Categories
परिसंवाद

उत्तर महाराष्ट्र परिसंवाद : महान भारतीय – डॉ.बाबासाहेब आंबेडकर

ऑक्टोबर - २०१२

महाराष्ट्र अंनिस धुळे शाखेतर्फे आयोजित ‘महान भारतीय – डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या उत्तर महाराष्ट्र स्तरीय परिसंवादामध्ये बोलताना जळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक अभ्यासक व विश्लेषक प्रा. शेखर सोनाळकर यांनी सांगितले की, महामानव बाबासाहेबांना जातीअंतासाठी लढाई, स्त्रीमुक्तीसाठी चळवळ आणि वर्गव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी संघर्ष करणे अभिप्रेत होते. त्यामुळे आपण सर्व भारतीयांनी त्यासाठी कटिबद्ध होणे हीच बाबासाहेबांप्रति कृतज्ञता होऊ शकेल. दृकश्राव्य माध्यमांनी नुकत्याच आयोजित केलेल्या महान भारतीय ठरविण्याच्या जनमत चाचणीत दोन कोटी भारतीयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महानतेवर शिक्का मोर्तब केले. त्याचे मोठे स्वागत दलित समाजाकडून झाले. दलितेतर समाजात बाबासाहेबांना मानणारा व विचार अनुयायीत्व वर्ग असला तरी त्यांच्याकडून त्याची विशेष दखल घेतली गेली नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या मोठेपणाची उजळणी करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दलचा कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासाठी ‘महान भारतीय- डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ परिसंवाद धुळे शाखेतर्फे रविवार दि. 9 सप्टेंबर रोजी धोंडो शामराव गरुड वाचनालय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्राचार्य डॉ. पी.डी. देवरे (नाशिक) उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून जळगावचे ज्येष्ठ सामाजिक विचारवंत प्रा. शेखर सोनाळकर, धुळ्यातील सुप्रसिद्ध नाटककार प्रा. अनिल सोनार आणि ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा. सोनाळकरांनी बाबासाहेबांच्या विविध वैशिष्ट्यपूर्ण व पायाभूत योगदानाच्या नोंदणींची मांडणी केली. कृषिप्रधान समाजव्यवस्था असणार्‍या आपल्या देशाच्या विकासासाठी भारताचा अर्थशास्त्रीय अंगाने अभ्यास करणारे बाबासाहेब हे दादाभाई नौरोजींनंतरचे दुसरे तज्ज्ञ नेते होते. शेतीची मालकी सरकारची असावी आणि त्यातल्या नफ्याचा डिव्हीडंट सरकारने शेतकर्‍यांना द्यावा इथपासून ते श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व अबाधित ठेवताना कामगारांच्या प्रश्नासाठी संघटीत प्रयत्न करण्यापर्यंतची भूमिका बाबासाहेबांनी घेतली होती. त्यामुळेच त्यांनी राजकीय पक्ष स्थापन करताना प्रथम स्वतंत्र लेबर पार्टी असे नामानिधान द्यायचा विचार केला होता. औद्योगिकरणामध्ये मूलभूत उद्योग सरकारी मालकीचे, आवश्यक उद्योग सरकारी नियंत्रणात; पण खाजगी मालकीचे पूरक उद्योग खाजगी मालकीचे असावेत, अशी त्यांची अर्थविषयक भूमिका होती.  वित्तीय संस्था आणि विमा कंपन्यांच्या राष्ट्रीयकरणाचा आग्रह बाबासाहेबांनी कायम ठेवला होता. समाजसुधारकाची व्यापक भूमिका महात्मा जोतिराव फुल्यांनंतर घेणारे बाबासाहेब हे द्रष्टे नेते होते. सामाजिक सुधारणांसाठी प्रयत्नरत असणार्‍या सत्यशोधकी चळवळीतील जवळकर आणि आरोग्य चळवळीचे प्रवर्तक डॉ. र.धो. कर्वे यांचे वकील म्हणून बाबासाहेब खंबीरपणे उभे राहिले होते. ‘अ‍ॅनिलेशन ऑफ कास्ट’ मधून जातिअंताची तर्कशुद्ध भूमिका मांडणार्‍या बाबासाहेबांनी महाडच्या आणि काळाराम मंदिराच्या सत्याग्रहातून धर्मश्रद्धेविरुद्धचा प्रतिकार उभा केला. जगातल्या अभिजन वर्गाला कायम अप्रूप व आकर्षण वाटलेला ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ विचार सांगणारा बौद्ध धर्म लाखोंच्या सहभागाने स्वीकारुन बाबासाहेबांनी जगात इतिहास घडविला आहे, असे प्रा. शेखर सोनाळकरांनी व्यक्त केले.

