील जादूटोणाविरोधी कायदा देशपातळीवर लागू केला पाहिजे.”

‘आपण कोणत्या बाजूचे’ या लेखामध्ये महिलांना मंदिरामध्ये मिळणार्‍या दुय्यम वागणुकीची चर्चा केली असून धर्मचिकित्सेची गरज स्पष्ट केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्याबद्दल म्हणतात, “खर्‍या सोन्याला आगीचे भय नसते. अग्निपरीक्षेत धातू जळून गेला तर ते सोने नव्हते, मग त्यात दुःख करण्यासारखे काहीच नाही आणि जर ते खरेच सोने असेल तर ते आगीमध्ये देखील तावून-सुलाखून निघेल म्हणून आपण चिकित्सेला घाबरता कामा नये.”

त्यापुढचा लेख काळाराम मंदिर ते शनि शिंगणापूर व्हाया पंढरपूर सत्याग्रह हा असून त्यामध्ये विविध अंगाने विचार केलेला दिसतो. हा कालखंड धर्माच्या नावावर राजकारण आणि मानवी भावनांचे कट्टरीकरण करण्याचे प्रयत्न सुरू असलेला कालखंड आहे. अशा अवघड कालखंडात संविधानाच्या मूल्यांना धरून विवेकी विचाराने आणि संघटितरित्या चालवलेले लढे यशस्वी होऊ शकतात हा विश्वास वरील लढ्यामधून मिळतो. शनि शिंगणापूरची नाळ त्यांनी हिंदू कोड बिलाच्या लढाईशी जोडली आहे. काळाराम मंदिर सत्याग्रहाबद्दल बोलताना बाबासाहेब म्हणतात, ‘मंदिरप्रवेशाने तुमचे सर्व प्रश्न सुटतील, असे मुळीच म्हणता येणार नाही. आपल्या प्रश्नाचे स्वरूप व्यापक आहे ते राजकीय-सामाजिक-धार्मिक-आर्थिक-शैक्षणिक अशा स्वरुपाचे आहेत; पण काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हे उच्चवर्णीय हिंदू मनास एक प्रकारचे आवाहन आहे. हिंदू आपल्यासारख्या माणसाला माणूस म्हणून किंमत देणार आहेत की नाही? आम्हाला माहीत आहे, मंदिरात दगडाचा देव आहे, त्याचे दर्शन झाल्याने व त्याची पूजा केल्याने आमचा प्रश्न सर्वस्वी सुटणार नाही. आजचा सत्याग्रह हा हिंदूंच्या मनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. अलिकडच्या काळात हाजी अली दर्गामधील प्रवेश, शनिशिंगणापूर चौथर्‍यावर प्रवेश आणि शबरीमला मंदिरातील प्रवेश अशा तीन प्रमुख घटना दिसून येतात.

1952 साली झालेल्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शेकडो नव्हे, लाखो महिलांनी आपले स्वतःचे नाव लावण्याऐवजी अमुक-तमुकची बायको म्हणून नाव लावले होते. नवर्‍याला आपले नाव स्वतंत्रपणे लावलेले चालणार नाही, याची त्यांना खात्री होती. तिथपासून ते 60 वर्षांमध्ये असे बदल झाले की, स्त्रियांना प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी समानतेची वागणूक मिळावी म्हणून महिलाच लढताना दिसतात आणि धर्माच्या नावावर त्याला होणारा विरोध आज थांबला नसला, तरी त्याची प्रतवारी बदलली आहे, याचे कारण समाजातील बदलती सामाजिक प्रमाण मूल्ये. आज स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य प्रमाण मूल्य म्हणून स्वीकारले जाताना दिसत आहे; पण या पलिकडे एक अवघड प्रश्न शिल्लक राहतोच तो म्हणजे धर्माद्वारे स्त्रियांचे जे बेमालूमपणे शोषण केले जाते, त्यामधून त्या कशा बाहेर पडतील? संविधानाला अभिप्रेत असलेला समताधिष्ठित समाज अस्तित्वात यावा, यासाठीच हा प्रवास असाच चालू राहायला हवा.

‘आम्ही कासवाचे बळ आणले आहे,’ या लेखामध्ये साधना साप्ताहिकाच्या प्रगतीचा आढावा घेतला आहे. डॉ. दाभोलकरांनी ‘साधने’ची घडी व्यवस्थित बसवली. त्याचा विकास आज होताना दिसतो आहे. ‘परिवर्तनाची पंचविशी’ हा लेख सातार्‍यामधील परिवर्तन संस्थेसंबंधी आहे. परिवर्तन म्हणजे जाणीवपूर्वक घडवून आणलेला बदल. ही संस्था गेली 25 वर्षेव्यसनमुक्तीचे काम करते. आता मानसिक आरोग्याचे कामही त्यांनी हाती घेतले आहे. या कामासंदर्भात सुरू केलेला ‘इन्सेन्स’ प्रकल्प किती महत्त्वाचा आहे, ते प्रत्यक्ष लेखामध्येच वाचले पाहिजे. मनोरुग्णांच्या समस्या सोडवणे, त्यांचे पुनर्वसन, समुपदेशन, गावपातळीवर मानसिक आरोग्यसेवा यांची सविस्तर माहिती त्यात दिली आहे.

