Categories
प्रतिसाद

वाचणारे म्हणतात

जुलै - २०१२

            मी गेल्या तीन चार वर्षांपासून वार्तापत्राचा नियमित वाचक आहे. अंक नेहमी अतिशय वाचनीय व वैचारिक असा असतो. या अंकात अनेक प्रश्नांची उकल व जनप्रबोधन करण्याकरता एखाद्या विषयासंदर्भात विशेषांक काढण्यात येतो. व त्यामध्ये त्या विषयासंदर्भात अनेक लेख असतात. याच प्रकारे एक संपूर्ण विशेषांक सर्प या विषयावर काढावा. त्यामध्ये सापाविषयी गैरसमजुती, अंधश्रद्धा, साप चावल्यानंतरचे प्राथमिक उपचार, बुवाबाबाकडून साप उतरविण्याचे अघोरी उपचार, सापाबद्दलची शास्त्रीय माहिती, सर्पमित्रांच्या मुलाखती इत्यादीपर माहितीपर लेख द्यावेत, अशी संपादक मंडळाला विनंती आहे.

-अमरदीप दगडू पवार, धुळे


            आपला मे 2012 चा अंक अतिशय छान होता. त्यातील गौतम निकम यांचा ‘अपराजिता रमा’ हा लेख मला फार आवडला. मी निगडी येथील सावरकर वाचनालयात आपला अंक नियमित वाचते. जून महिन्यात निगडीमध्ये झालेल्या डॉ.दाभोलकरांचा मुक्त चर्चेचा कार्यक्रम फारच प्रेरणादायी होता. मला एक सुचवावेसे वाटते की, शहरी भागातल्या लोकांच्या अंधश्रद्धा जरा वेगळ्या आहेत. उदाहरणादाखल 1)विशिष्ट वारी कोणालाही पैसे न देणे. 2)देवस्थानाला भरमसाठ देणग्या देणे. पण मोलकरणीला 100 रू.ची पगारवाढ न देणे. 3)विशिष्ट राशींच्या महागड्या अंगठ्या बोटात घालणे. 4)मोठ्या मंदिरात प्रसाद दिला जात असतानासुद्धा परत वेगळे लाडू किंवा पेढे घेऊन ते वाटत बसणे. 5)नास्तिक लोकांना ते आगाऊ व मूर्ख आहेत अशी नावे ठेवणे. कृपया वरील अंधश्रद्धेबद्दल आपण काहीतरी लिखाण आपल्या वार्तापत्रातून प्रसिद्ध करावे.

-प्रतिभा पाटील, पुणे


            सध्या नाशिक येथे ‘गो-पियुष’ या नावाने औषधी कॅप्सुल विकल्या जातात. एजंटांच्या म्हणण्यानुसार सर्व रोगांवर गुणकारी असणार्‍या या कॅप्सुल्स गाईच्या कच्च्या दुधापासून बनविल्या जातात. प्रतिकार शक्ती वाढवून सर्व रोग बरे केले जातात. या 10 कॅप्सुल्सची किंमत 1300 रू. आहे. मला हे सर्व लोकांच्या आरोग्याशी खेळल्यासारखे वाटते. याबाबत लोकांची होणारी फसवणूक थांबवावी, ही विनंती.

-अर्चना केंदळे, सोलापूर


            पिंपरी चिंचवड येथे अंनिसचे राज्य कार्यकारिणी मोठ्या दिमाखात व यशस्वीरित्या पार पडली. हे समक्ष पाहून व भाग घेऊन आनंद वाटला. हे प्रेरणादायी काम पुन्हा करण्याची जिद्द व उर्मी मनात आली. या बैठकीमध्ये वार्तापत्राचे अंक पोस्टातून मिळत नसल्याच्या बर्‍याच कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या. पोस्ट ऑफीस व पोस्टमनच्या कामाविरूद्ध तक्रार करण्यास बैठकीमध्ये आवाहन केले गेले. हे ऐकून थोडा खेद वाटला. कारण मी पोस्ट खात्यात अधिकारी म्हणून पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी(सिंधुदूर्ग, गोवा, रत्नागिरी, सांगली, सातारा, पंढरपूर, नगर, पुणे) काम केल्याने खरी वस्तुस्थिती(वास्तव) हे मी नमूद करू इच्छितो.

            पोस्ट खात्याशी संलग्न असलेला आर.एम.एस. म्हणजे रेल्वे मेल सर्व्हिस हा एक स्वतंत्र विभाग प्रत्येक पोस्टल विभागाशी जोडलेला असतो. या आर.एम.एस.च्या विभागातून साध्या टपालाची, रजिस्टर टपालाची, स्पीड पोस्ट टपालाची विभागवार पोस्ट ऑफीसच्या यादीनुसार वेगवेगळी छटाई(सॉर्टींग) 24 तास चालू असते. सध्या तेथे असलेला अपुरा सॉर्टींग क्लार्कचा तुटवडा व आर.एम.एस.कर्मचार्‍यांच्या वेगवेगळ्या युनियनचा सर्व कर्मचार्‍यांच्यावर प्रभाव आहे. ओव्हरटाईमची ऑर्डर झाल्याशिवाय कर्मचारी सॉर्टींगच्या कामाला हातच लावत नाहीत. आर.एम.एस.प्रशासकीय उपअधिकार्‍यांचा कर्मचार्‍यांच्यावर प्रभाव कमी पडतो. त्यामुळे सर्वच टपाले, साधे अंक, मासिके, साप्ताहिके सॉर्टिंग न होता आर.एम.एस.ऑफीसमध्ये कित्येक दिवस पडून असतात. वेळ मिळाल्यानंतर कधीतरी सॉर्टींग झाल्यानंतर संबंधित पोस्ट ऑफीसकडे अंक बटवड्यासाठी थैलीतून पाठविले जातात. त्यानंतर त्या पोस्ट ऑफीसमधले पोस्टमन दोन दिवसात अंकाचे वितरण उरकत असतो. यात पोस्टाची काही चूक नाही. चूक आहेत ती आर.एम.एस.विभागाची! (माझ्या स्वत:चे फेबु्रवारी, मार्च, एप्रिल 2012 चे अं.नि.वा.चे अंक मी स्वत: आर.एम.एस.विभागात जाऊन ढिगार्‍यातून शोधून काढले आहेत.) तेव्हा तक्रार करायची झाल्यास संबंधित ‘पोस्ट मास्टर जनरल(पी.एम.जी.)’ यांच्याकडे करावयास सभासदांना कृपया आपल्या वार्तापत्रातून सांगावे, ही विनंती.

-रमेश दिलपाक, प्राधिकरण, पुणे-44