            परिसंवादाच्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. पी. डी. देवरेंनी, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेतृत्त्वांच्या योगदानाचा  तुलनात्मक विचार  मांडला. म. गांधींच्या  नेतृत्त्व प्रभावापासून वेगळे राहून भरीव योगदान देणार्‍यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अग्रस्थानी आहेत; तर गांधी विचारव्यवहारांशी मतभेद असून देखील सुभाषचंद्र बोस, मानवेंद्रनाथ रॉय आणि सावरकरांना गांधी नेतृत्त्वाचा प्रभाव पूर्णपणे टाळता आलेला नाही.  स्वातंत्र्योत्तर भारताच्या निर्मितीसाठी स्वातंत्र्य चळवळीतील धुरीणांनी वेळोवेळी मांडलेल्या  परिवर्तनाच्या विचारांचे आणि संकल्पनांचे धुरीणत्व करण्याचे योगदान संविधानात बाबासाहेबांनी दिलेले दिसते. त्यासाठी पूर्वीच्या समाजव्यवस्थेचा आधार असणारी ‘विषमता’ नाकारुन ‘मानवतावाद’ हे प्रधान सूत्र भारतीय समाजव्यवहारात रुजवण्याचा त्यांचा आग्रह डॉ. आंबेडकरांचा कायम राहिला. औद्योगिकरणामुळे पश्चिमेकडील सर्व काही चांगले या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर विवेकानंद, टिळक, बंकीमचंद्र यांच्यानंतर भारतीयत्वाचे सत्व आणि महत्त्व रुजवण्यामध्ये डॉ. बाबासाहेबांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण राहिले आहे.  गांधी व आंबेडकर यांच्यातील सतत मांडल्या जाणार्‍या द्वंद्वाच्या पार्श्वभूमीवर खरं म्हणजे दोघांनी एकमेकाला समजून घ्यायचा व दुरुस्त करायचा प्रयत्न केलेला दिसतो. समता,स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय संकल्पनांना भारतीय संविधानाच्या मूल्य आशयामध्ये महत्त्वपूर्ण स्थान बाबासाहेबांनी दिले आहे.

ज्येष्ठ नाटककार प्रा. अनिल सोनार यांनी ‘निळ्या घुमटाखालील मराठी दलितेतर कवी’ या भूमिकेतून बाबासाहेबांच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या वाङ्मयीन चळवळीचा मागोवा घेतला. त्यातील प्रामुख्याने दलितेतर मराठी कवींचा आढावा घेताना 80 पेक्षा जास्त कवींनी बाबासाहेबांवर थेटपणे वा त्यांच्या विचारप्रवाहाची अभिव्यक्ती आपल्या कवितांतून केल्याचे सांगितले. जगात कार्ल मार्क्सच्या विचारसरणीचा प्रभाव असणारा स्वतंत्र वाङ्मयीन विचार प्रवाह निर्माण झाला. तसेच भारतात व मुख्यत: मराठी भाषेत दलित साहित्याच्या मुळे डॉ. बाबासाहेबांचा जीवन-विचार वृद्धिंगत झालेला दिसतो.  बाबासाहेब महामानव म्हणून जसे सर्वमान्य झाले, तसेच आपल्यातला माणूस आपल्यासाठी आणि आपल्याबरोबर असणार्‍या नायकांमधलाच ‘प्रतिनायक’ आहे याची जाणीव कायम राहणारी आहे. गांधी, साने गुरुजी आणि आंबेडकर यांच्या अनुयायीत्वातील साधर्म्य व अंतर्विरोध मांडताना प्रामाणिक पुरोगाम्यांचा फजितवाडा मांडणारी ‘माझा पत्ता’ या कवितेच्या काही ओळी प्रा. सोनारांनी या प्रसंगी सादर केल्या. करुणा व प्रज्ञेतून निर्मिती ठरलेले संविधान हे काही बाबासाहेबांचे अंतिम कार्य नव्हते; तर मनुस्मृति टाकण्याची हिम्मत दाखवून जातीधर्माच्या पलीकडे नवसमाज निर्मितीचे धैर्य देण्याचे काम बाबासाहेबांनी केले आहे.  भारतीय संस्कृतीतील कृष्णानंतर शोषणमुक्त समाज उभारणीसाठी बंड करण्याचे काम आंबेडकरांनी केलेले दिसते, त्यामुळे अहिंसेचा पुरस्कार करणार्‍या बाबासाहेबांच्या अनुयायांनी जनमत चाचणीतून भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याचा संदेश जगाता दिला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी केले.

परिसंवादाची भूमिका पसंद करताना महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी बाबासाहेबांकडून मिळालेल्या विचारवारशाचे भावबंध स्पष्ट केले. विश्वमानव, घटनाकार, बोधीसत्व, दलितोद्धारक, समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ, धर्मांतरकार, जातीअंतांच्या संघर्षाचे प्रवर्तक आणि अत्यंत व्यासंगी अभ्यासक विद्यार्थी असणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाबद्दल कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यातून सामाजिक अभिसरणासाठीचा संवाद आम्ही करु इच्छितो. त्यातून भविष्यात भारतीयांना पददलितांचे जगणे सन्माननीय करण्याचा मानवअधिकार मिळणे शक्य होईल, असे अपेक्षित आहे. डॉ. बाबासाहेबांना नव्याने अभ्यासण्याची, प्रेरणा घेण्याची आणि कृतीशील होण्याची आवश्यकता यानिमित्ताने परिसंवादात व्यक्त करण्यात आली. परिसंवादाचे सूत्रसंचलन महेंद्र शिरसाठ यांनी केले. धुळे शाखेतर्फे संयोजन करताना ए.ओ. पाटील, प्रा. दिपक बाविस्कर, प्रा. भूषण पाटील, के. एन. साळुंके, सुरेश थोरात, प्रदीप सोनवणे आदींनी कष्ट घेतले.

-प्रा. दीपक बाविस्कर