डॉक्टरांच्या मागे, त्यांनी सुरू केलेले सर्व काम कोणत्या टप्प्यावर आहे, याचा आढावा या पुस्तकात आला आहे. कार्यकर्तेकुठेही कमी पडले नाहीत, हे पाहून काम बंद पाडण्याचे खुन्यांचे मनोरथ धुळीला मिळाल्याचे स्पष्ट होते.

जातपंचायतीच्या मनमानीविरोधात अंनिसने प्रयत्नपूर्वक ‘सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा’ करून घेतला. त्याची माहिती देताना लेखक म्हणतात, “प्रस्तावित नियम केवळ सामाजिक बहिष्काराच्या बाबतीत असून, जातपंचायत किंवा गावकीच्या घटनाबाह्य अस्तित्वाविषयी हा अधिनियम फारच थोडे दिशादिग्दर्शन करतो; म्हणून अधिनियमाचे नाव केवळ ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियम 2015’ असे न ठेवता ते बदलून ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार गावकी आणि जातपंचायत प्रतिबंधक अधिनियम 2015’ असे करायला हवे. हे काम केवळ कायद्याने होईल असे नाही. कायद्याच्या जोडीला प्रबोधनाचीही गरज आहे. आजपर्यंत अंनिसने 11 जातपंचायती बरखास्त करण्यात यश मिळवले आहे, तरी अजूनही महाराष्ट्रात शेकडो जातपंचायती आणि गावक्या अस्तित्वात आहेत.”

या विभागात पुढे धर्माचा राजकारणासाठी वापर, धर्मांधांचा क्रूरपणा, अनधिकृत प्रार्थनास्थळांचे बांधकाम, यज्ञाचा फोलपणा, मध्य प्रदेशामध्ये मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळामध्ये कॉम्प्युटर बाबा, भय्यूजी महाराज, नर्मदानंदजी, हरिहर आनंदजी आणि पंडित योगेंद्र महंत यांना राज्यमंत्रिपदाचा दिलेला दर्जा, शिफु सनकृती या नावाखाली तरुण मुलींना केलेले टार्गेट, तिहेरी तलाक आणि समाज बदल, मुस्लिम सत्यशोधक मंडळाला बळ देण्याची गरज, मदर तेरेसाचा चमत्कार आणि संतपद, व्हॅटिकनमधील बुवाबाजी आणि ‘दाभोलकर ते पानसरे व्हाया तुकाराम’ या रिंगण नाटकाचा प्रयोग करतानाचे अनुभव अशा विविध विषयांवर चर्चा केलेली आहे.

यापुढील विभाग आहे ‘मारेकर्‍यांच्या शोधात!’ यामध्ये ‘आम्ही सारे दाभोलकर’ ही कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली भावना, ‘गोळीने विचार मारता येतात का?’ हा सनातन प्रश्न, डॉ. दाभोलकरांचा खून झाला त्या पुलावर सुरू असलेली आंदोलने, पोलीस तपास आणि कोर्टाचे कामकाज, ‘हिंसेला नकार मानवतेचा स्वीकार’ हे अभियान याबरोबरच “आपली मुले हिंसक का होत आहेत?” अशा विविध विषयांवर चर्चा आहे. त्यात लेखक म्हणतात, ‘विवेकी विचारांची ताकद त्या विचारांचा प्रसार करणार्‍यांना जितकी कळलेली असते, त्यापेक्षा अधिक त्यांच्या विरोधकांना कळलेली असते,’ या वाक्याचा प्रत्यय महाराष्ट्रात आणि कर्नाटकात घडलेल्या चार खुनांमधून येतो आहे. जगभर असे हल्ले सुरू आहेत, त्याची उदाहरणे लेखकाने दिली असून न्यायालयाने तपास केल्यावर तपासात थोडीफार हालचाल सुरू झाली, असे निरीक्षण लेखकाने नोंदवले आहे. त्याचबरोबर पोलीस तपासामध्ये दिसून आलेल्या त्रुटी म्हणजे सीबीआयचा अधिकारी हिंदी भाषिक आणि कागदपत्रे मात्र मराठीत, तपासासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ सीबीआयला वर्षभर न मिळणे, फरारी आरोपी पकडता न येणे, न्यायालयाने पोलीस तपासावर ताशेरे मारणे या गोष्टी नोंदवल्या आहेत.

लेखकाने संघटनेमधील सहकार्‍यांचा उल्लेख अत्यंत आदराने आणि आपुलकीने शक्य त्या ठिकाणी केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याबद्दलची तळमळ पानापानांतून प्रतीत होते. समाजात घडणार्‍या बारीक-सारीक घटनांची त्यांनी नोंद ठेवली आहे आणि त्यावर आधारित अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून भाष्य केले आहे.

प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याने वाचलेच पाहिजे, अशा या पुस्तकाची किंमत फक्त 225 रुपये ठेवण्यात आली आहे.

पुस्तकाचे नाव : विवेकाच्या वाटेवर

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे

किंमत : रू. 225/-

पृष्ठे : 180

संपर्क : 9764147483