‘लताच्या नाजूक भानामतीची गोष्ट’ या लेखावरील वाचकांच्या प्रतिक्रिया
शहाजी भोसलेचे उपचार योग्यच!
लताच्या भानामतीची नाजूक गोष्ट या कथेतील लता ही एक ग्रामीण भागातील, कमी शिकलेली, काही अंधश्रद्धा बाळगून असलेली तसेच कोणालाही फसवू नये या विचाराची 19 वर्षांची एक तरूणी आहे.
तारूण्याच्या भरात वासनेच्या आहारी जाऊन तिचे तिच्या चुलत भावाशी संबंध आलेले आहेत. लग्नानंतर ही लता वरचेवर माहेरी जाऊन सुरेशशी शरीरसंबंध ठेवत होती. त्यामुळे तिचे अज्ञानाने काही समज होते, की पोटातील बाळ हे सुरेशचेच असावे, तसेच एका महाराजाने तुला मुलगी होणार असेही तिला सांगितल्याने ती आपणास मुलगी होणार असे मानून होती. ती तिची अंधश्रद्धा व अज्ञान होते. तसेच मी चांगल्या माणसाला फसवत आहे अशी तिची समजूत होती व ती तिला नको होती.
यातून मार्ग काढण्यासाठी, गर्भ नष्ट करण्यासाठी भानामतीचे विविध प्रकार ती करीत होती. अंगात येणे, गडागडा लोळणे, दातखिळी बसणे इ. गडागडा लोळण्याने गर्भपात होईल असे तिला वाटत होते व आपली सुटका होईल असा तिचा गैर समज होता. त्यामध्ये तिच्या जीवाला धोका आहे हे तिला माहीत नव्हते.
भोसले यांना तिला या संकटातून सोडवावयाचे होते. तिला व तिच्या बाळाला वाचवावयाचे होते. त्यासाठी तिच्या गैरसमजुती, अंधश्रद्धा, अज्ञान दूर करावयाचे होते. त्याशिवाय ती गर्भपात करण्यापासून दूर होणार नव्हती.
तिला वैज्ञानिक माहिती देऊनही गर्भपातापासून दूर करता आले असते. परंतु ती कमी शिकलेली, अंधश्रद्धाळू असल्याने अवघड होते. म्हणून भोसले यांनी तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन गर्भवतीच्या अंगात देव आल्यास तिला होणारे मूल हिजडा होते ही अवैज्ञानिक गोष्ट सांगून, तिला घाबरवून गर्भपातापासून दूर केले. व तिची गुपिते गुपितच राहतील याचा विश्वास दिला व तिला गर्भपातापासून दूर केले व बाळ व लता या दोघांना जीवदान दिले.
यामध्ये तिला फसवण्याचा हेतु नव्हता. व ती सज्ञानी, 19 वर्षांची असल्याने व भोसले यांचे अनुभव चांगले आल्याने तिच्यावर तेच संस्कार होण्याची शक्यता नाही. म्हणून भोसले यांचे उपचार योग्य होते.
-डी.एन.मगदूम, सातारा.
सत्य वदवण्यासाठी असा अवैज्ञानिक प्रश्न विचारणे योग्यच!
आपल्या एप्रिल 2013 च्या अंकातील ‘लताच्या भानामतीची नाजूक गोष्ट’ वाचली. शेवटी शहाजी भोसले यांनी विचारलेल्या अवैज्ञानिक प्रश्नाबद्दल मत विचारले होते. त्याबद्दल स्वत:हून अवैज्ञानिक वागणार्यांना व ज्यांचा विज्ञानावर विश्वास नाही किंवा विज्ञान माहिती नाही अशांना अशाप्रकारे धमकावणारा, घाबरवणारा प्रश्न विचारणे आवश्यकच आहे.
अवैज्ञानिक व घाबरवणार्या प्रश्नाची पार्श्वभूमी महत्वाची आहे. प्रश्नकर्ता विज्ञाननिष्ठ आहे त्याला अशा प्रश्नाची त्या परिस्थितीत आवश्यकता होती अन्यथा सत्य बाहेर आले नसते त्यामुळे सत्य वदवण्यासाठी त्यांनी प्रश्न फार चांगल्या प्रकारे वापरला आहे. Because Diamond cuts diamond या प्रमाणे शहाजी भोसले यांनी केलेला प्रयत्न अत्यंत चांगला आहे.
अंनिसच्या कार्यासाठी सदिच्छा! मी अंनिवाचा इतका सक्रीय कार्यकर्ता नाही परंतु माझ्या दैनंदिन जीवनात कॉलेजमध्ये अंधश्रद्धेला सहकार्य करणारा एकही प्रसंग होऊ देत नाही. असो.
-प्राचार्य, डॉ.एस.के.पाटील, सांगोला, जि.सोलापूर
शहाजीचा प्रश्न योग्यच!
आपला एप्रिल 2013 चा अंक वाचला. त्यातील पान नं.32 वर “लताच्या भानामतीची नाजूक गोष्ट” वाचली. शेवटी वाचकांसाठी एक प्रश्न विचारला आहे. शहाजीने असा अवैज्ञानिक आणि घाबरणारा प्रश्न विचारणे योग्य होते का?
लताला अंधश्रद्धेच्या रोगानी पछाडले होते हे सत्य आहे. तिला तज्ञ व नामांकीत डॉक्टरांनाही दाखविले होते. तसे हकीमही काही कमी झाले नव्हते. तरी काही गुण आला नाही. मग शहाजीने मनाची शकल जोडून तिला सांगण्यात आले की, जर तू असं अंगाला आळ्या-पिळ्या मारत भुंकत बसशील तर तुझ्या पोटाला जन्माला येणारं बाळ ‘नपुंसक’ जन्माला येईल! असं म्हणताच लता शुद्धीवर आली. कारण तिला चांगले बाळ पाहिजे होते. म्हणून अवैज्ञानिक उपाय योग्यच वाटतात.
-भाऊराव सोमवंशी, मुरूम, जि.लातूर
अशा नाजूक प्रसंगी अवैज्ञानिक प्रश्न विचारणे योग्यच!
एप्रिल 2013 च्या अंकातील ‘शोध भानामतीचा’ या सदरात शहाजी भोसले सरांनी लताच्या भानामतीची नाजूक गोष्ट या शिर्षकाखाली लताच्या भानामतीच्या नाजूक गोष्टीचा शोध लावला आणि तिच्या भानामतीचे रहस्य उलगडले ते अगदी योग्यच आहे असे म्हणावे लागेल, ‘जिथे नाही ज्ञान तेथे काय करी विज्ञान’ या न्यायाने लतास विज्ञानवादी प्रश्न करून तिने तिच्या भानामतीचे गूढ भोसले सरांना खचितच सांगितले नसते.
आपले मासिक वैज्ञानिक मनोवृत्तीचे जरूर आहे. समाजात विज्ञानवादी दृष्टिकोन रूजावा हे आपल्या मासिकाचे ध्येय आहे. परंतु अशा नाजूक प्रसंगी अवैज्ञानिक आणि घाबरवणारा प्रश्न विचारून जर लता व तिच्यासारखे असे कैक कुटुंब पुढील अनर्थापासून बचावत असतील तर ते योग्यच!
-भालेराव उत्तम एकनाथ, कोळनूर, जि.लातूर
लताने सांगितलेली माहिती प्रसिद्ध करणे चुकीचे
आपल्या एप्रिल 2013 च्या अंकातील लताच्या भानामतीची नाजूक गोष्ट वाचली. आपण केलेल्या आवाहनानुसार उत्तर देताना नवीन शंका प्रश्न आपणास विचारत आहे.
अंगात येवून घुमणार्या लताबद्दल माहिती घेण्यासाठी शहाजी भोसले व अरुणा तिच्या घरी जावून संपूर्ण परिवाराकडून माहिती घेतली. त्याचबरोबर घरगडी व समवयस्क असणारी शेजारील स्त्री यांच्याकडेही विचारणा केली. त्यानंतर त्या दोघांनी लताची भेट घेतली. तिच्याकडून माहिती घेण्यापूर्वी तिने सर्व माहिती खरी सांगावी, ज्यामुळे तिच्यावरील संकट दूर करता येईल. त्याबरोबरच तुझ्याकडून मिळालेल्या माहितीची वाच्यता, आम्ही दोघेही कोठेही करणार नाही, अशी प्रांजळ कबुलीही दिली. या ठरावानंतर लताने सर्व माहिती खरेपणाने दिली.
खरी माहिती काढण्यासाठी अवैज्ञानिक किंवा घाबरण्याचा प्रश्न विचारणे गरजेचे आहे. ती चूक नाही. यानंतर शहाजी भोसले व अरूणा हे दोघेही याबद्दल कोठेही वाच्यता न करणेसाठी बांधील झाले.
मग ही खरी माहिती आपणापर्यंत कशी आली? कदाचित कोणाच्यातरी हक्काने ती बातमी आपणापर्यंत आली असेल असे मानूया. ती बातमी आपण प्रसिद्ध न करता पॅकबंद करावयास पाहिजे. कारण शहाजी भोसले व अरुणा यांच्याबरोबर आपणही त्याची वाच्यता न करणेसाठी बांधील झाला आहात. हे तुमच्या लक्षात यावयास पाहिजे होते. अशी आमची शंका आहे.
– मगन हसन तांबोळी, मु.पो. दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली.
(लताच्या भानामतीची नाजूक गोष्ट हा लेख प्रसिद्ध करताना व्यक्तींची नावे, गावाची नावे संपूर्णपणे बदलली आहेत………………………………………………. ) – संपादक